मन वढाय वढाय (भाग ७)

Submitted by nimita on 20 January, 2020 - 23:26

आता हळूहळू स्नेहाच्या घरी पण तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू व्हायला लागली होती. एक दिवस तिची आई तिला म्हणाली," स्नेहा, अगं, या रविवारी वंदना मावशी येणार आहे आपल्याकडे. रजत पण येईल तिच्याबरोबर. तू जाणार नाहीयेस ना त्या दिवशी कुठे ?" वंदना म्हणजे स्नेहाच्या आईची बालमैत्रीण; दोघी अगदी शाळेत असल्यापासून एकत्र होत्या. आणि रजत हा मावशीचा मुलगा- स्नेहाचा बालमित्र! खरं म्हणजे मावशी आणि आई - दोघींचं कायमच एकमेकींच्या घरी येणं जाणं असायचं. पण आज आईनी अगदी मुद्दाम ही बातमी दिली होती त्यामुळे आईच्या बोलण्यामागचा अर्थ स्नेहाच्या लक्षात आला. तिनी थोडं वैतागून विचारलं," तुझी मैत्रीण येणार आहे ना? मग मी घरी नसले तरी काय फरक पडतो ?" त्यावर तिची आई हसत म्हणाली," अगं, जरी माझी मैत्रीण असली तरी यावेळी ती तुझ्यासाठी येणार आहे ! आता स्पष्टच सांगते तुला ... आमची दोघींची अशी इच्छा आहे की तुझं आणि रजतचं लग्न व्हावं....ती बोललीये रजतशी ... तो तयार आहे ! पण त्याचं म्हणणं आहे की काहीही ठरवण्या आधी त्याला एकदा तुझ्याशी बोलायचं आहे आणि म्हणूनच येणार आहेत ते दोघं ."

खरं सांगायचं तर रजतला भेटण्यात स्नेहाला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. गेल्या काही दिवसांपासून त्यालाच काय पण कोणालाच भेटायची इच्छा होत नव्हती तिची. पण आईनी परस्पर ठरवून टाकल्यामुळे निदान तिच्यासाठी तरी स्नेहाला त्या दिवशी घरी थांबणं भाग होतं. तसं पाहता वंदना मावशी जरी तिच्या आईची मैत्रीण असली तरी सुरुवातीपासूनच स्नेहाबद्दल तिला विशेष ओढ होती - अगदी स्नेहा लहान असल्यापासूनच ! रजत आणि स्नेहा सुद्धा लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. रजत खरंच खूप चांगला मुलगा होता.... पण 'एक चांगला आणि जवळचा मित्र' यापलीकडे स्नेहानी कधीच त्याच्याबद्दल कुठलाच विचार केला नव्हता.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी वंदना मावशी आणि रजत भेटायला आले. एरवी त्या दोघांबरोबर गप्पा मारताना स्नेहाला कधीच संकोच वाटला नव्हता, पण आज मात्र तिला खूपच ऑकवर्ड वाटत होतं... कारण आजचं त्यांचं येणं हे एका खास कारणासाठी होतं आणि स्नेहाला नेमकं तेच नको होतं. पण 'आलिया भोगासी असावे सादर' असा विचार करत ती बाहेरच्या खोलीत जाऊन बसली.

वंदना मावशीनी नेहेमीप्रमाणेच तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. पण स्नेहाला मात्र आज मावशीच्या बोलण्यात , तिच्या आवाजात एक प्रकारचा हक्क जाणवत होता. एरवी स्नेहाच्या वयाची होऊन एखाद्या मैत्रिणी सारखी तिच्या बरोबर चेष्टा मस्करी करणारी तिची मावशी आज अचानक काहीतरी वेगळंच वागत होती. आईला मदत करायच्या बहाण्यानी स्नेहा स्वैपाकघरात गेली. तिला आत आलेली बघून तिची आई म्हणाली," अगं, तू बस ना बाहेर त्या दोघांशी गप्पा मारत. मी पण येतेच आहे ." त्यावर स्नेहा म्हणाली," आई, आज मावशीचं वागणं काहीतरी वेगळंच वाटतंय मला! आणि रजत तर आल्यापासून काहीच बोलत नाहीये. मला खूप ऑकवर्ड वाटतंय गं...तू चल ना बाहेर." तिच्याकडे बघून मिश्किल हसत तिची आई म्हणाली, "तुझं आपलं काहीतरीच असतं, तू हो पुढे..मी आलेच." पण स्नेहा बाहेर जायच्या आधी मावशीच आत आली आणि म्हणाली," काय गं? दोघी मायलेकी मिळून काय कारस्थानं रचताय माझ्या विरुद्ध ?" तिच्या या वाक्यावरून दोघी मैत्रिणींचे एकमेकींवर शाब्दिक प्रहार सुरू झाले..."झाल्या दोघी सुरू...आता नुसत्या हसत बसतील.." वैतागून बाहेरच्या खोलीत जात स्नेहा म्हणाली. तिच्या बोलण्याला दुजोरा देत रजत म्हणाला," हो ना.. एक तर हसा तरी नाही तर बोला तरी ! त्यांना तरी कसं कळतं एकमेकींचं काय माहीत!"

स्नेहानी हसत हसत नेहेमीप्रमाणे त्याला टाळी देण्यासाठी हात उचलला आणि ती एकदम मधेच थबकली. ते बघून रजत म्हणाला," स्नेहा, मी आल्यापासून बघतोय - तू खूप स्ट्रेस मधे वाटतीयेस. आणि त्याचं कारणही माहितीये मला. आणि म्हणूनच आई बरोबर मी पण आलोय आज...आपण दोघांनी एकमेकांशी अगदी सविस्तर बोलणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनी. जस्ट रिलॅक्स स्नेहा.... तुला जर असं सगळ्यांसमोर अवघडल्यासारखं होणार असेल तर आपण तुझ्या खोलीत किंवा वर गच्चीत जाऊ या का ? किंवा मी नंतर कधीतरी येऊ का - जेव्हा तू मनानी तयार असशील तेव्हा ?"

खरं सांगायचं तर ही 'नंतर' भेटण्याची पळवाट स्नेहाला खूपच आवडली. क्षणभर वाटलं की 'चालेल' म्हणावं रजतच्या या प्रस्तावाला... का कोणास ठाऊक, पण स्नेहाच्या मनात एक वेडी आशा होती ; तिला वाटत होतं की - 'आता आपल्यापासून लांब गेल्यावर सलील ला आपलं महत्व कळेल, त्याला त्याची चूक उमजेल आणि तो त्याच्या निर्णयावर परत एकदा विचार करेल.'

पण तोपर्यंत इथे रजतला असं आपल्यात अडकवून ठेवणंही पटत नव्हतं तिच्या मनाला. रजत तिचा बालमित्र होता. तिची आई आणि वंदना मावशी दोघी सतत बरोबर असायच्या त्यामुळे साहजिकच रजत आणि स्नेहा देखील अगदी लहान होते तेव्हापासून एकमेकांना ओळखत होते.... दोघं एकत्र खेळले होते , अधूनमधून छोटी मोठी भांडणंही झाली होती त्यांच्यात... मैत्रीतले रुसवे फुगवे, अबोला सगळं काही अनुभवलं होतं दोघांनी...पण बहुतेक वेळा रजतनी च पुढाकार घेऊन सगळं काही ठीक केलं होतं. स्नेहाचे tantrums नजरेआड करून नेहेमी त्यानीच पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला होता. त्याच्यासारख्या साफ मनाच्या मुलाला आपल्या स्वार्थी विचारांसाठी झुलवत ठेवणं स्नेहाला योग्य वाटत नव्हतं.

'शीः बाई ! हा रजत इतका चांगला का आहे ? या चांगुलपणामुळेच याच्याशी चुकीचं वागायचा विचार सुद्धा नाही करता येत.' स्नेहा मनातल्या मनात उगीचच धुसफूसत होती.

तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेनी बघत रजत म्हणाला," हॅलो मॅडम ! तुम्हाला विचारतोय मी ! नंतर भेटू या का आपण ?" एकदम भानावर येत स्नेहा म्हणाली," नको, नंतर नको..आत्ताच बोलू या आपण. वर गच्चीवर जाऊ या का ?तू हो पुढे, मी आईला सांगून येते." रजतला जिन्याच्या दिशेनी रवाना करून स्नेहा स्वैपाकघरात आईला सांगायला गेली. तिला आत येताना बघून वंदना मावशी म्हणाली," हे काय, झालं इतक्यात बोलून ?" त्यावर स्नेहाची आई म्हणाली," अगं, हो म्हणायला किती वेळ लागणार?" आणि दोघी पुन्हा हसत सुटल्या. "ए आई, अगं, काहीही काय बोलत असतेस तू ? आणि सारख्या काय गं हसत बसता दोघी?" स्नेहा वैतागून म्हणाली. तिचा एकंदर मूड बघून दोघी गप्प झाल्या. स्नेहा बाहेर जाता जाता म्हणाली," आम्ही दोघं गच्चीवर जातोय, एवढंच सांगायला आले होते मी."

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत डोळे मिचकावून तिची आई म्हणाली," चहा तिकडेच आणून देऊ का गं ? डिस्टर्ब तर नाही होणार ना ?" आणि पुन्हा त्या दोघींच्या हास्यानी घर भरून गेलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान