"आजी, तुला थोडा वेळ आहे का ? मला बोलायचं आहे तुझ्याशी," आजीच्या शेजारी येऊन बसत स्नेहा म्हणाली. हातातल्या पुस्तकातून नजर वर करत आजीनी तिच्याकडे पाहिलं. स्नेहाचा एकंदर आविर्भाव आणि तिचा रडवेला चेहेरा बघून आजीला साधारण अंदाज आलाच होता ; पण तरीही तसं काही न दाखवता आजी म्हणाली," हो, बोल ना. " खरं तर आजीशी खूप काही बोलायचं असं ठरवून आली होती स्नेहा...पण आता अचानक तिला शब्दच सुचेनात. नेमकी कुठून सुरुवात करावी तेच समजत नव्हतं तिला. तिची ही चलबिचल बघून आजीनी विचारलं," काय झालं स्नेहा? सगळं ठीक आहे ना ? तुला कोणी काही बोललं का ?"
आजीला मधेच थांबवत स्नेहा म्हणाली," मी रजत ला 'होकार ' द्यायचं ठरवलंय." स्नेहाचं ते वाक्य ऐकून खरं तर आजीला आनंद व्हायला हवा होता....म्हणजे स्नेहाची तशीच अपेक्षा होती. पण झालं उलटंच... आजी अचानक मौन होऊन कुठल्यातरी विचारांत गढून गेली. "माझा हा निर्णय ऐकून तुला आनंद नाही झाला का ? इतरांसारखंच तुला पण तर हेच हवं होतं ना? " स्नेहा पटापट बोलून मोकळी झाली. "हो, खरं आहे. मला पण वाटत होतं की तू रजतला होकार द्यावास.... पण हा निर्णय घेण्याआधी तू नीट, शांतपणे विचार करावास असं मला वाटतंय. असा रागाच्या भरात, तडकाफडकी काय तो निर्णय घेणं योग्य नाही." आजीनी तिला वाटत असलेली काळजी बोलून दाखवली. स्नेहा पुढे काही बोलणार इतक्यात तिला हाताच्या इशाऱ्यानी गप्प करत आजी म्हणाली," तुझा चेहेराच सांगतोय की तुला आत्ता खूप राग आला आहे; राग म्हणण्यापेक्षा मनस्ताप झाला आहे. आणि अशा वेळी रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळा चुकीचे असू शकतात. आणि म्हणूनच मला वाटतंय की रजतला आणि बाकी घरच्यांना तुझा होकार सांगण्याची घाई करू नको. मला नाही माहित तुला का आणि कशाचा किंवा कोणाचा राग आलाय; पण जेव्हा तुझा राग शांत होईल तेव्हा पुन्हा एकदा या निर्णयावर विचार कर- आणि जर तेव्हा देखील मनातून 'होकार'च आला, तर त्यादृष्टीनी पुढचा विचार कर." आजीचं बोलणं ऐकून स्नेहा थोडी गोंधळात पडली. काहीशी वैतागून म्हणाली," आता हे काय गं तुझं नवीन काहीतरी ! तूच सांगितलं होतंस ना मला रजत च्या प्रपोजल चा विचार करायला...आणि आता जेव्हा मी त्याचं प्रपोजल ऍक्सेप्ट करायचं म्हणतीये तरी त्याच्यावर सुद्धा विचार करायला सांगतीयेस.. आधीच आयुष्यात कमी confusions आहेत का ? त्यात अजून भर घाल तू...."
स्नेहाचा हा त्रागा बघून आजी थोडी काळजीत पडली. 'पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं दिसतंय,' स्नेहाचा चेहेरा आपल्या दिशेनी वळवत आजीनी तिला विचारलं," काय झालंय नक्की, सांग बरं मला..मगाशी कोणाचा फोन आला होता ? सलीलचा का ?" सलीलचं नाव ऐकलं मात्र- आणि स्नेहा उसळून म्हणाली," तो कशाला फोन करेल मला? औरंगाबाद मधे येऊन इतके दिवस झाले पण माझी साधी आठवण सुद्धा नाही आली त्याला. इतर सगळ्या मित्र मैत्रिणींना त्यानी त्याच्या बहिणीच्या लग्नाला बोलावलं, फक्त मला सोडून!! इतका कसा निर्दयी झाला गं तो? आणि म्हणूनच मी पण ठरवलंय आता- जर त्याला माझी पर्वा नाहीये तर मी तरी कशाला त्याचा विचार करत बसू? आणि म्हणूनच मी रजतशी लग्न करायचं ठरवलंय." स्नेहा एक दमात सांगून मोकळी झाली.
पण तिचं हे वक्तव्य ऐकून आजी मात्र अजूनच काळजीत पडली.स्नेहानी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलाय हे स्पष्ट झालं होतं. आणि तिला याची जाणीव करून देणं आवश्यक होतं. शेवटी तिच्या आणि रजतच्या आयुष्याचा प्रश्न होता.
आपल्या हातातलं पुस्तक बाजूला ठेवत आजी म्हणाली," हं, म्हणजे मी म्हणाले ते खरं आहे तर.. तू हा निर्णय भावनेच्या भरात घेतला आहेस. पण तुला एक सांगू ? रजतशी लग्न करण्यापेक्षा 'सलीलला धडा शिकवायचा' या एकाच कारणासाठी तू होकार दिला आहेस.आणि इथेच चुकतीयेस तू. म्हणून म्हणतीये मी की तुझा राग शांत झाला की पुन्हा एकदा नीट विचार कर आणि तेव्हा सुद्धा जर तुझ्या मनानी रजतच्या नावाचा कौल दिला तरच त्याला होकार कळव."
स्नेहाला आजीचं म्हणणं पटलं. आजीच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली," I love you आजी ! तूला सगळं माहित असतं - नेहेमीच ! आणि मला तुझ्यातला सगळ्यात आवडणारा फॅक्टर कोणता आहे माहितीये तुला? You don't judge people . त्यामुळे मी निःसंकोचपणे माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगू शकते." स्नेहाला आपल्या कुशीत घेत आजी म्हणाली," हो ना ? मग आता मी सांगतीये तसा शांतपणे विचार कर आणि मग काय ते ठरव. जर मदतीची गरज भासलीच तर मी आहेच की !"
काही वेळापूर्वी रागाच्या भरात तणतणत खोलीत आलेली स्नेहा आता बरीच सावरली होती. आजीच्या खोलीतून बाहेर आल्यावर ती सरळ तिच्या फेवरेट जागेच्या दिशेनी निघाली- गच्चीवर ! लहान असल्यापासून तिला गच्चीवर जाऊन बसायला खूप आवडायचं. जशीजशी मोठी होत गेली तसंतसं गच्ची बरोबरचं तिचं नातं अजूनच घट्ट होत गेलं. लहान असतानाच्या भातुकलीच्या लुटुपुटीच्या संसारापासून ते तरुणाई मधे बघितलेल्या खऱ्याखुऱ्या संसाराच्या स्वप्नांपर्यंतचा तिचा प्रवास बघितला होता या गच्चीनी !स्नेहा गच्चीतल्या तिच्या नेहेमीच्या जागी जाऊन बसली. सुरुवातीला मनात नानाविध विचारांची गर्दी जमली होती....सलीलच्या वागण्यामुळे अपमानित झाल्याची भावना उगीचच डोळ्यांत पाणी आणत होती. त्यातच आजीबरोबर झालेलं संभाषण देखील पुन्हा पुन्हा आठवत होतं. आई , बाबा, वंदना मावशी,रजत सगळ्यांचे चेहेरे आलटून पालटून डोळ्यांसमोरून सरकत होते. हा विचारांचा गुंता कसा सोडवावा हेच कळत नव्हतं स्नेहाला. अचानक तिला एका पुस्तकात वाचलेली काही वाक्यं आठवली - 'Leave your front door and your back door open. Allow your thoughts to come and go...just don't serve them tea.' जेव्हा ही वाक्यं वाचनात आली होती तेव्हा त्यांच्यातल्या गर्भितार्थामुळे ती स्नेहाच्या लक्षात राहिली होती. पण इतक्या लवकर ती आचरणात आणायची वेळ येईल असं नव्हतं वाटलं त्यावेळी.
स्नेहानी आपल्या विचारांना मुक्त सोडायचं ठरवलं...त्यांना योग्य-अयोग्य , चांगले-वाईट, हवेसे- नकोसे अशा कोणत्याही बंधनात न बांधता मोकळं करून टाकलं. थोड्या वेळानी हळूहळू तिचं मन शांत झालं.. त्रासदायक विचार आपोआप तळाशी गेले आणि निरपेक्ष बुद्धीला पटणाऱ्या विचारांनी उचल खाल्ली. ती आपल्याच विचारांच्या तंद्रीत असताना अचानक तिला तिच्या आईचा आवाज आला. भानावर येत तिनी कान टवकारले. आई खाली घराच्या गेटजवळ उभी राहून कोणाशी तरी बोलत होती. स्नेहानी गच्चीच्या कठड्याला असलेल्या गॅप्स मधून बघायचा प्रयत्न केला. खालचं दृश्य जरी तिला नीट दिसत नसलं तरी त्यांचे आवाज मात्र अगदी स्पष्ट ऐकू येत होते. आईशी बोलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द रजत होता. सकाळी आई कुठल्यातरी कामासाठी वंदनामावशी च्या घरी गेली होती. आत्ता रजत तिला पुन्हा घरी सोडायला आला होता.
"बाय् मावशी, मी निघतो," आपली मोटारसायकल वळवत रजत म्हणाला. "अरे, आत ये ना बेटा...चहा घेऊन जा," स्नेहाच्या आईनी त्याला घरात येण्याचा खूप आग्रह केला; पण रजत त्यासाठी तयार नव्हता." आज नको, नंतर येईन. आत्ता स्नेहा पण असेल ना घरात ; जोपर्यंत तिचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत शक्यतो मी तिच्या आसपास राहू नये असं मला वाटतंय. उगीच तिच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नाही आणायचं मला. मी तसं कबूल केलंय तिला. त्यामुळे आत्ता मला जाऊ दे." स्नेहाची आई पुढे काही बोलणार इतक्यात तो मोटारसायकल ला किक मारून गेला सुद्धा!
पण स्नेहाच्या मनात त्याची ती वाक्यं घुमत राहिली. "अजून तरी माझं आणि रजतचं नातं हे फक्त मैत्रीचंच आहे ; पण तरीही मला दिलेल्या शब्दाचा मान राखतोय तो!" स्नेहाच्या विचारांचं पारडं आता रजतच्या बाजूनी झुकायला लागलं होतं. मगाशी मनाची सगळी दारं उघडल्यानंतर झालेल्या विचारमंथनामुळे आता सगळा गाळ खाली तळाशी जमा झाला होता. सगळं कसं स्वच्छ, नितळ वाटत होतं. गोंधळलेल्या मनाला, मनातल्या विचारांना योग्य दिशा मिळाली होती. स्नेहाच्या मनानी कौल दिला होता.
क्रमशः
खूप छान. गच्ची आवडली.
खूप छान. गच्ची आवडली.
'...don't serve them tea' ला thumbs up!
मगाशी मनाची सगळी दारं
मगाशी मनाची सगळी दारं उघडल्यानंतर झालेल्या विचारमंथनामुळे आता सगळा गाळ खाली तळाशी जमा झाला होता. सगळं कसं स्वच्छ, नितळ वाटत होतं. गोंधळलेल्या मनाला, मनातल्या विचारांना योग्य दिशा मिळाली होती. >>>>> nice .
I wish , in real life also things would have been working like this 
The soul becomes dyed
The soul becomes dyed
with the colour of its
thoughts.-
Marcus Aurelius
nice story
beautiful story
Allow your thoughts to come
Allow your thoughts to come and go...just don't serve them tea>>+११११ मस्तच!
Pudhache bhag taka na patapat
Pudhache bhag taka na patapat...
छान चालु आहे कथा... मात्र
छान चालु आहे कथा... मात्र प्रत्येक भाग वाचल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला नाही जमत. ऑफिसमध्ये वाचतो ना... पुढील भागाच्या प्रतिक्षेत
छान च आहे,प्रत्येक भाग मस्त
छान च आहे,प्रत्येक भाग मस्त वाटतोय