“मायाळू धनेशाचे गुपित”: पुस्तक परिचय: लेखक - डॉ. दिलीप सावरकर.

Submitted by Dr Raju Kasambe on 5 February, 2020 - 07:11

पुस्तक: “मायाळू धनेशाचे गुपित”
पुस्तक लेखक: डॉ. राजू कसंबे.
प्रकाशक: साहित्य प्रसार केंद्र, नागपुर.
पृष्ठे: ९०.
मूल्य: रु.१२०/-
पहिली आवृत्ती: ८ नोव्हेंबर २०१८.
पुस्तक परिचय: डॉ. दिलीप सावरकर, नागपूर.

(टिप: माझ्या पुस्तकाचा डॉ. दिलीप सावरकर, नागपूर ह्यांनी लिहिलेला परिचय येथे त्यांच्या नावासहित पोस्ट करतो आहे.).

Hornbill Book Cover.jpg“मायाळू धनेशाचे गुपित” हे पुस्तक एकंदर फक्त नव्वद पानांचे असून नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद भास्कर कुलकर्णी यांनी प्रकाशित केलं आहे. प्रास्ताविकात त्यांनी ह्या पक्षाबद्दलची आणि पुस्तकाची संपूर्ण पार्श्वभूमी विशद केली आहे. पुस्तकात एकंदर चोवीस प्रकरणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनेश पक्षी सहज दिसत नसल्याने अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज होतीच.

सर्वच धनेशांना चोचीवर एक प्रकारचा उंचवटा किंवा शिंग असते. त्यामुळे त्यांना पक्षांमधील गेंडा म्हणतात. भारतीय उपखंडात धनेशाच्या एकंदर दहा प्रजाती आढळून येतात. त्यापैकी भारतीय राखी धनेश हा भारतात सर्वत्र आढळतो. ह्या पक्षाचे शास्त्रीय नाव Ocyceros birostris आहे. त्याच्या चोची वरच्या शिंगामुळे हे नाव दिलं गेलेलं आहे. ह्या पक्षाचे संपूर्ण वर्णन, नर आणि मादी हे कसे ओळखावेत, पिलांच्या चोचीचा रंग पिवळसर असून त्यावर शिंगाचा उंचवटा नसतो.
त्यांचे विविध अधिवास ६०० मीटर ते १४०० मीटर पर्यंत आढळतो. त्याच्या उडण्याच्या पद्धती, उडताना ते कीs कीs अशी हाळी देतात. त्यांचा आहार मुख्यत्वे वड वर्गीय फळांचा (Ficus) असून फुले, किडे, भुंगे, तुडतुडे, सरडे, उंदीर व इतर छोटे प्राणी सुद्धा ते खातात.

साधारणतः मार्च ते जूनच्या दरम्यान मादी स्वतःला ढोलीत बंदिस्त करून घेते. प्रियाराधनाची सुरुवात दोन ते तीन महिने आधीपासूनच होते. मादी स्वतः ढोलीत जाऊन छिद्र लिंपून घेते. त्यासाठी ती चिखलाचे गोळे व स्वतःची विष्ठा वापरते. ती दोन ते पाच अंडी घालते. पिल्लांचा जन्म मादीचे बाहेर येणे हे एकंदर ९३ ते ९८ दिवसात ह्या पक्षाची वीण पूर्ण होते.
ह्या पक्ष्यांची संख्या बऱ्यापैकी स्थिर असल्याचे मानल्या जाते कारण तो परिस्थितीशी जुळवून घेणारा पक्षी समजल्या जातो. त्याच्या विस्तार कक्षा खूप मोठ्या आहेत.

लेखकांनी संशोधनाला १० जानेवारी २००७ ला सुरुवात केली. त्याचे तारीखवार दाखले प्रत्यक्ष वाचणे हा एक वेगळाच अनुभव आहे. मादीच्या बंदिवासाच्या दिवसातले अनेक बारकावे, अगदी नराने पुरविलेली फळे व चिखलाचे गोळे इत्यादीची संख्या दिली आहे. आणि प्रजातीच्या संशोधकाला प्रश्न पडला आहे की मादी स्वतःला ढोलीत का कोंडून घेते? नैसर्गिक प्रवृत्ती, वंशवृद्धी की अंडी, पिल्ले व स्वतःची सुरक्षा? या सर्वांना ‘होय’ हेच उत्तर त्या पुस्तकातून मिळते.

