बहिण भाऊ

Submitted by Dr Raju Kasambe on 9 February, 2020 - 07:44

बहिण भाऊ

“आम्ही तिला कशाला खेळू देऊ? तिला मुलींसोबत खेळ म्हणा”. बंटी त्याच्या बहिणीला मिंटीला आणि आईला म्हणाला.

“मिंटी तुझ्यासोबत आली तर आम्ही तुझ्यासोबत खेळणार नाही”. बंटीचे मित्र त्याला म्हणाले.

बंटीने एकदा आपल्या आईकडे आणि बहिणीकडे बघितले आणि त्याचे मित्र पळाले त्या दिशेने धुम ठोकली. मिंटी तिच्या भावापेक्षा म्हणजे बंटी पेक्षा चार-पाच वर्षांनी लहान होती. एवढ्यात बंटी तिच्याशी असाच वागत होता. मिंटीच्या डोळ्यात अश्रू तरळले. सगळी मुलं नजरेआड होताना बघून तिचे डोळे डबडबले. हळूच तिने आपले अश्रू पुसले. एकही शब्द न बोलता ती दारातच उभी राहिली. निशब्द. निश्चल.

तेवढ्यात दोन सुंदर नाजूक फुलपाखरं हळुवार भिरभिरत तिच्याजवळ आली. त्यांना तिचे रंगीत कपडे आवडले असावेत नाहीतर तिच्याशी शिवाशिवी खेळायची असेल कदाचित. पण का कोण जाणे मिंटीने आज त्यांचा पाठलाग केला नाही. ती नुसतीच ढीम्म बसून राहिली.

दाराच्या पायर्‍यांवर बसून ती एक एक खडा उचलून अंगणात भिरकाऊ लागली. फेकलेले खडे टुणटुण उड्या मारताना बघून तिला गम्मत वाटली. पूर्वी ती आणि बंटी सोबतच खेळायचे. लपाछपी, शिवाशिवी, नाहीतर घर-घर. गंमतच्या घर-घर खेळात ती छान स्वयंपाक करायची आणि बंटी जमिनीवर बैठक ते सर्व जेवल्याचे नाटक करायचा. मग पाणी प्यायचा आणि पोट भरल्यासारखे करून गंमतचा ढेकर सुद्धा द्यायचा. कधीकधी ते दोघं फुलपाखरं पकडायला जायचे. नाही तर उगाच चतुर किड्यांचापाठलाग करायचे. रंगीबेरंगी फुलपाखरं बघून ती तर हरखून जायची.

पण एवढ्यातच बंटी तिच्याशी खेळनासा झाला होता. तो आता त्याच्या मित्रांसोबत रमत होता. एखाद्या वेळेस तो तिच्याशी खेळलाच तर मग ते दोघे धावण्याची शर्यत लावायचे. बंटीच्या तुलनेत मिंटी अगदीच हळू धावत असल्याने ती खूपच मागे पडायची आणि बंटीच जिंकायचा. मग तो ‘चूक-चूक’ करून तिला ‘रडूबाई’ म्हणत असे. लगेच तो धावत जाऊन त्याच्या मित्रांमध्ये मिसळून जाई. मिंटीला एकटं सोडून. अगदी आजच्यासारखं. कंटाळून ती घरात परतली.

‘कोण? मिंटी का?’ आईने विचारले.

पण मिंटीने उत्तर दिले नाही. तिने मान सुद्धा वर केली नाही. आता तिला कुणाशीच बोलावेसे वाटत नव्हते.

‘अगं, दादा तुझ्याशी उद्या खेळेल बघ!’

आईचे हे दररोजचे समजावणे सुद्धा तिला पाठ झाले होते. कारण उद्या तर उद्याच असतो ना? तो तर कधीच येत नसतो!

‘अगं, खाऊन बघ कसा झाला ते?’

मिंटीने डोळे मोठे करून वर बघितले. वा! स्वयंपाक घरातल्या टेबलावर आईने अनेक प्रकारचे छान छान खाऊ बनवून ठेवले होते. शेव, चकल्या, लाडू, करंज्या, थालीपीठ! ती नुसती बघतच राहिली.

‘आपण सहलीला जाणार?’ तिने विचारले.

‘नाही.’

‘मग आपल्याकडे कार्यक्रम आहे?’

‘नाही.’

‘मग?’

आता तिचे कुतूहल शिगेला पोहोचले होते.

‘अगं दादा च्या शाळेत क्रीडा दिन आहे. म्हणजे खेळांच्या स्पर्धा होणार आहेत आणि आपण सुद्धा त्या बघायला जाणार आहोत.’
खेळून दमलेला बंटी सुद्धा परतताच आईने केलेली जय्यत तयारी बघून चकित झाला. आईने त्याला समजावून सांगितले.
‘अगं पण एवढा खाऊ कुणासाठी?’

‘माझ्यासाठी!’ मिंटी उत्साहाने म्हणाली!

'आणि माझ्यासाठी सुद्धा' आई म्हणाली.

‘पण, तू तर म्हणाली होतीस की तू क्रीडा दिनाला येऊ शकणार नाहीस म्हणून?’ बंटी म्हणाला.

‘ते खरं, पण उद्या मी सुट्टी घेणार आहे!’ आई.

बंटीला हे रुचलं नाही. त्याचा चेहरा पडला. तो धावतच त्याच्या खोलीत गेला आणि त्याने धाडकन खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. उशी छातीशी धरून तो जमिनीवर पडून राहिला.

‘मिंटी क्रीडा दिनाला येणार? नाही. हे मी सहन करू शकत नाही. मी धावण्याच्या शर्यतीत शाळेमध्ये सर्वात शेवटी असतो हे तिला कळले तर?’
बंटी विचारात गढून गेला. कारण तो मिंटीसोबत शर्यत लावायचा तेव्हा तोच जिंकत असे. तिला वाटायचे की तिचा बंटी दादा सर्वात जास्त वेगात धावतो. प्रत्यक्षात तो शाळेत शेवटून पहिला असायचा! मिंटीला हे गुपित माहिती नव्हते. ते तिला कळायला नको होते. बाकी सर्व जगाला ते कळले तरी त्याची त्याला चिंता नव्हती.

‘मिंटी यायला नको.’ पाय आपटत तो मनाशीच बोलला. पण अर्थात हे कुणाला ऐकू गेले नाही.

क्रीडा दिनाची शाळेत जय्यत तयारी चालू झाली होती. संपूर्ण मैदानावर पताका लावलेल्या होत्या. विविध रंगाचे ध्वज फडकत होते. चुनखडीने मैदानावर रेषा आखलेल्या होत्या. लाऊडस्पीकर आणि माईक मधून शिक्षक विविध सूचना देत होते. युनिफॉर्म घातलेल्या आणि कपाळावर विविध पट्ट्या बांधलेल्या मुला-मुलींनी सारे मैदान फुलून गेले होते.

धावण्याची स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीला पहिला वर्ग, मग दुसरा वर्ग, नंतर तिसरा वर्ग - बंटीचा. बंटीच्या वर्गाची स्पर्धा सुरू होईपर्यंत त्याचे सारे लक्ष मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे होते.

‘आई नको पोहोचायला आणि मिट्टी पण. नको. नको. नको. नको.’ त्याच्या डोक्यात एवढेच विचार येत होते.

एवढ्यात क्रीडा शिक्षकांनी शिट्टी वाजविली. सर्व मुलांसोबतच बंटी सुद्धा धावू लागला. तो मागे पडत गेला. सर्व स्पर्धक मुलं पुढे निघून गेली. तो आपल्या तंद्रीतच धावत होता. तेवढ्यात आवाज आला
‘बंटी दादा.’ हो मिंटीच होती ती.

‘आई, बघ बंटी दादाचा पहिला क्रमांक आला.’ मिंटी उत्साहाने ओरडली!

‘नाही. शेवटचा!’ बंटी तिची नजर चुकवीत आणि मान खाली टाकून म्हणाला. आईने आणलेल्या खाऊचा डबा घेऊन तो आपल्या मित्रांकडे पळाला. जेवणाची वेळ संपेपर्यंत तो आई आणि मिंटीकडे फिरकलाच नाही.

दुपारी अडथळ्याची शर्यत सुरू झाली. या शर्यतीत घसरगुंडीवर घसरणे, जाळीवर चढाई, पाइपमधून बाहेर पडणे, शिडीवर चढणे, लांब उडी मारून खड्डा पार करणे असे अनेक अडथळे पार करायचे होते. शेवटी प्रत्येकाला एक चिट्ठी उचलावी लागायची. त्या चिठ्ठीत पुढे काय करायचे ते सांगितले होते.

बंटीला ही स्पर्धा खूप आवडत असे. कारण हे अडथळे पार करताना त्याला मजा यायची. एक गलेलठ्ठ मुलगा त्याच्या गोल ढेरी मुळे पाइपजवळ अडकला तेव्हा मैदानावर हशा पिकला.

