तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2020 - 16:21

मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही. त्यामुळे उद्या आपल्या पोरांनी असे कसे रे माझे नाव ठेवले बाबा बोलू नये म्हणून आपण छान सुंदर नाव हुडकून काढतो. किमान अर्धा मराठी शब्दकोष पिंजून काढतो. पण पोरांना एक मस्त अर्थपुर्ण नाव देतो. बस्स तेच नाव तुम्ही कसे शोधले याचे अनुभव ईथे शेअर करूया.

थोडक्यात अन पाल्हाळ न लावता मीच सुरुवात करतो.

१) पहिलीच पोरगी झाली. तिच्या जन्माची कहाणी ईथे शेअर केलेली. आज नावाची करतो. तशी काही विशेष नाहीये. पण मुलगीच पाहिजे आहे आणि मुलगीच होणार याची निन्याण्णवे टक्के खात्री असूनही मुलगी होऊनही बारश्याच्या मुहुर्तापर्यंत तिचे नाव काय ठेवावे हे ठरत नव्हते. म्हणजे सुचत होते पण माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते.

अखेर बारश्याच्या दिवशी पाळण्यात ठेवलेल्या पोरीच्या कानात नाव सांगायची वेळ झाली आणि तिच्या कानात नुसतीच फुंकर मारायची वेळ येतेय का असे वाटले. ईतक्यात अचानक माझे वडील म्हणाले परी नाव ठेवा. पोरगी परीसारखीच आहे दिसायला. सगळे हो हो म्हणाले. मी सुद्धा म्हणालो हो, पोरगी परीसारखीच आहे दिसायला. बस्स यालाच माझा होकार समजून घरच्या लोकांनी हेच नाव फायनल केले आणि दोन महिन्याच्या मासूम चेहरयामागे लपलेल्या एका शैतान मुलीचे नाव परी ठेवले गेले Happy

पुढे मात्र परी हे घरचे नाव म्हणून ठिक आहे पण कागदोपत्री नाव दुसरे ठेऊया असा किडा घरच्यांच्या डोक्यात वळवळला होता. पण तोपर्यंत मी तिचे परी हे नाव स्विकारले होते. ज्या नावाने तिला हाक मारायला आवडते ते सोडून उगाच कश्याला गहन अर्थाचे नाव निव्वळ आपले भाषाज्ञान सिद्ध करायला ठेवा असे घरच्यांना सुनावून मी त्यांच्या डोक्यातला किडा ठेचून मारला.

आजच्या तारखेला मी तिला परी, परया, परू किंवा नुसतेच पss अशी हाक मारून तिच्या साध्यासोप्या सुटसुटीत नावाचा निखळ निर्मळ आनंद ऊचलतो Happy

२) दुसरा पोरगा ऋन्मेष ... नाम तो सुना ही होगा Happy

मला या नावाचा अर्थ माहीत नाही. कदाचित या नावाला अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त मायबोलीवर डुआयडी काढायला एखादे कॅची नाव हवे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.

मुलाचा जन्म झाला, नावाची शोधाशोध सुरू झाली. हे नावही आलेले माझ्या डोक्यात. पण ज्या नावाचा अर्थही माहीत नाही ते बायकोला कसे सुचवायचे असा बाळबोध विचार करून मनातच ठेवले.

पण एकदा बायकोच सहज म्हणाली, मला तर ते ऋन्मेष नावही खूप आवडते... खर्रंच, मी सुद्धा ते ऐकून उत्साहीत झालो. आणि जराही वेळ न दडवता तिच्याकडून या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले.

दुसरया दिवशी बायकोने आपल्या बहिणींना हे नाव सांगितले. तसे त्यांनी नाके मुरडत भुवया तिरप्या केल्या. हे कसले नाव? म्हणत स्वत: शोधून आणलेली नावे पुढे दामटली. बायकोच ती, माहेरचा आहेर पहिला स्विकारणार. त्यात तिच्या आईनेही नावाला अर्थ हवाच ! असं ठासून म्हटले. मग तर मी नाक घासूनही ती माझे ऐकणार नव्हती.

पण तरीही मी ठाम राहिलो. प्रकल्प मी तडीस नेणार आणि उद्घाटन सोहळा दुसरयांच्या हस्ते. असे कसे चालणार. अखेर सासुरवाडी नमली आणि ऋन्मेषच नाव फायनल झाले. सध्या रुनू, रुंट्या, रुंटूपुंटू अश्या नावांचा ते लोकं मनसोक्त आनंद घेतात. पण ऋन्मेष नावाला मात्र Runमेष म्हणजे मेंढ्या हाकणारा मेंढपाळ असे चिडवतात.....

आता आपलेही किस्से येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेवा हे नर्मदा नदीचं एक नाव आहे. पण नर्मदेचा कृष्णाशी किंवा द्वारकेशी काही संबंध असेल तर माहिती तरी नाही.

Pages