“दि अॅक्सीडेंटल स्टुडंट”

Submitted by Dr Raju Kasambe on 21 February, 2020 - 05:51

“दि अॅक्सीडेंटल स्टुडंट”

एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. स्टेज वर स्थानापन्न झाल्यावर माझा परिचय वाचल्या गेला.
आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत - डॉ. राजू कसंबे.

आता मी त्यांच्या डिग्र्या वाचून दाखविते. बि.एससी., बि.ए., एम.ए. (इंग्रजी), एम.एससी. (पर्यावरण), डी.बि.एम., बि.एड., एम.फील., पीएच.डी.
टाळ्या!!

माझा असा परिचय झाला की टाळ्या पडतात.
मी कुठेही भाषण द्यायला गेलो अथवा कुठल्या कार्यक्रमात की गेलो असे घडते. माझा पण ऊर भरून येतो.
हो! खरंच खूपच शिकून टाकले मी.

कधी विचार पण केला नव्हता की आपण खूप शिकतोय. फक्त त्यावेळेस असे वाटले की आपण हे करायला पाहिजे. ही डिग्री मिळवायला हवीच. बस प्रयत्न करीत गेलो. अगदी आता हे करायलाच हवे अशी भावना ठेवून. अडचणी नेहेमीच आल्या. पण उपायसुद्धा मिळत गेले. शिक्षकांचे आशीर्वाद मिळत गेले. पण हे कधीच ठरविले नव्हते की आठ पदव्या मिळवायच्या?

अजूनही चांगले आठवते. बि.एससी. मध्ये फर्स्ट क्लास घेऊनही मला आर्थिक चणचणीमुळे एम.एससी.ला जाता आले नाही. डिग्री घेऊन घरी बसलो होतो (१९९१-९२). नोकरीसाठी मुलाखती देणे चालू केले. केवळ जीवशास्त्राच्या पदवीवर फक्त वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून नोकरी मिळू शकते हे माहिती होते. पण फर्स्ट क्लास डिग्री असूनसुद्धा (कोकाटे ह्यांचे!) फाडफाड इंग्रजी बोलता येत नव्हते. मुलाखतीसाठी आलेले बाकीचे उमेदवार माझ्या तुलनेत ‘हायफाय’ असत. अनेकजण एम.बी.ए. केलेले सुद्धा असत. अर्थात अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा माझे सिलेक्शन होत नव्हते. मग काय रिकाम्या वेळात घर बसल्या बि.ए. (अतिरिक्त इंग्रजी वाङ्मय विषयात) करता येईल म्हणून फॉर्म भरला. परीक्षा दिली. सुदैवाने पास सुद्धा झालो.

बि.ए.ची मार्कशिट हाती पडेपर्यंत मला एका छोट्या कंपनीत नांदेड येथे वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून नोकरी मिळाली होती. एका मित्राच्या ओळखीतूनच हा ‘ब्रेकथ्रु’ मिळाला होता. कंपनीचा पगार कमी होता. त्यामुळे टॅलेंट पेक्षा ‘मुलगा काम करेल ना?’ ह्या विश्वासावर मला घेतले होते.

नांदेडला बि.ए.ची मार्कशिट हाती पडताच ह्याचे काय करायचे म्हणून तिथल्याच पीपल्स कॉलेज मध्ये एम.ए. (इंग्रजी वाङ्मय) साठी अर्ज भरला. सुदैवाने प्रवेश मिळाला. पण आता नोकरी असल्यामुळे कॉलेजला दररोज जाणे शक्य नव्हते. कसे तरी करीत दोन वर्षे निभावली. विशेषतः एका प्राध्यापकाने (डॉ. कुलकर्णी सर) मला खूप धीर दिला. पहिल्या वर्षीचे विषय निघाले पण दुसर्‍या वर्षीचे विषय अडकून राहिले. परीक्षा आणि कंपनीची मीटिंग नेमकी एकाच वेळेस असायची. माझ्यासाठी रोजीरोटी महत्त्वाची होती. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावता येत नव्हते. एक एक पेपर पास करताना चार पाच वर्षे निघून गेली. तोपर्यंत मी नोकर्‍या बदलवित, बदल्या होत नांदेड – औरंगाबाद – अमरावती असा प्रवास केला. त्याच कालावधीत नांदेडला नवीन विद्यापीठ झाले पण नियमाप्रमाणे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठाचाच विद्यार्थी राहिलो. अमरावतीला आल्यानंतर लग्न झाले.

एम.ए.चे मागे राहिलेले पेपर द्यायचे निमित्त साधून बायकोला फिरायला घेऊन गेलो. अमरावतीवरून औरंगाबादला जाऊन शेवटी एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालो. आणि हो आम्हाला मुलगी सुद्धा झाली!

प्राध्यापकीसाठी बी.प्लस हवा (५५% गुण) असतो. मला तर येथे द्वितीय श्रेणीसुद्धा मिळाली नव्हती. दोन गुण कमी पडले होते. निराशेमुळे अनेक दिवस मार्कशिट सुद्धा आणायला गेलो नाही. माझ्या व्यावहारिक जीवनात त्याचा काही उपयोग नव्हता. (पुढे चालून जेव्हा मार्कशिट आणली तेव्हा कळले की दोन मार्कांची ‘ग्रेस’ मिळते. मला द्वितीय श्रेणी मिळाली होती).

मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे जर एम.बी.ए. किंवा डी.बी.एम. (डिप्लोमा ईन बिझिनेस मॅनेजमेंट) केले तर त्याचा पुढे फायदा होईल असे दिसत होते. अमरावतीच्या एका कॉलेजमध्ये डी.बी.एम. करता येईल असे लक्षात येताच तिकडे प्रवेश मिळवला. येथे सुद्धा कॉलेजमध्ये हजेरीची समस्या होती. पण सद्गृहस्थ असलेल्या प्राचार्यांनी मला आशीर्वाद दिले आणि मी प्रथम श्रेणी मिळवली.

आर्थिक तंगीमुळे एम.एससी. करायला मिळाले नाही ही खंत नेहेमी सतावत असे. सिक्किम मणिपाल विद्यापीठात दूरशिक्षणाद्वारे (करस्पॉन्डन्स कोर्स) एम.एससी. करता येते ही अतिशय आनंदाची बातमी आता मला माझा मित्र जयंत वडतकर कडून कळली. ते सुद्धा पर्यावरणशास्त्र हा विषय घेऊन! कॉलेजमध्ये जाऊन हजेरीची कटकट नाही! अर्थात ही संधी मी सोडणार नव्हतोच.

शोध प्रबंधासाठी मोर्शी जवळ अप्पर वर्धा धरणाकाठी आम्ही शोधलेल्या निळ्या शेपटीच्या राघुंवर संशोधन करायचे मी ठरविले. अमरावती विद्यापीठातील प्राणिशास्त्राच्या डॉ. गणेश वानखेडे सरांनी त्यासाठी मार्गदर्शन केले आणि माझी नैया पार झाली. लेखी परीक्षा अर्थात माझ्यासाठी खूप कठीण नव्हती. प्रथम श्रेणी मिळाली.

पुन्हा माझी बदली झाली. चंबू गबाळे गुंडाळून नागपुरला राहायला आलो. मला कुणीतरी बी.एड. बद्दल माहिती दिली. त्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा सोपी असल्याचे कळले. अर्थात प्रवेश मिळाला. पुन्हा ९०% हजेरीचा प्रश्न आला (माझी हजेरी १० टक्के वगैरे असावी). पण ह्यावेळेस महाविद्यालयाच्या प्राचार्या देवासारख्या मदतीला धावुन आल्या. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या पाया पडलो. त्यांनी आशीर्वाद दिला. अर्थात प्रथम श्रेणी मिळाली.

बी.एड. संपते न संपते तो मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक द्वारा एम.फील. करता येतं आणि त्यासाठी नागपुरला केंद्र असल्याची माहिती आणि जाहिरात मिळाली. लगेच प्रवेश घेतला. त्यासाठी मला आठवड्यातून्न दोन सायंकाळी वर्गाला हजेरी लावायची होती. शोध प्रबंधासाठी गोरेवाड्याच्या जंगलातील फुलपाखरांचे संशोधन करून सादर केले. अर्थात प्रथम श्रेणी मिळाली.

मला पक्ष्यांमध्ये रुची असल्यामुळे नागपूरला पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे घट्ट मित्र झाले. पी.एचडी. करायची चर्चा होऊ लागली. त्यांनी डॉ. दिलीप सावरकरांची (प्राणीशास्त्राचे प्राध्यापक) भेट घालून दिली. विद्यापीठात चक्कर टाकली. पी.एचडी.ची नियमावली मिळवली.

सावरकर सरांनी डॉ. प्रवीण चरडे सरांची (प्राचार्य, सेवादल महिला महाविद्यालय, नागपुर) भेट घालून दिली. चरडे सरांनी पी.एचडी.च्या नोंदणीचा मार्ग सुकर केला. ते स्वतः माझे सह-मार्गदर्शक झाले. डॉ. जीवन तरार सरांनी मला संशोधक विद्यार्थी म्हणून स्वीकारले. ते माझे मुख्य मार्गदर्शक झाले. पुढील दोन वर्षे (२००७-२००९) नोकरी आणि धनेश पक्ष्यांच्या (हॉर्नबिल) संशोधनात कशी निघून गेली ते कळलेच नाही. चरडे सरांनी माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे दरवाजे उघडून दिले. संशोधनाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत सिंगापूर, इस्राइल आणि नेदरलँडला जाऊन पक्षिशास्त्रातील बारकावे शिकायला मिळाले.

