स्वतःची पायवाट!!

Submitted by १८तन्वी on 16 March, 2020 - 01:50

असावी स्वतःची एक पायवाट
मनातून जाणारी,स्वतःलाच दिसणारी,
स्वतःमध्येच रुळलेली अन स्वतःसाठीच असणारी...

नागमोडी वळणांनी अनंतापर्यंत जाणारी...
प्रत्येक वळणावर पुढच्या प्रवासाची उत्कंठा ताणणारी...

कडेला असावेत वाऱ्यावर डोलणारे शुभ्र नभांचे तुरे...
स्पर्श करताच विरघळून स्वप्नांच्या जगात नेणारे...

गर्द निळे अवकाश असावे...
मुक्तछंद जाणिवांचे, स्वअर्थांचे राजहंसी थवे दिसावे...

शांततेत ऐकू यावा स्वश्वासांचा सुरेल मल्हार...
तर कधी थिरकावा देह, होऊनि स्वतःच बेधुंद नृत्याविष्कार...

मधेच दिसावा नाजूक बकुळ सडा, तरलतेने शहारणारा
नजरेने स्पर्शताच, फुलपाखरू होऊन अंगभर नाचणारा...

कधीही चालावं कधीही थबकावं...
थकून पहुडता चांदण्यांचं आकाश दुलई होऊन अंगावर यावं...

सर्वांगाला मग व्हावा स्पर्श मायाळूसा त्या मृदेचा...
अन देहभर रोमांच उठावा तिच्या आश्वासक घट्ट सोबतीचा...

भेटावेत आठवणींचे लखलखणारे असंख्य काजवे...
त्या जादुई प्रकाशात विरून जावेत, मनाचे सगळे रूसवेफुगवे...

गरज नसावी कोण्या सोबतीची, मैत्री व्हावी कातरवेळेशी...
स्वतःनेच अनुभवावी सोबत कणाकणांची, क्षणाक्षणांची...

चालताना आलाच जर डोळे भरून श्रावण...
तर, ये माझ्या कवेत म्हणून यावा तव मातीतून हुंकार..
मग आसमंती भरून रहावा तो ओला मृदगंधार..

अश्या या वाटेवरती अनुभवावेत स्वत:चे मुक्त स्वानंदी क्षण...
परतावे मग सुसज्ज होऊनी जगण्या नेहमीचे रात्रंदिन...

---तन्वी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users