प्रमोशन

Submitted by कौस्तुभ_सृजन on 10 March, 2020 - 05:42

“अभिनंदन अविनाश! तुझ्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कंपनी तुला प्रमोशन देते आहे. तुझी निवड हि खास आपल्या चीफ एक्सेक्युटीव्ह ऑफिसर तर्फ़े करण्या आलेली आहे. या प्रमोशन नंतर तुला आपल्या कंपनीतर्फे संपूर्ण युरोप विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पुढच्या एका वर्षात कंपनीचा या विभागातील नफा तीस टक्क्याने वाढविण्याचे आव्हान तुझ्यासमोर असेल. तुझ्या सारखा अत्यंत हुशार, तरुण, तडफदार, कर्तबगार अधिकारीच हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकतो ह्याची कंपनीला जाणीव आहे आणि म्हणूनच तुझ्या नावावर या प्रमोशन साठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.” अविनाशच्या बॉसने त्याला हि बातमी त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून दिली.

हि बातमी ऐकताच अविनाशच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आपल्या कर्तृत्वाची योग्य दखल कंपनीने घेतली याबद्दल त्याला प्रचंड अभिमान वाटला. तो म्हणाला, “धन्यवाद सर ! कंपनीच्या अपेक्षांवर मी नक्की खरा उतरीन अशी मला खात्री आहे.”

"गुड गुड माय बॉय! " असे म्हणून बॉस पुढे बोलले. “आता या प्रमोशन नंतर तुला मागे वळून पाहायची गरजच नाही. या पोस्टसाठी तुला जवळपास प्रत्येक शनिवार, रविवार भारतात आणि यूरोपमध्ये दौरे करावे लागतील, मोठमोठ्या क्लाएंट्स बरोबर पार्टी, बिझनेस मिटींग्स, सेमिनार्स ह्यामध्ये तुझे सगळे वीकेंड्स आता खूप बिझी राहतील. याबरोबर तुला जग फिरायला मिळेल ते वेगळेच. सो आय विश यु ऑल द बेस्ट !”

शनिवारी सकाळची हि अविनाशची त्याच्या बॉस सोबत नेहमीची मीटिंग होती. तसे त्याचे ऑफिस सोमवार ते शुक्रवार पर्यंत असायचे. परंतु त्याच्या वाढलेल्या जबाबदारीमुळे तो शनिवार अर्धा दिवस ऑफिसमध्येच राहायचा. मीटिंग संपल्याबरोबर त्याने आईला फोन केला आणि बोलला "आई माझे प्रमोशन झाले! सांग बाबांना कि अविनाशने प्रमोशन मिळवले आणि स्वीकारलेदेखील.” त्याच्या बोलण्यातील कडवटपणा त्याच्या आईला लगेच जाणवला. परंतु त्याच्या आईने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि हि आनंदाची बातमी मी लगेच बाबाना कळवते असे ती बोलली.

अविनाशचे वडील एका मोठ्या बँकेत अधिकारी होते. सोमवार ते शुक्रवार ते सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यालयात असायचे. शनिवारी अर्धा दिवस कार्यालयाची वेळ होती पण त्याच्या वडिलांना तरी बऱ्याच उशिरापर्यंत काम असायचे. शनिवारी संध्याकाळी उशिरा बाबा घरी आले कि ते अविनाश आणि त्याच्या मोठ्या बहिणीला फिरायला घेऊन जायचे. कधी कधी पूर्ण कुटुंब बाहेरच जेवायचे. शनिवारचा तो उरलेला दिवस आणि रविवार पूर्ण दिवस मात्र त्याचे बाबा आपल्या कुटुंबाबरोबरच जास्तीत जास्त घालवायचे.

अविनाश त्यावेळी साधारण पंधरा वर्षांचा असेल आणि त्यावेळेस घरात फक्त बाबांच्या प्रमोशनच्याच गोष्टी होत होत्या. त्याने आईला फोनवर बोलताना ऐकले कि आता बाबांचे प्रमोशन होणार, ते अजून मोठ्या पदावर जाणार, त्यांचा पगार भरपूर वाढणार. आता पुढे अविनाशला आणि त्याच्या ताईला शिक्षणासाठी खूप पैसा लागेल तो आता या प्रमोशन मुळे मिळेल.

एकूणच बाबांचे प्रमोशन झाल्यावर जास्त मजा होणार होती म्हणून तो खूप उत्सुकतेने बाबांच्या प्रमोशनची वाट बघत होता. पण काही दिवसांनी अचानक घरात बाबांच्या प्रमोशनच्या गोष्टी बोलणे बंद झाले. एक दिवशी आई शेजारच्या काकुंशी बोलताना त्याने ऐकले कि बाबांनी स्वतःहून प्रमोशन नाकारले. अविनाशला हे ऐकून खूप वाईट वाटले. बाबानी प्रमोशन का नाकारले हे काही त्याला कळले नाही.
अविनाशच्या बहिणीने बीएससी, एमएससी केले आणि स्पर्धा परीक्षा देऊन ती पण एका बँकेत नोकरीला लागली.

अविनाशपण अत्यंत कामसू, हुशार, कर्तबगार होता. त्याला त्याच्या गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम विद्यालयात मध्ये प्रवेश मिळाला असता. परंतु ते विद्यालय दुसऱ्या मोठ्या शहरात होते आणि आपल्याला तो खर्च परवडणार नाही असे त्याच्या बाबांनी त्याला स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे अविनाशला त्याच्या मनाला मुरड घालून त्याच्या शहरातील विद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. पण हि गोष्ट त्याच्या मनाला फार लागली होती. आपल्या बाबांनी जर प्रमोशन घेतले असते तर पाहिजे आपल्याला त्या विद्यालयात प्रवेश घेता आला असता आणि त्यामुळे आपल्या प्रगतीची सर्व दारे खुली झाली असती हे त्याला स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे आपल्या प्रगतीच्या आड बाबांचे प्रमोशन न घेणे हेच कारण होणार होते. त्या दिवसापासून त्याला त्याच्या बाबांच्या प्रमोशन न घेण्याची चीड आलेली होती. जेव्हापण त्याच्या अभियांत्रिकी प्रवेशाचा विषय निघायचा तो आई बाबांसमोर हे बोलून दाखवायचा. त्याचे आई बाबा मात्र यावर काहीच बोलायचे नाहीत.

अभियांत्रिकीनंतर त्याने काळाची पावलं ओळखून व्यवस्थापनातील पदवी घेतली. खरेतर त्याला अमेरिकेतून हि पदवी मिळवायची होती. परंतु घरून त्यासाठी आवश्यक तेव्हढे आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे त्याला भारतातूनच हि पदवी मिळवावी लागली. बाबांचे प्रमोशन न घेणे पुन्हा एकदा त्याच्या प्रगतीच्या आड आलेले होते. आणि त्याचबरोबर त्याची त्याबद्दलची चीड पण वाढलेली होती.

शिक्षणानंतर त्याला नोकरी मिळाली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याने मनाशी ठरवले होते, कि जी चूक बाबांनी केली ती आपण नाही करायची. आपल्याला कितीही कामाचे कष्ट पडले तरीही सगळे प्रमोशन घायचे. आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलांना होऊ द्यायचा नाही.
नोकरीवर रुजू झाल्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर अविनाशने या कंपनीत एका वरिष्ठ पदापर्यंत मजल मारली होती. त्याची बायको सोनाली हिसुद्धा उच्चशिक्षित होती परंतु ती घरातच रमली होती. त्यांच्या संसारवेलीवर अर्णव आणि अनुष्का अशी दोन फुले उमलली होती. अर्णव पाच वर्षांचा होता तर अनुष्का दोन वर्षांची होती.

सोमवार ते शुक्रवार अविनाश आपल्या कामाच्या व्यापात पूर्णपणे गढून गेलेला असायचा. शनिवार संध्याकाळ नंतर मात्र अविनाश पूर्णपणे घरात रमून जायचा. शनिवारी संध्याकाळी घरी आल्याबरोबर अर्णव बॅट बॉल घेऊन यायचा. त्यानंतर दोघे बापलेक घर दणाणून सोडायचे. अविनाश नेहमी पहिल्याच बॉलला आऊट व्हायचा आणि नंतर पूर्ण वेळ अर्णव बॅटिंग करायचा. लहानगी अनुष्का सोनालीच्या कडेवर बसून हसत खिदळत सगळी गम्मत बघत रहायची. शनिवारी संध्याकाळी सोनाली अविनाशच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवायची. रात्री जेवताना मग दोघे हा आठवडा कसा गेला, अनुष्काने काय गम्मत केली अर्णवने काय धमाल केली ह्याच्या चर्चा करत बसायचे आणि जोडीला मस्त गरम कॉफी असायची. रविवार सकाळी मग सगळे मस्त दूरवर फिरून यायचे. संध्याकाळी एखादा चित्रपट घरीच बघायचे. रविवार संध्याकाळचे जेवण अविनाश बनवायचा. खरेतर आठवड्यातील सर्व दिवसांपैकी आपल्या कुटुंबाबरोबर मिळणार हा वेळा अविनाशला त्याच्या कामासाठी आवश्यक असणारी सर्व ऊर्जा देऊन जायचा.

आज तो खुशीतच घरी आला. सोनालीने दार उघडल्याबरोबर लहानग्या अर्णव आणि अनुष्काने त्याला बघून प्रचंड दंगा घातला. अविनाशने पटकन दोघांनापण कडेवर घेतले. सोनाली हा सर्व सोहळा कौतुकाने बघत होती. अविनाशने मग तिला आपल्या प्रमोशनची बातमी सांगितली. सोनालीला खूप आनंद झाला. तिच्या नवऱ्याने खरोखरच आपल्या कष्टांच्या बळावर हे प्रमोशन मिळवले होते.

दुसरा दिवस रविवारचा होता. त्या रविवारी मात्र अविनाशला पहाटे फारच लवकर जाग आली. खरे तर त्याला रात्री नीट झोपच लागलेली नव्हती. तो एकटाच बाहेर दिवाणखान्यात आला. काल रात्री त्याला पहिल्यांदाच जाणवले कि मुलं फार लौकर मोठी झाली आहेत. इतके वर्ष आपल्या कामात प्रचंड गुंतलेले असताना, आपल्या पिलांना आपण मोठा होताना नीट अनुभवलेलेच नाही. अर्णवचं बोबडे बोल, त्याचे रांगणे, काऊचिऊचा घास खाणे, त्याच्या रोजच्या गंमती जंमती, अनुष्काचे हसणे खिदळणे, बाबाच्या कडेवर येण्यासाठी चाललेली धडपड हे सगळे सगळे आपण जगायचे राहून गेलो आहे हे विचार त्याला फारच त्रास देऊ लागले.

या प्रमोशननंतर आपण कितीतरी वीकएंड घराबाहेर राहणार, म्हणजे हा थोडा वेळसुद्धा आपण आपल्या चिमण्यांसोबत घालवू शकणार नाही हि कल्पनाच त्याला सहन होईनाशी झाली. कामाच्या मागे लागताना आपल्यालातला बाप मात्र फार मागे राहून गेला हि जाणीव त्याला खूप अस्वस्थ करून गेली. त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी बाहेर धाव घेतली होती. त्याला एकदम गदगदून आले. एव्हढ्यात त्याच्या पाठीवर हळुवार हात फिरला. त्याने चमकून मागे बघितले सोनाली भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. एका बापाच्या भावना एका आईने न सांगता ओळखल्या होत्या. तो तिला म्हणाला, "सोनाली, मी हे प्रमोशन नाही घेऊ शकणार !". सोनालीने त्याला पुढे बोलूच दिले नाही. ती म्हणाली, "अविनाश, काल मला जेव्हढा आनंद झाला होता, त्यापेक्षा जास्त तुझा अभिमान आत्ता वाटतो आहे. मला नेहमी वाटायचे कि कामाच्या ओघात तुझ्यातला बाप त्याचे अस्तित्व तर विसरणार नाही ना. मुलांच्या वाढत्या वयात, आई-बाप हे नेहमीच त्यांच्या सोबत हवेत. मग त्यासाठी कधी कधी आई-बाबांना त्यांचे ध्येय मागे ठेवावे लागले तरीही. मला खात्री होती कि तुलादेखील कधीतरी याची जाणीव नक्की होईल." अविनाश कौतुकाने सोनालीकडे बघत राहीला. आता त्याच्या मनातले बाबांवरील रागाचे धुके विरून गेले होते. आपल्या बाबानी प्रमोशन का नाकारले हे त्याला आज लक्षात आले होते.

सोमवारी अविनाशने आपल्या बॉसला प्रमोशनसाठी आपला नकार कळवला आणि त्याच रात्री तो आपल्या कुटुंबासह आपल्या आई वडिलांकडे आला. त्याला अचानक आलेला पाहून आई बाबाना आनंद झाला. घरात आल्याआल्या अविनाशने पटकन बाबाना मिठी मारली आणि दाटून आलेल्या आवाजात तो बोलला, "बाबा, मी माझे प्रमोशन नाकारले आहे. तुम्ही तुमचे प्रमोशन का नाकारले, हे मला आत्ता कळले. मी तुमच्यावर यासाठी रागावलो होतो, तुम्हाला याबद्दल खूप वेळा बोललो यासाठी मला क्षमा करा."

बाबांनी त्याची पाठ थोपटून त्याला शांत केले आणि आईकडे वळून ते म्हणाले, "बघ, मी तुला त्यादिवशी म्हंटले होते ना कि आज जरी मी हे प्रमोशन नाकारले आहे, तरीही काही वर्षांनंतर मला एक प्रमोशन नक्की मिळेल म्हणून. आज मला ते प्रमोशन मिळाले आहे.”

All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ भागवत.
या लेखातील शब्दांकन कॉपीराईट (http://www.kaustubhsrujan.blogspot.com) आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा आवडली.

अवांतर : आपली उच्च शिक्षणाची सर्व स्वप्ने आईवडीलांनी पुरवलीच पाहिजेत ही मानसिकता मुळातच योग्य नाही.