...पुनरागमनाय च

Submitted by अपूर्व जांभेकर on 29 January, 2020 - 00:54

...पुनरागमनाय च

"मेरी अं... my daughter in law बहूत अच्छी है हं..." हिंदी मधला 'बहू' हा शब्द पटकन न सुचल्याने व कन्नड भाषेचा परिचय 'ब्याड' अन 'बेकू ' एवढाच असल्यामुळे जयंत दळवीला अशा अस्खलित मराठमोळ्या इंग्रजीचा आधार घ्यावा लागला. "कुच्च मत बोल रे..." जयंताच्या शेजारी बसलेल्या कोण्या एका लुंगी वाल्या शेट्टी ने नकारार्थी हातवारे करून तीव्र निषेध केला. "जयंता... husband कन्नड हो या मराटी, ... शादी के बाद पैले तीस साल खुदकी बीवी कि सुनो, और बादके बीस साल बेटे कि बीवी कि... वोनली lucky people die immediately after this ..." आजू-बाजूला बसलेल्या लुंगी कंपूमधून समर्थक आणि अनुभव संपन्न हास्य दाद मिळाली. गेल्या तीन वर्षांतील जयंताची हि तिसरीच खेप होती बंगळुरू ला त्याच्या मुलाकडे. तीन वर्षांपूर्वी नवीन वास्तूच्या गृह-प्रवेशासाठी आणि नंतर दीड वर्षं अगोदर सुनंदा गेल्यावर हवा पालट म्हणून... आणि हि तिसरी! सुनंदानेच ठरवलं होतं, सून आणि मुलाच्या आयुष्यात फारशी दखल द्यायची नाही... आदित्य म्हणजे, जयंताचा मूलगा आणि सून सायली, दोघेही IT मध्ये! आणखी चांगला पगार, पद, झालच तर कंपनी सुद्धा समोरा-समोर अश्या बरयाच फायद्यांमुळे दोघेही आता बेंगुळुरात 'ऐटीत' राहत होते. अनेक कारणांपैकी सुनंदाच्या नाराजीचं हे एक मूख्य कारण. चार वर्षांपूर्वी गोंडस अमोघचा जन्म झाला... वर्षभरात त्याचं जवळ केलं नाही हेही त्याच अनेक कारणांपैकी... "आपलयाला जर चांगली opportunity आहे तर मग ती का घ्यायची नाही? ... जावळ वगैरे काय रे? इतके छान केस आहेत त्याचे, देव-बिव, धर्म-बिर्म सांगून कापायचे? तुला आधीच सांगितलं होतं मी, I am a girl of a modern era and I won’t entertain this nonsense!...जो तो आपापल्या ठिकाणी एकदम बरोबर!
येणं -जाणं निमित्तानेच (अंतरच इतकं कि, निमित्तानाही गाळणी लागलेली) किंवा अगदी तशीच वेळ आली तर…

...आणि वेळ आगंतुकच असते... "तिची वेळ आली, गेली ती... काटकसरीने जगण्याची वृत्ती तिने जातानाही सोडली नाही... एकदम थर्ड स्टेज... तिथेही खर्च वाचवला " जयंताने डोळे पुसले. फक्त चांगल्याच आठवणींना उजाळा देऊ इथून पुढे..." स्वेच्छा निवृत्तीनंत आयुष्याच्या उत्तरार्धात तरी सुनंदा सोबत, मुलगा-सून आणि नातवासोबत हवं-तसं जगू म्हणणारा जयंता, आपल्या त्याच हसऱ्या चेहऱ्याने मुलाचं, सुनेचं सांत्वन करत होता. "बाबा तुम्ही चला आमच्यासोबत, कशाला राहता एकटे?" आदित्यने आग्रह धरला होता. सायलीही अगदी मनापासून म्हणाली होती,. "अगं, उभं आयुष्य गेलं माझं ह्या सदाशिव पेठेत... आता ह्या वयाला, असा बदल... नाही जमणार... काहीही लागलं मला तर तुम्ही आहातच कि, आणि तुम्हाला काहीही लागलं नाही तरी मी आणि आपलं हे घर, आम्ही दोघेही इथेच आहोत!" जयंताने सायलीच्या पाठीवर वडीलकीने थोपटले.

"ए दळव्या!" खूप दिवसांनी जयंताला अशी हाक कोणी मारली होती. "काय तू, आपल्या त्या दिवशीच्या पार्टी नंतर गायबच झालास एकदम... " बारकुंडा सदानंद वडके जवळ-जवळ पळतच आला "बेंगलोर ला गेला होतास कि काय मुलाकडे?" जयंता ज्या बँकेत होता त्याच बँकेत सदानंद कॅशियर होता. दोन गोष्टींचा आनंद तो सदा न कदा फुकट घेत असे... भरपूर पैसे मोजणे आणि येतील त्या बायकांशी गप्पा छाटणे! पण दुःखही ह्याचच! दोनही गोष्टी, स्वतःच्या म्हणून कधीच घरी घेऊन जाऊ शकत नसणे..."नाही रे, आता मुलगा-सून-नातू तिघेही येतील इथेच पुढल्या महिन्यात! गणपती आहेत ना... जयंता कमरेवर हात ठेवत ठेवत म्हणाला. "त्यापेक्षा त्यांनाच का नाही सांगत आता बाप्पा बसवायला" वडकेने त्याच्या मिशीला नेहमीच्या सवयीत बोटाने थोपटले. "म्हणजे बघ ना, आता वहिनी सुद्धा नाही, एकटा इथे काय-काय करशील?" "ह्म्ममम" जयंताने डोळ्यावरचा चष्मा काढून रुमालाने पुसत सुस्कारा सोडला. त्याच्या सुनेचा पडलेला चेहरा आता त्याला आणखी स्पष्ट दिसला. "बाकी, जोशी काय म्हणतायत?’

'ए दळव्या' घरी परतून रोजची कामं हातावेगळी करता करता कितीतरी वेळ हि हाक जयंताच्या डोक्यात घुमत होती. आयुष्यात खूप सहज मिळणारा आणि तरीही तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्तच दुर्लक्षित झालेला ठेवा म्हणजे आपल्या माणसांनी, आपलेपणाने, आपल्याला मारलेली हाक! सहकारी व मित्रमंडळींचा विश्वास 'दळव्या', वडीलधाऱ्यांचा आधार 'जयंता' आणि तिचा, फक्त तिच्यासाठीच असा एकांतातला 'जयु'... साधारण सहा वर्षांपूर्वी, मान खाली घालून, नाकासमोर चालून पस्तीस वर्षं केलेल्या बँकेच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली… तशी आणखीन दोनच वर्षं शिल्लक होती म्हणा! निवृत्ती आधी चार-एक महिने वरिष्ठांनी (दिखाऊपणासाठी) दिलेलं asst. branch manager हे पद आणि सहकार्यांनी निरोप संभारात केलेलं भर-भरून कौतुक! हां, आता काहींनी साहजिकच म्हंटलं 'अरे, अजून लग्न व्हायचंय पोरांचं तुझ्या, इतक्या लवकर...' पण खरं सांगायचं, तर कंटाळला होता जयंता... थकला नव्हता पण आरामाची, जबाबदारी विरहित जगण्याची अत्यंत गरज होती त्याला. सुदैवानं मुलगा हुशार निघाला, गरजा सुरवातीपासूनच मोजक्या आणि सुनंदा उत्तम गृहिणी असल्याने बऱ्यापैकी सेविंग झालेलं! घरासाठी, आदित्यच्या foreign education साठी घेतलेलं कर्ज सुद्धा व्याजासहित फिटलेलं! दुधात साखर पडली... सून सुद्धा smart आणि कमावणारी मिळाली...दोन-अडीच वर्षांत दुधावर साय सुद्धा धरली... मुलगा-सून, सासू-सासरे एकत्र फार नांदत जरी नसले तरी रोज उठून भांडत नव्हते... दोन बेडरूमच्या ऐस-पैस जागेत, फार एकोप्याने राहात नसले तरी विकोप्याने वेगळे होण्याची इच्छा कोणाचीच, अगदी सायलीची सुद्धा नव्हती. तिला आपल्या सासूचा ‘देव-धर्म’ स्वभाव अनाठायी वाटायचा, त्रास व्हायचा तिला त्याचा. त्यामुळे त्या दृष्टीने तिच्याकडून असलेल्या अपेक्षांचा ती सरळ सरळ विरोध करायची, नापसंती स्पष्टपणे व्यक्त करायची, समोरासमोर! आणि तीच हेच वागण सुनंदाला उद्धट वाटायचं, तिचाही संताप व्हायचा आणि मग तीच बडबड, तेच आरोप त्याच तक्रारी... एकदा आदित्य घरी एकटाच असताना जयंता म्हणाला "अरे ए आद्या, तुला एक गंमत सांगतो, हे सगळं ना त्या सरदारजीच्या विनोदासारखं असत... चार सरदारजी मिळून एक गाडी हलवू शकत नाहीत कारण दोघे पुढून ढकलत असतात आणि दोघे मागून... आपली करमणूक आहे ह्यात हे लक्षात ठेव, काय?!"
अमोघ व्हायच्या तीन महिने आधी maternity leave वर असतानाच, बेंगुळुर मधील एका नामांकित कंपनीकडून सायलीनेच आठ-एक महिने अगोदर केलेल्या अर्जाचा positive reply आला. पद नि पगार दोनही फारच आकर्षक दिलं जात होतं. आदित्यने आणि तिने मिळून ठरवलं, कि हि संधी सोडायची नाही. "Myself currently being on maternity leave, requesting respected management to accept my joining three months after the birth of my child on 'work from home basis'. I shall start reporting in person from your Bengaluru office after my child turns one year old. I hope, management will consider this genuine situation & shall allow this…” अतिशय हुशारीने सायलीने दिलेली हि नोटीस , कंपनी डावलू नाही शकली. मधल्या काळात, आदित्यने सुद्धा बेंगळुरू मध्ये नोकरी मिळवली सायली सारखीच, चांगला पगार आणि पद असलेली. एक वर्षानंतर दोघेही, राजा-राणी, आपल्या राजपुत्रासोबत घराबाहेर पडले. "सुनंदे, जेंव्हा आपण आपल्या पिलांना पंख देतो, तेंव्हाच त्यांच्या आभाळाला मर्यादा घालण्याचा अधिकार आपण गमावतो... हां, आता त्यांनी किती उंच उडावं हे आपण त्यांना आपल्या शिकवणीतून, संस्कारातून समजावून देतोच... पण, त्याच आचरण, यथाशक्ती-यथामती किती आणि कसं करायचं हे फक्त तेच ठरवू शकतात, नाही का?" आदित्य आणि सायलीने बेगुळुरला जायचं ठरवल्यापासून स्वाभाविकपणे, दळवींचं घर दिवसेंदिवस खदखदतच होत. मुलगा व सून विरुद्ध सासू असं शीत युद्ध चालू असताना, वडिलांनी हतबल मध्यस्थीची भूमिका चोखपणे बजावली होती. पण आई, हि शेवटी आईच असते "ठीके... तुम्ही म्हणता, ते मान्य करते मी. माझ्या मुलाच्या प्रगतीमधे अडथळा कशी होईन... पण काही काही गोष्टी ज्या मला वाटतात, त्या मी तुम्हाला कधीच समजावून नाही सांगू शकणार नाही, नाही त्यात तुमचा काहीच दोष नाही...पण कदाचित त्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागतो..." आणि ह्यावर, जयंताकडे काहीही उत्तर नव्हतं.

सकाळचा साडेसहाचा गजर जयंताने तो वाजायच्या आधीच बंद केला. घड्याळ त्याला जागं करण्यासाठी होतं कि, तो घड्याळाला, कुणासठाऊक... गेलं दीड वर्षं तरी, हि शर्यत जयंताच जिंकत होता. सकाळी साडेसहाला उठणे, दोन-अडीच किलोमीटर चालून येणे व येताना त्या दिवशीचं दूध, देव-पूजेसाठी फुलं घेऊन येणे, घरी आल्यानंतर दार-खिडक्या मोकळ्या मनाने उघडून, रेडिओ चालू करून, विविध-भारतीवर भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐकता-ऐकता थोड्याफार श्वासाच्या कवायती करून, सुंठ घालून वाफाळलेला फक्कड चहा आणि त्यातच साडे सातच्या सुमारास आलेलं ताजं वर्तमानपत्र... आठ-साडेआठ तर इथेच वाजायचे. सुनंदाला स्वयंपाक घरात अंघोळ केल्याशिवाय पाऊल ठेवलेलं चालायचं नाही, अगदी सकाळच्या पहिल्या चहाच्याहि आधी, तिची अंघोळ झालेली असायची... पण जयंताने थोडीशी बगल दिली होती ह्या नियमाला, चहाच्या ऐवजी त्याने तो नियम सकाळच्या स्वयपांकासाठी लागू केला होता. अर्धा-पाऊण तास भक्ती-भावाने चालणाऱ्या पूजेची वेळ आता पंधरा मिनिटांच्या team huddle ने घेतली होती. मग जुंपून घ्यायचा जयंत स्वतःला किचनमधे...हॉलमधून सुधीर, ह्रिदयनाथ, लता, आशा, माणिक, सुमन, वसंत, भीमसेन तर कधी पुरषोत्तम हल्क्या आवाजात कुजबुजत राहायचे, जयंताला अगदीच एकटं वाटू नये म्हणून... साडे अकराच्या सुमारास गोदा यायची घर झाडून-पुसून घेण्यासाठी. "येओ... कस कराल बई समदं? जमल का?" उद्या पासून पोळ्यांसकट दोन्ही वेळेचा सगळा स्वयंपाक मीच करेन असं जयंताने सांगितल्यावर, गोदाचा विश्वासच बसत नव्हता. वीस वर्षं झाली होती गोदाला दळवींकडे... साधा चहा सुद्धा मालकीणबाईंच्या शेवटच्या आजारपणात शिकले ते, हे माहित होतं तिला. तिच्या मालकांचं असं बोलणं, गोदाला मस्करीच वाटली... पण काहीच दिवसात, जळलेल्या नकाशांना न जळता गोलावा येऊ लागला, वरणातील जास्तीचं पाणी हळू हळू आटायला लागलं, भाजीचं विश्व फक्त कांदा-बटाटा-टमाटा एवढच मर्यादित न राहता, गवार, श्रावण घेवडा, कोबी, पान-कोबी, भोपळा, वेग-वेगळ्या उसळी, पालेभाज्या असं सर्वदूर फोफावलं. वर्षभरात स्वयंपाक घरालाच जयंताची इतकी सवय झाली, कि न्याहारीसाठी किंवा कधीतरी जेवणामधेच रुचिपालट म्हणून केले जाणारे, फोडिणीची पोळी ,फोडणीचा भात, थालीपीठ, धिरडं, घावन, तांदळाची उकड, पोहे उपीट, शिरा असे पदार्थ सुद्धा त्याला छान जमायला लागले आणि हे सगळं सगळं तो स्वतःच करता-करता शिकला... आणि आलाच कधी कंटाळा स्वयंपाकाचा तर, बादशाही काही फार लांब नव्हतं! दुपारी जेवण झाल्यानंतर, झोप येई पर्यंत जयंता वाचन करत पहुडलेला असायचा, डोळा लागायचा त्याचा पण जेम-तेम अर्धा तास...मग संध्याकाळचे दोन तास त्याच्या समवयस्क नवं(?)तरुणांसोबत(??) राखीव असायचे...संध्याकाळच्या पोळ्या, तो संध्याकाळीच करायचा, गरम-गरम सुनंदा सारख्या...रात्री जेवताना तोंडी लावायला टीव्ही वरच्या काही मालिका, गाण्याचे कार्यक्रम... रात्री जेवणानंतर वाचनाचा परत एक round व्हायचा आणि मग 'बेला के फूल’ ऐकता ऐकता एकट्यानेच व्यापलेल्या डबल-बेड वर, प्रसारण संपल्यानंतरची रेडिओतील खर-खर व दिवसभर थकलेल्या जयंताच्याही नकळत सुरु झालेलं घोरणं एकरूप होऊन जायचं...

आठवड्यातून एखाद दिवशी फोन यायचा आदित्यचा अगर तो करायचा आदित्यला चौकशी साठी. पण, आदित्यला, सायलीला जेवढी स्वतःच्या वडिलांच्या, सासऱ्यांच्या संपर्कात रहायची गरज असेल, त्याहूनही कमी गरज जयंताला राहिली होती. निष्काळजीपणाने नाही, राग म्हणून तर मुळीच नाही पण जयंताला सवय झाली होती एकटं राहण्याची, एकटं असण्याची… कदाचित कोणाचीच सोबत नसण्याची. सुनंदा गेल्यानंतर बेंगुळूरहुन परत येतानाच जयंताला समजलं होतं, एकटं राहण्यासाठी, एकट्याने झोप येणं गरजेचं - झोप येणासाठी दमणं आणि म्हणूनच हा सारा घरकामाचा भार डोक्यावर घेतलेला! एकटेपणाची सवय होईपर्यंतच जो काही काळ जाईल तेवढाच...एकदा ती सवय लागली कि मग ती अजिबात एकटं सोडत नाही...

"पाणी गरम करून पिताय? तब्बेत बरी आहे ना बाबा?" सायलीने स्वतःसाठी पाण्याचा ग्लास भरून घेत विचारलं. अख्ख्या दीड वर्षांनंतर जयंता घराबाहेर पहिल्यांदाच पडला होता. तो बंगळूरला आदित्यकडे आला होता, आठ दिवसांपूर्वी. आनंदच झाला दोघांनाही... अमोघने तर फक्त आबांचा धोशा लावला होता! . "छे ग! कधी-कधी घेतो मी झोपायच्या आधी..." जयंता म्हणाला "आई घ्यायच्या ना रोज, न चुकता..." सायलीला आठवलं. "बाबा, आपल्या त्या शंकर काकांकडे किती दिवस बसतात हो गणपती?” दोन दिवसाआधी जयंताने गणपती बंगळूरच्या घरात बसवण्याचा विषय काढल्याने वातावरण थोडं दमट झालं होतं. "गणपती!?" जयंत आश्चर्याने उद्गारला "अगं लहानपणापासून बघत आलो मी, शंकर काकांकडे घरातले देव सुद्धा वर्षानुवर्षे धुळवड खेळतायत...नशीब, सुनंदाला तिथे संसार करावा लागला नाही..."जयंत परत हसला "लग्न होण्या वर्षभर आधीच मी खोलीत राहायला आलो होतो...अजूनही आठवतंय मला, गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली होती खोली तिने...शंकर काकांकडे बहुदा गोठाच बांधला असता!" आता सायलीला सुद्धा हसायला आलं "कसय, मी चुलत्यांकडेच वाढल्यामुळे, सुनंदाच्या नशिबात सासुरवास आलाच नाही" जयंताने पाणी प्यायले "माझ्याच वेंधळेपणाचा आणि हलगर्जीपणाने तिचा छळ झाला असेल तेवढाच!" दोघेही आता किचन मधून बाहेर, हॉल मध्ये येऊन बसले. "मी अगदीच नास्तिक जरी नसलो तरी, देव-धर्म, कुळ-धर्म कुळाचाराच्या बाबतीत खूप उत्साही सुद्धा नव्हतो...सुनंदा म्हणाली, 'अहो दळवींकडच्या चाली-रिती माहित होतील तेंव्हा होतील... तोवर आपण गणपती तरी नक्कीच बसवू शकतो, नाही का? तो विघ्नहर्ता आहे, त्याला कसल्या कुळ-धर्म कुळाचाराचं बंधन नाही'... स्त्री-हट्ट.. मी सुद्धा नाही म्हंटलो नाही... मग आदित्य झाला, दरम्यान, दळवींकडच्या परंपरांची माहिती मिळवली हिने कुठून तरी..." जयंता थांबला थोडासा आणि त्याने सायलीकडे बघितले "मला मान्य आहे, तिच्या ह्या सगळ्या बाबतीतल्या अति-आग्रही स्वभावाचा तुला त्रास झाला... ह्या गोष्टी तंतोतंत पाळल्याच पाहिजेत असा माझा काहीच आग्रह नाही...आणि आजच्या तारखेला ते योग्यही नाही... आता मागच्याच वेळेला नाही का, फक्त आदित्यच येऊ शकला घरी, तुला आणि अमोघला कुठे जमलं?" सायली ऐकत होती. "खरंय तुझं, आता सारंकाही सवड असली आणि त्यापेक्षा सुद्धा, आवड असली तरच करावं...म्हणूनच, मला असं म्हणायचंय कि... तुम्हाला जमत असेल आणि खरीच इच्छा असेल तरच, नाहीतर मी ह्यावेळेस उत्तरपूजा करून घेईन बाप्पाची... कारण आता मलाही हे सगळं एकट्याला जमेल असं वाटत नाही...” टीव्ही फर्निचर च्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या फॅमिली-फोटोग्राफ कडे जयंताने पहिलं, “काय गंमत आहे ना पण, दळवींकडच्या चाली-रीती इतक्या काटेकोरपणे पणे पाळणाऱ्या तीनेच, दळवींकडे पद्धत नसताना सुद्धा गणेश स्थापना इतकी वर्षं चालू ठेवली...आपल्या घरात, त्यावेळी सुद्धा ती एकमेव स्त्री होती... आणि आता सुद्धा तू... असो, मी सुद्धा काय बोलत बसलो, आतमध्ये माझा लेक आणि तुझा लेक, दोघंही तुझी वाट पाहत असतील... चल, good night!" इतका वेळ लागलेली सायलीची तंद्री एकदम मोडली, ती पुढे काही बोलणार ह्याच्या आधीच जयंता त्याच्या झोपायच्या खोलीत गेला सुद्धा होता

"चहा नेहमीप्रमाणे?" गाडी न्यूट्रलवर आणून पार्क करत सायलीने विचारले. तशी गप्पच असायची ती गाडी चालवताना रोज, पण आज तिने तिच्या आवडीची गाणीही लावली नव्हती. ती आणि आदित्य, रोज ऑफिसला एकत्रच जायचे. अमोघची शाळा सकाळची असायची, त्याची स्कुल बस साडेसात वाजताच यायची आणि हे दोघे आठला बाहेर पडायचे. बारा वाजता शाळा संपल्यानंतर, तो day care मध्ये थांबायचा संध्याकाळपर्यंत. पण, गेले आठ दिवस तो तिथे गेला नव्हता. "You must have, like always, taken my reaction wrongly the other day" कटिंग चहाचा एक घोट घेत सायली म्हणाली "Your dad shows up at our place after more than one & half years & that too...आपण गणपती बसवण्याची जबाबदारी या वर्षी पासून घेऊ का हे विचारायला?" तिने तोंड वाकडं केलं. "I mean, माझं सोड, तुझ्यासाठी.. अमो साठी?? एकदाही आले नाहीत ते... बोलावलं नाही का मी... तू सांग... तीन वर्षं राहिले रे त्या घरी मी... आणि" बोलू का नको असा विचार करून सायली म्हणाली "आणि मी काही दुष्ट सून नाहीये...मलाही वाटतं, त्यांनी यावं इथे, राहावं निवांत आपल्याबरोबर, अमोसोबत... "आदित्य सगळं शांतपणे ऐकत होता सिगारेटचे झुरके घेत. "ते सगळं निघालं त्यादिवशी..." तिने आदित्यचा डोळ्यात डोळे घालून पाहायचा प्रयत्न केला "मला लहानपणीचं आठवलं सायु, त्यादिवशी बाबा बोलत होते तेंव्हा..."तोंडाबाहेर सोडलेल्या सिगारेटच्या पुंजक्याकडे बघत आदित्य बोलला. "सात-आठ वर्षांचा असेन मी.. विसर्जनाच्या दिवशी म्हंटलं बाबाना मी मूर्ती धरतो म्हणून, एक वेळा, दोन वेळा… लक्षच दिलं नाही त्यांनी.. तिसऱ्यांदा हट्ट केल्यावर मात्र ' आद्या, नीट धरायचं बर का बाप्पाला, पाडायचं नाही' असं म्हटले... he made sure, that I am holding it properly, confirmed that I won't loose my grip... आणि मग सावकाश, स्वतःचा हात काढून घेता-घेता 'गणपती बाप्पा मोरया' असं खणखणीत आवाजात म्हणले..." शेवटचा कश ओढून थोटूक पायाखाली विझवून टाकलं त्याने "काय भारी वाटलं होतं मला... "आदित्य स्वतःशीच हसला "खूप मोठा झालो मी असं वाटलं होतं..." आता तो सायलिकडे नीट पाहत होता... "आज ते माझ्यावर, rather आपल्यावर, पहिल्यांदाच स्वतःहून काहीतरी जबादारी सोपवतायत, मग..." आदित्य थांबला "हे बघ, I know, देव-बिव तुला आवडत नाही, फारसं मी सुद्धा मानत नाही, त्यात आपलं हे busy schedule... पण, ह्यावर्षी पासून जर बाप्पा, आपल्याकडे तर नाहीच पण तिथे पुण्याला सुद्धा... I don't know सायु, but I will definitely miss it badly" सायलीला असा, इतका भावूक आदित्य ह्यापूर्वी कधी दिसलाच नव्हता... "आणि आपल्याला जर काही हवं असेल तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते" काही क्षण दोघेही एकमेकांकडे नुसते पाहत होते. कोणी काहीच बोललं नाही. "चल, माझी VC आहे, मी निघतो..." आदित्य त्याच्या क्लस्टर च्या दिशेने निघून गेला. सायली थांबली तिथेच; आणखी एक कटिंग घेत...
"can you please switch off your phone, or if its urgent..." आदित्यच्या बॉसने धमकी वजा सूचना केली. आदित्यचा फोन त्याची meeting चालू असताना एकदम वाजला. विसरला होता तो आज silent करायला. नेमका कुणाचा message कडमडला आत्ताच, अश्या शिव्या मनात देत त्याने पहिलं तर सायली म्हणत होती... "दीड दिवस..." आदित्य हसला आणि आता त्याने मोबाइल समाधानाने silent केला.

"गलपती बाप्पा मोलया!" छोटा अमोघ आपल्या नाजूक पण तार सुरात ओरडला. त्याच्या आईचा रंग घेतलेला अमोघ, पांढऱ्या शुभ्र झब्ब्यात मोदकच दिसत होता. जयंता आणि आदित्य सुद्धा छान तयार झाले होते. सायलीने, तिच्या सासूबाईंनी दिलेली जरीची लाल साडी नेसली होती. "हं... आता थोडी हलवून ठेव मूर्ती, म्हणजे मग आपल्या गॅलरीतच बादलीत विसर्जन थोड्यावेळाने केलं तरी चालेल ठरल्याप्रमाणे." जयंता म्हणाला. नुकतीच आरती व मंत्रपुष्पांजली म्हणून झाली होती. "आत्ताच करून घेऊ, म्हणजे आरती वगैरे सुद्धा झालीच आहे ना ..." आदित्य म्हणाला. "मी उचलनाल बाप्पा!" अमोघचा हात मूर्ती पर्यंत गेला सुद्धा तसा, जयंता पटकन पुढे झाला व त्याने अमोघला उचलून कडेवर घेतले. अमोघने कांगावा सुरु केला "अरे ए हे बघ, आमो-बाळा तूच घे बाप्पाला, फक्त तू माझ्या कडेवर बस, चालेल?" जयंताने लाडाने अमोघच्या डोक्यावरून हात फिरवला. आदित्यने हळूच मूर्ती उचलली आणि असं दाखवलं कि अमोघच्या हातात दिलीये, अमोघच्या हाताखालून, जयंताने ती धरून ठेवली आणि खुणेनेच आदित्यला सांगितलं. " आबा, आबा - बाप्पा आता कुठे जानाल?" अमोघने निरागसपणे विचारले बाप्पाच्या मूर्तीकडे बघत. जयंता काही बोलणार इतक्यात सायलीच बोलली "अरे.. अमो, बाप्पा खूप लांब राहतो, ट्रेन ने जाणार तो परत त्याच्या त्याच्या घरी..." जयंता आणि आदित्य दोघेही पाहू लागले सायलीकडे "हो... तूझ कसं हे घर आहे, तसच बाप्पाचही घर आहे... बाप्पाला खूप काम असत दिवसभर घरातलं... आणि इव्हनिंगला त्याला सुद्धा त्याच्या फ्रेंड्स ना भेटायचं असतं.. अमो कसा जातो खेळायला; तसच..." सायलीने आता जयंताकडे पाहिलं "बाप्पा स्कूल ला सुद्धा जातो?... " अमोघने पुढचा साहजिक प्रश्न वि विचारला. "नाही" सायली हसलीच थोडीशी "बाप्पा मोठ्ठाय खूप, तो अमो सारखा स्कूल ला पण जात नाही आणि आई-बाबा सारखा ऑफिस ला सुद्धा” "म्हणजे आबांसारखा??" अमोघने हसून जयंताकडे पाहिलं. सायली आणि जयंता एकमेकांकडे पाहत होते, आदित्य त्या दोघांकडे पाहत होता. "आता पलत कधी येनाल बाप्पा? उद्या?" अमोघचा बाळ-बोधपणा चालूच होता. कोणी काहीच बोललं नाही "मग उद्याच्या उद्या?" अमोघ थोडा विचार करून म्हणाला. सायलीने अमोघच्या दोनही हातांची ओंजळ करून त्याची पापी घेतली, "तू मनापासून बोलावलंस, तर नक्की येईल बाप्पा" . आता बाप्पाची मूर्ती पूर्णपणे जयंताच्या हातात आली होती. आदित्यला त्याच्या लहानपणीचा तो प्रसंग परत आठवला. "दिवाळीला तुझ्या सोबत फटाके उडवायला येईल, मग Christmas ला खूप साऱ्या gifts घेऊन येईल आणि summer vacation मध्ये तुझ्याबरोबर mangoes..." सायलीने जयंताकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "पुनरागमनायचं! असच म्हणतात ना बाबा?..." जयंता प्रेमळ हसला त्याने मान डोलावली आणि म्हणाला "नक्की!"

© अपूर्व संजीव जांभेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुरेख लिहिलय. आवडील कथा एकदम.
शेवटही अगदी सुंदर केलाय.

(वाचताना माझा बराच गोंधळ झाला, कशामुळे ते समजले नाही.)

(वाचताना माझा बराच गोंधळ झाला, कशामुळे ते समजले नाही.) >> परीच्छेद नीट पाडलेले नाहीत, त्यामुळे कोण बोलतेय ते पटकन कळत नाही.

(वाचताना माझा बराच गोंधळ झाला, कशामुळे ते समजले नाही >>> माझाही.

खूप सुंदर लिखाण. मला वाटतं लिखाणाची मांडणी सुटसुटीत हवी होती. जरा कंटाळा आला वाचायला पण नेटाने पूर्ण केली.

गणपती बसवण्याचा आग्रह धरण्यापेक्षा जयंताने आदित्यला सिगारेट सोडायचा आग्रह करायला हवा होता. सगळा त्याग, समजूतदारपणा याची अपेक्षा फक्त बायकांकडून. चालीरीती, परंपरा सगळ्या बायकांनी पाळायच्या. आणि पुरुषांना मात्र हवं तसं वागायची मुभा. हाच घीसापीटा फॉर्म्यूला किती दिवस चालणार?

मी_अनु, anjut, हर्पेन, मीनल हरिहरन, तृप्ती, विनिता_झक्कास, सनव, मन्या,आनन्दा , कुंतल, स्वस्ति, हरिहर - मनापासून धन्यवाद.

urmilas - मलाही छान वाटलं ऐन जानेवारीत बाप्पावर काहीतरी लिहायला...thank you so much!

स्वस्ति, विनिता_झक्कास आणि हरिहर - सूचनेसाठी आभारी आहे, पुढच्या कथेत सुधारणेचा नक्की प्रयत्न करेन.

soha - सर्वप्रथम, ह्या कथेतून तुमच्या/कुणाच्याहि भावना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दुखावल्या असतील तर क्षमा मागतो!
कुठलीही सफाई द्यायचा माझा हेतू नाही पण तरीही लेखक म्हणून थोडसं बोलतो...
कथा लिहिता-लिहिता असं वाटल कि, खरतर हि कथा, कळत-नकळत 'Millennial Parents' ह्या विषयाला पुसटसा स्पर्श करून
जाते (अर्थात, हे फक्त माझं मत). धन्यवाद!
चूक-भूल, द्यावी-घ्यावी.

@soha जयंताला सांगून सिगरेट पिणार आहे का आदित्य???

कथा सुंदर... मुळात मी पण अगदी देव वैगेरे मानत नाही पण सर्व देवांचा आदर करते, त्यातल्या त्यात बाप्पा तर सगळ्यात लाडका म्हणून कदाचित जास्त आवडली कथा

वाह !!! फार सुरेख Happy मायबोली वर अश्या सुंदर, तरल कथा वाचल्यात नं की सात्विक समाधान मिळतं एक.

चांगला प्रयत्न आहे. शीर्षक चुकीचं लिहिलं आहे. 'पुनरागमनाय च' असं पाहिजे. दोन वेगळे शब्द आहेत आणि च वर अनुस्वार नाही. 'च' सार्थ होण्यासाठी पुनरागमनाय च्या आधी काहीतरी पाहिजे, तो श्लोक तरी किंवा नुसते टिम्ब टिम्ब वापरा.

मला आवडली कथा! जयंताचे परीस्थितीशी मैत्री करणे आवडले.

>>गणपती बसवण्याचा आग्रह धरण्यापेक्षा जयंताने आदित्यला सिगारेट सोडायचा आग्रह करायला हवा होता.>>
जयंता गणपती आणायला जमेल का असे विचारतो, त्यात आग्रह नाहीये. निर्णय त्याने आदित्य-सायलीवर सोपवलाय. नसेल जमणार तर उत्तरपूजा करुन निरोप द्यायची त्याची तयारी आहे. आपल्या पत्नीच्या स्वभावाचा, आग्रहाचा एकत्र रहात असताना सायलीला त्रास व्हायचा याची त्याला जाणीवही आहे. मला कुटुंब एकत्र असताना तो आणि आदित्य त्या फ्रंटवर तटस्थ रहातात, 'आपली करमणूक' हा विचार, हे खटकले. पण तो त्यांचा कमकुवतपणा सुनंदाच्या व्यक्तीरेखेशी सुसंगतही वाटला.
गणपती आणि सिगरेट हे दोन वेगळे मुद्दे. आदित्यच्या सिगारेट बाबत त्याच्या पालकांची नापसंती आधीच नोंदवून झाली असेल ना. एक मुलाचा बाप असलेल्या आदित्यला सिगारेटचा सोडायचा आग्रह त्याची पत्नी म्हणून सायली करु शकते , जोडीला जयंता पाठिंबा देवू शकतो. सायलीला सिगारेट खटकत आहे असे कुठे कथेत जाणवले नाही.

सायलीने मुलाच्या जन्माच्या तीन महिने आधी नोकरीचा राजिनामा दिल्यावर मॅटर्निटी लिव कशी? तिने ब्रेक घेतला ना?

आवडली कथा.

>>गणपती बसवण्याचा आग्रह धरण्यापेक्षा जयंताने आदित्यला सिगारेट सोडायचा आग्रह करायला हवा होता.>>>>> सिगारेट सोडण्याचा आणि गणपती बसवण्याचा काय संबंध?

Pages