मन वढाय वढाय(भाग १९)

Submitted by nimita on 25 February, 2020 - 20:26

बघता बघता लग्नाचा दिवस आठवड्यावर येऊन पोचला. स्नेहाची आई आणि वंदनामावशी यांच्यात जणू चढाओढ लागली होती....सुनेचे लाड जास्त का जावयाचे ! स्नेहा पण खुश होती. रजत बरोबरचं तिचं नातं हळूहळू नवीन साच्यात नव्यानी घडत होतं. त्याची मैत्री तर तिला आधीपासूनच माहीत होती; पण आता त्याच्या स्वभावातल्या इतर अनेक पैलूंची तिला नव्यानी ओळख होत होती. त्यात सगळ्यात महत्वाचा आणि तिला भावलेला पैलू होता- रजतनी दाखवलेला संयम....या नव्या नात्याकडून रजतच्या पण काही अपेक्षा असणारच की....नव्हे होत्याच! पण स्नेहाच्या भूतकाळाबद्दल तो जाणून होता आणि म्हणूनच तो त्यांच्यातल्या या नात्याला खुलायला पुरेसा वेळ देत होता. या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू स्नेहाच्या मनात, तिच्या विचारांत सलीलच्या जागी रजत स्थानापन्न व्हायला लागला होता.किती तरी वेळा रजतचं वागणं, त्याचं बोलणं ऐकून स्नेहा तिच्याही नकळत त्याची आणि सलील ची तुलना करत होती...आणि प्रत्येक वेळी रजतचं पारडं जरा झुकलेलं च असायचं.

पण अजूनही कधीतरी अचानक सलील तिच्या मनात डोकावून जायचा. त्याच्याबरोबर घालवलेले काही सुखद क्षण आठवायचे; सलीलचा चेहेरा डोळ्यांसमोरून तरळून जायचा....पण पूर्वी त्याच्या आठवणींनी स्नेहा जशी व्याकुळ व्हायची तशी आता होत नव्हती. तिनी वस्तुस्थितीचा स्वीकार केला होता. आता आपल्या आयुष्यातला 'सलील' नावाचा चॅप्टर कायमचा बंद झाला आहे हे ती स्वतःच्या मनाला वारंवार बजावून सांगत होती. पण अजूनही त्या बाबतीत तिला पूर्ण यश मिळालं नव्हतं. शेवटी हतबल होऊन तिनी याबाबतीत आजीशी बोलायचं ठरवलं.

आजीनी नेहेमीप्रमाणे शांतपणे स्नेहाचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. थोडा वेळ दोघींपैकी कोणीच काही बोललं नाही. शेवटी न राहवून स्नेहाच म्हणाली," ए आजी, अगं बोल ना काहीतरी. मी काय करू म्हणजे माझ्या मनातल्या सलीलच्या आठवणी कायमच्या पुसल्या जातील. रजत बरोबर नव्यानी आयुष्य सुरू करताना मला माझ्या मनाची पाटी कोरी हवी आहे. आणि तेच जमत नाहीये मला. त्यामुळे कधी कधी वाटतं की मी रजत बरोवरच्या माझ्या नात्यावर अन्याय करतीये.त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतीये....त्याला फसवतीये !"

स्नेहा एका दमात सगळं बोलून मोकळी झाली; पण आजी मात्र अजूनही तिच्याच तंद्रीत होती. स्नेहाला काय आणि कसं सांगायचं यासाठी शब्द जुळवत होती. शेवटी एकदाची आजीनी बोलायला सुरुवात केली. "तुला आठवतंय स्नेहा - तू शाळेत चौथ्या इयत्तेत असताना स्कॉलरशिप च्या परीक्षेत संपूर्ण शाळेत पहिली आली होतीस ?" आजीचा हा गुगली ऐकून स्नेहा गोंधळून म्हणाली," हो, आठवतंय ना! पण..." तिला मधेच थांबवत आजीनी पुढे विचारलं," त्यावेळी तुझ्या बाबांनी बक्षीस म्हणून तुला एक पेन दिलं होतं....इंपोर्टेड इंक पेन ... आठवतंय?" हा प्रश्न ऐकून तर स्नेहा अजूनच वैतागली आणि म्हणाली," हो, ते पण आठवतंय गं ! पण त्याचा इथे काय संबंध? तुला नक्की काय म्हणायचंय ? मला काही समजत नाहीये." स्नेहाकडे हसून बघत आजीनी अजून एक गुगली टाकला-" तू उगीचच काही समजून घ्यायचा प्रयत्न ही करू नकोस..अजून confuse होशील. त्यापेक्षा फक्त मी विचारतीये त्या प्रश्नांची अगदी प्रामाणिक उत्तरं दे. मी न सांगताच कळेल तुला सगळं..." आजीचं हे बोलणं ऐकून मात्र स्नेहानी आपली शस्त्रं खाली टाकली आणि ती आजीला शरण गेली...

आजीनी आपली रणनीती तयार केलीच होती; त्यानुसार तिनी बोलायला सुरुवात केली. "बाबांनी दिलेलं ते पेन तुला खूप आवडायचं ना? का बरं ?"

"का म्हणजे ? माझ्या आयुष्यातलं पहिलं वहिलं इंक पेन होतं ते ! खूप स्पेशल होतं ते माझ्यासाठी !!"स्नेहा आठवणींत रमत म्हणाली.

"पण मग काही दिवसांनंतर त्या पेनची निब मोडली आणि ते पेन इंपोर्टेड असल्यामुळे तशी निब कुठल्याच दुकानात मिळाली नाही - हो ना?" आजी नी पुढचा प्रश्न केला.

"हो ना गं! कित्ती शोधलं, पण कुठेच नाही मिळाली तशी निब !! त्यामुळे मग दुसरं पेन विकत घ्यावं लागलं." स्नेहा हिरमुसली होत म्हणाली.

"हं, आणि ते दुसरं नवीन पेन तुझ्या पहिल्या पेन पेक्षा खूप चांगल्या क्वॉलिटीचं होतं; त्याच्यामुळे तुझं अक्षरलेखन सुद्धा खूप सुधारलं होतं - हो ना ?

"हं," स्नेहानी एकाक्षरी होकार दिला पण अजूनही तिला आजीच्या बोलण्याचा काही संदर्भ लागत नव्हता. पण आजी म्हणाली होती तसं आता ती जास्त उहापोह न करता नुसती ऐकत होती.

आपली प्रश्नमंजुषा पुढे चालू ठेवत आजीनी विचारलं,"त्यानंतर आजपर्यंत तू कितीतरी पेन्स वापरली असशील...एकापेक्षा एक सरस.... पण मग तरीही तू तुझं ते पहिलं मोडकं पेन अजूनही जपून ठेवलंयस ! का बरं ?" आजीच्या या प्रश्नावर स्नेहा पटकन बोलून गेली-" अगं, मोडलं असलं म्हणून काय झालं? माझं सगळ्यात पहिलं शाईचं पेन होतं ते.... मी माझं कपाट आवरताना जेव्हा जेव्हा मला ते दिसतं ना तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.."

आजी ज्या उत्तराची वाट बघत होती ते उत्तर तिला मिळालं होतं.. स्नेहाच्या पाठीवर हात ठेवत आजी म्हणाली, "आता येतंय का तुझ्या लक्षात? तुझ्या मनातल्या सलीलच्या आठवणी या तुझ्या पहिल्या पेन सारख्या आहेत... तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला त्यांची गरज नाहीये हे तुला माहिती आहे तरीही तू त्यांना मनातून बाहेर काढू शकत नाहीयेस....आणि या बाबतीत माझं मत विचारशील तर तसा प्रयत्न देखील करू नकोस." आजीचं शेवटचं वाक्य ऐकून स्नेहा पुरती गोंधळली.." अगं, पण मग माझ्या आणि रजतच्या नात्यात त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आले तर ? आणि तसंही, 'एकदा रजत च्या प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर सलीलच्या आठवणी पण जपणं'... हे योग्य ठरेल का? "

"मी तुला सलीलच्या आठवणी जपायला नाही सांगितलं... मी फक्त एवढंच म्हणते आहे की तू मुद्दाम त्यांना मनातून हुसकावून टाकायचा प्रयत्न नको करू. तू जितकी त्यांना विसरायचा प्रयत्न करशील तितक्या त्या तुला आठवत राहतील.

टायटॅनिक सिनेमा मधली रोझ काय म्हणते लक्षात आहे ना... A woman's heart is a deep ocean of secrets .

जेव्हा रजत बरोबर च्या नव्या सुखद , अविस्मरणीय अशा आठवणी तुझ्या मनात साठत जातील ना तेव्हा आपोआप या जुन्या आठवणी मनाच्या तळाशी खोल जाऊन पडतील...राहू दे त्यांना तिथेच. In fact , एका दृष्टीनी ते योग्यच ठरेल. कारण सलीलच्या त्या आठवणीच तुला वेळोवेळी रजतच्या प्रेमाची महती पटवून देतील. त्यामुळे आता हे सगळे विचार सोडून दे आणि तुझ्या आयुष्यातल्या या नव्या अध्यायाच्या स्वागताची तयारी कर...."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!!
नेहमीप्रमाणेच मस्त भाग...

A woman's heart is a deep ocean of secrets .>>> अगदी 100 % खरं Happy