करोना करोना…

Submitted by Asu on 22 February, 2020 - 06:59

सर्व जगात थैमान घालणाऱ्या करोनाच्या विषाणूला नम्र विनंती-

करोना करोना…

करोना करोना जुलूम करो ना
किडा-मुंगीगत माणसे मारो ना
जनसंख्या नियंत्रण मानव करेना
माल्थसचा सिद्धांत खोटा ठरेना

झाली चूक त्यांची रागाऊ नका ना
करोना करोना आम्हां माफ करा ना
वुहानहून आला तुम्ही हेच खरे ना
जायचे लवकर तुमचे तुम्ही पहा ना

ड्रॅगनशी कुस्ती आता पुरेना
हरले बिचारे त्यांना सोडाना
जगात चिंता, काही कळेना
उपाय तुजवर अजून मिळेना

आरोग्याच्या सवयी तुम्ही लावा ना
साबणाने हात धुऊन स्वच्छ करा ना
चेहऱ्यावर हात कुठे टेकवू नका ना
खोकता शिंकता रुमाल धरा ना

शमविण्या करोना उपाय मिळेना
माणूसखाऊ बकासुराचं पोट भरेना
शोधावा भीम कुठे काही कळेना
करोना करोना तूच आता जा ना

सर्दी ताप खोकला कुणा जडो ना
झाल्यावर डॉक्टरांचा रस्ता धरा ना
आराम करत घरात शांत बसा ना
करोनाचा प्रसार तुम्ही रोखा ना

सर्व मिळून तुम्ही आता एकत्र या ना
करोनाच्या राक्षसाला पळवून लावा ना
आरोग्याची परि तुम्ही काळजी घ्या ना
आनंदाची पहाट उगवेल वाट पहा ना

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults