मन वढाय वढाय (भाग ११)

Submitted by nimita on 1 February, 2020 - 21:47

स्नेहाची अवस्था अगदी विचित्र झाली होती.तो पूर्ण दिवस ती आपल्याच विचारांत गर्क होती. तिला आजीच्या बोलण्यात तथ्य जाणवत होतं, आधी सलीलच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचाही विचार करायला तयार नसणाऱ्या तिच्या मनात आता रजत नी पहिलं पाऊल टाकलं होतं. तिच्या मनातल्या विचारांचा झोका आता सलील आणि रजत या दोघांमधे हिंदोळे घेत होता. रजत बद्दल आणि त्याच्या परिवाराबद्दल आजी जे काही म्हणाली होती त्यातला शब्द न् शब्द खरा होता; आणि कितीही प्रयत्न केला तरी स्नेहा हे सत्य डावलू शकत नव्हती. पण रजतच्या दिशेनी वळत असताना तिचं मन पुन्हा पुन्हा सलील पाशी जाऊन थांबत होतं. विचार करून करून स्नेहाच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. विचारांच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नव्हता.अचानक तिला तिच्या आईची फिलॉसॉफी आठवली. आई नेहेमी म्हणायची," जेव्हा माझ्यासमोर एखादा न सुटणारा प्रश्न उभा ठाकतो आणि मी त्यापुढे हतबल होते, तेव्हा मी सरळ माझा प्रॉब्लेम देवाला सांगून मोकळी होते. त्याला सांगते - 'मला यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचव.' आणि गंमत म्हणजे लवकरच मला त्या दृष्टीनी काहीतरी inputs मिळतात...कधी एखाद्या गाण्यातून, कधी कोणा व्यक्तीच्या रुपात, तर कधी चक्क चक्क एखाद्या फेसबुक पोस्ट मधून सुद्धा!" हे सांगत असताना आईच्या मनात असलेली ईश्वरभक्ती तिच्या चेहऱ्यावरूनही ओसंडून वाहत असायची.

इतर वेळी आईच्या या भाबड्या भक्तीवरून स्नेहा तिला खूप कोपरखळ्या मारायची. त्या प्रत्येक वेळी आई शांतपणे तिला म्हणायची," आत्ता कर तू माझी चेष्टा ; पण एक ना एक दिवस तुला पण याची प्रचिती येईल. मग पटेल तुला माझं म्हणणं!" तो दिवस इतक्या लवकर येईल असं मात्र स्नेहाला कधीच वाटलं नव्हतं. पण तिनी आईचा तोडगा आजमावायचं ठरवलं.... देवघरात जाऊन देवांसमोर हात जोडून उभी राहिली आणि मनातल्या मनातच तिची दुविधा अगदी स्पष्टपणे देवासमोर मांडली. "या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग दाखव देवा... आणि तू जे संकेत देशील ते समजण्याइतकी बुद्धीही दे मला." स्नेहा देवासमोर डोकं टेकवत म्हणाली.

'आईची फिलॉसॉफी अगदीच बिनबुडाची नाहीये ...काहीतरी तथ्य नक्की असावं त्यात ; कारण जेव्हापासून माझ्या प्रॉब्लेम्सचा भार मी देवावर सोपवलाय; तेव्हापासून खूप हलकं हलकं वाटायला लागलंय. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्या सारखं वाटतंय. गेले काही दिवस मनावर सतत एक दडपण होतं.... आपण जो निर्णय घेऊ तो चुकीचा तर नाही ना ठरणार... अशी एक शंका मनात घर करून होती.पण आता एक वेगळाच दिलासा मिळाल्यासारखं वाटतंय.' देवघरातून बाहेर येताना स्नेहा स्वतःच स्वतःला कबुली देत म्हणाली. तिच्या चेहेऱ्यावर आज बऱ्याच दिवसांनंतर हास्याची रेघ उमटली होती. स्वैपाकघरात काम करत असलेल्या आपल्या आईजवळ जात तिनी अचानक आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली," थँक्स आई." स्नेहाच्या या अशा अचानक उतू जाणाऱ्या प्रेमामागचं कारण न कळल्यामुळे तिची आई पुरती गोंधळून गेली. " काय गं , काय झालं ? आणि मला 'थँक्स' कशाला ? मी काय केलं ?" आईचे हात हातात धरत स्नेहा म्हणाली," काही नाही गं, असंच.... मी तुला इतका त्रास देते तरी तू नेहेमी मला समजून घेतेस आणि तुझ्याही नकळत मला खूप छान छान गोष्टी शिकवतेस ना ....म्हणून तुला थँक्स !" आई त्यावर काही बोलायच्या आधीच स्नेहा तिच्या खोलीच्या दिशेनी निघाली होती. "वेडं आहे माझं बाळ...कसं होणार हिचं सासरी गेल्यावर ?? देव च जाणे!" स्नेहाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिची आई पुटपुटली.

स्नेहामधे झालेला हा बदल आजीच्या चाणाक्ष नजरेनी अचूक हेरला पण त्यामागचं नक्की कारण मात्र तिला अजून उमगत नव्हतं. पण सारखं सारखं तिच्या मागे लागणंही योग्य नव्हतं. म्हणून आजीनी तिला थोडा वेळ द्यायचं ठरवलं.

स्नेहा आता देवाकडून मिळणाऱ्या इशाऱ्याची वाट बघत होती. 'पुढच्या एक दोन दिवसांत नक्की काहीतरी hint मिळेल' - स्नेहा स्वतःलाच समजावत म्हणाली. आणि दुसऱ्या दिवशी खरंच तिला हवा होता तो इशारा मिळाला . स्नेहाच्या एका मित्राचा -अजयचा सकाळी सकाळी फोन आला. बाकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना त्यानी अचानक तिला विचारलं," अगं, सलील सध्या इकडेच आहे- तुला कळलं नाही का? त्याच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून आलाय सुट्टी घेऊन."

ही बातमी ऐकून स्नेहा काही क्षण बधीर झाली. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं.'हा देवाचा कौल तर नसेल? नसेल नाही- आहेच मुळी...' तिच्या मनात एक वेडी आशा पल्लवित झाली. तिला होणारा आनंद कसाबसा कंट्रोल करत ; ती अंदाज घेत म्हणाली, "तू गंमत करतोयस ना ? सलील आला असता तर त्यानी मला नक्कीच तसं कळवलं असतं, मला भेटला असता तो..." स्नेहाला मधेच थांबवत अजय पुढे म्हणाला,"अगं, मी कशाला तुझी गंमत करीन ? खरंच सांगतोय मी- मागच्याच आठवड्यात आलाय तो इथे. काल त्याच्या बहिणीचं लग्न होतं. तू का नाही आलीस गं लग्नाला ? आपला सगळा ग्रुप होता तिथे. इतकी धमाल केली सगळ्यांनी. खूप छान वाटलं इतक्या दिवसांनंतर सगळ्यांना भेटून. आणि तुला खूप मिस केलं गं सगळ्यांनी. का नाही आलीस तू ?....." अजय अजूनही बरंच काही बोलत होता पण स्नेहा आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अजय ला काहीतरी कारण सांगून तिनी कॉल कट केला.

'सलील इतक्या दिवसांपासून इथे आहे, पण त्यानी एकदाही मला कॉन्टॅक्ट नाही केलं ? काल त्याच्या बहिणीच्या लग्नाला अख्ख्या ग्रुपला बोलावलं त्यानी; पण नेमकं मलाच विसरला? IIT मधे असताना सुट्टीत घरी आल्यावर सगळ्यात आधी मला भेटणारा सलील तो हाच का ? नाही नाही...मी ज्या सलीलला ओळखते तो असा नव्हता... पण मग आता इतका कसा बदलला तो? का मी त्याला पूर्ण ओळखूच शकले नाहीये अजून ? मला भेटावंसं , माझ्याशी बोलावंसं पण नाही वाटलं त्याला? कदाचित त्याच्या बाबांना त्रास होऊ नये म्हणून असं विचित्र वागला असेल का तो? पण मग मला होणाऱ्या त्रासाचं काय? आजी म्हणाली ते अगदी बरोबर आहे.... नुसतं प्रेम करून चालत नाही; वेळ आल्यावर ते निभावून नेता आलं पाहिजे. आणि नेमकं तेच करत नाहीये हा... आणि मी मात्र वेड्यासारखी उगीच एक वेडी आशा मनात ठेवून होते ; वाटलं होतं- माझ्यापासून दूर गेल्यावर त्याला माझ्या प्रेमाची, माझी खरी किंमत कळेल आणि तो त्याचा निर्णय बदलेल....या एका आशेवर मी रजतला आणि बाकी सगळ्यांना इतके दिवस झुलवत ठेवलं!!पण मला वाटत होतं तसं काहीच नाही झालं...उलट त्याच्या बाबांची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानी माझ्या प्रेमाचा अपमान केला. आणि माझा सामना करायला लागू नये म्हणून एका क्षणात माझ्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले...प्रेम तर दूरच राहिलं पण साधी मैत्रीची ओळखही नाही ठेवली त्यानी. त्याच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या मला इतरांकडून कळाव्या ? इतकी परकी झालीये का आता मी त्याच्यासाठी?? आज जर अजयचा फोन आला नसता तर मला हे काहीच कळलं नसतं."

आज कधी नव्हे तो पहिल्यांदा स्नेहाला सलीलचा खूप राग आला होता. 'कोण समजतो हा स्वतःला ? माझ्यावर प्रेम करत असला तरी मला, माझ्या प्रेमाला गृहीत का धरतो नेहेमी ? सगळं काही त्याच्या हिशोबानी ? पण त्याच्या या अशा एकतर्फी वागण्यामुळे मला किती अपमानित झाल्यासारखं वाटतं!' स्नेहाला आजीचं बोलणं आठवलं-'प्रेम इतकंही आंधळं नसावं की त्यापुढे आपण आपला आत्मसन्मान हरवून बसू!कारण हरवलेल्या प्रेमाच्या बदल्यात पुन्हा प्रेम मिळू शकतं पण एकदा का आपला आत्मसन्मान गमावला की आपण स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरायला लागतो.'

"खरंच, आजी म्हणत होती त्यातली सत्यता आता लक्षात येतीये माझ्या. इतके दिवस मी फक्त एकाच दिशेनी विचार करत होते..आजूबाजूचं काहीच बघायला तयार नव्हते..सलीलच्या प्रेमाची झापडं लावून घेतली होती मी डोळ्यांना!" विचार करता करता स्नेहा उठली आणि आजीच्या खोलीकडे जायला निघाली. आता निर्णय घ्यायची वेळ आली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्थितीचं वर्णन, निर्णयापर्यंत येणारे चढउतार छान आले आहेत.

चिन्नू>+1
फाफटपसारा टाळून नेमका विचारांचा प्रवास दाखवलाय.
पुभाप्र.

छान लिहिताय!
मनस्थितीचं वर्णन, निर्णयापर्यंत येणारे चढउतार छान आले आहेत.>>+१