एकटीच @ North-East India दिवस - ८

Submitted by सुप्रिया राज जोशी on 10 January, 2020 - 05:49

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

13 फेब्रुवारी 2017

ए कोको,

तुझी बायको किती मठ्ठ आहे रे! मी सिक्कीम न पाहताच तुमच्या ट्रिप साठी केवढी सारी माहिती काढून दिली होती. त्यावर तुमची सिक्कीमची अक्खी ट्रिप झाली. आता मला इथची थोडीशी माहिती हवी म्हणून तिला फोन केला तर अर्धे तिला माहीत नाहीये आणि उरलेलं अर्धे तिला आठवत नाहीये. पण एका अर्थी बरंच झालं की मी कुठून माहिती उचलली नाही. इंटरनेट आणि इतर प्रवाशांकडून जे काही मिळाले असते त्यानुसार दोन दिवसात गंगटोक आटपले असते. इथला आज माझा सहावा दिवस! तरी अजून गँगटोकची हौस भागली नाही. पण आता ज्या दिशेने प्रवासाची सुरवात झाली ती दिशा बदलायची वेळ आली तसे नॉर्थ ईस्ट मधील्या सिक्कीम च्या बहिणींना भेट द्यायची असे ठरवले. एखाद्या नवीन ठिकाणाचा पल्स समजून घ्यायचा तर त्याची नस शोधेपर्यंत भटकावं लागत. आणि त्या त्या ठिकाणाचा पल्सच खर तर आपल्याला सगळ्यात जास्त भावतो, आठवणीत रहातो, बाकी प्रेक्षणीय स्थळ वगैरे निमित्त असत. उद्या पुढच्या प्रवासाला निघायच्या आधी गंगटोक मधील चढउतारांच्या वळणावळणाच्या रस्यावरून खुशाल फक्त भटकंतीच करायची, असे ठरवले.
dog_0.jpg

MG Marg पासून 8 किलोमीटर वर ताशी व्ह्यू पॉइंट आहे. तिथून पुढे चालायला सुरुवात केली तर 5 किलोमीटर वर गणेशटोक (6500 ft) लागते तिथून पुढे गोलगोल वळणे घेत 3 किलोमीटरचा रस्ता चालले की हनुमान टोक (7200 ft) ला पोहोचता येते. याच रस्त्यावर एक वॉटरफॉलही आहे. ही भटकंती आजच्या तारखेसाठी ठेवली होती.
52258604_10156865124902778_6999441896586084352_n.jpg

हॉस्टेल मधलं पाणी गरम करायचं मशीन चालेना म्हणून ओनर त्याच्या किचन मधून प्यायला गरम पाणी आणून देतच होता की एकेक हॉस्टेल मेट्सही उठले. इस्रायल चा अवि (त्याचं नाव अवनेर पण मला अवि म्हणा असे त्याने संगीतल म्हणून सारे त्याला तशीच हाक मारतात) होस्टेल मध्ये खूप दिवस रहात आहे. पण कालच रात्री दोन नवीन पाहुणे आले आहेत. बंगलोरवरून पूजा आणि नेदरलँड चा वॊलेस! यांना काल रात्री मी हायहेलो सुद्धा केले नाही. तसे आशा हॉस्टेल मध्ये कोणी असेच वागावे याबद्दल काही नियम नसतात. नाही म्हणायला हॉस्टेल ने प्रिंट करून भिंतीवर लटकवलेले फुटकळ do's & don'ts असतात. पण बाकी एकूण वातावरण मात्र मोकळे तरीही एकोप्याचे असते.

51974134_10156865124822778_7163492677877497856_n.jpg
पूजा ला जसे माझ्या आजच्या भटकंती बद्दल कळले तसे ती एका पायावर यायला तयार झाली. वोलेस सुद्धा येतो म्हणाला. आधी चौघांनी बाहेर पडून MG Marg वर मस्त आलू पराठ्याचा (जरी आलू पराठा कसा खायचा? असा बेसिक प्रश्न वोलेस ला पडला होता ) ब्रेकफास्ट केला. मग निघालो. आज कांचनगंगेचा सुंदर नजारा बघायला मिळाला. वाटेतल्या एका धबधब्यावर आम्ही थोडा वेळ रमलो. गप्पा गोष्टींच्या नादात रमत गमत अख्खा फेरफटका पूर्ण केला. परतीचा प्रवास करताना आम्ही दमून गेलो होतो पण एका टेम्पोवाल्याने आम्हाला तिघांना लिफ्ट दिली, नवीन मित्र मैत्रीनिबरोबर मस्ती करायला खूप मज्जा आली. गंगटोकला परत यायला दुपार झाली होती.

मुंबईवरून रोडट्रीप साठी निघालेल्या मयूर ने मला तिस्ता पासून गंगटोक पर्यंत लिफ्ट दिली होती. मला त्याचा मेसेज आला की त्याला हाय फिव्हर चढला आणि ताबडतोब इथच्या लोकल हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी जावे लागले. मी सोडून या शहरात त्याच्या ओळखीचे कोणीच नाही. एका दिवसाची आमची मैत्री किंवा ओळख म्हणूया पण त्याच नात्याने त्याला काही मदत हवी का हे पहायला त्याच्या हॉटेलवर गेले. त्याची माझी भेट झालीच नाही पण एक निरोप कळला की उद्याच्या दिवशी गंगटोकवरून निघून त्याच्या कोणा cousin कडे विश्रांतीला जायचे असे त्याने जायचे ठरवले आहे. मग उद्या त्यांच्याबरोबरच निघावे असे ठरवून टाकले.

इथचा सर्वात जास्त वर्दळ असलेला MG Marg कोणालाही प्रेमात पाडेल. तिथल्याच दुकानात तासभर फिरत राहिले, तेवढ्यात तीन तीन आईस्क्रीम्सस खाल्ली. थंडीत आईस्क्रीम खायचे म्हणजे डबल मज्जा! पोट भरले होते तरी उद्या हे सारे सोडून जायचे म्हणून वर इकडचा माझा फेवरेट चिकनरोलही खाउन घेतला. आता हॉस्टेल वर जाऊन अराम फक्त करायचा. निघायच्या आदली रात्र स्पेशल का असते? रात्री उशिरपर्यंत सारी कामे बाजुला टाकून सारेजण बसतात, गप्पा रंगतात, हसण्याखिदळण्याला उत येतो, फोननंबर्सची देवाणघेवाण होते, पुन्हा भेटण्याचे वायदे होतात... दोन दिवसांची सोबत तरल मैत्री मध्ये बदलते.
52344271_10156865136992778_6830649054788059136_n.jpg

झोपायच्या आधी पूजा ने माझ्यादठी लिहिलेले पत्र माझ्या हातात ठेवले. रात्री 12 नंतर पॅकिंग आटपले. त्यानंतर पत्र वाचल, उत्तर काय लिहावे ते मात्र सुचेना. उद्या 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे! या वर्षी हा स्पेशल दिवस प्रवासातच जाणार हे कळले. गंगटोक वरून निघायचे ते आधी सिलिगुडी आणि तिथून पुढे गोहाटी असा लांब पल्ला गाठायचा! पूजा सुद्धा आमच्या बरोबर येते म्हणाली, पहाटेच आंम्ही निघालो, मयूर ने मला आणि पूजाला त्याची आणि आमची वाट जिथे वेगळी होत होती त्या जंक्शन ला सोडले. तिथचे नाव मोंपोंग असे होते.

इकडे तिकडे चौकशी केली पण ह्या ठिकाणी आम्हाला शेअर सीट वगरे मिळायची मुळीच शक्यता दिसेना. थोडा वेळात खूप प्रयत्न करून जसा संपला तसे दुसरे ऑप्शन मार्क केले ... .बोले तो hitchhiking झिंदाबाद! एक सोडून दोघी जणी होतो, काय बिशाद की कोणी लिफ्ट साठी नाही म्हणेल? अगदी पहिलीच गाडी थांबली. आम्हाला मज्जा वाटली, आम्ही आपापल्या बॅगसकट गाडीत घुसलो नि सिलिगुडी पर्यंत बिनपैशाचा सुखरूप प्रवास झाला.
52432293_10156865137302778_8575199443970686976_n.jpg
पूजाला आज कलकत्त्याला जायचे, मग आम्ही NJP स्टेशन ला गेलो. तिकीट विकत घेतले. तिची गाडी रात्री आठ ची, माझी लगेच दुपारी दोन ला होती. मला समान चढवायला, शेवटचे गुडबाय करायला ती ही प्लॅटफॉर्म वर आली. ब्रम्हपुत्रा एक्स्प्रेस मध्ये बसून एकदाची मी गोहाटी ला निघाले. म्हणजे आता सिक्कीमला गुडबाय केले असे म्हणायला हरकत नाही.

तुझी साली आधी घरवाली
मीच ती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास.

कोणतेही शहर सोडण्याच्या आदली रात्र स्पेशल असते याबद्दल तीव्र सहमती !

आता गुवाहाटीच्या प्रतीक्षेत.

अशा प्रवासांत सहप्रवाशांशी चटकन नातं (?) जुळणं हा एक महत्त्वाचा भाग दिसतोय .

हेही मला जमणे आणि रुचणे शक्य नाही , हे जाणवले.

भरत +११, हे अस चटकन मैत्री करण मला जमण्यासारख नाही.. पण असा प्रवास करायचा असेल तर "मैत्रीचे बंध" चटकन जुळुन येण मस्ट आहे. हे मला जमवायला हव.. अस वाटल..

चटकन मैत्री करण मला जमण्यासारख नाही पण असा प्रवास करायचा असेल तर "मैत्रीचे बंध" चटकन जुळुन येण मस्ट आहे.>>>>>> यामुळेच मला,लेखिकेचा हेवा वाटला.

माझा उलटा आहे अनुभव. विमानात सहप्रवाशाशी ओळख होते आपण खूप बोलतो. नंतर उतरल्यावर एक व्हेग गिल्ट वाटत रहाते - इतकं कशाला बोललो. वहात जाण्याची काहीही गरज नव्हती. याचा अर्थ असा नाही की खूप इन्टिमेट गप्पा होतात. पण तरीही गिल्टी वाटतं मला. Everything in context. मे बी मला सुपरफिशिअल नाती अजिब्बात अजिब्बात आवडत नाही, प्रत्येक नात्याला, खोली व उंची हवीच,जिव्हाळा हवीच असा आग्रह असतो.
____________
बाकी लेखनाबद्दल ठिकठाक. वाचते आहे.

मला सुपरफिशिअल नाती अजिब्बात अजिब्बात आवडत नाही, प्रत्येक नात्याला, खोली व उंची हवीच,जिव्हाळा हवीच असा आग्रह असतो. --- अनुमोदन. मला अजिबात साळकाया-माळकाया मैत्रिणी करता येत नाहीत.

हर्पेन ... कस कळलं की ती माझी मोठी बहिण आहे?कमाल आहे.
कान पकडले Proud
भरत अगदी बरोबर आहे ... अनोळखी लोकांशी किमान जे लोकल्स आहेत त्यांच्याशी संवाद साधता येणे अशा प्रवासात गरजेचे आहे, असे मलाही वाटते. लोकल माहिती मिळवायचा तो सर्वात मोठा मार्ग आहे तसेच ज्यांना एकलेपणा जाणवू शकेल त्यांच्यासाठी तो तात्पुरता रामबाण उपाय आहे. ज्यांना ते कठीण कंटाळवाणे वाटते त्यांच्यासाठी असा प्रवासही कठीण किंवा कंटाळवाणा होऊ शकतो.

भरत +११, हे अस चटकन मैत्री करण मला जमण्यासारख नाही.. पण असा प्रवास करायचा असेल तर "मैत्रीचे बंध" चटकन जुळुन येण मस्ट आहे. हे मला जमवायला हव.. अस वाटल.. >>> + १२३

छान चालु आहे मालिका. मलापण विमानप्रवासात कोणाशी गप्पा मारायला जमत नाही... थोडे हाय हेलो बास होते.
पण इथे तुलनेने मैत्री होणे सोपे आहे कारण एका सारख्याच गोष्टीची (बॅकपॅकिंग) अतोनात आवड असलेले लोक भेटत आहेत त्यामुळे एक गोष्ट त्यांच्यात आपोआप कॉमन आहे व आवडीची आहे, पुन्हा सारेच एकटे आलेत या आव्हानात्मक प्रवासास. मग मैत्री होण्यास जास्त वेळ लागणार नाही.