मन वढाय वढाय (भाग ४)

Submitted by nimita on 10 January, 2020 - 21:08

सलील जेव्हा त्याच्या रिझल्टचे पेढे घेऊन स्नेहाच्या घरी आला होता तेव्हा स्नेहाची अवस्था खूपच विचित्र झाली होती. एकीकडे त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचं अगदी मनापासून अभिनंदन करावंसं वाटत होतं, पण मनात एक अनामिक हुरहूर होती....सलीलबद्दल वाटत असणाऱ्या प्रेमाची नुकतीच अनुभूती झाली होती स्नेहाला...आणि म्हणूनच त्याला सामोरं जायला मन धजत नव्हतं ! तिला भीती होती की तिच्या डोळ्यांतले भाव सलील अगदी लीलया वाचू शकेल, पण जर त्याच्या मनात आपल्यासाठी फक्त मैत्रीचीच भावना असली तर ? उगीच त्याचा गैरसमज नको व्हायला ! तिला कुठल्याही परिस्थितीत सलील तिच्या आयुष्यातून दूर जायला नको होता.

मनाच्या या अशा द्विधा अवस्थेत असतानाच बाहेरच्या खोलीतून सलीलचं तिच्या आजीशी बोलणं तिच्या कानावर पडलं. सलील विचारत होता,"आजी, स्नेहा कुठे आहे?" पण आजी काही बोलायच्या आधीच तो 'स्नेहा, कुठे आहेस तू ?' म्हणत तिच्या खोलीत आला.

स्नेहाच्या समोर पेढ्यांचा बॉक्स धरत तो म्हणाला,"फक्त तुझ्यासाठी...Only for you ! माझ्या या यशाचं सगळं क्रेडिट तुला आहे!!" सलीलला इतकं खुश बघून स्नेहाला खूप समाधान वाटत होतं, पण त्याच्या यशाचं क्रेडिट तिला ? थोडं गोंधळून जात तिनी विचारलं," अरे, मी कुठे काय केलं . सगळी मेहनत तर तुझी आहे, त्यामुळे क्रेडिट पण तुलाच .." तिला मधेच थांबवत सलील म्हणाला," तू म्हणाली होतीस ना की तुझा माझ्यावर, माझ्या मेहेनतीवर विश्वास आहे !! त्यामुळे मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तुझा हा विश्वास खोटा ठरू द्यायचा नाही...थँक्स स्नेहा...Thank you for believing in me," स्वतःच्याच विचारात हरवून सलील बोलत होता,"तुला माहितीये स्नेहा; मी मगाशी जेव्हा बाबांच्या ऑफिसमधे त्यांना माझ्या रिझल्ट बद्दल सांगायला गेलो होतो ना तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता..त्यांच्या केबिनमधून बाहेर येऊन सगळ्या स्टाफला सांगितलं त्यांनी...'हा माझा मुलगा आहे !' - आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत मला माझ्याबद्दलचा अभिमान अगदी स्पष्ट दिसत होता गं... " आपल्या तंद्रीतून बाहेर निघत तो स्नेहाला म्हणाला," आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. म्हणून याचं क्रेडिट तुलाच..." बोलता बोलता सलीलनी त्याच्याही नकळत स्नेहाला आपल्या बाहुपाशात घेतलं. स्नेहादेखील त्याच्या छातीवर डोकं टेकून क्षणभर विसावली. तेवढ्यात बाहेरच्या खोलीतून तिच्या आजीची हाक ऐकू आली आणि स्नेहा सलीलपासून दूर होत घाईघाईनी खोलीच्या बाहेर पडली. तिच्या मागोमाग भांबावलेल्या चेहेऱ्याचा सलीलदेखील आला. आपण स्वतः आजी जवळ गेलो तर आपल्या हृदयाचे वाढलेले ठोके तिला ऐकू जातील की काय या भीतीपोटी खोलीच्या दारापाशी उभी राहात ती उगीचच हसत सलीलला म्हणाली," अरे, आजीला पण दे ना पेढे." तिच्या नजरेचा इशारा सलीलनी ओळखला आणि तो आजीला पेढे देऊन नमस्कार करायला खाली वाकला, पण पूर्ण वेळ त्याची नजर मात्र स्नेहावरच खिळून होती....तिच्या घामेजलेल्या चेहेऱ्यात, चोरट्या नजरेत काहीतरी शोधत होता तो...काही क्षणांपूर्वी त्याच्या हातून घडलेल्या कृतीचा अर्थ, त्यामागचं नक्की कारण शोधायचा प्रयत्न करत होता....

त्याच्या मनाची अवस्था पण काही वेगळी नव्हती.तोही स्नेहा इतकाच गोंधळून गेला होता. गेली दोन वर्षं ते दोघं एकमेकांना ओळखत होते. आजपर्यंत कितीतरी वेळा त्यांनी एकमेकांना स्पर्श केला होता...कधी एखाद्या जोकवर टाळी देताना तर कधी लुटुपुटीच्या भांडणात एकमेकांच्या पाठीवर धपाटे घालताना ! हेरिटेज वॉक्स च्या वेळी तर अनेकदा डोंगर चढता उतरताना सलीलनी स्नेहाला आधार दिला होता... पण त्या जाणीवपूर्वक केलेल्या स्पर्शामधे आणि आत्ताच्या या नकळत घडलेल्या स्पर्शामधे नक्कीच काहीतरी फरक होता. या स्पर्शात जाणवलेली अधीरता पूर्वी कधीच जाणवली नव्हती. आजचं त्याचं ते स्नेहाला जवळ घेणं आणि तिचंही त्याच्या मिठीत विरघळून जाणं.... ती अनुभूती सलीलसाठी सुद्धा अगदी नवखी होती...पण जितकी नवखी तितकीच हवीहवीशी देखील!

त्याच्या मनातल्या या विचारांचे पडसाद तो स्नेहाच्या डोळ्यांत शोधत होता. पण त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत स्नेहाकडे नव्हती...का ती मुद्दाम त्याची नजर चुकवत होती? तिला स्वतःलाच अजून तिच्या मनातल्या या नव्या भाव भावनांची पुरती ओळख झाली नव्हती...तिच्याच मनात अजून काही प्रश्न अनुत्तरित होते...अशा वेळी सलीलच्या शोधक नजरेचा सामना करणं केवळ अशक्य होतं स्नेहासाठी.

आजीशी थोडा वेळ गप्पा मारून झाल्या आणि सलील घरी जायला निघाला. जाताजाता स्नेहाच्या जवळ येत तो म्हणाला ,"उद्या संध्याकाळी माझ्या बाबांनी घरी सेलिब्रेशन पार्टी ठेवली आहे. आपल्या अख्ख्या ग्रुपला बोलावणार आहे मी. तुला पण यायचं आहे...नक्की !" पेढ्यांचा बॉक्स तिच्या हातात देण्याच्या निमित्तानी तिच्या आणखी जवळ येत तो हळूच म्हणाला," तुझा तो निळ्या रंगाचा evening gown आहे ना, तो घालून ये...Blue colour suits you."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users