दंश

Submitted by ऑर्फियस on 23 January, 2020 - 20:15

मयसभेच्या पायरीवर तो उंचापुरा, बलदंड राजपुरुष उभा होता. आजुबाजुला सेवक प्रणाम करून जात होते. पण त्याचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारांमध्ये व्यग्र होता. प्रतिपक्षाने काही वर्षातच प्रचंड प्रगती केली होती. राजसूय यज्ञ केला होता. ती आपलीच भावंड असली तरी पुढे केव्हातरी त्यांचा आपल्याशी संघर्ष होणार हे त्याला कळून चुकले होते. त्याने गदा हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते. जगात कुणीही गदायुद्धात त्याला हरवू शकणार नव्हते. हे सारं वैभव मूळात आपलं आहे हा नेहेमीचा विचार त्याच्या मनात आला. आपला पिता अंध निपजला त्यात आपला काय दोष? असे विचार करीत असतानाच त्याने मय सभेत प्रवेश केला आणि थाडकन त्याचे मस्तक भिंतीवर आदळले. गदा त्याच्या हातून निसटून खाली पडली. क्षणभर त्याला काही कळेचना. प्रवेशद्वार तर समोर दिसत होते. त्याने हळूच हात पुढे केला. हाताला अत्यंत मुलायम अशा गुळगुळीत, पारदर्शक स्फटिकाचा स्पर्श झाला. त्याला ह्सु आले. मयसभेतल्या या दृष्टीभ्रमांबद्दल त्याने बरेच ऐकले होते. मयसभा निर्माण करणार्‍या कलावंताचे त्याला मनोमन कौतूक वाटले. निव्वळ नेत्राच्या हालचालीने शत्रूच्या गदेचा प्रहार कुठे होणार हे ओळखणारे आपण स्फटिकाचे द्वार ओळखू शकलो नाही. तो पुन्हा हसला. गदा बाजुला ठेवून त्याने द्वार शोधण्यास सुरुवात केली.

सर्वप्रथम त्याने स्फटिकावर आपला हात ठेवला आणि तो डावीकडे फिरवू लागला. अजूनही स्फटिकच लागत होता. त्यानंतर त्याने उजवीकडे चाचपण्यास सुरुवात केली आणि एका ठिकाणी हात एकदम आत गेला. त्याला पुन्हा आश्चर्य वाटले. वेलबुट्टी काढलेल्या भिंतीचा भाग म्हणजे प्रवेशद्वार होते. समोरुन येणारा सेवक मात्र अगदी सवयीचे असल्याप्रमाणे त्याला प्रणाम करून भिंतीतून आरपार निघून गेला. त्याने थबकून एक पाऊल आत टाकले. आणि हळूच दुसरे पाऊल आत टाकले. मयसभेत त्याने प्रवेश केला. गदा बाहेर राहिल्याचे त्याला लक्षात आले. पण पुन्हा जाऊन गदा घेण्यापेक्षा परतताना घेऊ असा विचार त्याने केला. त्याची गदा सर्वसामान्य योद्ध्यांना पेलवणारी नव्हती. त्याने समोर पाहताच क्षणभर त्याचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना.समोरचे विस्तीर्ण सभागृह पाण्याने भरले होते. पाणी पाऊलभरच होते. त्यातच बसण्यासाठी आसने मांडली होती पण त्या आसनांचे पाय त्या उथळ पाण्यात बुडाले होते. त्याला काही कळेचना. पाण्यात सभागृह? पुढे पाऊन टाकताना त्याने आपले वस्त्र भिजू नये म्हणून किंचित वर उचलून धरले आणि नवलच! पाण्याच्या जागी गुळगुळीत स्फटीक होता. त्या विशिष्ट स्फटिकामुळे पाण्याचा भास निर्माण झाला होता.

पुन्हा मनोमन कलाकाराचे कौतुक करीत त्याने सावधपणे पाऊल पुढे टाकले. येथे पाणी नाही हे माहित असूनदेखील तो भासच इतका खरा होता की शरीराकडून ती कृती आपोआपच होत होती. सभागृह अतीविस्तीर्ण होते. त्याची शोभा पाहात पुढे जात असताना तो पुन्हा आपल्या विचारांमध्ये व्यग्र झाला. त्याच्या अंध, दुबळ्या पित्याने राज्याचा हा भाग त्याच्या बांधवांना दिला होता आणि अल्प काळातच ते सामर्थ्यवान झाले होते. शत्रू आपले सामर्थ्य वाढवत नेणार याबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती. त्याआधीच हल्ला करणे भाग होते. हाती गदा असल्यावर त्याच्यासमोर कुणीही टिकाव धरु शकणार नव्हते. अगदी शत्रूपक्षाचे ते पाच योद्धेसुद्धा. शिवाय त्याच्या पक्षात फार मोठी माणसे होती. कवचकुंडले लाभलेला त्याच्यासाठी प्राण देण्यास तयार असलेला जिवलग मित्र होता. शत्रूपक्षालाही ज्यांनी शस्त्रविद्या शिकवली असा महापराक्रमी गुरु त्याच्या बाजूने होता. इच्छामरणाचा वर लाभलेला, ज्याचा आजवर कुणीही पराभव करु शकले नव्हते असा त्याचा पितामह त्याच्या पक्षात होता. त्याचा जय निश्चित होता. अशावेळी जुगारासारख्या क्षुद्र गोष्टींचा आश्रय घेण्यास त्याचे मन तयार नव्हते. फासे फेकून मिळालेला जय त्याला नको होता. आणि त्यामुळे त्या पराक्रमी योद्ध्याला समाधानही लाभणार नव्हते. बलदंड शत्रूला नमवायचे ते रणांगणातच आणि तेही आपल्या गदेच्या प्रहारानेच. तो अचानक थबकला. त्याची विचारशृंखला तुटली. समोर दुसर्‍या दालनात जाण्यासाठी उघडलेले द्वार होते. मात्र आता तो फसणार नव्हता.

त्याने हळूच हात पुढे केला. हात सहजपणे आत गेला. मग त्याने पहिले पाऊल टाकले. हे खरोखरच द्वार होते. तो आत प्रवेशला आणि त्याचे भानच हरपले. दालनाच्या भित्तिकेवर निरनिराळ्या रंगात वेलबुट्ट्या काढून चित्रं रंगवली होती. आणि ती तशीच समोर भूमीवरही चितारली होती. त्यामुळे भित्तिका कुठे संपते आणि भूमी कुठे सुरु होते लगेच कळत नव्हते. हा आणखी एक दृष्टीभ्रम. उजवीकडून एक सोपान वर जात होता. त्याने पाहिले आणि तो थबकला. त्या सोपानावर सेविकांसमवेत ती उभी होती. शत्रूपक्षाची स्त्री. पाचांची पत्नी. अनुपम सौंदर्याचे वरदान लाभलेली. ती ही त्याच्याचकडे पाहात होती. तिला पाहताच त्याला आठवला तो आपला मित्र. या उद्धट, अहंकारी स्त्रीने स्वयंवरात त्याच्या जिवलग मित्राचा अपमान केला होता. "सूतपुत्राला वरणार नाही" तिचे वाक्य त्याच्या हृदयात कळ उमटवून गेले. त्याने विचार केला शत्रूला नमवले की हा अहंकारही आपोआपच ठेचला जाईल. मित्राचा अपमान त्याच्या मनातून जाईना. आणि त्या विचारातच त्याने अभावितपणे पाऊल पुढे टाकले मात्र आणि तो थेट जलाशयात कोसळला. तेथे जलाशयाच्या जागी भूमीचा भास निर्माण केला गेला होता. कोसळताना त्याने गदेच्या आधाराने स्वतःला सावरले असते पण गदा तर बाहेरच राहिली होती. त्याची वस्त्रे भिजून गेली. त्याचा मुकूट कुठेतरी पाण्यातच नाहीसा झाला. तो स्वतःला कसाबसा सावरत असतानाच त्याला तिच्या हसण्याचा आवाज आला आणि तप्त लोहशलाकेप्रमाणे तिचे शब्द त्याच्या कानात शिरले "आंधळ्याचा पूत्रही आंधळाच"...

संतापाने त्याचे शरीर थरथरु लागले. नागिणीने दंश केल्याप्रमाणे मानहानीचे विष त्याच्या शरीरात भिनू लागले. त्याला आपल्या अंध पित्याचा अपमान सहन होईना. आंधळ्या मायेने पित्याने नेहेमी त्याची बाजू लावून धरली होती. पण त्याला शत्रूपक्षाबद्दल सहानुभूती बाळगणार्‍या मंत्र्यांमुळे मर्यादा पडल्या होत्या. त्याच पित्याने यांना हे राज्य विभागून दिले आणि त्याचाच अंध म्हणून उपहास केला जात होता. आपल्यासाठी प्राण पणाला लावायला तयार असलेल्या मित्राचा हिने अपमान केला होता. आणि आता आपला... हिच्या पाच पतींमधला एक तरी आपल्या गदेसमोर टिकेल काय? त्याला आता मुकूट शोधावासा वाटेना. तो तसाच मागे फिरला. आणखी दृष्टीभ्रम पाहण्यात त्याला आता रस नव्हता. त्याचे नेत्र लालबूंद झाले होते. मुठी आवळल्या गेल्या होत्या. परतताना कसलाही दृष्टीभ्रम नव्हता. कुठे काय आहे ते त्याला ठावूक होते. आता फक्त शत्रूचा पराभव करायचा. जूगार तर जूगार, द्युत तर द्युत. खरोखर कोण अंध आहे हे दाखवून द्यायचं. ओली वस्त्रे असलेला मुकूटरहित असा तो योद्धा मयसभेच्या बाहेर आला. बाजूलाच त्याला आपली गदा दिसली. इतरांना जड वाटणारी ती गदा त्याने सहजपणे हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते.

ऑर्फियस (अतुल ठाकुर)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast.. agadi chhan kelay varnan.. dolyasamor mayasabhach ubhi keli tumhi

खूप सुंदर लिहिलेय. आवडले.

द्रौपदीचे हे उद्गार खूप प्रसिद्ध आहेत. महाभारत मला रामायणापेक्षा आवडते कारण महाभारतातील माणसे मानवी गुणवगुणांनी भरलेली आहेत. इथे सगळे ग्रे आहेत.

कोणीच पूर्ण पांढरे किंवा काळे नाही, जसे रामायणात आहे.

आभार Happy

द्रौपदी तशी कुजकटच होती म्हणायची बोलायला! Happy
पण खूपच छान लिहीले आहे ... अजून खरंच वाढविता आली असती...कितीही...
नाही का..? अगदी भारतीय युद्धापर्यंत देखिल!

मृत्युंजय आठविणे अपरिहार्य आहे!

लिहिलं मस्त आहे पण किंचित उदात्तीकरण जाणवलं ... दुर्योधन कुशल गदायोद्धा होता पण इतका शक्तिशाली अजिबातच नव्हता ... हाती गदा असल्यावर कोणीही त्याच्यासमोर टिकू शकलं नसतं वगैरे अतिशयोक्ती झाली आहे - कौरव पांडव द्रोणाचार्यांकडे शिकत होते त्यावेळी भीमाने गदायुध्दात कितीतरीवेळा त्याचा पराभव केला होता . द्रौपदी स्वयंवरावेळी केवळ अर्जुन आणि भीम हे दुर्योधन आणि तिथे जमलेल्या अन्य क्षत्रिय राजांना भारी पडले होते ..

त्यामुळेच भीष्म , द्रोण यांसारखे पराक्रमी लोक आपल्याकडे असूनही प्रत्यक्ष युद्धात पांडवांचा जय होईल याची त्याला धास्ती होती . त्यामुळे कपटाने गोड बोलून जंगलाचा ओसाड प्रदेश धृतराष्ट्राकरवी त्यांना दिला ... पण पांडव त्यातही समाधानी होते , त्यांनी तिथे वैभवशाली राज्य निर्माण केलं ; दुर्योधन त्यांना शत्रू मानत होता , पण ते त्याला शत्रू मानत नव्हते आणि पुढेमागे हस्तिनापूर जिंकून घेण्याचं तर त्यांच्या स्वप्नातही नव्हतं .

द्रौपदीची चूकच झाली ... पण ती नसती झाली तरी दुर्योधनाने काहीतरी निमित्त शोधलंच असतं पांडवांशी वैर उकरून काढायचं .. त्याच्या मनातल्या असुरक्षितता आणि मत्सराच्या भावनेमुळे .. द्रौपदीने ते जरा लवकर घडवून आणलं एवढंच .. तुम्ही रंगवला आहे तेवढा दुर्योधन शक्तिशाली नव्हता ...

तुम्ही रंगवला आहे तेवढा दुर्योधन शक्तिशाली नव्हता ...
Submitted by radhanisha on 25 January,≫≫ मला वाटते लेखकाने दुर्योधनाचा स्वसामर्थ्याबद्दल अहंकार किती मोठा होता ह्या संबधाने ते लिहिलंय. (जसा पाकिस्तान बडबडत असतो की आम्ही पण आण्विक शक्ति आहोत ह्याची भारताने जाणीव ठेवावी वगैरे वगैरे Lol )

अहंकारच आपला सर्वात मोठा शत्रु असतो आणि त्यात जर तो खोटा अहंकार असेल तर पराभव निश्चित

दुर्योधन भीमा पेक्षा जास्त skilled होता गदा युद्धात.
लहानपणी भीम जरी त्याला भारी पडत होता पण नंतर त्याने बलराम कडून गदा युद्धाचे ट्रेनिंग घेतले होते आणि जेंव्हाचा हा प्रसंगaआहे त्यावेळी धरतीवर त्यांच्याइतका स्किलड गदाधारी कोणीच नव्हता- भीम देखील नाही.
महाभारत युद्धात शेवटच्या वेळी युधिष्टिर ने दुर्योधनाला आव्हान दिले होते कि पाच पांडवामधील त्याला हवा तो पांडव आणि हवे ते शस्त्र निवडून लढावे आणि जिंकल्यास हस्तिनापूर घ्यावे.
अशा वेळी दुर्योधन इतर कोणालाही निवडून गदा युद्ध मध्ये सहज हरवू शकला असता. पण त्याने भीमाला निवडले गदा युद्ध साठी.
लढाईत भीमाला हरवलेही होते जवळ जवळ पण कृष्ण ने चीटिंग केली आणि भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर मारायला सांगितले. जे गदा युद्धात चूक आहे - कमरेखाली प्रहार.

सर्वांचे मनःपूर्वक आभार. एक घटना दुर्योशनाच्या दृष्टीकोणातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे थोडं उदात्तीकरण क्षम्य आहे असं मला वाटतं.

जबरद्स्त लिहिले आहे ठाकुरसाहेब.
हे असेच वाढवले असते तर दुर्योधनाला पूर्ण सहानुभुती मिळाली असती जशी मृत्युंजया नंतर कर्णाला मिळाली.

खूप सुंदर लिहिलेय. आवडले.

द्रौपदीचे हे उद्गार खूप प्रसिद्ध आहेत. महाभारत मला रामायणापेक्षा आवडते कारण महाभारतातील माणसे मानवी गुणवगुणांनी भरलेली आहेत. इथे सगळे ग्रे आहेत.

कोणीच पूर्ण पांढरे किंवा काळे नाही, जसे रामायणात आहे.>>>> साधना छान प्रतिसाद, मलाही असंच वाटतं सेम.

"दंश"...अतिशय सुंदर आणि समर्पक शीर्षक. देखणा, रुबाबदार, राजबिंडा सोबतच अभिमानी आणि 'आपण अजेयच आहोत' असा दुर्दम्य अहंकार दुथडी भरून वाहत असणारा दुर्योधन डोळ्यांसमोर उभा राहतो. कुठल्याच व्यक्तिरेखेचे नाव नमूद न करण्याची कल्पना सुद्धा छान!
'इंद्रप्रस्थ दर्शन', 'राजसूय यद्न', 'शिशुपाल वध'... ह्या घटना आपल्याला महाभारताच्या अंतिम परिणामांकडे थेट घेऊन जातात.

बाकी, जसं वर 'अज्ञानी" म्हणाले, हा प्रसंग दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आला आहे... >>"मला वाटते लेखकाने दुर्योधनाचा स्वसामर्थ्याबद्दल अहंकार किती मोठा होता ह्या संबधाने ते लिहिलंय" अगदी बरोबर!

परंतु, जर कोणाला "भीम का दुर्योधन" असा प्रश्न असेल तर माझ्या माहितीप्रमाणे, गदा-युद्धाच्या शास्त्रामध्ये दुर्योधन निश्चितच उजवा होता. पण... भीमाची जमेची बाजु, हि त्याच्याकडे असलेलं दश-सहस्त्र गजांचं बळ! गदा युद्धात तंत्राइतकीच महत्व आहे शक्ती/बळाचं...

हा धागा पुन्हा वर आला. सर्वांचे खुप खुप आभार Happy महाभारतावर बरंच काही लिहायचं डोक्यात आहे. याआधी काही लेख लिहिले त्या चर्चेत बरेच वादही झाले. महाभारतातील व्यक्तीरेखांच्या बाबतीत त्या त्या लोकांचे स्वतःचे जे दृष्टीकोण असतील त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या कथांमध्ये केला आहे. भूंगा ही कथाही तशीच. याला कुणी उदात्तीकरण म्हटलं तर माझी हरकत नाही. पण अनेकदा उदात्तीकरण हा शब्द वाईट गोष्टी चांगल्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर वापरतात. मला मूळात त्या गोष्टी वाईट होत्या का हे देखिल तपासून घ्यावसं वाटतं. बाकी कुणाचेही नाव कथेत घेतले नाही कारण ही माणसं आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनाच इतक्या ठळक आहेत की नाव घेण्याची गरजच भासली नाही. ही कथा लिहिताना खुप समाधान मिळाले. महाभारतातील आणखी काही व्यक्तीरेखांवर लिहायचे आहे.

अपूर्व जांभेकर, धनुडी आभार Happy

मला मूळात त्या गोष्टी वाईट होत्या का हे देखिल तपासून घ्यावसं वाटतं. >> नक्की तपासून घ्या. पण म्रुत्युंजय / युगंधर सारख्या कादंबर्या हे सत्य तपासण्याचे स्त्रोत नाहीत. प्रत्यक्श व्यासांचे महाभारत वचायला हवे. भीमा ने ( हिडिंब/ बकासूर्/किर्मिर्/जरासंध्/दूर्योधन्/ दूश्शासन) यांना समोरा समोर हरवले. द्रौपदी स्वयं वरा नंतर जेव्हा दूर्योधन्/कर्ण( with kawach kundal) चाल करून आले तेव्हा भीम अर्जुन सगळ्यां ना भारी पड्ले. जेव्हा गंधर्वां नी दूर्योधन्/कर्ण( with kawach kundal) पकडून बांधून घातले तेव्हा देखील भीम अर्जुन मदती आले.(plus Virata kadachee ladhai)
दूर्योधनानी किन्वा बलरामानी (कंसवध सोड्ल्यास) फार मोठा परक्रम केल्याचे दिसत नाही. ज्या जरासंधा मुळे यादवांना पळून द्वारीकेला
जाव लागल त्याचा सूड बलरामानी घेतला नाही.त्या साठी भीमच गेला.

Pages