चोरीचे अभंग

Submitted by Asu on 9 February, 2020 - 08:49

चोरीचे अभंग

चोरावर मोर | लेखन प्रयास ||
उगाच साहस | करू नये ||

विचारांची चोरी | वर शिरजोरी ||
लेखकाचे दारी | शोभे नाही ||

जात मांजराची | दावी भाव भोळे ||
मिटुनिया डोळे | दूध पिण्या ||

चोरीची कमाई | लपणार नाही ||
देव सदा पाही | वरूनिया ||

सारस्वता घरी | पापाची कमाई ||
प्रसिद्धीची घाई | उगाचची ||

आपलेची दात | आपलेची ओठ ||
शरमेची गोठ | सांगू कुणा ||

नकळत चूक | होते कधी कधी ||
स्वये अपराधी | शिक्षा घ्यावी ||

असू म्हणे देवा | करू नये हेवा ||
आपला तो ठेवा | आपणासी ||

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.09.02.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults