एक अरबी आजोबा

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 02:14

बर दुबईच्या जुन्या घरांना - ज्यांना अरबी भाषेत ' बस्तकीया' म्हणतात - दुबईच्या मुनिसिपालिटीने अतिशय प्रेमाने जपलेलं आहे. आपल्या तुटपुंज्या इतिहासाची आणि संस्कृतीची जीवापाड जपणूक करणाऱ्या या लोकांसमोर आपल्या देशाच्या हजारो वर्षांच्या संस्कृती आणि इतिहासाविषयीच्या लोकांच्या अनास्थेची जाणीव जास्तच प्रकर्षाने व्हायला लागते. या जुन्या बस्तकीयांच्या छोट्या छोट्या गल्ल्या, चिखलाने सारवलेल्या भिंती आणि पामच्या झाडाच्या झावळ्या, लाकडं इत्यादींपासून उभी केलेली छपरं याचा आकर्षण वास्तुविशारद असल्यामुळे मला चकचकीत इमारतींपेक्षा जास्त वाटत आलेला आहे आणि म्हणूनच बरेच वेळा वेळ मिळेल तसं त्या भागाची भटकंती मी केलेली आहे.

अशाच एका भटकंतीत ' बाबा अहमद' नावाने आजूबाजूच्या लोकांना परिचयाचे असलेले एक ऐंशी - पंच्याऐंशी वर्षांचे आजोबा मला एका बाजल्यावर हुक्का पीत आजूबाजूच्या लहानमोठ्या लोकांशी काहीतरी बोलताना दिसले आणि आपोआप माझे पाय त्यांच्याकडे वळले. बस्तकीयांच्या काही भागांमध्ये आता छोटी छोटी कॉफी शॉप्स झालेली आहेत. त्यातल्याच एकापुढे असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत हे आजोबा एका ऐसपैस चौथऱ्यावर ठेवलेल्या लाकडी बाजल्यावर लोडाला टेकून बसलेले होते. दिवस थंडीचे असल्यामुळे बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि गार वारा असं मस्त वातावरण होतं. शनिवार असल्यामुळे लोकांची वर्दळसुद्धा होती. त्या कॉफी शॉप मध्ये १०-१५ कॉफीचे प्रकार मिळत होते आणि कितीही वेळ बसायची मुभा होती, त्यामुळे अनेक लोक तिथे घुटमळत होते.

अहमद बाबा तिथे जमलेल्या काही लोकांना अरबी भाषेत काहीतरी सांगत होते आणि लोक लक्ष देऊन ते सगळं ऐकत होते. नंतर मला समजलं, की त्यात दोन जण दुबई विद्यापीठाचे समाजशास्त्राचे विद्यार्थी होते, एक जण 'खलीज टाइम्स' मध्ये लेख लिहिणारा पत्रकार होता आणि ३-४ जण शारजाहून खास अहमद बाबाला भेटायला आलेले त्याचे जुने परिचयाचे होते. हा गोतावळा या एका चुंबकाच्या अवतीभोवती जमा होतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे हे मी ताडलं आणि थोडा वेळ मीसुद्धा तिथे बसलो. अरबी भाषा समजत नसल्यामुळे मी केवळ त्याचं निरीक्षण करत होतो आणि गमतीशीर माणसांचं नुसतं निरीक्षण किती आनंददायी असू शकतं, हे मला चांगलंच जाणवत होतं.

वय स्पष्ट दिसेल असा सुरकुत्यांनी भरलेला आणि रापलेला चेहरा, हाडाला चिकटलेली कातडी आणि त्यातून ठसठशीतपणे दिसणारी एक एक नस, तोंडात उरलेले पुढचे दोन दात, छातीच्याही खाली आलेली पांढरी शुभ्र दाढी, पिंगे डोळे, डोक्यावर बांधलेलं अरबी पद्धतीचं मुंडासं आणि अंगात घातलेला पांढरा स्वच्छ 'कंदुरा' , शेजारी जमिनीवर काढून ठेवलेल्या पांढऱ्या अरबी पद्धतीच्या सपाता, बाजूला ठेवलेली तुर्किश कॉफीची सुरई ,आठ-दहा खजूर आणि अखंड सुरु असलेलं 'हुक्कापान' अशा रूपातली ही व्यक्ती मला विलक्षण आवडून गेली. त्यांचं ते बोलणं समोरचे लोक कान देऊन ऐकत होते. मधूनच काहीबाही विचारात होते. ते आजोबासुद्धा ना कंटाळता उत्तर देत होते. शेवटी २-३ तासांनी गर्दी पांगली आणि आजोबा उठून आपल्या त्या कॉफीच्या सुरईत नवी कॉफी आणि हुक्क्यामध्ये नवी तंबाखू भरून आपल्या त्या राजेशाही आसनावर तशाच ऐटीत लवंडले.

त्याच्यापाशी बोलणार कसं, हे मला कळत नव्हतं , कारण मला अरबी भाषेचा गंधही नव्हता. शेवटी कसंबसं उसनं अवसान आणून मी त्यांना ' सलाम' करून अर्ध्या इंग्रजीत आणि अर्ध्या हिंदीत प्रश्न केला -

' आपका नाम? name ...name...?"

'बैठो बेटा. अरबी जुबान माफी? '

' अरबी माफी...हिंदी ok ..you know hindi ?'

' kullu kullu ...तोडा तोडा' म्हातारा डोळे मिचमिचे करत गोड हसला आणि त्याने मला बाजूच्या दगडावर बसायला सांगितलं. मला जस लोकांशी भरभरून बोलायला आवडतं, तसं या आजोबांना सुद्धा आजूबाजूला लोक जमवून मस्त गप्पा मारायला आवडतात, हे कळलं आणि मी खुश झालो.

अहमद बाबा काही मिनिटातच गप्पांमध्ये रंगला. तोडकी मोडकी हिंदी त्याला येत होती कारण तरुणपणी त्याने अनेक व्यापार केलेले होते. मोती, मसाले, मासे, सोनं इतकंच काय, पण अगदी होड्यांसाठी लागणारी वल्ही, मासे ठेवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या अशा अनेक विजोड वस्तूंचा व्यापार करताना भेटलेले गुजराथी, सिंधी, बलुची, इराणी, आफ्रिकी आणि इतर देशांचे अरबी लोक यांच्यामुळे या माणसाने ८-१० भाषा व्यवहारापुरत्या आत्मसात केल्या होत्या. दुबईमध्ये ज्या काळी वाळू, खाडीच्या काठावरची तुरळक लोकवस्ती आणि मातीची बैठी घरं याहून जास्त काहीही नव्हतं, तेव्हा हे आजोबा आपल्या पौगंडावस्थेत होते. शिक्षण सुद्धा गावातल्या मदरश्यामध्ये तेही अंक, अक्षर, लिखाण आणि वाचन इतपतच. बाकी कुराणाचा अभ्यास आणि पठण.

' मघाशी बघितलंस ना? माझा शिक्षण इतकंच असूनसुद्धाकोण कोण कोण आलेला ऐकायला?' आजोबा अभिमानाने बोलले आणि आनंदात हुक्क्याचा एक जोरदार झुरका मारून आपल्याकडच्या एसटीला लाजवेल इतका धूर हवेत सोडत त्यांनी समोरचा एक खजूर उचलला.

आम्ही ज्या घराच्या बाहेर बसलो होतो, ते त्या आजोबांचं असल्याची माहिती मला मिळाली. ते त्या कॉफी शॉपचे ५१% भागीदार होते आणि त्यांची दुबईमध्ये इतरही बरीच प्रॉपर्टी होती. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या बाकीच्या सगळ्या उद्योगधंद्यांची आपल्या मुलांमध्ये वाटणी करून ते आपल्या जुन्या घराबाहेर आनंदात जुन्या आठवणींना उजाळा देत बसायला लागले आणि तिथेसुद्धा त्यांनी आपल्या गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ स्वभावाने अनेक लोक जोडले.

' आमच्यासाठी आमचे झाएद बाबा अल्लाहने पाठवलेली भेट होते. ' आजोबांनी यूएई चे पितामह मानले जाणाऱ्या शेख झाएद यांच्याबद्दल बोलायला सुरु केलं. ' झाएद बाबा नसते तर यूएई मधल्या सगळ्या छोट्या छोट्या राज्यांना केव्हाच फिरंग्यांनी खाऊन टाकलं असतं. त्यांनी एक देश बनवला, इथे शिक्षण आणलं, भरभराट आणली, नंतर शेख मखतूम, शेख सुलतान असे सगळे लोक झाएद बाबांच्या आदर्शावर पुढे गेले. दुबई ४० वर्षात कुठे गेली बघ...माझी मुलं लंडनला शिकली. मुलांची मुलं पण जर्मनी, लंडन, अमेरिका आणि कुठे कुठे शिकली...झाएदबाबा नसते तर आम्ही कुठे असतो?'

