हिरव्या आठवणी

Submitted by Dr Raju Kasambe on 31 January, 2020 - 09:15

हिरव्या आठवणी

अनेक वर्षांनंतर मी माझ्या मूळ गावी असलेल्या शेतात आलो होतो. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा हे गाव तसे कधी प्रकाशझोतात नसते. शिक्षण आणि नंतर नोकरी निमित्ताने मी जवळपास विसेक वर्षांपासून बाहेरगावी राहत आलोय. अधून मधून लग्नकार्य प्रसंगी गावाकडे जाणे होते. त्यातही फुरसत काढून आमच्या शेताकडे आणि पिरबाबाच्या टेकडी पलीकडे असलेल्या गणेशपुर पारधी बेड्यावर चक्कर टाकायला मला आवडते.
आजही मी लग्न कार्यासाठीच आलो होतो. वर मंडपासाठी लागणाऱ्या आंब्याच्या डहाळ्या आणायची जबाबदारी मी पटकन स्वीकारली. भावाची बाईक घेऊन काही मिनिटातच शेतात पोहोचलो. बालपणी रमत-गमत शेतात जायची मजा येत असे. जाताना फरशी (नाल्यावरील दगडी पूल) जवळ आणून टाकलेल्या मृत जनावरांचा फडशा पाडणारी कुरूप आणि अजस्त्र गिधाडे दिसत. त्यांची रक्ताने माखलेली डोकी बघून अंगावर शहारे येत. तुडुंब पोट भरल्यावर मग ती गिधाडे सुरुवातीला धावून नंतर लटपटत भारावलेले उड्डान भरत. आणि जवळच्या दोन विशाल महावृकाच्या फांद्यांवर जाऊन बसत.

निष्पर्ण महावृकाच्या फांद्या मला वाळक्या झाडावर शेकडो अजस्त्र सर्प लटकत असल्यासारख्या भासत. सायंकाळी शेतातून परतायला उशीर झाला तर मी या दोन महावृकांकडे अजिबात बघत नसे. आणि फरशीत तर भुताटकी असल्याचे सर्व शेतमजुर बोलत. त्यामुळे रात्री-बेरात्री तिथून जायचे म्हणजे ‘राम’ ‘राम’ म्हणत मी झपाट्याने फरशी पार करीत असे.

आज बाईकनी हे सर्व कधी पार केले ते कळले सुद्धा नव्हते. नाला सुद्धा कोरडा ठणाण होता. त्याच्या दोन्ही बाजूस बेशरमीची पसरलेली हिरवळ मी टिपली होती. गिधाडे तर कधीचीच संपलीत. त्यामुळे ती दिसण्याचा प्रश्नच नव्हता. मे महिना असल्यामुळे शेतात केवळ माझा चुलत भाऊ वसंता होता. मशागतीची सारी कामे आटोपली असल्यामुळे तो ही रिकामाच बसला होता. अगदी विषण्ण मनस्थितीत. मी थोडी विचारपूस केली तेव्हा तो सांगू लागला. शेतात असलेल्या चारही विहिरी आटलेल्या होत्या आणि घरच्या गाई-म्हशींना पाजायला सुद्धा शेतात पाणी नव्हते. पूर्वी पर्हाटि (कापूस), ज्वारी, तूर आणि गव्हाचे पीक आलटून पालटून घेत असू. आता तर गेल्या अनेक वर्षांपासून गहू टाकला नाही. श्रीमंत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून संत्र्यांचे बगीचे लावले. चारशे पाचशे फूट खोल कूपनलिका खोदल्या. त्यामुळे चाळीस-पन्नास हात खोल विहिरीतले पाणी आपसूकच गायब झाले. आणि छोटा शेतकरी कास्तकार आणखीनच अडचणीत आला. त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेत लाकूड टाल वाल्यांनी शेताच्या धुर्‍यावरच्या (कुंपणावरच्या) एकेक पुरातन वृक्षांचा कवडीमोलाने सौदा करणे चालू केले. हळूहळू धुर्‍यावरचे सर्व मोठे वृक्ष संपले.

तेवढ्यात मला आगगाडीची शिट्टी ऐकू आली. धुरांचे लोट काढीत कोळशावर चालणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ यवतमाळ कडून मुर्तीजापुर कडे निघाली होती. पण आता ती पूर्वीची ‘शकुंतला’ राहिली नव्हती. कोळसा जाऊन आता डिझेल आले होते आणि वेगही बर्‍यापैकी वाढला होता. आगगाडीची शिट्टी ऐकू आल्यानंतर मी जवळपास दोन शेते धावून पार करीत असे आणि ते अजस्त्र यंत्र धडाडत जाताना धडधडत्या छातीने बघत असे. आता मला कळलं की कोळशावर चालणाऱ्या आगगाडीला आता खेळण्यातली अर्थात ‘टॉय ट्रेन’ म्हणतात. काहीही असो, आज मी त्या गाडीला बघायला धावलो नाही. खरे तर त्याची आवश्यकताच नव्हती कारण मधले सर्व वृक्ष झाडेझुडूपे साफ झाले होते. आता आगगाडी बघण्यात काहीही अडथडा राहिला नव्हता.

विहिरीकाठचे पुरातन उंबराचे झाड मला दिसले नाही. जोरदार वादळाच्या तडाख्यात त्याने आपला जीर्ण देह ठेवला होता. माझ्या आतेभावाच्या बकऱ्याच्या खांडातील (म्हणजे कळपातील) एका मस्तवाल बोकडासोबत आम्ही या उंबराखाली टक्कर घेत असू. त्याच्या माथ्यावर आपल्या तळहाताने टक्कर देऊन त्याचे माथे भडकवायचे. मग आक्रमक पवित्रा घेऊन तो दोन पायांवर उभा ठाकला की चपळाईने उंबराच्या झाडावर चढायचे. नाहीतर रस्ता दिसेल तिकडे पळायचे. पण उंबरावर चढून आपल्या पायापर्यंत आलेली बोकडाची शिंगे बघून अंगावर रोमांच उठत. आम्ही आपल्या परीने गावातील ‘मॅटाडोर’ नव्हतो का? माझा आतेभाऊ तर बोकड दोन पायांवर उभा झाला की त्याचे पुढचे दोन्ही पाय पकडून त्याला पटकनी म्हणजे धोबीपछाड देत असे! आमच्यासाठी तो ‘हिरो’ ठरत असे.

उन्हाळ्यात याच झाडाजवळ गुराढोरांसाठी तूराट्यांचा मांडव घातला जाई. दुपारी सारे गुरंढोरं या मांडवात रवंथ करीत बसून राहत. बकऱ्या रवंथ करताना बाभळीच्या बिया तोंडातून बाहेर टाकतात. त्या बियांना ‘दामोट्या’ म्हणतात. दुपारी आम्ही दामोट्याचा खेळ खेळत असू.
उन्हाळ्याच्या शेवटी मात्र या उंबराच्या ढोलीत एक प्रचंड आकाराचे घुबड येऊन राहत असे. काही दिवसानंतर स्वारी व त्याची दोन तीन पिल्ले ढोलीतून डोकावू लागत. पिल्लं निघाली की घुबड दिवसभर एका बेहड्याच्या पर्णराजित झोपलेले असे. त्या पिल्लांचे टवकारल्यासारखे बटबटीत गोल डोळे बघून आम्हा बच्चेकंपनीच्या छातीत धस्स होई!

मी वसंतासोबत बोलत आमराई कडे निघालो आणि मला आणखी एक धक्का बसला. सारी आमराईच वाळून चालली होती. अनेक वृक्ष अदृश्य झाले होते. एकाही झाडाला पाडाचे आंबे तर सोडाच, धड हिरवी पानोळी सुद्धा नव्हती.

माझ्या वडिलांनी त्यांच्या उमेदीच्या काळात लावलेला खोबर्‍या आंबा सुकताना बघून मला गलबलून आले. बाबा मला नेहमी त्या झाडाबद्दल सांगायचे. दुष्काळातही त्यांनी त्या झाडाच्या बुंध्याजवळ घागरीची ‘झरती’ (ठिबक सिंचन) ठेवून त्याला वाढवले, जोपासले होते.
अगदीच कामापुरत्या आंब्याच्या डहाळ्या कशाबशा जमवून मी माघारी वळणार तेवढ्यात मला एक भोरी (डव्ह) सरळ विहिरीत उडून जाताना दिसली. घरटे असेल म्हणून मी डोकावलो तर काय, विहिरीत असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी ती पीत होती. आजूबाजूला कुठेही पाणी नसल्यामुळे पक्षांनी सरळ विहिरीत उतरून पाणी प्यायला सुरुवात केली होती. ज्या पक्षांना हे सुचले नाही, साधले नाही, ते पाण्यावाचून तडफडून मेले असतील काय की दुसरीकडे उडून गेले असतील?

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही या आंब्याच्या अंगाखांद्यावर शब्दशः खेळलो होतो. आमचा ‘डाबडुबली’ नावाचा खेळ म्हणजे सोप्या शब्दात झाडावर खेळल्या जाणारा शिवाशिविचा खेळ. पण डाबडुबली मधल्या माकडउड्या, खाली पडण्याची भीती आणि चपळाईने हालचाल करण्याची गरज जमिनीवरच्या शिवाशिवीत अजिबात नसते. डाबडुबली मध्ये थरार असतो. रोमांच असतो!

झाडावरून पडलं की सरळ हाडाच्या डॉक्टरकडे जायची वेळ येऊ शकते. झाडाची फांदीन फांदी अगदी परिचयाची होऊन जाते. कधीकधी असे वाटायला लागते या आम्र वृक्षांनीच आम्हाला स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवलं. आमची काळजी घेतली. कधी दगा होऊ दिला नाही. आजी-आजोबांनी नातवंडांना आपल्या अंगा-खांद्यावर बिनधास्त खेळू द्यावं तसं.

आंबे पाडाला आले की आम्ही दगडाने नेमका पिवळा नारिंगी आंबा टिपायचो. दात आंबून जाईपर्यंत आणि कच्च्या कैऱ्यांचा चिक तोंडाभोवती उबजेपर्यंत आम्ही आंबे खायचो. वादळवारा झाला की पोत्यांनी कैऱ्या घरी येत. आंबे उतरवायच्या वेळेस झाडाखाली आंब्याच्या राशी लागत.
माझा दादा झाडावर चढून आंबे काढायच्या विशेष खुडीने आंबे तोडत असे आणि एका जाळीच्या पिशवीत भरत असे. ती पिशवी भरली की आम्ही दोरानी खाली उतरवून घेत असू. ही सर्व आंब्याची झाडे वाळून चालली होती. किती वर्षे वय असेल त्यांचे? मानवाच्या किती पिढ्या बघितल्या असतील त्यांनी? ती वृद्धापकाळाने मरत असतील की मानवाच्या लालसेने जमिनीतील पाणी गायब झाल्यामुळे मरत असतील? अजस्त्र देह वाळून जाताना त्यांना माणुसकीबद्दल काय वाटत असेल?

शेताच्या धुर्‍यावर असलेले अनेक पुरातन वृक्ष गायब झाले (तोडलेले) होते. प्रचंड उंचीची कडुनिंबाची झाडे, बेहड्याची झाडे, माझी आवडती बोराची झाडे, रामफळ, सीताफळ, बाभळी, शेकडो पक्ष्यांचे आवडते आंबट-गोड चारोळीचे छोटेसे झाड सगळे कुठे शोधून सापडत नव्हते (अनेक जणांना चारोळी म्हणजे चार ओळींची कविता एवढेच माहीत असते). हपापलेल्या मानवाने त्यांना संपवले होते. त्यांचे महत्त्व समजून घ्यायला आम्हाला वेळ नव्हता. पैसे मिळत आहेत म्हणून एक एक झाड विकायचे. आता काय विकणार? आम्ही नुसतेच तोडत गेलो, कापत गेलो! पेरायचे, नवीन रोपटे लावायचे विसरून गेलो. फक्त आणि फक्त आजची चिंता केली. भविष्य खराब करून बसलो. उद्याचे कोणी बघितलेय. म्हणून सारे संपवत गेलो.

शेतातली झाडे संपल्यावर टालवाल्यांची (सॉ मील) नजर डांबरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कडूनिंबाच्या, बाभळींच्या पुरातन झाडांवर पडली. रातोरात रस्त्याकडेची झाडे गायब होऊ लागली. लवकरच रस्ते उजाड, बोडखे झाले. जंगले, टेकड्या याआधीच फक्त करून झाल्या होत्या.

मी वसंताला झाडांचे महत्त्व समजावून सांगू लागलो. यावर्षी पाऊस आला की विहिरीचे पुनर्भरण कसे करायचे ते सांगू लागलो. त्याने ते शांतपणे ऐकून घेतले. घरी परतताना मी त्याला विचारले ‘मग लावशील ना धुऱ्याला झाडे?’ त्याने निमूटपणे होकारार्थी हलविलेली मान माझे समाधान करून गेली. आंब्याच्या डहाळ्या आणायला गेलेल्या माझे मन भूतकाळातून वर्तमानात आले. माझी बाईक बोडख्या पण चकचकीत डांबरी रस्त्यावरून शहराकडे धावू लागली!

डॉ. राजू कसंबे, मुंबई

पूर्वप्रसिद्धी: दैनिक जनमध्यम, अमरावती. रविवार, दिनांक २४ जुलै २००५.

Group content visibility: 
Use group defaults

हा लेख वाचून, ग्रामीण भागातही हिरवाई फक्त आठवणीतच उरल्ये अशी चरचरीत जाणीव होऊन उदास वाटलं
जवळपास पंधरा वर्षानंतर आता काय परिस्थिती आहे गावाकडे हे वाचायला मलाही आवडेल.

खूप सुन्दर लेख. तितकाच अंतर्मुख करणारा. हा लेख वाचून वनमहर्षि मारुती चितमपल्ली यांच्या लिखाणाची आठवण झाली. श्री चितमपल्ली हे माझ्या बाबान्चे मित्र. त्यांच्या सहवासात घालवलेले बालपणीचे सुंदर क्षण आठवले.

लेख आवडला
आम्ही नुसतेच तोडत गेलो, कापत गेलो! पेरायचे, नवीन रोपटे लावायचे विसरून गेलो.>>>>>अगदी सहमत

आम्ही नुसतेच तोडत गेलो, कापत गेलो! पेरायचे, नवीन रोपटे लावायचे विसरून गेलो. फक्त आणि फक्त आजची चिंता केली. भविष्य खराब करून बसलो. उद्याचे कोणी बघितलेय. म्हणून सारे संपवत गेलो.>>>>>

आता फरक पडला आहे का? आशा आहे फरक पडला असणार.

दुष्काळ वाईटच, भारताने कित्येक दुष्काळ झेललेत पण आता दुष्काळ कसा मानवनिर्मित होत जातोय त्याची छोटीशी झलक लेखातून सापडते.

साधना,
आता तर समृद्धी महामार्ग होतो आहे. झाडांची कत्तल झाली आहे. जुनी झाडे संपलीत. गावाकडे जायचे म्हणजे नातेवाईकांना भेटायला. बस. बाकी मन सुन्न होते.