४ ऑस्कर मिळविणारा ‘पॅरासाईट’ : चित्रपट अनुभव

Submitted by Dr Raju Kasambe on 21 February, 2020 - 00:41

४ ऑस्कर मिळविणारा ‘पॅरासाईट’ : चित्रपट अनुभव!

एका बेरोजगार कुटुंबाच्या भाकरीच्या शोधाची ही गोष्ट आहे. आई (चुंग-सूक), बाप (की-तीक), मुलगा (कि-वू) आणि मुलगी (कि-युंग) असे चार जण असलेले हे कुटुंब थातुर मातुर काम करून दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून खटपट करीत असतात. त्यांचे घर कुठल्याशा गल्लीबोळात असते. अगदी बेवड्या लोकांना त्यांची खिडकी मूत्रविसर्जनासाठी योग्य वाटेल येवढ्या छोट्या बोळीत!

चित्रपाटाची सुरुवात घरातील दोन स्मार्ट अपत्ये फुकटचे वायफाय मिळवायचा कसा प्रयत्न करतात, पासवर्ड शोधतात इथून होते. अर्थात घरची मुले चुणचूणीत असतात. चिरंजीव ‘किवू’ चारदा विद्यापीठ परीक्षेत नापास झालाय! पण त्यांच्यात ‘स्ट्रीटस्मार्टनेस’ भरपूर आहे. पण परिस्थिति साथ देत नसते. मुलगी कि-युंगला उपजतच चित्रकलेत गती आहे – पण त्याचा काय उपयोग?

अचानक एक संधी चालून येते. एका गर्भश्रीमंत व्यवसायिकाच्या कुटुंबात (बाबा – श्री पार्क, आई, मुलगी, मुलगा) त्यांच्या मुलीसाठी इंग्रजी भाषेच्या शिक्षकाची गरज असते. ‘किवू’ला इंग्रजी शिक्षक म्हणून ह्या कुटुंबात – बंगल्यात प्रवेश मिळवतो. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच ह्या बंगल्यात ‘घुसते’ आणी जम बसवते, जणू काही ‘परजीवी’च. अर्थात त्यासाठी त्यांना तेथे आधीच काम करीत असलेल्या ‘बिचार्‍या’ लोकांच्या नोकर्‍यांचे बळी द्यावे लागतात. फार चतुराईने हे साधले जाते (प्रत्यक्ष बघण्यातच खरी गम्मत आहे). अर्थात आपल्या घरचे चारही ‘नवीन सदस्य’ एकाच कुटुंबातील आहे ह्याची पार्क कुटुंबाला सुतराम कल्पना नसते!

कोकिळा कावळ्याच्या घरट्यात स्वतःची अंडी टाकते आणि सर्व जबाबदारी श्री व सौ कावळीनिवर टाकून कोकिळा दांपत्य स्वतः आयुष्याचा आनंद घेतात. अर्थात त्यासाठी त्यांना कावळ्याच्या घरट्यातील अंडी बाहेर फेकून देण्याचे पाप करावे लागते. बास, अस्सेच!!

आता किमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी ‘पार्क’चे गर्भश्रीमंत कुटुंब सांभाळत असते. सगळे काही आलबेल आहे असे वाटायला लागते. किम कुटुंब स्वतःच्या चतुराईचे कौतुक करीत आणखी स्वप्ने रंगवायला लागतं. आणि अचानक घरातील जुनी मोलकरीण एका रात्री परतते. तिला ‘किम’ कुटुंबाच्या षडयंत्राचा सुगावा लागतो (म्हणजे चारही जण ‘मिलेजुले’ असल्याचा). त्याचवेळेस जुन्या मोलकरणीच्या ‘गुपिताचा’ किम कुटुंबाला शोध लागतो.

अचानक चित्रपटाचे कथानक अनपेक्षित दिशेने दौडू लागते. आतापर्यंतच्या हलक्याफुलक्या प्रसंगात आपल्याला कुणी ‘खलनायक - व्हीलेन’ वाटत नाही. नंतर ज्या काही घटना घडतात त्यामुळे आपल्याला चित्रपटात आधी दाखविलेल्या क्षुल्लक प्रसंगांची आठवण होते. गर्भश्रीमंत लोकांच्या मनात गरिबाच्या अंगाच्या वासाचा सुद्धा कसा तिटकारा असतो. द्वेष असतो. पण तो जाहीरपणे व्यक्त केल्या जात नाही. समाजात वावरताना सगळं कसं आलबेल आहे असं भासवलं जातं. हा द्वेष कधीतरी उफाळून येतो आणि एक सामान्य गरीब माणूस एखाद्या गर्भश्रीमंत माणसाविरोधात (स्वतःच्या पोशिंदया वरही) शस्त्र उचलतो. तो असं काही करेल असं आपल्याला स्वप्नातही वाटत नाही.

एका बेरोजगार कुटुंबाच्या संघर्षापासून सुरू होणारा हा चित्रपट आपल्याला हसवता हसवता गंभीर करतो, हादरवतो, ‘अरे ये क्या हो रहा है’ असे झटके देतो. चित्रपटाचा अनपेक्षित शेवट आपल्याला दक्षिण कोरियातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील दरिद्री-गर्भश्रीमंतीची दरीबद्दल, एकमेकांबद्दल असलेल्या अदृश्य, अव्यक्त व्देशाबद्दल विचार करायला भाग पाडतो. ती दरिद्री-गर्भश्रीमंतीची दरी आपल्याला दिसायला लागते.

ह्या चित्रपटाबद्दल “खलनायक (व्हीलेन) नसलेली शोकांतिका आणि विदूषक नसलेला विनोदी चित्रपट” असे एका समीक्षकाने लिहिलंय! अगदी खरे आहे. ह्या चित्रपटाला आंतराष्ट्रीय ख्यातीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला २०२० चे प्रतिष्ठेचे चार ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत – सर्वोत्कृष्ट चित्रपट,दिग्दर्शन, लेखन आणि आंतर्राष्ट्रीय फीचर फिल्म.

हा चित्रपट कसा आणि कुठे (इंग्रजी उपशीर्षकासहित) बघायला मिळेल हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. पण बघा निश्चित, हे मात्र मी सुचवू शकतो.

चित्रपटाची लांबी: २ तास १२ मिनिटे.
भाषा: कोरियन.
कथानक - दिग्दर्शक: बोंग जून-हो.

टिप: हे चित्रपट परीक्षण नव्हे.

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण! पॅरासाइट हे नाव किती यथार्थ आहे, हे चित्रपट बघताना समजतं.
ऑस्करच्या कमिटीला सलाम (हे फिल्मफेयरचे अवॉर्ड बघून वाटतं.)

> गर्भश्रीमंत लोकांच्या मनात गरिबाच्या अंगाच्या वासाचा सुद्धा कसा तिटकारा असतो. द्वेष असतो. पण तो जाहीरपणे व्यक्त केल्या जात नाही. समाजात वावरताना सगळं कसं आलबेल आहे असं भासवलं जातं. हा द्वेष कधीतरी उफाळून येतो आणि एक सामान्य गरीब माणूस एखाद्या गर्भश्रीमंत माणसाविरोधात (स्वतःच्या पोशिंदया वरही) शस्त्र उचलतो. तो असं काही करेल असं आपल्याला स्वप्नातही वाटत नाही. > पर्फेक्ट!!

लेख चित्रपट https://www.maayboli.com/node/2205 विभागात असायला हवा.

ॲमी
आता लेख तिकडे सुद्धा टाकू का? कारण मी त्या विभागाचा सदस्य नव्हतो.
धन्यवाद!!

परत लेख टाकायची गरज नाही.
ऍडमीनना https://www.maayboli.com/user/3/guestbook विनंती करा की लेख चुकून ललित विभागात टाकला गेलाय; त्याला चित्रपट विभागात मुव्ह करा.

हा चित्रपट नेटवर्क डाटा खर्चून कायदेशीर पणे कुठे पहायला मिळू शकेल? चित्रपट गृहात मी जाणं बंद केले आहे.

सर्वांचे धन्यवाद !!
आर्यन वाळुंज साहेब
कृपया गुगल वर शोधा. बर्‍याच वेबसाईट आहेत. जरूर बघा.

विस्तारीत अनुभव लिहिण्याच्या ओघात तुम्ही चित्रपट उलगडुन दाखवला आहे. वर ठळक शब्दात स्पॉयलर अलर्ट लिहा - चित्रपट न बघितलेल्या वाचकांकरता...

>>गर्भश्रीमंत लोकांच्या मनात गरिबाच्या अंगाच्या वासाचा सुद्धा कसा तिटकारा असतो. द्वेष असतो.<<
नोप. तो गंध नोटिस केला जातो पण त्यामागचा उद्देश तिटकारा/द्वेष नसुन चित्रपटात पुढे आलेल्या एक घटनेकरता दिलेला क्लु आहे. सवयीनुसार किंवा सततच्या संपर्कात न येणारा कुठलाहि गंध लगेच नोटिस केला जातो. त्याला श्रीमंत्/गरीब रंग देणे प्रिपॉस्टरस आहे...

अर्थात त्यासाठी त्यांना कावळ्याच्या घरट्यातील अंडी बाहेर फेकून देण्याचे पाप करावे लागते. बास, अस्सेच!!
जरा विषयांतर, अशारितीने कावळ्यांची अंडी फुटली जातात तरीही कावळ्यांची संख्या कमी होत नाही नवीन कावळ्यांची पैदास होत असेलच ना??

चित्रपट पाहिला नाही. परीक्षण आवडलं.

पण एकूण मला कळला व झेपला नाहीये चित्रपट. ही नोकर फॅमिली फ्रॉड असते पण गरीबीमुळे फ्रॉड करत असल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी का?
मला तर त्या श्रीमंत कुटुंबाचीच दया आली .बिचारे. यापेक्षा नोकर ठेवूच नयेत.

मला पण सनव सारखच काहीतरी वाटलं. क्लास मधला फरक वगैरे ठीक आहे. पण कदाचित लहानपणापासून गरिब लोकं कसे एकदम एथिकल असतात, श्रीमंतच लबाड असतात असे बॉलिवुडी बाळकडू मिळाल्याने की काय मला त्यागरीब कुटुंबाबद्दल सहानुभुती काही वाटली नाही.
जरा चिडचिडच झाली सिनेमा बघून.

तू दिलेल्या लिंक बघितल्या. पण तरी पटलं नाही. भांडवलशाहीला नावं ठेवणारे लिबरल्स स्वतः त्याचे मोठे beneficiary असल्याची खूप उदाहरणं पाहिली आहेत म्हणून असेल. पार्क कुटूंब गैर मार्गाने श्रीमंत झालं असेल तर ते चूक. अन्यथा ते बांडगुळ का बरं?
किंवा पार्क कुटूंब आपल्याकडल्या लिबरल राजकारण्याप्रमाणे सतत गरीब वंचित जनतेच्या काळजीचा आव आणत स्वतः मात्र डोळे पांढरे होतील इतका पैसा खाऊन बसत असतील तर तेही अयोग्य.

सर्वांचे धन्यवाद. मी लेख लिहिताना फक्त एका लेखकाचा लेख वाचला होता तसेच पात्रांची नावे विकीपेडिया वरून घेतली. त्यामुळे मला जसे वाटले तसे लिहिले. असो.

बघितला. मला तो वाढदिवसाच्या पार्टीत पार्क्चा खून करणे प्रसंग झेपलाच नाही. काय बावळट सीण होता. विनोदीच वाटला. सुरवातीला सिनेमा डार्क ह्युमरच्या अन्गानी जाईल असं वाटलं तर यांनी खून टाकले. कन्फूज वाटला सिनेमा.

मला एकच सीन आवडला. पार्क कुटूंब ट्रिप वरून अचानक परत आल्यावर त्यांच्या घरातून बाहेर पडून भर पावसात बाप, मुलगा आणि मुलगी आपल्या घरी परततात - तो.

या सिनेमाला ऑस्कर का मिळालंय म्हणे?

इथंले प्रतिसाद वाचून काल बघितला
इतकाही ग्रेट नाही वाटला
अनेक त्रुटी जाणवल्या
इतक्या श्रीमंत घरात इतके कमी नोकर?
एवढी मोठी बाग त्याला माळी नाही? कुठल्याही नोकराला इतक्या पटकन कसे काय कामाला ठेवतात?
शेवटचा पार्टी चा प्रसंग तर अगदीच