२००९ च्या शेवटी पी.एचडी.चा प्रबंध सादर केला. डोक्यात विचार चक्रे चालू होती. डॉक्टरेट करून वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून नोकरी करायची काय? अर्थात मनातून उत्तर येत होते – नाही. ह्याच दोन तीन वर्षात मला पाठदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. कंपनी मला स्वेच्छा निवृत्ती देईल अशी आशा होती. पुढे काय करायचे माहिती होते (वाइल्ड लाईफ साठी, पक्ष्यांसाठी काम करायचे) पण तशी संधी मिळेल की नाही ते माहिती नव्हते.

केवळ बी.एससी. ह्या पदवीवर १७-१८ वर्षे नोकरी करता करता मी असा जीवनाच्या प्रवासात शिकत गेलो. पदव्या घेत गेलो. जशी माहिती मिळत गेली तशा ह्या पदव्या घेतल्या. नेहेमी मी अॅक्सीडेंटल स्टुडंटच राहिलो.

पण ज्या कारणामुळे मी तेव्हा एम.एससी. करू शकलो नाही ते कारण उराशी धरून मी कधीच रडत बसलो नाही. मी कधीच माझ्या आई बाबांना दोष दिला नाही. मला संधी मिळताच मी काय करून दाखवू शकतो ते मी करून दाखवले. मला माझ्यातल्या फाडफाड ईंग्लिश न बोलता येणार्‍या ‘राजूला’ मी ते करून दाखवू शकतो हे सिद्ध करायचे होते.

डिसेंबर २००९ च्या सुरुवातीलाच ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि माझ्या मनात जे काही घोळत होतं त्याला बळकटी मिळाली. मला जे काम आवडतं तेच मी करायला पाहिजे ह्यावर मी ठाम झालो. ३१ डिसेंबर २००९ ला ‘नोव्हार्तीस’ ह्या बहुराष्ट्रीय औषधी कंपनीतील नोकरी मी सोडली. भविष्यात काय लिहिले आहे त्याची चिंता होतीच पण 'बघून घेऊ' अशी मनाची तयारी सुद्धा होती!

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

पण ज्या कारणामुळे मी तेव्हा एम.एससी. करू शकलो नाही ते कारण उराशी धरून मी कधीच रडत बसलो नाही. मी कधीच माझ्या आई बाबांना दोष दिला नाही. मला संधी मिळताच मी काय करून दाखवू शकतो ते मी करून दाखवले. >>>

ज्जे बात, हार्दिक अभिनंदन

पण ज्या कारणामुळे मी तेव्हा एम.एससी. करू शकलो नाही ते कारण उराशी धरून मी कधीच रडत बसलो नाही. मी कधीच माझ्या आई बाबांना दोष दिला नाही. मला संधी मिळताच मी काय करून दाखवू शकतो ते मी करून दाखवले. >>> ज्जे बात, हार्दिक अभिनंदन>>>>> +११११

सही ! तुमचे अनूभव खूप छान असतात, त्यातुन मार्गदर्शन पण मिळते.

जिद्द आणि मेहनतीला दंडवत !_/\_

जाता जाता- धनेश पक्षाची एक जात अंदमान द्वीप वर नारकोंडम येथेच फक्त सापडते. त्या नारकोंडम बेटावर जाण्याचे भाग्य मला मिळाले.

सर्वांचे धन्यवाद!
सुबोध खरे ,
तुम्ही खरेच भाग्यवान आहात. मी अजूनही अंदमान निकोबर सुद्धा बघितलेले नाही!

मी देखील गवंडी, सुतार यांच्या हाताखाली काम करत शिकलो, शेणी वेचल्या, ऊसतोड मजूर म्हणून काम केले. हमाली केली, सेल्समन पासून अनेक पोस्टवर मार्केटिंगमध्ये काम केले.
पण शेवटी स्थैर्य आणि मनःशांती, प्रतिष्ठा सरकारी नोकरीनेच दिली.

आर्यन वाळुंज
एक छान लेख लिहा. अशा संघर्षाच्या गोष्टीतून इतरांना प्रेरणा मिळते. धन्यवाद!!

... ते कारण उराशी धरून मी कधीच रडत बसलो नाही. मी कधीच माझ्या आई बाबांना दोष दिला नाही. मला संधी मिळताच मी काय करून दाखवू शकतो ते मी करून दाखवले.

ह्या तुमच्या जिद्दीला सलाम!

भारी आहे.

बापरे.फारच डेंजर शिकला आहात तुम्ही.डिग्री ची यादी वाचत दमले.(आधी 2 ओळी वाचून मला वाटलं की प्रमुख वक्त्याला सर्व पाडाव्या चिकटवतात ओळख करून देताना त्याबद्दल विनोदी लेख आहे.पण नंतर वाचताना तुमच्या कडे खरोखर मेहनतीने कमावलेल्या इतक्या डिग्र्या आहेत वाचलं आणि आदर अजून वाढला.

mi_anu
धन्यवाद. मी हे ठरवून शिकलेलो नाही. सगळे घडत गेले.