तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2020 - 16:21

मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही. त्यामुळे उद्या आपल्या पोरांनी असे कसे रे माझे नाव ठेवले बाबा बोलू नये म्हणून आपण छान सुंदर नाव हुडकून काढतो. किमान अर्धा मराठी शब्दकोष पिंजून काढतो. पण पोरांना एक मस्त अर्थपुर्ण नाव देतो. बस्स तेच नाव तुम्ही कसे शोधले याचे अनुभव ईथे शेअर करूया.

थोडक्यात अन पाल्हाळ न लावता मीच सुरुवात करतो.

१) पहिलीच पोरगी झाली. तिच्या जन्माची कहाणी ईथे शेअर केलेली. आज नावाची करतो. तशी काही विशेष नाहीये. पण मुलगीच पाहिजे आहे आणि मुलगीच होणार याची निन्याण्णवे टक्के खात्री असूनही मुलगी होऊनही बारश्याच्या मुहुर्तापर्यंत तिचे नाव काय ठेवावे हे ठरत नव्हते. म्हणजे सुचत होते पण माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते.

अखेर बारश्याच्या दिवशी पाळण्यात ठेवलेल्या पोरीच्या कानात नाव सांगायची वेळ झाली आणि तिच्या कानात नुसतीच फुंकर मारायची वेळ येतेय का असे वाटले. ईतक्यात अचानक माझे वडील म्हणाले परी नाव ठेवा. पोरगी परीसारखीच आहे दिसायला. सगळे हो हो म्हणाले. मी सुद्धा म्हणालो हो, पोरगी परीसारखीच आहे दिसायला. बस्स यालाच माझा होकार समजून घरच्या लोकांनी हेच नाव फायनल केले आणि दोन महिन्याच्या मासूम चेहरयामागे लपलेल्या एका शैतान मुलीचे नाव परी ठेवले गेले Happy

पुढे मात्र परी हे घरचे नाव म्हणून ठिक आहे पण कागदोपत्री नाव दुसरे ठेऊया असा किडा घरच्यांच्या डोक्यात वळवळला होता. पण तोपर्यंत मी तिचे परी हे नाव स्विकारले होते. ज्या नावाने तिला हाक मारायला आवडते ते सोडून उगाच कश्याला गहन अर्थाचे नाव निव्वळ आपले भाषाज्ञान सिद्ध करायला ठेवा असे घरच्यांना सुनावून मी त्यांच्या डोक्यातला किडा ठेचून मारला.

आजच्या तारखेला मी तिला परी, परया, परू किंवा नुसतेच पss अशी हाक मारून तिच्या साध्यासोप्या सुटसुटीत नावाचा निखळ निर्मळ आनंद ऊचलतो Happy

२) दुसरा पोरगा ऋन्मेष ... नाम तो सुना ही होगा Happy

मला या नावाचा अर्थ माहीत नाही. कदाचित या नावाला अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त मायबोलीवर डुआयडी काढायला एखादे कॅची नाव हवे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.

मुलाचा जन्म झाला, नावाची शोधाशोध सुरू झाली. हे नावही आलेले माझ्या डोक्यात. पण ज्या नावाचा अर्थही माहीत नाही ते बायकोला कसे सुचवायचे असा बाळबोध विचार करून मनातच ठेवले.

पण एकदा बायकोच सहज म्हणाली, मला तर ते ऋन्मेष नावही खूप आवडते... खर्रंच, मी सुद्धा ते ऐकून उत्साहीत झालो. आणि जराही वेळ न दडवता तिच्याकडून या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले.

दुसरया दिवशी बायकोने आपल्या बहिणींना हे नाव सांगितले. तसे त्यांनी नाके मुरडत भुवया तिरप्या केल्या. हे कसले नाव? म्हणत स्वत: शोधून आणलेली नावे पुढे दामटली. बायकोच ती, माहेरचा आहेर पहिला स्विकारणार. त्यात तिच्या आईनेही नावाला अर्थ हवाच ! असं ठासून म्हटले. मग तर मी नाक घासूनही ती माझे ऐकणार नव्हती.

पण तरीही मी ठाम राहिलो. प्रकल्प मी तडीस नेणार आणि उद्घाटन सोहळा दुसरयांच्या हस्ते. असे कसे चालणार. अखेर सासुरवाडी नमली आणि ऋन्मेषच नाव फायनल झाले. सध्या रुनू, रुंट्या, रुंटूपुंटू अश्या नावांचा ते लोकं मनसोक्त आनंद घेतात. पण ऋन्मेष नावाला मात्र Runमेष म्हणजे मेंढ्या हाकणारा मेंढपाळ असे चिडवतात.....

आता आपलेही किस्से येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाचं नाव आम्ही विक्रमादित्य ठेवले आहे. त्याला आम्ही विक्रम म्हणतो. माझ्या नवऱ्याचे माहेर उज्जैन आहे आणि तिथली आठवण म्हणून आम्ही हे नाव ठेवले.
मुलगी झाली असती तर मी माधुरी पुरंदरे यांच्या "राधाचे घर" मधून राधा नाव ठेवणार होते.
विक्रमादित्य असे नाव ठेवणार हे कळताच माझ्या आईनेच आधी खूप विरोध केला. पण आता ती एकटीच त्याला विक्रमादित्य अशा संपूर्ण नावाने हाक मारते. अजून विरोध होऊन आमचा बेत रद्द होऊ नये म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी बर्थ सर्टिफिकेटवरच नाव घालून आणले. आमची बरेच लोक या नावामुळे थट्टा करतात. आणि मलाही टेन्शन आहे की पुलंसारखं "नाव लावायचं राजे भोसले, आणि चालवायची पिठाची गिरणी" असं झालं तर?

Lol सई, त्याचं काय म्हणणं आहे? त्याला त्याचं संपूर्ण नाव आवडतं का, कि विक्रमच आवडतं?

माझ्या मुलीचं सरळ साधं सोपं सुंदर 'रमा' नाव ठेवलंय..
हाक मारायला सोपे जाईल, शक्यतो जोडाक्षर नको, unique नावाच्या भानगडीत अर्थ नसलेले किंवा जोडजोडी केलेले नाव नको अशा प्रमुख अटी होत्या.. (असेही आमचे आडनाव अत्यंत unique असल्यामुळे नाव कॉमन चालणार होते)

विक्रमादित्यला त्याच्या नावाचा जाज्वल्य अभिमान आहे.
मी विक्रमादित्य, उज्जैनचा राजा अशी ओळख करून देतो तो स्वतःची

माझ्या मुलाचं नाव मला प्रथमेश ठेवायचं होतं कारण गणपती बाप्पा च एक नाव पण आणि माझ्या नावाच पण पहिले अक्षर प्र... दोन्ही इच्छा पूर्ण होतील. पण माझ्या आईने विरोध केला का तर तुझ्या सारखा आगाऊ आणि हट्टी होईल म्हणून मग अथर्व नाव ठेवलं.....

मला पण एकमेव नाव पाहिजे होतं म्हणून मुलाचं नाव वरिष (वर देणारा देव - विष्णु) ठेवलं... या नावाच्या इंग्रजी अक्ष्ररांमध्ये माझे आणि बायकोचे पहिले इंग्रजी अक्षर येते... नंतर कन्यारत्न झाले..तेव्हा असंच नाव शोधत होतं ज्याचात आमच्या तिघांचे इंग्रजी आद्याक्ष्रर येईल आणि नाव ठरलं... शर्वी (पवित्र्य)... दोन्ही मुलाच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये सारखीच अक्षरे आहेत...

माझ्या माहेरी सगळे मराठी साहित्यात पारंगत असल्याने आमची सगळ्यांचीच नावे खूप वेगळी आणि अर्थपूर्ण आहेत. आमची ही स्पेशालिटी पाहून बाळ झाले किंवा होणार असले की आमच्याकडे नाव काय ठेऊ हे विचारायला यायचे
त्यातील बरीचशी नावे आता 50/60 वर्षाने कॉमन वाटतात. साहजिकच आमच्या पुढच्या पिढीवर ही परंपरा जपण्याची जबाबदारी होती. आम्ही ही यथाशक्ती निभावली.
माझ्या थोरल्या लेकीचे नाव ओवी ठेवले पण आता अभंग श्लोक अशी रांग सुरू होणार का अशा आचरट प्रश्नांना सामोरे जावे लागे. तिचे दुसरे नावही होते जे पुढे आले आम्ही आता घरातले तिला ओवी म्हणतो.दुसऱ्या लेकीचे नाव मनोज्ञा.म्हणजे लक्ष्मी ती कोजागिरी पौर्णिमेची आहे

माझ्या माहेरी सगळे मराठी साहित्यात पारंगत असल्याने आमची सगळ्यांचीच नावे खूप वेगळी आणि अर्थपूर्ण आहेत. आमची ही स्पेशालिटी पाहून बाळ झाले किंवा होणार असले की आमच्याकडे नाव काय ठेऊ हे विचारायला यायचे
त्यातील बरीचशी नावे आता 50/60 वर्षाने कॉमन वाटतात. साहजिकच आमच्या पुढच्या पिढीवर ही परंपरा जपण्याची जबाबदारी होती. आम्ही ही यथाशक्ती निभावली.
माझ्या थोरल्या लेकीचे नाव ओवी ठेवले पण आता अभंग श्लोक अशी रांग सुरू होणार का अशा आचरट प्रश्नांना सामोरे जावे लागे. तिचे दुसरे नावही होते जे पुढे आले आम्ही आता घरातले तिला ओवी म्हणतो.दुसऱ्या लेकीचे नाव मनोज्ञा.म्हणजे लक्ष्मी ती कोजागिरी पौर्णिमेची आहे

आम्हाला शंकराच्या नावावरुन युनिक नाव ठेवायचे होते म्हणून नभ्य हे नाव ठेवलेय .उच्चार चुकीचा करतात बर्याचदा लोक पण हा बरोबर उच्चार कसा करायचा ते सांगतो

वरिष या शब्दाचा अर्थ वर देणारा देव कसा काय? वर + ईश = वरेश होते. वर देणारा म्हणजे वरद आणि वर देणारा देव करायचे असेल तर वरद + ईश = वरदेश होईल. अर्थ गूगल वरून काढला असेल तर 99% चुकीचा असण्याची शक्यता आहे.

माझ्या बाबांकडे एक संस्कृत- इंग्रजी शब्दकोश होता.‌एकदा तो चाळत असताना नवऱ्याला 'मिहिका' हा शब्द आवडला. अर्थही सुरेख होता. ( दवबिंदू) म्हणून 'जेव्हा कधी मुलगी होईल' तेव्हा मिहिका नाव ठेवायचे ठरले होते. मुलाचे नाव ठरवलेच नव्हते.
आमच्या कडे पाच नावं ठेवतात बाळाची. बाकीच्या नावांची स्टोरी नंतर लिहिते. Happy

आम्ही बडोद्याला असताना माझे बाबा माझ्या कडे आले होते. तेव्हा समोरच्या घरात राहणारी एक छोटी मुलगी येताजाता त्यांच्याशी बोलत असे. दोन वर्षांची असावी. तिचे नाव 'श्रीना' होते. बाबांना ते नाव फार आवडले. त्यामुळे स्वत:च्या नातीसाठी नाव सुचवताना त्यांनी तेच नाव सुचवले. त्यामुळे माझ्या मुलीचे दुसरे नाव आहे ' श्रीना'

आम्हांला 'सई' हे नाव पण फार आवडले होते. पण आजूबाजूला अमराठी लोकच जास्त असल्याने ते 'सई' चे'साई' च होणार हे माहिती होते. म्हणून तिसरे नाव सई ठेवले. पण कागदोपत्री 'मिहिका' आहे.
मिहिकाचेही अमराठी लोक मीका, महिका, महक करतात. Sad

त्यामुळे माझ्या मुलीचे दुसरे नाव आहे ' श्रीना'
>>>>

या नावाला अर्थ आहे की हा जोडून बनवलेला शब्द आहे काही कल्पना आहे का?
माझ्या एका मित्राच्या बहिणीचे नाव श्रीक्ष्मी होते - श्री + लक्ष्मी या दोन शब्दांतील अक्षर घेऊन जोडलेले. तोंडी सांगताना नेहमी हे सांगितल्याशिवाय समोरच्याला पटकन श्रीक्ष्मी या ऊच्चाराचा बोधच व्हायचा नाही.

मानसी ठेवले तर माणशी होते, मेघना एक आहे सोसायटीत म्हणून गाळावे लागले.
>>>>>

ऑर्कुटवर माझे एक "मानस" नावाचे प्रोफाईल होते. चांगले गाजलेले. तेव्हा माझे लग्नही झाले नव्हते. पण पुढेमागे पोराचे नाव मानस ठेवावे असे तेव्हा वाटायचे Happy

तेव्हा माझे एक गोलू नावाचे प्रोफाईलही हिट होते. त्याचा फोटो म्हणून मी एका गोड कृष्णवर्णीय मुलाचा फोटो ठेवला होता. माझ्या मुलाचे ऋन्मेषचे फोटो पाहून तेव्हाचे काही मित्र म्हणतात, गोलूच आलाय तुझ्या घरात...

ऋन्मेष सध्या मनात बसलेले नाव, अन्यथा त्या काळात बाप झालो असतो तर मुलाचे टोपणनाव तरी गोलू असते...

अशी मनात बसलेली नावे आपल्या मुलांना ठेवण्याची मजाच काही और Happy

अलीकडेच एका बाईंशी ओळख करून दिली गेली त्यांचं नाव अंगाई होतं. आता हे पाळण्यातले नाव का लग्नानंतर नवऱ्याने ठेवलेलं वगैरे विचारायचा मोह टाळला.
पण इथे लिहीत आहे कोणाला युनिक नाव हवं असल्यास.
आमच्या ओळखीत एका मुलाचं नाव साहित्य पण आहे.

या नावाला अर्थ आहे की हा जोडून बनवलेला शब्द आहे काही कल्पना आहे का?>>>
गुजराथी शेजारी होते ते. 'श्रीना' म्हणजे 'देवाने पाठवलेली/देवाची मुलगी' असं काहीसं सांगितले होते त्यांनी.

माझ्या भावाचा मुलगा. पाळण्यात नाव बभ्रुवाहन ठेवले होते, पण सारखा इकडं तिकडं बोकाळत फिरत असतो म्हणून आता त्याचं नाव बोकलत ठेवले आहे.

भाच्याने मुलाचं नाव मार्कंडेय ठेवलं अमेरिकेत पौराणिक नावाचं कौतुक म्हणून. पण शाळेतल्या मुलांनी त्याला 'मार्क' केलं.
((बास्केटबॉल किंवा फुटबॉल खेळताना 'मार्कंडेय पास द बॉल' म्हणेपर्यंत युगेयुगे लागतील, बॉल जाईल दुसरीकडे)))

एका कुटुंबात प्रसाद,पुजा,,आरती,निरांजन , . . .
>> शेजाऱ्यांनी यज्ञ, विभुती.. अशी नावे ठेवावीत.

एका कुटुंबात मुलगी जन्माला आली तीच नाव ठेवलं वीणा.
आता मुलगा जन्माला आलाय, त्याचं नाव काय ठेवायचं? तंबोरा?

Pages