उठ राजा !

Submitted by Asu on 16 January, 2020 - 00:22

राजकीय पक्षांचे निवडणुकीचे जाहीरनामे अंमलात येतात का? का नुसताच गाजावाजा होतो?-
उठ राजा !

तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा
प्रश्न तुझे मातीतले
सिमेंटात ना रुजणार
कधी न धरला हाती नांगर
त्यांना काय कळणार ?
वाजवतील स्वतःचा बेण्ड बाजा!
तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा
लाकूड फाटा जसा चुल्ह्याशी
तसे तुला जाळणार
पोळी त्यांची भाजून होता
प्रश्न तुझे विरणार
फुकट होईल तुजला सजा!
तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा
राजकारणी, समाजकारणी
पोटासाठी फक्त लढणार
तव पोटाची चिंता तुजला
घास कुणी ना भरवणार
तुपात ते, उपवास तुझा!
तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा
घे स्फूर्ती तू शिवरायाची
शून्यातून स्वराज्य उभारणार
मुडद्यांमध्ये प्राण ओतुनि
क्रांतीचा गर्जा जयजयकार
जागृत होऊन लढण्यास सजा!
तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा
अन्नदाता तू जगताचा
भीक का मागणार!
उठ राजा ओळख तुजला
तूच तुला तारणार
बघतील ते दुरून मजा!
तुला सांगतो शेतकरी राजा,
नको भुलूस या गाजावाजा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults