कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर

Submitted by Dr Raju Kasambe on 29 January, 2020 - 01:49

कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर.jpg“कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर”

काही लोकं वेडी असतात. त्यांना कशाने तरी झपाटलेले असते. पक्षी, फुलं, प्रवास, हिमालय, जगातील अद्भुत गोष्टी पैकी काही तरी त्यांना नेहेमी खुणावत असतं. आणि ते तिकडे धावत असतात. नव्हे एका अनामिक ओढीने ते तिकडे खेचले जात असतात.

नेहेमी ते अद्भुताच्या शोधात असतात. मग ते अद्भुत त्यांना एखाद्या मनुष्यात सुद्धा सापडू शकते. कुठल्यातरी आडवळनाला सापडू शकते. त्या अद्भुताचा अनुभव ते स्वतःपुरताच मर्यादित ठेवत नाहीत. त्यांना लेखणीचे सुद्धा वरदान असते. स्वतःचे अनुभव जगाला सांगताना ते आपणच अनुभवतो आहोत असे वाचणार्‍याला वाटावे इतके वास्तव ते आपल्यासमोर उभे करतात. अशीच एक व्यक्ति म्हणजे डॉ. संदीप श्रोत्री!!

अनेक वर्षांपूर्वी कास पठाराबद्दलची माहिती शोधताना पहिल्यांदा त्यांचे नाव माहिती झाले. ह्या व्यक्तीने एवढं काही लिहून ठेवलंय! मग पुढे कधीतरी त्यांची भेट झाली. तेव्हा कळलं की हा माणूस वाटले होते त्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ आहे. व्यवसायाने शल्यविशारद असलेला हा माणूस पक्षी, प्राण्यांच्या, अद्भुताच्या शोधात हिमालयापासून, गालापगोस तर माचूपिच्चू पर्यन्त (हे कुठे असावेत बरे?) कुठेही जाऊ शकतो!

सर्व प्रथम 'पुष्पपठार कास' आणि त्याच विषयावरचे इंग्रजीतले पुस्तक हाती लागले. नंतर 'काटेरी केनियाची मुलायम सफर' वाचले! आणि त्यांचा चाहता झालो.

'मार्क इंग्लिस' ह्या वल्लीबद्दल लिहिलेले त्यांचे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट व्यक्तिचरित्रच नव्हे तर कुणालाही प्रेरणा देणारे पुस्तक. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारे. पॉझिटिव्ह थिंकिंग चे गाईड!!

साधारण एक वर्षांपूर्वी त्यांनी मला त्यांचे “कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर” भेट दिले. पुस्तक तेव्हाच वाचून संपवले. ठेऊन देणे शक्यच नव्हते. तेव्हापासून त्या पुस्तकाबद्दल लिहायचे मनात घुटमळत राहिले.

सर चार्ल्स डार्विनला उत्क्रांतीचा सिद्धान्त जिथे सुचला तेच हे बेट! पहिली गोष्ट तर हे बेट सातासमुद्रापलीकडे आहे (खरेच)! तिथले समुद्री पक्षी, महासरडे, कासवे आणि एकंदरीतच प्राणी अतिशय वेगळे आहेत. आपण लेखकाने केलेला मुंबई ते ‘गालापगोस’चा प्रवास आणि तेथील प्राणीसृष्टीबद्दल वाचताना प्रत्यक्ष ‘गालापगोस’ला जाऊन आल्याची अनुभूति घेतो. तिथल्या लोकांनी ‘गालापगोस’ला आहे तसे ठेवण्यासाठी घेतलेले प्रयत्न, घातलेले नियम आणि जास्तीत जास्त जैव विविधतेची नोंद घेण्यासाठी लेखकाने केलेली धडपड आपण अनुभवतो! गळ्यातील गुलाबी पिशवी फुगवत असलेल्या फ्रिगेट पक्ष्याचे छायाचित्र मिळविण्यासाठी त्यांनी केलेली धडपड छान वर्णन केली आहे.

प्रशांत महासागरातील ह्या इवल्याशा बेटावरील ही सफर आपल्या मनात घर करून राहते. हे जग ह्याची डोळा आपण अनुभवायला हवे असे खुणावत राहते. लेखकाच्या लेखणीने आपल्याला तशी ही सफर घडते एवढे मात्र निश्चित!!

पुस्तक: “कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर”
लेखक: डॉ. संदीप श्रोत्री
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : १००
किंमत रु.१८०/-

डॉ. राजू कसंबे

Group content visibility: 
Use group defaults

छान.

'पुष्पपठार कास' हे त्यांचे पुस्तक संग्राह्य आहे.

या आगळ्यावेगळ्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद... Happy

हे पुस्तक वाचायचय
सुमती जोशी यांच्या उत्क्रांती या डार्विन विषयीच्या पुस्तकात याबद्दल बरंच वाचलं आहे त्यामुळे उत्सुकता आहे
क्षोत्रीच पुष्पपठार कास ...अप्रतिमच