संशोधनाच्या दरम्यान अनेक बारकावे, घेतलेल्या नोंदीची नव्या संशोधकांना मदत होऊ शकेल. एकदा संशोधनाला सुरुवात केली की महाराजबाग, तेलंगखेडी उद्यान, रविनगर परिसर इत्यादी ठिकाणच्या घरट्यांवर सकाळ ते संध्याकाळ कसे लक्षात ठेवायचे याचं आदर्श वर्णन केले आहे. जे अनेक नव्या संशोधकांना मार्गदर्शक ठरेल. तसेच वेळोवेळी पक्षी दृष्टीआड झाल्यास त्याच्या आवाजावरून पानोर्‍यामध्ये पक्षी नेमका कुठे आहे ते शोधण्याचा ध्यास अप्रतिम आहे. मादीला सरडा भरवणं, धनेशांची रात निवार्‍याची जागा पाठलाग करुन शोधणं हे सर्व ध्येयासक्त संशोधकालाच शक्य आहे. धनेशाचे पिल्लू २९ ते ३० दिवसांनी अंड्यातून बाहेर येते हे लेखकाने शोधून काढले. पिल्लू मोठे झाल्यावर मादी बंदिवासातून बाहेर येते. मग पिलांचा बंदिवास सुरू होतो. नर-मादी दोघेही पिल्लांना भरवतात. पिल्लं सुद्धा ढोली पुन्हा चिखलाच्या गोळ्यांनी लिंपुन घेतात. असं न करणारी पिल्लं मरून जातात. नवजात पिल्लाच्या चोचीवर शिंग नसतं. नंतर अंदाजे एक वर्षानंतर ते वाढतं. तसेच अंदाजे दोन वर्षांनी ते प्रजननक्षम होतात.

हे धनेश अनेक वृक्षांची फळे खातात. त्यांच्या आहारातील अनेक वृक्षांची यादी दिलेली आहे. तसेच बीट्टीची फळे सुद्धा ते खातात, या फळांमध्ये ग्लायकोसाइड्स हे हृदयावर परिणाम करणारे विष असते. ते विष हा पक्षी सहजपणे पचवू शकतो. हा पक्षी कोणतंही फळ वा शिकार पायात धरून नेत नाही. तो केवळ चोचीचा उपयोग करतो. सरडा डोक्याच्या बाजूने खाल्ला जातो. उलटी करून काढून डोक्याकडूनच पिल्लांना भरविल्या जातो. अंदाजे आठ ते नऊ दिवसानंतर ढोलीतून बाहेर आलेल्या पिल्लांचं, त्याच्या वागण्याचं, चोची ओढण्याचं, खेळण्याचं व सूर्यस्नान घेण्याचं संपूर्ण वर्णन कारणासह दिलेलं आहे.

लेखकाची संशोधक दृष्टी अप्रतिम आहे. त्याच बरोबर नाहिशा होणाऱ्या पिलांच्या बाबतीत सुद्धा कारणमीमांसा केलेली आहे. धनेश पक्षाला औषधी वृक्षांचे उपजतच ज्ञान असावं असं लेखकाचं निरीक्षण आहे.

घरट्यात महावृक, कडूनिंब, कढीलिंब इत्यादी पक्षांची पाने आढळून आली. या पक्षाला इतर पक्षी व प्राण्यांशी खाद्यासाठी व घरट्यासाठी स्पर्धा करावी लागते. त्यानंतरच्या प्रकरणात या पक्षाच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला आहे. जसे चोच खेचाखेच, हवाई टक्कर इत्यादी; धनेशाची विण उन्हाळ्यातच का? या विषयीचं प्रकरण माहितीपूर्ण होण्याकरिता लेखकाने खूपच कष्ट घेतलेले दिसतात. नंतरच्या घरट्याची निगा या प्रकरणात वाळक्या ढलप्यांवर विष्ठा करून ढलपी बाहेर फेकल्याने घरटे स्वच्छ ठेवता येते ही रंजक माहिती आहे. मातीची उड्डान पिसे बंदिवासात एका विशिष्ट क्रमाने गळतात. मादीचा बंदीवास हा फायदेशीर आहे का? हे उत्क्रांतिवादाच्या दृष्टिकोनातून सांगोपांग विचार केला आहे. ह्याच संदर्भात धनेश पक्षी बुद्धिमान आहे का? या प्रकरणात रंजकतेने मत मांडले आहे. त्याचप्रमाणे नर कोरड्या कुरकुरीत ढलप्या मादी व पिल्लांना पुरवतो. याचा टॉयलेट पेपर सारखा उपयोग करून घरटे स्वच्छ ठेवणे ही कला प्रगत बुद्धी असल्याचे लक्षण आहे. पुढे नराच्या वागण्यावरून म्हणजे संशोधकांना निरीक्षण फार उच्च दर्जा दर्शवते. शेवटी संस्कृत साहित्यातील धनेश, धनेशाचे पिल्लू घरी ठेवून त्याला थोदे खायला घालून, त्याचे पालकत्व स्वीकारल्याचा आनंदाचा क्षण, चित्रपट-नाटकात शोभावा असा आहे.

धनेशाच्या प्रजाती, धनेशाचे महत्व, संकटे व संवर्धन, वन्यजीव वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ आणि परिशिष्ट मध्ये मराठी, इंग्रजी व शास्त्रीय नावांच्या सूचिमूळे वाचकांना या धनेशाबद्दल परिपूर्ण माहिती मिळते. एका संशोधनातून एक सुंदर, माहितीपूर्ण, वाचनीय पुस्तक ही एक फार दुर्मिळ गोष्ट आहे. लेखकाचे अभिनंदन. वाचकांना पुस्तक वाचून संशोधनाच्या अनेक नव्या कल्पना सुचतील.

डॉ. दिलीप सावरकर.
मोबाइल: 9823109083

Group content visibility: 
Use group defaults

सर, नाव मायाळू धनेशाचे गुपित ऐवेजी गणेशाचे गुपित असे झाले आहे. लेख वाचून प्रतिक्रीया देईनच पण नावामुळे गोंधळ होतोय Happy

निलाक्षी
धन्यवाद. दुरुस्ति केलि आहे.

परिचय आवडला. आपण घेतलेले परिश्रम समजले. मागे मी वाचलेलं की आसाम वगैरे भागात चोचीसाठी धनेशाची शिकार मोठ्या प्रमाणावर चालते.

वाह! हे पुस्तक घ्यायलाच हवे.
आज स्पष्ट बोलायचं ठरवलच आहे तर एक प्रश्न विचारू का डॉक्टरसाहेब!
येथे मी काही पक्षीनिरिक्षणाच्या नोंदी करतो आहे. तुम्ही पहात असाल किंवा नसालही. पण तुम्ही चुकूनही कधी मार्गदर्शन करणारे चार शब्द लिहिले नाही तिकडे. हे योग्य नाही किंवा छान प्रयत्न करताय वगैरे वगैरे. हे पक्षिप्रेमीचे वागणे नक्कीच नाही. किंवा अशा विषयापासून खरा पक्षीप्रेमी दुर राहूच शकत नाही. असो.

माझं एक सहजगत्या घडलेलं निरिक्षण-
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ओरडण्याने व आकारामुळे धनेश लक्ष वेधून घेतोच . पण त्याचबरोबर तो 4-5 जणांच्या तरी थव्यामधेच फिरतो व त्यामुळे त्याचं आगमन व अस्तित्व वातावरण भारावूनच टाकतं. कोकणात अनेक वेळा मला हें जाणवलं आहे. पुस्तकात अर्थातच हेंही निरिक्षण असावंच पण इथं उल्लेख दिसला नाहीं, म्हणून हा आगाऊपणा !

हरिहर (पद्मनाभ),
मी तुमचे लिखाण वाचले नव्हते. कालच दोन लेख वाचलेत. तुमचे लिखाण खूप छान आहे. लेखांवरच प्रतिक्रिया टाकेल. लिहिणे चालू ठेवा. तुमचे पूर्ण नाव वापरले तर लोकांना ते कळेल. अभिनंदन.

छान !

तुमचे पूर्ण नाव वापरले तर लोकांना ते कळेल
>>> अहो काही लोक १२३, १२३ असं सतत नाव बदलत असतात. पुर्ण नाव न टाकण्यामागे मजबुरी असू शकते काही लोकांची.