आनंदछंद ऐसा - स्वाती२

Submitted by स्वाती२ on 28 February, 2020 - 08:43

मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्‍या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय तर मी वाचन, विणकाम, हस्तकला वगैरे यादी दिली असती. पण म्हणताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुरावल्याशिवाय तिचे महत्व जाणवत नाही तसे काहीसे माझे झाले. इथे अमेरीकेत लग्न होवून आले, दोन महिन्यात नव्याची नवलाई संपली, पानगळ सुरु झाली आणि काहीतरी टोचू लागले. खरे तर हाताशी भरपूर वेळ होता, वाचनाचा छंद पुरवायला सुरेख लायब्ररी होती, विणकाम-हस्तकलेसाठी भली मोठी दुकाने होती पण कसलीतरी कमी जाणवत राहीली. मिडवेस्टमधला पहीला विंटर बर्‍याच जणांना कठीण जातो तसेच काहीसे असावे असे म्हणत मी स्वतःला अभ्यासात बुडवून घेत माझ्या परीने जीव रमवत होते.
बघता बघता वसंतऋतूची चाहूल लागली आणि गावच्या सुपरमार्केटच्या एका भागाची एकदम कायाच पलटली. माती, खताची पोती, छोटी छोटी बियाणांची पाकिटे, पिटुकली रोपं, पाणी घालायच्या झार्‍या, हातमोजे, खुरपी ..., बघूनच जीव हरकून गेला. पिटुकली क्रोटोन आणि स्नेक प्लांटची रोपटी, त्यांना हात लावत मी थेट आजोळीच पोहोचले आणि एकदम लक्षात आले अरे हेच ते हरवलेले! त्या कुंड्यांमधे माहितीचे लेबल खुपसलेले होते. हाऊसप्लांट म्हणून कशी काळजी घ्यायची तेही लिहिलेले होते. आजोळी मागल्या अंगणात तसरीत वाढणारी झाडे हाऊसप्लांट? गंमतच वाटली. तेव्हा आम्ही भाड्याच्या सदनिकेत रहात होतो. तीन रोपांची खरेदी झाली. आजोळच्या अंगणाचा कोपरा माझ्या विंडोसीलवर सामावला. भारतात असताना कधी हाऊसप्लांट हा प्रकार नव्हता. लायब्ररीत जाऊन भले मोठे हाउसप्लांटचे पुस्तक घेवून आले. एक वेगळेच हिरवे जग उलगडले. नवे बाळ, नवी नोकरी, सदनिकेतले रहाणे यासोबत एकीकडे उन्हाचे कोपरे शोधत हाउसप्लांटची बाग वाढू लागली. हळू हळू त्यात उन्हाळ्यात डेकवर ठेवायला फुलझाडांच्या कुंड्या आल्या. छोट्याशा झारीने त्यांना पाणी घालणार्‍या लेकाचे कौतुक आईला, मामीला सांगताना मी जुन्या आठवणीत रमले.
लेक चार वर्षांचा झाला आणि आम्ही नव्या गावात रहायला आलो. इथेही भाड्याची सदनिकाच होती मात्र छान ऊन येणारा मोठा खाजगी पॅटीओ होता. प्लेडेटसाठी आलेली लेकाच्या मित्राची आई म्हणाली ' सो यू लव हाऊसप्लांट्स!' मी जेव्हा तिला सांगितले की इथे सदनिकेत तेवढेच शक्य आहे तेव्हा ती म्हणाली , 'अगं किती मोठा छान पॅटिओ आहे, कंटेनर वेजीटेबल गार्डन का करत नाहीस?' कुंडीतली भाजी? त्याआधी शहरातल्या नातेवाईकांकडे कुंडीत फक्त मोगरा, गुलाब, तुळस आणि कढीपत्ता वाढताना बघितला होता. पुन्हा लायब्ररीला शरण गेले. महिन्याभरात पानगळ सुरु होणार होती. पुढल्या वर्षी नक्की असे म्हणत माझे प्लॅनिंग सुरु झाले. उन्हाळ्यात कुंडीतले सॅलड ग्रीन्स, मटार, टोमॅटो, झुकिनी , हलपिनो पेपर्स अशी भाजीची बाग डौलात वाढली. दरवर्षी यात नव्याने भर पडत होती. यथावकाश याच गावात स्थानिक व्हायचे ठरवून घर बांधले आणि मला मातीत मनसोक्त खेळायला चिमुकला हक्काचा अर्बन लॉट मिळाला. मात्र त्यासोबत आला 'लॉन' नावाचा नवा धडा! बिल्डरने पुढल्या आवारात इंस्टंट लॉन लावले, बाजूचे, मागले आवार ही आमची जबाबदारी होती. बागकामाच्या या परीक्षेत मात्र मी सपशेल नापास झाले. फॉल-स्प्रिंग परीक्षेच्या वार्‍या सुरु होत्या, काठावर पास-नापास सुरु होते. समरमधे छोटा भाजीचा वाफा, फुलबाग डौलाने वाढत होती, भरपूर ऊन येणार्‍या खिडक्यांत घरातली झाडे ही जोमाने वाढत होती पण लॉन? निगराणीसाठी कंत्राट करुनही केविलवाणेच होते. अशातच गावात पर्ड्यू एक्सटेंशनतर्फे मास्टर गार्डनरचा कोर्स चालवला जातो असे कळले. मी जाऊन नोंदणी केली. ऑगस्टमधे कोर्स सुरु झाला, पहिल्या दिवशी ओळख कार्यक्रमात कळले की तीसातले वीसजण माझ्यासारखे 'लॉन चॅलेंज' वाले होते. हिरव्यागार , चित्रासारख्या लॉनचा मोहातून सुरु झाला आमचा निसर्गाच्या सोबतीने जगण्याचा एक प्रवास. या प्रवासाने नौसैनिकापासून ते नर्सपर्यंत विविध कार्यक्षेत्रं असलेले जीवाभावाचे मैत्र दिले, कम्युनिटी गार्डनमधे काम करताना श्रीमंत अमेरीकेतल्या अन्न असुरक्षितेबाबत शिकवले, रासायनिक खते-किटकनाशके यांकडे डोळे उघडून बघायला भाग पाडले, सुंदर फुलपाखरे, पक्षी यांच्या पलीकडे जावून इतर किटकांशी दोस्ती करवली. स्नोमधे बी रुजवायला शिकवले आणि नांगरणी न करता भाजीपाला पिकवायलाही शिकवले. बागकाम करता करता मी माझ्या गावासाठी ग्रांट्स शोधायला, हिरव्या जागा वाढवायला शिकले. माझ्यात गावच्या चौकात उभे राहून प्रात्यक्षिक देता येइल इतपत धिटाई आली. निसर्गसाखळीतल्या सगळ्याच कड्या महत्वाच्या हे उलगडत गेले तसे चित्रासारख्या हिरव्यागार लॉनचा मोहही गळून पडला. आता स्वप्न आहे ते पर्माकल्चरच्या तत्वांच्या सोबतीने शाश्वत बागकामाचे, उपकारकारक किटकांसाठी सुरक्षित अधिवासाचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलय.
एक नवी द्रुष्टी मिळाली तुम्च्या वर्णनातून.
परसातली बाग म्हणजे आपले स्वतःचे extended अस्तित्वच जणू... >> +111

Pages