अस्तित्व !!! (भाग ३ ) 

Submitted by Sujata Siddha on 11 January, 2020 - 02:01

अस्तित्व !!! (भाग ३ ) 

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाताना तिने ठरवलं कि आता ‘ निळ्या’ दिसला तर त्याच्याकडे बिलकुल बघायचं नाही , तसही तो research करत असेल तर त्याचं आपल्या कॉलेजच्या बाजूला काय काम ? तो इकडे मुळात येतो कशाला आणि इथून पुढे तो चुकून समोर आलाच तर आपलं मन कोरं करकरीत ठेवायचं , निदान त्याच्याबद्दलचे विचार मनात आणायचे नाहीत , मग त्याला ते वाचता येत असो वा नसो . तितक्यात समोरून तो येताना दिसलाच , तीला वाट बदलावी असं वाटून गेलं पण तिने तसं केलं नाही , ती पुढे बघून चालत राहिली ,
“हाय !.How’s you? .” तो अतिशय उत्साहाने तिच्या पुढे येऊन तिच्या बरोबरीने चालायला लागला , स्वर नेहेमीसारखाच आनंदी .
“Awesome ” तीही काही कमी नव्हती .
“Great !..was expecting this answer ..तुला माहितीये ? पांढऱ्या शुभ्र लिलीच्या भरघोस ताटव्या मध्ये मधोमधच एखादं लाल भडक टप्पोरं गुलाबाचं फुल वाऱ्याबरोबर मनसोक्त डोलत असेल तर जितकं attractive वाटेल ना , तितकी किंवा त्यापेक्षाही जास्त भारी वाटतेस तू , सगळ्यांपेक्षा वेगळी , तुझं सौंदर्य पार इथे अटॅक करतं ” ,हाताची मूठ छातीजवळ नेऊन तो म्हणाला ,आणि मग लगेच ”अर्रर्रर्र पण तू लाल कशी असशील तुझं नाव तर शुभ्रता आहे ना ? “असं म्हणून तो एकटाच जोरात हसला , पण ती हसली नाही, चालत राहिली , अगदी क्लास रूम येईपर्यँत, तोही मग गप्प बसला , तिच्याबरोबर चालत राहिला . क्लासरूम पर्यँत आल्यावर ती मनातच म्हणाली , “आता आत पण येणारेस का ? “
“ Nope ,आत नाही “ तो खांदे उडवत म्हणाला , ती गपचूप आत निघून गेली . पण हळू हळू तिच्या लक्षात आलं , त्याचा सायकॉलॉजिकल सेन्स चांगला आहे , त्यामुळे याला लोकांच्या मनात काय चाललं असावं याचा साधरण अंदाज येतो , आणि तो ते आत्मविश्वासाने व्यक्त करतो , त्याच्या भाषेत तो खरच खडे टाकतो पण खूप कॉन्फिडन्टली टाकतो म्हणून ते खरं वाटतं , त्याच्या याच अविर्भावाला मुली फसतात आणि याच्या प्रेमात पडतात कदाचित , काहीही असो त्याच्या नादाला लागायचं नाही , तिने स्वतःपुरतं ठरवून टाकलं .
अशाच एका संध्याकाळी ती आणि मधुरा आश्रमाच्या शेतातल्या नेहेमीच्या जागेवर गप्पा मारत असताना तो आला ,
एक इन्व्हीटेशन घेऊन , बांधकामाच्या ठिकाणी जे मोलमजुरी करतात त्यांची मुलं शाळेत न जाता इकडे तिकडे उन्हातान्हात फिरत बसतात , अशा मुलांसाठी त्याने एक छोटंसं ‘डे care ‘ सेंटर अर्थात मोफतच सुरू केलं होतं , त्यात मुलांना सांभाळण्याबरोबरच ,शिकवायची व्यवस्था पण केली होती , त्याचं उदघाटन होत , त्यासाठी त्यां दोघीना बोलवायला तो आला होता . त्या दोघीना त्याने त्यात काही कामंही वाटून दिली होती . सकाळी सेंटर मध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वच्छ अंघोळ करायला शिकवायची , खूप लहान मूल असेल तर स्वतः:च घालायची , हे पाहिलं सुरुवातीचं काम तो करणार होता . त्या मुलांसाठी सकाळचा नाश्ता बनवायचं काम त्याच्या एका मित्राच्या आईने घेतलं होतं , तर त्यानां शिकवायचं , गोष्टी सांगायचं दुपारी जेवायला घालून झोपवायचं इ . कामं त्याने शुभ्रता वर सोपवलली होती , मधुराला आणि त्याच्या एक -दोन मित्राना त्याने मुलानां वेगवेगळे खेळ शिकवणे, क्राफ्ट्स करून घेणे , आणि इतर काही अवांतर काम दिली होती . करशील का वगैरे भानगड नाही , हे तू करायचंस बस हे एवढंच आणि असंच सांगून तो मोकळा झाला . तिने त्याला हे विचारलं देखील कि तू असं डायरेक्ट एखाद्याची permission न घेता कसं करू शकतोस ?, एवढा कसा कॉन्फिडन्ट आहेस स्वतः:बद्दल ? त्यावर तो तिला म्हणाला , कि माझा विश्वास स्वतः:वर नाही , समोरच्या माणसावर जास्त आहे , त्याच्यातल्या divinity वर आहे, ‘शुभ्रा प्रत्येक माणसात देव असतो आणि आपण आव्हान केलं कि तो आपल्यासमोर येतो , तूच म्हणाली होतीस ना एकदा कि परमेश्वर हि अनुभवायची चीज आहे , मग मी तो अनुभव नेहेमी घेत असतो. यावर ती काही बोलली नाही , पण तो करतो त्या प्रत्येक गोष्टीचं तिला कौतुक मात्र वाटायचं , मग ते मोफत योगासन वर्ग घेणं असू देत , वृद्धाश्रमाला मदत असू देत , पथनाट्य असू देत , किंवा मग शरदाच्या चांदण्यात बसून केलेलं कॅम्फ फायर आणि त्याने मदहोश होऊन म्हटलेली गाणी असू देत , हे सगळं तो करतो यापेक्षा तो ज्या पद्धतीने हे करतो ते तिला जास्त अपील व्हायचं ,खूप ग्रेसफुली करतो तो ते, असं तिला वाटायचं , ह्याला उद्या कुणी शिव्या जरी दिल्या तरी तो इतकं हसून, मान झुकवून आदबीने घेईल की देणारा पण संभ्रमात पडावा .आपण नक्की शिव्याच दिल्या ना ?
“ रिसर्च कशावर करतोयस तू ? तिने एकदा विचारलं , “परमेश्वराच्या अस्तित्वावर , “तो उत्तरला .
“काहीपण …” तिने मान झटकली . “हा काय रिसर्च चा विषय असू शकतो ? “
“का नसू शकतो ?इनफॅक्ट हाच सर्वात योग्य विषय आहे , तुला नाही असं वाटत ,? आपल्या अस्तित्वाचं जे मूळ आहे त्याच्यावर संशोधन करणं महत्वाचं आहे ?”
“तसं नव्हतं मला म्हणायचं , तू संशोधन कशासाठी करतोयस ? आहे हे सिद्ध करायला ? “
“मुळीच नाही , आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे हे मला मान्य आहे , रिकाम्या टेबलवर जर एखादा छोटासा ग्लास जरी आपल्याला दिसला तरी तो तिथे आला कसा ? कुणी ठेवला ? वैगेरे प्रश्न आपल्याला पडतात ना ? आपोआप आला असं तर नाही वाटत कधी , मग इथे तर ब्रह्मांड आहे , तेही सूसूत्र पद्धतीने घडविलेल मग या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा कुणीतरी असणारच , तो कुठे आणि कसा शोधायचा यावर संशोधन करतोय मी .त्याच्या अस्तित्वाच्या खुणा कशा शोधायच्या हा प्रयत्न करतोय मी “
ती हसली , खूप ., तो तिच्याकडे बघत राहिला , “का हसलीस ? “
“मुलीं पटवण्यातून वेळ मिळाला तर संशोधन करशील ना ? हा तीन किंवा पाच वर्षात संपणारा विषय नाहीये “ ती म्हणाली .
“I know !..म्हणून हसलीस ? “
“ नाही , ज्यांना तो गवसला होता , त्यांनी कुठे phd केली होती ? परमेश्वर शोधण्यासाठी अभ्यास आणि संशोधनाची गरज नाहीये , गरज आहे ती जीव तोडून प्रेम करण्याची आणि विश्वासाची , भगवंताच्या जवळ कोणीही जाऊ शकतं , जो त्याला भक्तीने प्रसन्न करतो त्याच्याजवळ तो नक्की असतो आणि भक्तीला साधनेचं बळ मिळालं कि तो फक्त जवळ रहात नाही तर अनुभवताही येतो असं माझे आजोबा म्हणायचे ,मुळात परमेश्वर हि काही वस्तू नाही, शोधली कि सापडायला” ती कपडे झटकत उठली . त्याने खांदे उडवले , ती उठली तरी तो बसूनच राहिला वर तिच्याकडे बघत . ती उभ्यानेच म्हणाली , ‘उठायचं का कि बसणार आहेस असाच ? “ यावर बसल्या बसल्या त्याने आधारासाठी हात वर केला , तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि सरळ खाली उतरायला लागली .
“कधी कधी ना तू फार शिष्टपणे वागतेस “ तो उठून तिच्याबरोबर खाली उतरत म्हणाला .” आणि अजिबात म्हणजे आजिबात रोमँटिक नाहीस .”
“पण माझा रोमँटिक स्वभाव तुला कशाला दाखवीन मी ? “
“मग कुणाला दाखवणार आहेस ?मी आवडत नाही का तुला ? “ तिच्याबरोबर चालता चालता एकदम समोर येऊन तिची वाट अडवत त्याने गंभीर होऊन विचारलं “ शुभ्रता एक वर्ष झालं आपण भेटतोय , अजूनही तुला काही वाटत नाही माझ्याबद्दल?
सांग ना ?अजूनही तू मला flirt समजतेस ? “
“ मी तुला एक चांगला जवळचा मित्र समजते , आता विचारू नकोस किती जवळचा .”
“ किती जवळचा ? “
“टेकडीवर शेजारी शेजारी बसून गप्पा मारण्याइतका जवळचा “ ती म्हणाली आणि निघून गेली , आत्ता पर्यत त्याला कुठलीही स्त्री वश झाली नाही असं झालं नव्हतं, कुणालाही सहजपणे स्वतःकडे आकर्षित करायच स्किल त्याने आत्मसात केलं होतं पण त्याला वाटलं होतं त्यापेक्षा तिच्या मनाची कवाडं उघडणं कितीतरी अवघड होत . खरं तर त्याला ती मनापासून आवडायची , तो तिला नुसतंच पटवत नव्हता , त्याला खरोखच ती हवी होती, life पार्टनर म्हणून, कारण त्याला ठाऊक होतं , आपल्या आयुष्य जगण्याच्या ज्या बहुविध तऱ्हा आहेत , त्याला साथ देऊन पुढे नेण्याचं काम फक्त तीच करू शकेल , चाकोरी बद्ध आयुष्य जगण्यात समाधान मानणारी तीही नाही हे तो जाणून होता , पण तिच्या मनात त्याच्याबद्दलचे काही पक्के समज होते , ते निघाल्याशिवाय ती आपल्याला लाभणार नाही , हेही त्याला माहिती होतं आणि तोपर्यँत वाट पाहायची त्याची तयारी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ्रताचं कणखर वागणे आवडले. अश्या भुलथापांना आणि आकर्षणाला फसण्याची चूक नायिका करत नाहीये हा एक चांगला पायंडा कथेच्या माध्यमातून पडत असेल तर अनेक सुंदर कळ्या उमलायच्या आधीच कुसकरून जाणे थांबू शकेल.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत .