मन वढाय वढाय (भाग २२)

Submitted by nimita on 5 March, 2020 - 22:30

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच रजत खूप खुशीत होता. आदल्या रात्री स्नेहानी सुचवलेल्या पर्यायामुळे आता त्याला सगळंच एकदम सोपं वाटायला लागलं होतं. 'बरं झालं काल स्नेहाशी बोललो," एकीकडे ऑफिसला जाण्यासाठी तयार होता होता रजतची विचारशृंखला चालू होती. ' किती प्रॅक्टिकल आणि योग्य मार्ग शोधला तिनी ! मी इतके दिवस याबाबतीत उगीचच वेडेवाकडे विचार करत होतो...त्यामुळे प्रश्न तर सुटतच नव्हता पण उगीचच नको नको त्या विचारांनी, काल्पनिक शक्यतांनी मन भरकटत चाललं होतं. आपलं हे मन तरी किती वेडं असतं ना....कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर अगदी समोर असतं- स्पष्ट दिसेल असं... पण आपण आपल्या प्रश्नालाच इतकं महत्व देतो- अक्षरशः त्याला डोक्यावर घेऊन मिरवतो- की त्यामुळे त्याच्या उत्तरावर आपली नजरच जात नाही. याबाबतीत मला स्नेहाचं खरंच खूप कौतुक वाटतं. एरवी मी स्वतःला 'खूप प्रॅक्टिकली विचार करणारा, सद्सद्विवेकबुद्धी वगैरे असणारा' माणूस मानतो. पण कधीकधी मलाही ज्या गोष्टींची उकल होत नाही त्या स्नेहा किती सहज समजावून सांगते ! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे- तिला त्यात काहीच वेगळं वाटत नाही... कधी असा विषय निघाला तर म्हणते -" What's so great about it? हे तर कोणालाही जमेल ." आणि म्हणूनच तर ती एवढी आवडते मला...' स्नेहाबद्दल विचार करताना नकळत रजतच्या चेहेऱ्यावर हास्याची एक हलकी रेघ उमटली. आणि नेमकी तेव्हाच त्याची आई खोलीत आली. आपल्या मुलाच्या चेहेऱ्यावरचं ते निखळ, निरागस हसू बघून वंदना मनोमन सुखावली. पण वरकरणी तसं काही दिसू न देता ती रजतला चिडवत म्हणाली," काय रे ? आज स्वारी एकदम खुशीत आहे? क्या बात है?आम्हांला पण सांगा की! "

आपल्या आईच्या प्रश्नावली ला अगदी थोडक्यात उत्तर देत रजत म्हणाला," हं, आहे काहीतरी... पण आत्ता वेळ नाहीये सांगायला. संध्याकाळी घरी आलो की सांगतो," खोलीतून बाहेर जाता जाता मधेच थांबून तो म्हणाला," आई, आज नीला मावशी, काका आणि आजीला पण इकडेच बोलावून घे . एकदमच सांगतो सगळ्यांना ." वंदना पुढे काही बोलायच्या आधी तो तिथून निघूनही गेला होता.

खरं म्हणजे त्याच्या प्रमोशन ची बातमी दोन्ही परिवारांना एकत्रच सांगायची कल्पना पण स्नेहाचीच होती. आणि त्यामागचं कारण काय - तर म्हणे,"ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांना होणारा आनंद त्या सगळ्यांच्या चेहेऱ्यांवर एकाच वेळी बघायला मिळेल.'

रजतच्या दृष्टीनी - 'एखादी चांगली बातमी ऐकली की कोणालाही आनंदच होईल ना! आणि तो आनंद त्याच्या चेहेऱ्यावर दिसणारच की !ते तर स्वाभाविकच आहे. त्यात एवढं 'बघण्यासारखं' काय आहे !! पण स्नेहा मात्र कधीकधी खूपच इमोशनल होऊन जाते.' स्नेहाचं हे असं वागणं रजतच्या समजुती पलीकडचं असायचं. पण 'तसं काही बोलून दाखवलं तर ती लगेच मनाला लावून घेईल की काय' असा विचार करून रजत काही न बोलता गप्प बसायचा.

रजत ऑफिसला जाईपर्यंत वंदना काही बोलली नाही. खरं म्हणजे रजतच्या आनंदामागचं खरं कारण काय आहे हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती तिला. पण त्याला पुन्हा विचारण्यात काही अर्थ नाही हे तिला माहीत होतं.' जर त्यानी संध्याकाळी सांगायचं ठरवलं असेल तर तो तेव्हाच सांगणार ' याची तिला खात्री होती.आपल्या मुलाचा स्वभाव ओळखून होती ती. पण तो गेल्यावर मात्र तिनी सरळ स्नेहाकडे धाव घेतली. स्वैपाकघरातली झाकपाक करून स्नेहा सुद्धा गच्चीतल्या तिच्या स्टुडिओ मधे जायला निघालीच होती.

खरं सांगायचं तर हे असं 'वेगळा स्टुडिओ असणं' स्नेहाच्या दृष्टीनी अजिबात गरजेचं नव्हतं. पण तिच्या काकांचा म्हणजे रजतच्या बाबांचा आग्रह होता की स्नेहाला काम करायला एक वेगळी जागा असावी ; त्यावरून बरीच चर्चाही झाली. स्नेहाचं म्हणणं होतं की ती घरातच एखाद्या खोलीत तिचं काम करेल... म्हणजे एकीकडे काम होत राहील आणि जर कधी गरज पडली तर घरातही मदत होईल...आणि नेमकं हेच नको होतं तिच्या सासऱ्यांना. त्यांच्या मते- जेव्हा एखाद्या स्त्री समोर -तिच्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि तिची नोकरी किंवा व्यवसाय - यांत निवड करायची वेळ येते तेव्हा बहुतांशी बायका या भावनेच्या आहारी जाऊन पारिवारिक जबाबदारीला प्राधान्य देतात आणि स्वतःच्या कामाला दुय्यम स्थान देतात. त्यामुळे जर स्नेहानी घरातच तिचं काम सुरू केलं तर ती तिच्या प्रोफेशन ला पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की तिनी घरापासून लांब तिचा स्टुडिओ सुरू करावा.. तिची पेंटिंग्ज, पॉटरी वगैरे कला जोपासाव्या. पण स्नेहाला वाटत होतं की घरात राहिलं तर घरकामात, इतर जबाबदाऱ्यात तिचाही हातभार लागेल.... त्यावरून सगळ्यांची खूप चर्चा झाली आणि शेवटी स्नेहाच्या आईनी सुचवल्याप्रमाणे एक सुवर्णमध्य निघाला. घराच्या गच्चीत जी गेस्ट रूम होती त्यात आवश्यक ते बदल करून तिथे स्नेहाचा स्टुडिओ सुरू करायचं ठरलं.

आणि काही दिवसांतच स्नेहाच्या लक्षात आलं की काकांचं म्हणणं योग्यच होतं.आता स्नेहा तिच्या दोन्ही आघाड्या व्यवस्थितपणे सांभाळू शकत होती. कधीकधी थोडी गडबडून जायची ती; सुरुवातीला खूप धांदल उडायची...पण रजतच्या आई बाबांनी तिला सांभाळून घेतलं. वेळोवेळी शक्य ती मदत केली आणि त्यामुळे आता तिचं छान बस्तान बसलं होतं.

त्या दिवशी पण नेहेमीप्रमाणे ती सकाळचा स्वैपाक आणि बाकी कामं आटोपून स्टुडिओमधे जायला निघालीच होती. पेंटिंग्ज ची एक मोठी ऑर्डर मिळाली होती तिला...आणि त्याची डेडलाईन जवळ येत होती त्यामुळे आजचा पूर्ण दिवस त्यातच जाणार होता. ती गच्चीच्या दिशेनी निघालीच होती तेवढ्यात वंदनानी तिला थांबवत विचारलं," रजत काय सांगणार आहे गं संध्याकाळी? काही Good news वगैरे आहे की काय ?" हा प्रश्न विचारतात वंदनाच्या डोळ्यांत आणि तिच्या आवाजातही एक वेगळीच उत्सुकता जाणवली स्नेहाला... प्रश्न विचारताना तिनी 'good news' या शब्दावर विशेष जोर दिल्यामुळे स्नेहा एकदम भांबावून गेली..." छे छे...तसं काहीही नाहीये गं मावशी," तिनी आपल्याकडून स्पष्टीकरण देत म्हटलं. त्यावर थोडी खट्टू होत वंदना म्हणाली," मग काय आहे? तुला नक्कीच माहीत असणार...सांग ना प्लीज."

आपल्या सासूला असं लहान मुलांसारखं अधीर होताना बघून स्नेहाला खूप मजा येत होती...'किती cute आहे ही,' तिच्या मनात आलं. वंदनाच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली," मी आत्ताच सांगून टाकलं तर मग काय मजा? थांब की जरा संध्याकाळ पर्यंत.... कळेलच काय ते..."

स्नेहावर लटका राग धरत वंदना फोनच्या दिशेनी निघाली..." किती छळता गं तुम्ही दोघं मला ! थांब ; तुझ्या आईकडे तक्रारच करते तुझी," असं म्हणत तिनी नीलाला फोन लावला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

MAST...

मनिम्याऊ , नको हो ! माझ्या कथेचं मातेरं करतील ते सिरीयल वाले.... मूळ कथा राहील बाजूला आणि trp च्या नादात कथेचे मात्र बारा वाजतील. Sad

मोजकेच पाञ असूनही कथा कुठेही न रेगांळता, सरळसोप न होता, छान मांडली आहे. नक्कीच कौतुकास्पद प्रयत्न केला आहे.
पुढील भागाची वाट पहातोय.

चिन्नु +१,
छान झालाय हाही भाग.. पुभाप्र! Happy