बंटी करीता हे सारे अडथळे पार करण्यात कसलीच अडचण नव्हती. सर्व अडथळे पार करून गेल्यावर त्याला एक चिठ्ठी मिळाली. त्यात लिहिले होते, ‘एक छोटी मुलगी शोधून तीन पायाची लंगडी करीत स्पर्धा पूर्ण करावी’.

‘मिंटी माझ्याकडे धावत ये!’ तो जोरात आणि उत्साहात ओरडला.

‘काय झालं?’ आई आणि मिंटीने एका सुरात विचारले.

बंटी ने एका दमात सर्व समजावून सांगितले. त्याने त्याच्या डोक्याची पट्टी सोडली. स्वतःचा उजवा पाय मिंटीच्या डाव्या पायाला बांधला आणि तिला सोबत धावायला सांगितले.

‘एक-दोन, एक-दोन, आणखी वेगात, एक-दोन, एक-दोन!’ तो ओरडत होता.

एवढ्यात बंटी अडखडला आणि जमिनीवर पडला. त्याच्या वजनामुळे मिंटी सुद्धा फरफटली गेली आणि खाली पडली. तिचे दोन्ही गुडघे फुटले. पण तिला गुडघ्याकडे बघायचे भान कुठे होते? ती उठून उभी झाली.

‘बंटी दादा, उठ लवकर, चल!’ ती म्हणाली.

‘एक-दोन, एक-दोन’ ते आणखी धावू लागले.

अगदी बेभान होऊन. जेव्हा ते थांबले तेव्हा कळलं की बंटीचा प्रथम क्रमांक आला होता!

बंटी आपल्या बहिणीला सोबत घेऊनच अभिमानाने त्याचे बक्षीस घ्यायला गेला. बक्षीस घेतल्यानंतर आपले गुडघे फूटल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण ते आनंदाचे होते की गुडघा दुखण्याचे कुणालाच कळले नाही.

बंटीने तिला पाठकुळी घेतले आणि मैदानावर असलेल्या प्रथमोपचार केंद्राकडे तो धावत सुटला.

‘खूप लागले का गं?’ तो म्हणाला.

‘खूप नाही.’ हिमतीने ती म्हणाली.

‘बंटी दादा, तू जिंकलास. तुला प्रथम बक्षीस मिळालं.’ ती.

‘अगं मला नव्हे, आपल्याला!’ बंटी.

‘आणि हे बघ अर्धे बक्षीस तू घ्यायचे. अर्ध्या पेन्सिली, अर्ध्या वह्या आणि रंगांच्या कांड्या मात्र पूर्ण तूच घे कारण तुला चित्र काढायला आवडतात ना?’

‘खरंच?’ मिंटी आश्चर्याने म्हणाली.

‘आई, हे बघ मला बंटी दादानी काय काय दिलं! रंगाच्या कांड्या, पेन्सिली, वह्या. किती छान!’ ती बोलत होती. ती अगदीच आनंदात होती आणि बंटी सुद्धा. कारण त्याला प्रथम बक्षीस मिळाले होते.

लाऊड स्पीकरवर संगीत लागले होते. ते न ऐकता बंटी आपल्या मित्रांना भेटायला पळाला. छान ऊन्हं पडलं होतं. धडामधूम फटाके फुटू लागले. उद्यापासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. बंटी आणि मिंटी परत एकत्र खेळणार होते. खूप खूप खेळणार होते!

(आधारित).

राजू कसंबे, मुंबई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

मस्त!

किती गोड गोष्ट ! आवडली.

माझं लहानपण आठवलं. एका विशिष्ट वयापर्यंत मला स्वतःचे मित्रमैत्रिणी नव्हतेच. मी पण दादाचं शेपूट होते. माझा दादा माझ्यापेक्षा खूप मोठा असल्याने त्याला लिंबुटिम्बु बरोबर फिरवण किती वैतागाचं असेल, पण मी हट्ट करून सतत त्याच्याच बरोबर फिरत असायचे. त्याचे मित्र त्याला सतत सांगायचे 'अरे यार तुझ्या बहिणीला नको ना आणू' आणि तो बिचारा होऊन सांगायचा की ' तिला आणलं नाही तर आई मला पण सोडणार नाही'. पण मग मी वयाचा अजून एक टप्पा पार पाडल्यावर ते चित्र बदललं. दादाचे तेच मित्र आडून आडून विचारायचे की ट्रेकला/मुव्हीला/आऊटिंगला मुली पण येणार आहेत, मीरा येणार का? किंवा तिला आणलंस तरी चालेल इ इ Wink
थोडक्यात काय तर मिंटीने थोडा धीर धरला तर त्याच आता कटवणाऱ्या मुलांच्या ग्रुपमध्ये ती नंतर most welcome असेल. Lol