अबब .... १. ७६ लाख करोड !

Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 00:18

दोन दिवसापूर्वी मुलीच्या शाळेतले " वार्षिक स्नेहसंमेलन ( Gathering ) " पाहण्याचा योग आला। मुला-मुलींनी बसविलेली नाटके , नृत्य एकदम मस्त होते। या निमित्ताने मस्त धिंगाना घालायचे परमिट मिळालेले त्यामुळे बच्चे कंपनी मजेत होती। शिक्षकांनी देखील खुप तयारी करून घेतलेली असल्याने आपले नाटक किंवा नृत्य चांगले करण्यासाठी प्रत्येक जण खास काळजी घेत होते। या मध्ये शिवाजी महाराज , गणपती उत्सव , दुर्गा देवीची आरती अशा पारंपरिक श्रद्धास्थानापासून ते अगदी आजच्या काळातील दुष्काळ , स्री भ्रूण हत्या , नशाबंदी या सामाजिक आशयावर पण मनाला टोचणी लावणारे भाष्य केले जात होते। याच अंतर्गत "पोस्टर गर्ल " या चित्रपटातील गाण्यावर शाळेतील "सेकंडरी डिवीज़न " च्या मुलींचे नृत्य खूपच रंगले होते। उत्साहात छान नृत्य मोबाइलच्या कॅमेरात कैद करावे म्हणुन रेकॉर्डिंग करत असतानाच " News Popups" अणि त्या पाठोपाठ " Whats app messages " चा भडिमार चालू झाला। कारण होते खालील ब्रेकिंग न्यूज़ चे

" RBI Bonanza: INR 1.76 lakh crores to be transferred to Indian Government"

OR

" RBI Autonomy in danger: Daylight robbery of INR 1.76 Lakh Crores"

OR

" Lender of Last resort(RBI) rescued Spender of last resort( Govt Of India) : Ifs and buts of INR 1.76 lakhs Crores"

मागे स्नेहसंमेलनतील नृत्य रंगात आले होते। गाण्याचे बोल मला खुणावत होते अणि कुठे तरी मला त्या ब्रेकिंग न्यूज़ पर्यन्त खेचून आणत होते।

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना

एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी

सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी"

या वैकुंठरूपी भारत देशाचा कारभार चालविताना/देशाचे रहाटगाडघे हाकताना विठुरायाला ( मायबाप सरकारला ) उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालत ( वित्तीय तूट ) सुखी संसार चालविणे एकट्याला अवघड होऊन बसले आहे . संसार सुखाचा करण्यासाठी म्हणजे देशातील लोंकांना सोयी सुविधा देण्यासाठी लागणारा निधी उभारणे गरजेचे आहे . अर्थव्यवस्था ओढग्रस्तीला लागलेली असताना त्यात नवीन गुंतवणूक रुपी प्राण फुंकणे गरजेचे आहे , अशा वेळेला वरील गाणे म्हणजे प्रजेने रखुमाईला (RBI) ला घातलेले साकडेच म्हणावे लागेल . लाभांश (Dividend) रुपी पावलांनी रखुमाईने (RBI ने ) सरकारच्या तिजोरीत ( विठूच्या गाभारी ) आपले दान टाकावे म्हणजे सरकार त्या गंगाजळीचा वापर लोकपयोगी कामांसाठी करून प्रजारुपी भक्तांना रस्ते ,रोजगार , चांगले जीवनमान उपलब्ध करण्यासाठी कामाला लागेल .

"RBI Dividend म्हणजे काय रे भाऊ... " याचे सोपे उत्तर म्हणजे "RBI ने वर्षभरात कमविलेल्या नफ्याचा काही वाटा भागधारक (Shareholder) म्हणून भारत सरकारकडे सुपूर्द करणे जेणे करून तो पैसा सरकारला आपले काम करण्यासाठी वापरता येईल. हा नफा RBI ने त्यांची गुंतवणूक धोरणे ( investment in Gold , Sovereign Bonds, Indian Govt. Bonds ) आणि त्यांचे " रोकडसुलभता ( Liquidity Management ) , पतधोरण ( Credit Policy) आणि देशातील चलन ( तुम्ही -आम्ही जे पैसे किंवा नोटा वापरतो ते ) पुरवठा (Currency Management) "अशा देशाच्या आर्थिक आरोग्याशी निगडित गोष्टींचे व्यवस्थापन यातून कमाविलेला असतो .

जसे कुठल्याही खासगी किंवा सूचिबद्ध आस्थापनांमध्ये ( Pvt Ltd co किंवा Listed entities), झालेल्या नफ्याचा काही भाग लाभांश (Dividend) म्हणून भागधारकांना ( Shareholders ) दिला जातो, तसाच हा प्रकार . वरकरणी पाहता यात काय विशेष , असा प्रश्न पडणे साहजिक आहे .तरी पण या वार्षिक सोपस्कारावर एवढा गदारोळ किंवा चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्या लाभांशाची( Dividend) भव्यता ( INR 1.23 lakh Crore) आणि आपत्कालीन काळासाठी राखीव ठेवलेल्या पुंजीतून ( Contingency reserves) सरकारने स्वत:कडे वळते केलेले पैसे ( INR 53 lakh Crore)

हे थोडेसे आपल्या घरोघरी पूर्वी असणाऱ्या आजीबाईच्या " जादूच्या बटव्याप्रमाणे " आहे . पूर्वी घरखर्चासाठी पैसे दिल्यानंतर घरातील बायका त्यातील काही पैशातच रोजच्या गरजा भागवून राहिलेला पैसा बचत करून ठेवायच्या . ते पैसे पण, घरी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या वाट्यामध्ये ठेवलेले असायचे . त्यामागील उद्देश म्हणजे अचानक येणाऱ्या संकटाच्या वेळी लोंकांपुढे हात न पसरता आपल्याकडील पैसे वापरता यावेत. ती जशी

आपत्कालीन काळासाठी राखीव पुंजी (Contingency reserves) असते , तशीच देशाच्या पातळीवर RBI स्वतःच्या झालेल्या नफ्यातून काही पैसे असे आपत्कालीन काळासाठी राखून ठेवते . ते किती ठेवावेत आणि सध्या जी आर्थिक आपत्कालीन परिस्थिती आहे तेव्हा त्या पुंजीतील पैसे काढून का वापरू नयेत या दोन मुद्दांवर गदारोळ उठलेला आहे .

हे विचार मनात चालू असताना गाण्याचे पुढले कडवे चालू झाले

"तुझी थोरवी महान, तिन्हीलोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई"

RBI म्हणून असणारी एक संस्थात्मक रचना , तिची स्वायत्तता , देशाच्या आर्थिक आरोग्याशी निगडित गोष्टींचे व्यवस्थापन करताना गरजेचे असणारे स्वातंत्र याचा पण बराच उहापोह झाला . या RBI रुपी रखुमाईची थोरवी आणि तिच्या कामाबद्दल जगात असणारा मान या सर्व गोष्टी कुठे तरी योग्य पद्धतीने हाताळल्या जात नाही आहेत असे वातावरण तयार झाले . ही मदत जर तुम्ही आम्हाला ,आम्ही म्हणतो त्या अटींवर केलीत तरच आम्ही तुमच्या स्वतंत्र , स्वायत्त अशा जगभरात नाव असणाऱ्या संस्थेची पालखी वाहू असे सरकार सूचित करत आहे असे वातावरण तयार झाले .

साहजिकच या मुद्दयावर राजकारण पण तापायला सुरवात झाली . " दिवसाढवळ्या केलेली लूट " ते " नेहमीची शासकीय पद्धती " अशा दोन टोकाच्या प्रतिक्रियांच्या हिंदोळ्यावर हा अति महत्वाचा विषय अडकून पडला.

यातील गांभीर्य लक्षात घेण्यासाठी "INR 1.76 Lakh Crores" याची व्यापकता लक्षात घेतली पाहिजे. ती कशी तर हा पैसा किती आहे , तो जास्त आहे कि भव्य आहे हे तपासायचे झाले तर एक गंमतीदार तुलना करता येईल

या पैशांमधून

दुपारी शाळेतून दिले जाणारे "Midday Meal " ही योजना पुढील १६ वर्षे चालविता येईल
मनरेगा ही जी ग्रामीण रोजगार योजना आहे ती पुढील ३ वर्षें चालविता येईल
किसान सन्मान योजना (Farmer Income Scheme) ही पुढील २ वर्षे चालू ठेवता येईल
१०८ राफेल विमाने एका झटक्यात खरेदी करता येतील
१७६ चांद्रयान अवकाशात सोडता येतील
३५० बाहुबली किंवा ५० अवतार सारखे भव्य खर्चिक सिनेमे निर्माण करता येतील
२ फुटबॉल वर्ल्ड कप एकाच वेळी आयोजित करता येतील

साहजिकच माझ्या भावना गाण्याच्या शेवटच्या कडव्याप्रमाणे होत्या

"तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर, होऊ दे ग उतराई "

RBI रुपी रखुमाईने हा भव्य खजिना मायबाप सरकार साठी ( विठूरायाची) खुला करावा आणि त्यातून प्रजेच्या हिता ची कामे चालू व्हावीत .

कार्यक्रम संपून घरी येताना जाणविले की खरी मेख तर इथून पुढे आहे.

तुकोबांनी म्हंटल्याप्रमाणे

"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

उदास विचारे खर्च करे ."

एकदा सरकारकडे पैसा जमा झाल्यानंतर उदास विचारे म्हणजे अलिप्ततेने म्हणजे " राजकीय , भाषिक, जातीय " समीकरणे बाजूला ठेऊन , लोकानुयायी निर्णय न घेता देशाला समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च करणे गरजेचे आहे . आलेला पैसे रस्ते बांधणी , बँकिंग व्यवस्थेला भांडवल पुरवठा अशा रोजगार निर्माण करणाऱ्या किंवा अर्थव्यवस्थेला गतिशील करणाऱ्या प्रकल्पामध्ये गुंतवला जाणे हिताचे ठरेल तोच पैसा जर वित्तीय तूट भरण्यासाठी किंवा अनुदान वाटपासाठी सरकारने वापरला तर राखीव पुंजीची चैनीसाठी केलेली उधळपट्टी ठरेल.

या प्रमाणे जर विठुराया ( मायबाप सरकार ) वागला तर रखुमाई (RBI)पण हा वैकुंटरूपी देश आर्थिक ओढग्रस्तीतून बाहेर काढून पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्यापरीने मदत करतच राहील

"सरकारला डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घेण्याची सुबुद्धी दे " असे गजाननाला साकडे घालून आज इथेच थांबतो . असा विचार करून संकल्प सोडण्यासाठी " गणेश चतुर्थी " पेक्षा दुसरा कोणता दिवस जास्त चांगला असेल .

गणेश चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा ! "गणपती बाप्पा मोरया "!

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख आहे. आवडला.

मला अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक वर्षात किती फायदा झाला याची माहिती उपलब्द आहेत का ?
१. ७६ लाख करोड रुपये सरकारने "मागितले" आणि हा नफ्यातला भाग आहे.

मागिल सरकारांनी या आधी किती वेळा RBI कडून असे नफ्यातले पैसे उचलले गेले आहेत ? RBI ७० वर्षात पहिल्यांदाच फायद्यामधे आहे का?

विकासकामं न केल्याने मागील ७० वर्षातील सरकारने आरबीआय कडून लाभांश सोडल्यास अतिरिक्त पैसे उचलले नाही, आरबीआयच्या स्वायत्ततेचा आदर केला. विद्यमान सरकार स्वायत्तता फाट्यावर मारून उद्या आरबीआयला नफ्या- तोट्याचे गणित शिकवायला बोकील सारखे अर्थतज्ञ बोकांडी मारायला कमी करणार नाही.