दृष्ट्या शासकांमुळे या चिमुकल्या देशाला किती मिळालंय आणि इथले लोक त्यामुळेच आपल्या शासकांवर किती प्रेम करतात, हे राजेशाहीबद्दल नाक मुरडणाऱ्या लोकांना दिसणं किती आवश्यक आहे हे मला जाणवत होतं. मुळात लोकशाही, साम्यवाद, राजेशाही या आणि अशा कोणत्याही समाज व्यवस्थेत द्रष्टे, देशावर प्रेम करणारे आणि प्रामाणिक नेतेच महत्वाचे असतात, हे एक कालातीत सत्य या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतं होतं.

' तुमच्याबद्दल थोडा अजून सांगा ना अहमदबाबा...' मी त्यांना देशाच्या पातळीवरून वैयक्तिक पातळीवर खेचलं.

आजोबा पुन्हा हुक्काच्या खोल झुरका घेत हसले, नाकपुड्या, तोंड आणि कुठून कुठून भसाभस धूर निघाला आणि आजोबांनी त्यांची तुर्किश कॉफी उचलली. त्यांचे डोळे लुकलुकले, काळ झर्र्कन ७० वर्ष मागे गेला आणि त्यांनी आपल्या मांडल्या जुन्या आठवणींचं कपाट उघडलं.

वाळू, उंटांच्या विष्ठेचा वास, कातडी जाळणारी गर्मी आणि हाडं गोठवणारी थंडी असा भयंकर विरोधाभास असलेलं हवामान, वीज नाही, पाणी कमी, मासे,अंडी, उंटिणीचं दूध आणि खजूर इतकाच कायमस्वरूपी मिळू शकणारा आहार, वस्तूंच्या देवाण-घेवाणीतच चालणारा व्यापार आणि खाडीत मिळणाऱ्या मोत्यांमुळे गावात येणारे बाहेरचे लोक याशिवाय त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात काहीच नव्हतं. दिवसातून पाच वेळा गावातल्या मशिदीत नमाज मात्र नित्यनेमाने ना चुकता व्हायचा. गावातल्याच वैदूकडे मिळणारी पारंपारिक औषधं आणि कधी कधी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱयांकडून मिळालेली जास्तीची जडीबुटी यावर सगळ्या गावाचा आरोग्य अवलंबून. ४ बायका करण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक पुरुष किमान ३-४ बायकांशी लग्न करायचा आणि त्यामुळे प्रत्येक घरात पुत्रसंपदा अमाप असायची. या आजोबांनी तसं असूनही एकच लग्न केलं हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.

' माझी १४ मुलं आहेत...३ लहान असतानाच गेली म्हणून नाहीतर १७ असती. आमच्यात मुली मोजत नाहीत, पण मी मोजल्या. ' या आजोबांची मोजणी किती अचूक माहित नाही, पण ' हम दो हमारे दो' च्या आमच्या पिढीला हा आकडा कल्पनेपलीकडचा होता. हि माणसं इतर काम कधी करायची, असा मला प्रश्न पडला आणि आजही या आजोबांची आज्जी धडधाकट असून आपल्या मोठ्या मुलाबरोबर आनंदाने राहते आहे हे ऐकून त्या आज्जीने गर्भाशयाला उघडबंद करायला सोयीस्कर पडेल असं झाकण लावून घेतलं होतं कि काय असा मला प्रश्न पडला. पुढे प्रगती नक्की का झाली नाही? आजोबा दमले कि आज्जी? असं विचारायचा मोह मी आवरला आणि पुढचं ऐकायला लागलो.

गावात डॉक्टर नाही म्हणून त्यांनी आपल्या ३ मुलांना वैद्यकीय शिक्षण घ्यायला इजिप्तला पाठवलं होतं. त्यांची ४ मुलं सैन्यात आणि पोलिसात होती. त्या काळातही मुलींना मदरशाबाहेरचं जग या आजोबांनी दाखवलं होतं. आपली एक मुलगी कुराण आणि इस्लामिक आचारविचार या विषयाची तज्ज्ञ असून त्या विषयावर ती व्याख्यानं द्यायला जायची, असं अभिमानाने सांगून त्यांनी एकदम डोळे मिटून अल्लाहचे मनातल्या मनात आभार मानले. एकूणच काय, हे आजोबा तसे काळाच्या पुढचे होते आणि कदाचित म्हणूनच ते मला आता आदरणीय वाटत होते.

