एकटीच @ North-East India दिवस - २१

Submitted by सुप्रिया राज जोशी on 9 March, 2020 - 14:14

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

26th फेब्रुवारी 2019

प्रिय सब्यसाची,

प्रवासात जोडल्या गेलेल्या मित्रांमध्ये एक नाव तुझे येते. मला मराठीतून तुझं नाव कसं लिहायचं ते येत नाही. आणि इंग्लिश मधल्या you चे मराठीत मी 'तू ' असे आपणहूनच भाषांतर केले.
माजुली हून परतताना आपण चहा नाश्ता आणि एकमेकांचा निरोप घेऊन निघालो. नंतर गाडीत मयूर ने मला तुझ्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याने तुझ्याबद्दलची आस्था, आदर, प्रेम आणखी वाढले. असं वाटलं मनात अनेक प्रश्नही आले ज्याची उत्तर आता सहजी मिळणार नाहीत. तुझ्या अनुभवातून आयुष्याबद्दल नक्कीच खूप सारे शिकण्यासारखे आहे. उगीच मी त्या गोलमटोल डुकरांच्या पाठी फोटो काढीत फिरत राहिले, जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या सर्वात नाजूक विषयावर बोलत होतात.

तुला पत्र लिहायचे दुसरे कारण की निव्वळ तू सांगितलंस म्हणून नोहवेत ला जाऊन रहायचं असं ठरवलं. आणि एकदा तिथे गेले काय तर तिथून पायच निघेना. दावकीला कॅम्पिंग करून परतताना नोहवेत च्या वाटेवरच्या शेवटच्या टप्प्यावर आज ही hitch hiking करतच आले. मेघालयात अशी संधी मिळाली म्हणजे विशेष वाटते!

इथे नेमके काय फिरायसारखे आहे याची फारशी कल्पना नाही तरी इथेतिथे वार्ता करत आज पायीपायीच गाव हिंडत फिरायचे असे ठरवले. पूर्वी जेव्हा स्त्रिया अंगात चोळी घालत असत तेव्हा एका खांद्यावर गाठ मारलेले हे जैनसेन हे पारंपरिक वस्त्र छातीपासून ढोपरापर्यंत शरीर झाकत असे. आताशा बायका मॉडर्न पोशाख घालून शास्त्र केल्यागत वरून हे जैनसेन गुंडाळतात.

इथली हालीच्या समोर रहाणारी शेजारीणसुद्धा माझा चांगला पाहुणचार करते. आज तिने तिचे ठेवणीतले जैनसेन मला लावून दिले. ते माझ्या कपड्याला मॅचिंग झाले तसे ते अजून खुलून दिसते असे ज्याला त्याला वाटू लागले. माझे सेल्फीबेल्फी चालले होते तेव्हाच हाली ने हाक दिली. त्याचा कोणीतरी मित्र गाडी घेऊन फिरायला निघत होता त्याबरोबर त्याने माझीही फिरायची सोय केली. आम्ही कुठे कुठे जाणार हे विचारून मी इंटरनेट वर त्याबद्दल काही माहिती मिळते का ते शोधू लागले.

53646154_10156915680912778_5849912965171511296_n.jpg53547748_10156915681037778_5680839503095267328_n.jpg

नोह्वेत मध्ये १८० वर्षांपूर्वी उभारलेली एक पारंपरिक खासी झोपडी आहे, एका साध्या खिळ्याचाही वापर न करता ती कशी बांधली ती कारागिरी लाजवाब! शंभर एक वर्षांपूर्वी उभारलेल्या या झोपडीत मला खासी परंपरेचे दुर्मिळ नमुने बघता आले.
आम्ही गाडीतून झोपडीत शिरेपर्यंत आणि झोपडीतून गाडीत शिरेपर्यंत सुद्धा मला हेरून गावकरी कुजबूज करू लागले होते. जरी मला खासी भाषा कळत नसेल तरी त्यांच्या नजरेतील कौतुक दिसत होते. माझ्या मचिंग जैनसेंग मुळे पुढचा सारा दिवस मी इथल्या स्थानिक लोकांच्या कौतुकाला पात्र झाले.

52917958_10156915727057778_2012430424306876416_n.jpg

2017 मध्ये मावलिंनोंग (mawlynnong) ह्या गावाला एशियामधील सर्वात स्वच्छ गाव हा किताब मिळाला, ते गाव, खरतर गावासारखे वाटतच नाही. टुरिस्टचे आकर्षण ठरावे म्हणून एखाद्या एजन्सीने आखीव रेखीव रस्त्यांच्या दुतर्फा मुद्दाम बगीचा तयार केला असावा असे वाटते. पण ते खरे नाही. एका दशकापेक्षा जास्त काळ इथल्या जेमतेम 90 कुटुंबतील लहानमोठा प्रत्येक सदस्य महिन्यातून तक कधी कधी दोन दिवस गावासाठी श्रमदान करतो. इथे कोपऱ्या कोपऱ्यावर बांबूच्या टोपल्या कचरा टाकण्यासाठी बनवल्या आहेत. टुरिस्टने त्यात टाकलेले चिप्स इत्यादींचे प्लास्टिक जाळतात खरे पण गावासाठी तीच एक मोठी समस्या झाली आहे. नाहीतर सांडपाण्याचा निचरा, विजेची बचत, कचरा नियोजन ...अशा कितीतरी सिस्टमस गावात वर्षवर्षं अस्तित्वात आहेत. जे तिथे उगवते, तेच वापरले जाते, तेच सांभाळले जाते नि शक्यतो रिसायकल केले जाते.
एका छोटुशा दगडाने उचलून धरलेली भलीमोठी शिळा, जी कुठच्याच वारा-वादळात किंचितही हलत नाही (balancing rock) ती गम्मत इथे पहायला मिळते. इथे अनेक घरांच्या अंगणात ट्री हाउसेस बांधली आहेत तिथून बांगलादेश बॉर्डर बघता येते म्हणे!
53745020_10156915727137778_583803711860506624_n.jpg

हालीच्या मित्राला पुढे दुसऱ्या गावी जायचे म्हणून परतीची सोय माझी मला करायची होती. गावाबाहेर पडून पायी चालत चालत मी इथला छोटू रूट ब्रिजचा रस्ता घेतला. ज्यांना नॉग्रीहाट झेपणार नाही त्यांच्यासाठी हा ब्रिज ठीक आहे!

53361243_10156915726997778_8537735741327802368_n.jpg
परत येताना पाचेक किलोमीटर चालून मी नोव्हेत ला घरी आले तेव्हा घराघराच्या अंगणात कुटुंबातील सदस्य एकत्र बसून गोष्टी गप्पा करत होते नि मुले रस्त्यांवर खेळत-हुंदडत होती. माझ्या गल्लीत तर समोर शेजारणी ने गाणी लावली होती त्या तालावर हाली रस्यावर नाचत होता. मी माझ्या खोलीच्या खिडकीत बसून पत्र लिहायला घेतले तसा समोरच्या शेजारणीचा मला चहा आला. तिच्या अंगणात अजून चार लोक चहा प्यायला जमले ते केंरम खेळत तिथेच बसले. खिडकीतच पत्र लिहित बसले आहे. समोर काय हास्यविनोद चाललाय माहित नाही पण माहोल मज्जा मस्तीचा दिसतो आहे. इथली लोकं एक संध्याकाळ सुद्धा कशी साजरी करतात बघून मी भारावून गेलेय. खर सांगू जगप्रसिद्ध टूरिस्ट डेस्टीनेशन मावलीनोंग पेक्षा मला हे रांगडे नोहवेत गावच जास्त भावले.

53311857_10156915748097778_1984292362678960128_n.jpg

सकाळी उठले आणि कपडे बदलायची वेळ आली तेव्हा मला आठवले माझे कपडे तर समोरच्या शेजारणीच्या गच्चीवर आहेत. काल हालीने ते तिथे वाळवायला सांगितले. पण आज ते आता गायब झालेले होते. गेले कुठे? वाऱ्याने उडून गेले की काय? माझ्याजवळ कपड्यांचे तीनच जोड होते. असा एक जोड वाऱ्यावर सोडून मला परवडले नसते. उशीरही परवडणार नव्हता. आज नुसते नोव्हेत नाही तर मेघालय सोडून पुढे नागालँड ला जायचय.
गच्चीच्या पायऱ्या उतरताना लक्षात आले की समोरच्या शेजारणीच्या घराचे दार उघडेच होते. मी दबक्या पावलांनी तिच्या घरात शिरले. पलीकडच्या कोलीत सोफ्यावर वाळलेल्या कपड्याचा ढीग पडला होता. मी त्यातले माझे कपडे उचलले नि घराबाहेर पडले. एवढी घरात इकडे तिकडे वावरून मी वस्तू उचलून बाहेर पडले. घरात कोणाला त्याचा थांगपत्ता नाही. मी मागच्या पत्रात लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी मी नोहवेत ला पोहोचले तेव्हाही हाली गायब होता पण घराचे दार सताड उघडेच होते.
असे हे गाव, गावातली अशी माणसं! आज हे सारे सोडायचे खूप जीवावर आले पण त्याचेच नाव प्रवास आहे. कुठे नाही पटले म्हणून तडकाफडकी तेवढेच वगळता येत नाही आणि कुठे जीव लागला म्हणून तिथेच अडकून पडता येत नाही. घटकाभर विश्रांती सोडली तर एक एक वळण चालत फक्त रहायचे.
सुख दुःखाच्या वाटांनी व्यापलेला आयुष्याचा प्रवास तरी याहून वेगळा कुठे आहे? पण आयुष्याबद्दल तुला मी काय सांगू? उलट तुझ्याशिच आयुष्याच्या विषयावरच्या अर्ध्या राहिलेल्या गप्पा मारायला कधी भेट होईल वाट पहात आहे.

तुझी मैत्रीण
सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users