टीका विरुद्ध सर्वसमावेशकता

Submitted by सामो on 28 February, 2020 - 13:03

अमेरिकेत यायच्या आधी ....
.
आता अशी सुरुवात केली की तुम्ही म्हणाल हं झालं हिचं सुरु अमेरिकेत येण्यापूर्वी आणि अमेरिकेत येण्यानंतर हेच 2 कप्पे आहेत जणू आयुष्याचे. तर खरं तर तसे नाही लग्नापूर्वी-लग्नानंतर, नोकरीपूर्वी-नोकरीनंतर , अमकं पूर्वी-अमकं नंतर असेही कप्पे आहेत. पण तुमच्या मनात चेष्टेचा, टीकेचा सूर येणे साहजिकच आहे कारण तुमची माझी तशी ओळख आहे पण मैत्री नाही. माझी सुखं दु:ख तुम्हाला माहीत नाहीत आणि म्हणूनच माझी विचार करण्याची पद्धत, तसं मला का वाटतं, माझया खरं तर vulnerabilities बद्दल सुद्धा अनभिज्ञ आहात. आणि म्हणूनच पट्टकन judgement पास करण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि हा धागा त्याबद्दलच आहे. की अनोळखी परिस्थितीवर, लोकांवर किती चट्टकन नकारात्मक लेबल्स, जजमेंट्स लादता येतात किंवा पास करता येतात.
.
हां तर अमेरिकेत येण्यापूर्वी मी ही अगदी हीच भाषा बोलता असे जी मी क्वचित आंजावरती ऐकलेली आहे - अमेरिका म्हणजे मठ्ठ लोकांचा देश, अति मांस जन्य पदार्थ खाऊन चरबीचे थर साठविणाऱ्या ओबीस लोकांचा देश. या लोकांना आपल्या जगाव्यतिरिक्त ना कोणाचं भान असतं ना तसे असल्याची खंत. आंजावरती काही जणांनी हेही म्हणताना ऐकलेले आहे की - अमेरिका - ऊठसूठ जंतूनाशक द्रव्य (hand sanitizes ) लावून हाताला क्रीम्स फासणाऱ्या लोकांचा देश. हे जे शेवटचं वाक्य बोललेले लोकं हे नक्की एकदा अमेरिकेची वारी करून परत गेलेले आणि मग आपल्या निरीक्षणातून वाईट तेवढे उचललेले. तर सांगायचा मुद्दा मी ही हीच भाषा बोले. बरोबर पूर्ण अथवा अर्धवट ज्ञानातून टिपलेल्या वाईट बारकाव्यांवरती बेतलेले नकारात्मक विचार.
.
पण या देशात आले आणि हळूहळू इथले लोक कळत गेले. आमच्या पहिल्याच गावामध्ये जोपर्यंत कार विकत घेतलेली नव्हती, तोपर्यंत कार-पुलिंग करून मदत करणारे लोक भेटले तसेच थँक्स Giving ला आवर्जून आम्हा तिघाना घरी बोलावून मेजवानी खाउ घालणाऱ्या शार-टीशा भेटल्या. या लोकांनी ज्यांनी कधीही हे जाणवू दिले नाही की आम्ही परके आहोत. आम्हाला त्यांच्याबरोबर, त्यांच्या गटात, देशात सामावून घेतले. कोणाकोणाचे नवरे चक्क एका रात्रीत बायको-2 मुले सोडून फरार झालेले होते आणि आईने सिंगल पेरेंटिंग करून मुलांना वाढविले होते. काही मैत्रिणींची अति बेढबपणामुळे , खरं तर ऊंचीही अति असल्याने लग्न होत नव्हते. पण त्यांच्या आईने माझी मैत्रीण असल्यामुळे माझ्यापुढे मुलीच्या लग्नाची काळजी बोलून दाखवलेली मला आठवते. ती वेळ जेव्हा मला वाटले अरे ही परदेशी बाईही भारतीय आईसारखीच बोलते आहे, मुलीच्या भवितव्याची काळजी करते आहे. काहीजण एकाकीच होते. बसस्टॉपवरती तर किती जण किती जण भेटले जे फक्त एका स्मितहास्यावरती त्यानी पूर्ण आयुष्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली.किंबहुना जास्तीत जास्त ब्लु कॉलर्ड, गरीब लोक हे बसमध्येच भेटत गेले. साहजिकच आहे.काहीजणी वयाच्या ७० व्या वर्षी नोकरी करताअना पाहील्या कारण काय तर अपार्टमेन्टचे भाडे नाहीतर कोण भरणार, डोक्यावरती छप्पर कसे रहाणार. लोकांच्या वेदना कळत गेल्या आणि हे कळत गेले की आपल्यासारखेच हाडामांसाचे लोक आहेत, सुख-दु:खे आहेत. कदाचित मनोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांची दु:खे "विकसित देशातील" दु:खे आहेत पण त्यांच्याकरता ती तितकीच संघर्षमय आहेत.
.
सांगायचा मुद्दा हा की या लोकांच्या vulnerabilities कळू लागल्या आणि त्यांच्याशी मैत्री होऊ लागली, मदतही अर्थात मिळू लागली होती, त्यांच्या मनाचा मोठेपणा कळू लागला होता. मग हे वैचारिक/शाब्दिक आसूड ओढणे, खाजगीत का होईना पट्टकन अविचारी ताशेरे देणे हे कमी होउ लागले. हळूहळू अशी वेळ आली की मुलीच्या ज्या मैत्रिणी ओबिस आहेत त्याच्या बद्दल चक्क काळजी खरंच, खरच काळजी वाटू लागली. स्वतः:ची भावनिक गुंतवणूक झाली. अरे किरा तर आपल्या रियासारखीच आहे, पण ..... ती जर याच गतीने जाडी होत राहिली, तर बिचारीला नाना व्याधी जोडणार, नोकरी कशी मिळणार, लग्न कसं होणार ....वगैरे. (डिस्क्लेमर - नोकरी व लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्ये नाहीत हे जाणून आहे.)
.
म्हणजे एका लक्षात आले की लेबल लावणे हे सोपे असते. याउलट त्या व्यक्तीला, त्या त्या वंशाला , लोकांना जाणून घेऊन, त्यावर विचार करून, जीभेवरती लगाम ठेवून बोलणे हे अवघड असते. कुठेतरी एक फार सुंदर वाक्य वाचलेले होते जे आता आठवत नाही - या अर्थाचे होते - दुसऱ्याला कमी लेखून जो एक वॉर्म ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो, एक जी समाधानाची भावना आपल्याला मिळते ती अतुलनिय असते नाही... तिची तुलनाच अन्य आनंदाशी होऊ शकत नाही. अर्थात हे वाक्य उपरोधिक होते.
.
परवा याच पठडीतील एक अध्यात्मिक लेख वाचनात आला कोणा वाईट परिस्थितीतल्या भिकार्‍याला पाहून, आपण म्हणत असतो - किती दुर्दैवी आहे बिचारा. न जाणे कोणत्या कर्माची फळे भोगत आहे. पण त्या लेखात असे म्हटलेले होते की - कशावरुन तो भिकारी अध्यात्मिक दॄष्ट्या उंच पातळीवरती नाही? कदाचित उरल्यासुरल्या शेष कर्मांंचा हिशेब देउन तो जन्म-मृत्युच्या जंजाळातून मुक्तही होणार असेल. याउलट श्रीमंती भोगणारे, उत्तम आरोग्याचे धनी आपण लोक अजुनही अध्यात्मिक प्रतलावरती 'आदिम / बाल्यावस्थेत' असूही. तेव्हा बाह्यरुपाला भुलून अथवा बाह्यरुपामुळे तिटकारा वाटुन, तर आपण टिका अथवा स्तुती करु शकत नाही.
.
मला असे नाही म्हणायचे की तुम्ही कोणावरही टीका करूच नका. टीकेचे , constructive criticism चे एक स्वतः:चे अजोड स्थान विश्वात आहे. टीकेमुळे दुसर्‍यात चांगला बदल घडण्याची संधी असतात निदान टीकेमुळ आपण काही गोष्टी नाकरतो आणि स्वत:लाच डिफाईन करत असतो. टिकापात्र व्यक्ती स्वतः: receptive असेल व ती अंतर्मुख होऊन विचार करू शकली तर टीकेचा लाभही होतो. अन्यथा टीका वायाही जाऊ शकते किंवा उलटूही शकते. पण टीका करण्यापलीकडे, एखादी सिच्युएशन जर माणुसकीच्या डोळ्यांनी पहाता येत असेल तर ते उत्तम. judgement पास करणे, सारासार विवेक,नीरक्षीर विवेक हे बुद्धीचे अंगभूत गुणधर्म आहेत, Faculties of intellect हे मान्यच आहे. पण तरीही आमच्यासारखे लोक कदाचित बुद्धी आणि मन यामध्ये पर्याय दिला तर मनाने, विचार करणे जास्त पसंत करत असावेत. म्हणजे बुद्धी अगदी गहाणच टाकावी असे नाही, पण ... या पणचे काय करायचे? मला ही सीमारेषा आखता येत नाही. कधी एखाद्या व्यक्तीला Discriminate करायचे आणि कधी समजुन घ्यायचा आटोकाट प्रयत्न करायचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित मनोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांची दु:खे "विकसित देशातील" दु:खे आहेत पण त्यांच्याकरता ती तितकीच संघर्षमय आहेत.

या वाक्यातल्या मनोबाबद्दल बोलतोय.

कदाचित मनोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांची दु:खे "विकसित देशातील" दु:खे आहेत पण त्यांच्याकरता ती तितकीच संघर्षमय आहेत.

या वाक्यातल्या मनोबाबद्दल बोलतोय.

छान लिहिलाय लेख! आवडला आणि पटलासुद्धा.. Happy
सुख-दुःखाची तीव्रता , माणसांच्या भावना- आनंद, प्रेम व्यक्त करायची पद्धत जगात कुठेही जा सारखेच असतात.

निंदकाचे घर असावे शेजारी. असे संत वचन आहे बहुदा तुकोबांचे.
असो लेख वाचून मनातील घालमेल समजली, पण एकूणच आशय पोहचला नाही.

>>> लेख वाचून मनातील घालमेल समजली>>> धन्यवाद!! खरे आहे घालमेल हाच शब्द योग्य आहे.
चट्टकन आणि आत्मविश्वासपूर्वक समोरच्याला लेबल लावून टाकणारी, निकालात काढणारी लोकं माहीत आहेत. बहुधा असे लोक इन्टेलेक्चुअलस च पाहीलेले आहेत.
पण मला कधीही जमलेले नाही. आयुष्यात सरळ सोपं काही नसतं. प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपली प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवावी लागते. मग कोणावरती किती विश्वास टाकायचा, कोणाला निकालात काढायचे - हे सर्व नात्यांचे प्रश्न फार अवघड वाटतात मला.

आयुष्यात सरळ सोपं काही नसतं. प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपली प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवावी लागते.>>>
हे अगदी खरं आहे. यालाच जीवन ऐसे नाव.

मनोबा म्हणजे अनन्या पांडे आणि जिथे आमची स्वप्नं पुर्ण होतात तिथून ह्यांचा संघर्ष सुरु होतो म्हणणारा कोणी सिद्धांत चतुर्वेदी आला कीच ह्या धाग्याचे सार्थक होणार.

बरोबर मांडलंय.
तर सांगायचं म्हणजे सुरुवातीला पहिल्या टप्प्यातून गेलो आहे - पटकन टीका करणे. आता नाही करत.

आपण लेबलं लावतो म्हणजे सव‌ईचे गुलाम असतो . ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा असेच काहीसे किंवा पुस्तक कसे हे वेष्टन पाहून ठरवू नये. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा...हा दृष्टिकोन ठेवला तर काहीसा सर्वंकष विचार करु शकतो. तो अगदी तंतोतंत नसला तरी माणसातला माणूस कळायला साहाय्यभूत असेल.

प्रत्येकाचं आपलं एक विश्व असतं त्यात आनंद दुःखाच्या व्याख्या आणि संदर्भ वेगळे असतात.नीती अनीतीचे कायदे प्रवाद वेगळे असतात. वन साईज फिट्स ऑल हा प्रकार माणसाला लागू होत नाही.बिहेविरीजमचा अंत त्यामुळेच झाला.

छान लेख,.
इतरांवर टीका करणे सोपे आहे.
पण त्यांच्या perspective नी विचार केला तर ते तसे का वागतात, बोलतात हे कळते. अर्थात दर वेळेस त्यांच्या बाजूनी कितीही विचार केला तरी त्यांचं वागण पटेलच असं नाही .
लास्ट पॅरेग्राफ थोडा अजून सोपा करून लिहायला पाहिजे होता असं वाटलं.