' १९७१ मध्ये यूएई आकाराला आली. १९७२ साली रास-अल खैमा यूएईचा एक भाग झाला आणि या ७ अमिरातींनी तयार झालेला हा देश आमची ओळख झाली. आम्ही अमिराती झालो. हे सगळं होताना मारामारी, खूनखराबा नाही झाला...झाएद बाबा होते ना! ' आजोबा पुन्हा पुन्हा शेख झाएद यांचा उल्लेख करत होते. ' पेट्रोल सापडलं, आम्ही श्रीमंत झालो. मग जगभरातून लोक आले. तुम्ही इंडियन लोक आधीपासून होताच इथे...तुमच्याबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे. जेव्हा इथे काहीच नव्हतं तेव्हापण तुमचे लोक यायचे इथे...इथे वीज आली इंडियन लोकांमुळे, सुपरमार्केट आलं इंडियन लोकांमुळे आणि विमानतळ झाल्यावर ते चाललं पण इंडियन लोकांमुळे' आजोबांना भारताबद्दल ममत्व होतं आणि ते अतिशय प्रेमाने भारताबद्दल बोलत होते. ' झाएद बाबा सांगायचे, इंडियन लोक खूप चांगले आहेत. मी दोन वेळा इंडियाला गेलोय...एकदा पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी आणि एकदा बायपास साठी' आजोबांचं बायपास होऊनही हुक्का काही सुटला नव्हता. ' अशाने मराल लवकरच...नका आता हुक्का पिऊ' अशी प्रेमळ दटावणी करावीशी वाटली सुद्धा मला, तितक्यात त्यांनी स्वतःच मला सांगितलं ' मी डॉक्टरना सांगितलंय, हुक्का नाही सोडणार. १० वेळा ऑपरेशन करा, चालेल...'

या आजोबांना मग मी अनेक वेळा भेटलो. त्यांनी दुबईचे किस्से, त्यांच्या आयुष्यात आलेले चित्रविचित्र अनुभव, त्यांच्या खजिन्यात असलेल्या अरेबिअन नाईट्स पासून ते गावातल्या भुताखेतांच्या अनेक गोष्टी, लोककथा आणि अशा अनेक गोष्टींचा भांडार माझ्यापुढे रितं केलं. एकदा त्यांच्याबरोबर आलेल्या आज्जीबाईंनाही मी भेटलो आणि त्या आज्जींसमोर हुक्का ना पिणाऱ्या आजोबांचं ते ' बायकोच्या धाकात असलेल्या' नवऱ्याचं गमतीशीर तरीही लोभसवाणं रूपसुद्धा मला बघता आलं. २०१० साली काही वर्षांकरिता यूएई ला रामराम केल्यावर २०१४ साली जेव्हा मी पुन्हा या देशात आलो, तेव्हा आल्या दिवशीच आपसूक त्या कॉफी शॉपकडे पाय वळले.

कॉफी शॉप शांत होतं. बाहेर ते बाजलं, तो हुक्का आणि आणि ते आजोबा यापैकी काहीही नव्हतं. विचारपूस केल्यावर ते आजोबा २ वर्षांपूर्वीच अल्लाहला भेटायला निघून गेल्याचा कळलं, त्यानंतर वर्षभरातच आज्जी सुद्धा गेल्याचा कळलं आणि त्यांच्या एका नातवाने ते घरं आणि कॉफी शॉप कोणालातरी विकल्याचंही कळलं.

त्या आजोबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींमध्ये एक ' भुताची' गोष्ट होती. त्यातलं ते भूत त्याच्या आवडत्या घरातून जायला राजी नव्हतं आणि त्यामुळेच असेल, पण त्या घरात कोणीच राहू शकत नव्हतं. या घरातही ते आजोबा आपल्या आज्जीबरोबर अजूनही असतील का? असा प्रश्न मला पडला. तसं असेलच त्या भुताला मला भेटायची तीव्र इच्छा झाली...कारण ते भूत भेटलं असतं तर पुन्हा त्या हुक्क्यात तंबाखू भरली गेली असती, पुन्हा तुर्किश कॉफीची सुरई आली असती आणि पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा जमला असता आणि ते आजोबा पुन्हा एकदा त्या हुक्क्याचा एक खोल झुरका घेऊन सावरून बसले असते आणि त्यांच्या आठवणींच्या जादुई सफरीवर मला घेऊन गेले असते !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आज्जीने गर्भाशयाला उघडबंद करायला सोयीस्कर पडेल असं झाकण लावून घेतलं होतं कि काय असा मला प्रश्न पडला.
>>> हाहाहा