मन वढाय वढाय (भाग ६)

Submitted by nimita on 16 January, 2020 - 21:50

सलील IIT मधे गेल्यापासून स्नेहाची आणि त्याची पत्रापत्री अगदी नियमितपणे चालू होती. अधून मधून दोघं फोनवरही बोलायचे. पण त्यांच्या दोघांच्यात निर्माण झालेलं हे नवथर प्रेमाचं नातं त्यांनी अजूनही इतरांपासून लपवून ठेवलं होतं. बघता बघता सलीलचा कोर्स संपत आला. कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील मिळाली. आता त्यांचं दोघांचं हे नातं घरच्यांसमोर आणायची वेळ आली होती. सलीलनी त्याच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे तो लवकरच त्याच्या बाबांशी या विषयावर बोलणार होता. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आल्यावर मग स्नेहादेखील तिच्या घरच्यांना सांगणार होती. एकदा घरच्यांचं शिक्कामोर्तब झालं की बस्! आणि दोघांनाही त्याबद्दल अगदी खात्री होती. दोघांनीही आता त्यांच्या भविष्याची ,सहजीवनाची स्वप्नं रंगवायला सुरुवात केली होती.

आता स्नेहा सलीलच्या पुढच्या पत्राची वाट बघत होती..आणि लवकरच त्याचं पत्र आलं...तिनी अगदी अधाशासारखं ते वाचायला सुरुवात केली. पण ती जशीजशी पत्र वाचत होती तसेतसे तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले... सुरूवातीच्या उत्सुकतेची आणि आनंदाची जागा आता काळजी आणि दुःखानी घेतले. तिच्या हातातलं ते पत्र तिच्याच अश्रूंनी कधी ओलं झालं हे तिलाही नाही समजलं. पण ती तरी काय करणार... पत्रातला मजकूर होताच तसा... सलीलच्या बाबांनी त्या दोघांच्या नात्याला सक्त विरोध केला होता. त्यांच्या दृष्टीनी स्नेहा आणि सलील यांची जोडी ही सर्वथा विजोड होती. हे वाचून स्नेहा सुन्न झाली ...पण पत्रातला पुढचा मजकूर वाचून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली....सलीलनी पुढे लिहिलं होतं,' माझे बाबा हे माझं सर्वस्व आहेत. त्यांचं सुख, त्यांचं समाधान हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.त्यांच्या इच्छेविरुद्ध जर मी तुझ्याशी लग्न केलं तर ते आयुष्यभर मला क्षमा करणार नाहीत. आणि या अपराधाचं ओझं घेऊन मी कधीच सुखानी जगू शकणार नाही. पण मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचारही करू शकत नाही त्यामुळे आता मी ठरवलंय की मी लग्नच नाही करणार. आणि माझा हा निर्णय कोणीही बदलू शकणार नाही...अगदी माझे बाबा सुद्धा ! तेव्हा प्लीज स्नेहा, मला विसरून जा. आपल्या दोघांच्यात जे काही होतं ते सगळं सगळं विसरून जा ....आता यापुढे आपले रस्ते वेगळे; आपली विश्वं वेगळी! खरं म्हणजे मी हे सगळं तुला प्रत्यक्ष भेटून सांगायला हवं होतं...पण आता तुझ्या डोळ्यांत बघायची माझी हिम्मत नाहीये गं! तुझ्या प्रश्नांसाठी माझ्याकडे कुठलीही उत्तरं नसल्यामुळे मी तुला फोनही नाही करू शकत.....आणि म्हणूनच मी असा पत्राचा आधार घेतो आहे. शक्य झाल्यास मला माफ कर.

अजूनही फक्त तुझाच- सलील'

स्नेहानी पुन्हा पुन्हा ते पत्र वाचलं, पण तिचा त्यातल्या एकाही शब्दावर विश्वास नव्हता.....एक वेडी आशा होती तिच्या मनात की सलील कदाचित गंमत करत असेल..उगीच तिला त्रास देण्यासाठी मुद्दाम असं काहीतरी लिहिलं असेल ! तिनी त्याला उलट टपाली पत्र पाठवलं. कितीतरी वेळा फोनही केला. पण सलीलनी कशालाच उत्तर नाही दिलं. स्नेहाची अवस्था वादळात भरकटलेल्या एखाद्या नावेसारखी झाली होती! आता घरी किंवा मित्र मैत्रिणींपैकी कोणालाच काही सांगून उपयोग नव्हता..कारण सलील स्वतःच त्यांच्या नात्याला पुढे न्यायला तयार नव्हता. पण स्नेहा तर त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हती ! तिनी विचार केला की स्वतः सलीलच्या बाबांना भेटून, त्यांच्याशी बोलून बघावं.त्यांनी कुठल्या कारणासाठी स्नेहाला नापसंत केलं हे तिला माहित करायचं होतं. कारण जेव्हापासून तिची आणि सलीलची ओळख झाली होती तेव्हापासून त्याचे वडील तिला ओळखत होते.बऱ्याच वेळा भेटीची झाल्या होत्या त्या दोघांच्या ... पण तेव्हा कधीही त्यांच्या वागण्यातुन तिला अजिबात असं काही जाणवलं नव्हतं. उलट प्रत्येक वेळी त्यांनी अगदी आपुलकीनी तिची चौकशी केली होती. मग आता अचानक असं काय झालं होतं?सलीलची मैत्रीण म्हणून जर ती त्यांना मान्य होती तर मग त्याची जीवनसाथी म्हणून का नाही? याबाबतीत सलीलशी बोलून काही फायदा नाही हे स्नेहाला आता लक्षात आलं होतं; कारण त्याच्या वडिलांच्या विरोधात तो काहीही ऐकून घेणार नाही हे तिला माहित होतं. त्यामुळे तिनी स्वतःच त्यांना भेटायचं ठरवलं..."जास्तीत जास्त काय होईल ? ते पुन्हा एकदा नकार देतील! पण 'आपण प्रयत्नच केला नाही' ही खंत नंतर आयुष्यभर मनात राहण्यापेक्षा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा"...स्नेहा स्वतःच स्वतःला धीर देत होती. "पण जर त्याच्या बाबांनी माझ्या घरच्यांना सांगितलं तर?इतकी वर्षं हे सगळं आईबाबांपासून लपवून ठेवलं हे कळल्यावर त्यांना नक्कीच खूप वाईट वाटेल.. पण त्याहीपेक्षा 'माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाकडून तरी कळलं ' याचा जास्त राग येईल दोघांना...." स्नेहाला काही कळेनासं झालं होतं.

ती या विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली असतानाच एक दिवस तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला..तिनी सांगितलं की 'सलीलला त्याच्या कंपनीतर्फे तीन वर्षांकरता जर्मनी मधे एका प्रोजेक्ट साठी जायची ऑफर आली आणि तो दोन दिवसांपूर्वीच जर्मनी ला गेला सुद्धा! सगळंच इतकं अचानक झालं की त्याला कोणालाच भेटायला आणि काही सांगायला वेळ नाही मिळाला.त्यानी मला फोन केला आणि ही बातमी आपल्या ग्रुप मधल्या सगळ्यांना कळवायला सांगितली.'

ही बातमी ऐकून तर स्नेहा पूर्णपणे कोलमडून गेली. ज्या सलीलसाठी ती त्याच्या आणि गरज पडल्यास स्वतःच्याही आईवडिलांचा सामना करायला तयार होती, त्याच सलीलनी इतका मोठा निर्णय घेताना तिला पुसटशी कल्पना ही नव्हती दिली. तिला काहीही न सांगता तो तिच्या आयुष्यातून निघून गेला होता...त्याच्या दृष्टीनी कायमचा !! त्याच्या या अशा वागण्याचा स्नेहाला खूप त्रास झाला होता....खूप दुःख झालं होतं तिला - विश्वासघात झाल्याचं... किती उद्वेग होत होता तिच्या मनाचा; कारण सलीलनी न लढताच हार पत्करली होती. तशातही अचानक तिला एक गोष्ट लक्षात आली..खरं म्हणजे तिला सलीलचा राग यायला पाहिजे होता... पण अशा परिस्थितीत सुद्धा ती ठरवूनही त्याच्यावर रागावू शकत नव्हती. त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं तिनी ! आणि त्या प्रेमापोटीच ती सलीलवर न चिडण्याची, त्याच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करण्याची कारणं शोधत होती.

'माझ्या इतकाच त्यालाही त्रास होत असणार- नक्कीच !पण त्याच्या बाबांच्या इच्छेपुढे तो तरी काय करणार ? तरी त्यानी सांगितलंय ना की आता तो कोणाशीच लग्न नाही करणार...यावरूनच कळतंय की त्याचं माझ्यावर खरं प्रेम आहे....माझ्यावर आणि फक्त माझ्यावरच !' तिचं वेडं मन स्वतःची समजूत घालत म्हणालं..

तेवढ्यात तिच्या व्यवहारी मनानी फटकारत प्रश्न केला,' पण अशा पुस्तकी प्रेमाचा काय उपयोग? जेव्हा तुला त्याच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तो तुला असं एकटीला सोडून निघून गेला.... मागे वळूनही न बघता.... प्रेम असं असतं ? इतकं स्वार्थी?'

स्नेहाला काहीच उमजत नव्हतं. ती बिचारी एकटीच हळूहळू, तिला जमेल तसा हा भावनांचा, विचारांचा गुंता सोडवायचा प्रयत्न करत होती..

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan..

छान