छान लेख.
>>लेबल लावणे हे सोपे असते. याउलट त्या व्यक्तीला, त्या त्या वंशाला , लोकांना जाणून घेऊन, त्यावर विचार करून, जीभेवरती लगाम ठेवून बोलणे हे अवघड असते.>> हे खुपच आवडले आणि रिलेट करता आले. "जजमेंटल असणे" ऐकले होते पण म्हणजे नक्कि काय ते अमेरिकेत आल्यावर लक्षात आले. आणि एखाद्याला रुपावरुन किंवा एकाच अनुभवावरुन "जज" करु नये हे अमेरिकेकडून शिकलो.
इथल्या आयुष्याची जडणघडण वेगळी, लोक ज्या परिस्थितीत मोठे होतात ती आपल्यापेक्षा वेगळी आणि विकसित देश असल्यामुळे त्यांना ज्या गोष्टी बेसिक किंवा मुलभूत वाटतात त्या आपल्याला चैनीच्या किंवा "उगाच अती महत्व देतात" अशा वाटतात. पण त्यांच्या दृष्टीतून बघितल्यास हे जाणवते कि त्यांनी आपले जग प्रत्यक्ष बघितलेच नाही त्यामुळे त्यांच्याकडे जे आहे तेच प्रमाण, नाही का? मग हेही जाणवले कि त्यांना आपल्या जगाबद्दल सांगितल्यावर बहुतांशी लोकांचा कल हा आपले जग समजुन घेण्याकडे व अजुन विचारण्याकडे असतो. कित्येक सहकर्मचारी माझ्याबरोबर स्वतःहून आले आणि डोसा खायला शिकले. वेगवेगळ्या चवी त्यांनी चाखून बघितल्या.
आपण आहोत तसे इथे लवकर अ‍ॅक्सेप्ट केले जातो. आपण भारतीय मात्र इतरांना लेबले लावून त्यावर गॉसीप करण्यात धन्यता मानतो हेही जाणवले. मी सुद्धा फार वेगळा नाही. आताशा फक्त ही जाणीव झाल्यामुळे तसे होणार नाही हे बघतो पण चार भारतीय टाळकी एकत्र आली कि परत पहिले पाढे पंचावन्न!!

>>>>>>>एखाद्याला रुपावरुन किंवा एकाच अनुभवावरुन "जज" करु नये हे अमेरिकेकडून शिकलो.>>>>>> +१००
>>>>>>आपण भारतीय मात्र इतरांना लेबले लावून त्यावर गॉसीप करण्यात धन्यता मानतो हेही जाणवले.>>>>>> हे सत्य आहे. परंतु बदलत आहे .मीअर्थात मीही अपवाद नव्हतेच.

>>तो अध्यात्मिक भाग पटला नाही पण बाकी लेख चांगला आहे.>>>+१
शिक्का मारायची घाई न करता समोरच्या व्यक्तीचे जगणे समजून घेणे महत्वाचे. आपल्याला ते पटायलाच हवे असेही नाही. जे पटत नाही तिथे अंतर राखणे आपल्या हातात असतेच. टीका करतानाही जोडीला उपाय/ बदल/पर्याय सुचवला तर लोकं कमी दुखावतात, मदत स्विकारतात. बुद्धी की मन असा विचार का करावा? मनाने विचार करताना आणि वाहून न जाता बुद्धीचा वापर करुन दीर्घकालीन उपायही शोधावा.

मनुष्य तरुणपणात जास्त उथळ विचारांचा असतो. वय वाढत जाते तसे अनुभवांतून परिपक्वता येत जाते. मग बऱ्याच वेळा बोलण्याआधी माणूस विचार करतो. दुसऱ्या च्या जागी स्वत:ला ठेवून विचार करायला लागलं की परिपक्वता आपोआप येते. हेमावैम.

>>>>>बुद्धी की मन असा विचार का करावा? मनाने विचार करताना आणि वाहून न जाता बुद्धीचा वापर करुन दीर्घकालीन उपायही शोधावा.>>>>> उत्तम मुद्दा.

बरोबर लिहले आहे.
पूर्ण लेख पटला ..
पूर्ण माहिती घेतल्या शिवाय ,अनेक अनुभव घेतल्या शिवाय एकादी व्यक्ती चांगली आहे की वाईट असे ठरवू नये किंवा त्या व्यक्ती विषयी तसे मत बनवू नये.
सर्वच वाईट गुण किंवा सर्वच चांगले गुण एकाच व्यक्ती मध्ये असू शकत नाहीत.
अतिशय क्रूर असणाऱ्या व्यक्ती मध्ये काही प्रसंगात चांगली वर्तूनुक घडू शकते.
तसेच अतिशय चांगली वाटणारी व्यक्ती आपले दुर्गुण वेळ आल्यावर प्रगट करू शकते.
माणूस इथून तेथून सर्व सारखाच भावनिक पातळीवर माणूस एकसारखाच विचार करतो.