सर्दी

Submitted by Asu on 14 January, 2020 - 04:45

सर्दी

नाक गळते डोळे गळती
गळतो देह उभा सारा
होता सर्दीचा सतत मारा
उत्साहा ना उरतो थारा

अंग आंबते नाक चोंदते
तापमापकाचा चढतो पारा
डोक्यामधल्या ऐरणीवर
सतत होई घणांचा मारा

गरम पाणी गुळण्या करा
दररोज घ्यावा वाफारा
हजार उपाय केले जरी
तरी पडेना काही उतारा

सर्दी पाठी खोकला येतो
खोकतखोकत काठी टेकत
सर्दी रंगते मन भंगते
जगणे होते रडत खडत

औषधाविना सर्दी छळते
सात दिवसांच्या काळात
औषध घेऊन सर्दी पळते
फक्त एका आठवड्यात

सर्दी जाते कवित्व उरते
खवखव खोकला घशात
ख्यांग ख्यांग कविता होते
उतरते कफाच्या रूपात

खोकला गेला जिवाणू मेला
रात्र झाली अच्छी अच्छी
तोच शेजारून कविता कानी
आऽच्छी आऽच्छी आऽच्छी!

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults