प्रजासत्ताक भारत

Submitted by Asu on 26 January, 2020 - 00:10

प्रजासत्ताक भारत

हे कोण म्हणे कुणाला I प्रजासत्ताक भारत झाला !
खरं खरं सांगा बोला, ह्या तिरंग्याची आण तुम्हाला ||धृ||

टिळक सुभाष गांधी लढला
मर्दानी लक्ष्मी ती वीरबाला
भगतसिंग सावरकर बळी गेला
पेटवून बलिदानाच्या ज्वाला
प्रिय भारत स्वतंत्र झाला ! ||१||

छळछळून इंग्रज गेला
इंग्रजी ठेवली छळण्याला
जन मायबोली विसरला
इंग्रजी भली गुलामाला
आत्ता तरी मराठी बोला ||२||

बघा अजब संसार झाला
जन लाथाडती घरवालीला
नांदवती घरी परकीला
मराठीचा निरुपाय झाला
साही नवऱ्याच्या बायकोला ||३||

काम ना मिळे हाताला
तरसती गरीब घासाला
श्रीमंतांचा बोलबाला झाला
मराठी माणूस मुंबईवाला
झाला मुंबईकर डब्बेवाला ||४||

संस्कृतीसमृद्ध देश सजला
ज्ञान संपन्न वेद पुराणातला
देऊ संदेश अखिल जगताला
आठवा प्रतापी शिवरायाला
प्रजा विसरली अभिमानाला ||५||

घरकर्मी देह मरगळला
चला उठा देशकार्याला
ह्या माझ्या भारत देशाला
करु वंदन या भूमातेला
आणू खऱ्या प्रजासत्तेला ||६||

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults