माझ्या नजरेतील रुपेरी पडदा भाग 2

Submitted by आत्रिक on 17 February, 2020 - 12:32

War of the world's (2005)
Spoiler alert

आपण हा चित्रपट पाहिला नसेल आणि आपल्याला त्यातील गोष्टी जाणायच्या नसतील तर आपण हा लेख वाचू नये.

नेहमीप्रमाणे डोक्याला जास्त ताण देण्याची इच्छा नसताना हा चित्रपट पाहायला मी घेतला. परग्रहावरील जीवांचे पृथ्वीवरील आक्रमण असणारे चित्रपट सलमान खान च्या सारखेच असतात, हॅपी शेवटाची खात्री एकदम....
तर असा मी हा चित्रपट पाहायला घेतला. टॉम क्रुझ चा हा चित्रपट, 2005 सालचा.... त्यामुळे आत्ताच्या काळापेक्षा तंत्रज्ञान जुने आहे ते लक्षात येते. बंदरावरील सामानाचे कंटेनर जहाजावर ठेवणाऱ्या टॉम क्रुझ पासून चित्रपट चालू होतो. इतके साधे काम करणारा नायक आता परग्रहाचे आक्रमण कसे पर्टवणार असे वाटत असताना, आक्रमणाला सुरुवात होते. क्षणाक्षणाला दिग्दर्शकाने आपली उत्सुकता ताणून धरली आहे. पण नेहमीप्रमाणे मानवाची जगण्याची इच्छाशक्ती आणि त्यातून पारडे पलटणे, अशा काहीच गोष्टी होत नाहीत. चित्रपटाच्या शेवटपर्यंत अशा असते की आता काहीतरी हिरो एकदम करेल आणि बाजी पलटेल, पण तसे होत नाही. अगदी शेवटी थोडी चुणूक दाखवलीय पण ती हिरोच्या जागी कोणीही असता तरी दाखवता आली असती. आता असा चित्रपट ज्यात नायक पूर्णवेळ पळ काढत असतो तो पाहिल्यावर निराशाच झाली माझी. नंतर IMDb मानांकन द्यायला गेलो आणि दिसले की दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आहे. मग जरा विचार चालू झाले... मग लक्षात आले की आपण नेमके काय पाहिले ते ... एरवी परग्रह आक्रमणात जे साधे लोक आपले जीव मुठीत धरून पळत असतात त्यांना हा नायक चित्रपटात साकारतो. मग परग्रवासी आले म्हणून कौटुंबिक कलह काही लगेच मिटत नाहीत , सामान्य माणसाला तिथे पण तोंड द्यावे लागू शकते. संकट कितीही प्रमाणात पृथ्वीवर आले असू दे ,सामान्य माणूस कायम आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्याच्या विवंचनेत असतो. हे सगळे जाणवायला लागले. आणि सर्वात महत्वाचे तर शेवट आवडला. ही पृथ्वी काही फक्त मानवाची नाही इथले सगळे जीव पृथ्वीचे आहेत आणि सगळ्या जीवांची ही पृथ्वी आहे. त्यापैकीच काही पृथ्वीच्या वातावरणातील काही जिवाणू परग्रहवासी ना पुरून उरतात. किती वेगळा विचार आहे हा, ही पृथ्वी आपल्या मालकीची असल्यासारखे आपण वागत असतो पण लाखो करोडो जीवांचा सांभाळ ही माय करत असते आणि तिचे रक्षण करणे ही आपली तशीच त्यांची पण जबाबदारी आणि गरज असते.

खूप वेगळाच कथेवर बेतलेला हा चित्रपट खूप निराळा दृष्टिकोन देतो......

Group content visibility: 
Use group defaults