मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट

Submitted by Dr Raju Kasambe on 8 January, 2020 - 04:54

मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट
मुंबईत पावसाळ्यात पाउस हा दररोजच पडतो. तो कधीही कसाही पडतो, कोसळतो. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था असते. नाले तुंबलेले असतात. मुंबईला महापूर सुद्धा येतो. २६ जुलै २००५ ला महापूर आल्यावर मुंबईकरांचे काय हाल झाले होते ते ऐकून, वाचून होतो. तेव्हा मी मुंबईला नसल्यामुळे महापूर अनुभवला नव्ह्ता.

पण मागील वर्षी तो ‘योग’ आला (२९ ऑगस्ट २०१७). दररोजप्रमाणे डोंबिवली-दादर-गोरेगाव अशा लोकल प्रवासाला निघालो होतो. आधीच्या दिवसापासूनच जोरदार पाऊस पडत होता. दादर पर्यंत अनेक ठिकाणी रेल्वेच्या रुळांवर पाणी दिसले. पण त्याचे काही विशेष वाटले नाही. दादरवरून बोरीवली लोकल पकडली. माटुंगास्टेशन सोडल्यानंतर लागलीच ती थांबली. थांबली ते थांबलीच. बघता बघता अर्धा, पाऊण आणि एक तास निघून गेला. रुळांवर एक फूट तरी पाणी साचलेले दिसत होते. अनेक जण रुळांवर उतरून माटुंगा स्टेशनपर्यंत पायी परतत होते. सर्व लोकल गाड्या जाग्यावरच उभ्या होत्या. मी सुद्धा रुळावर उतरलो. एका मुलाच्या पावलावर पाउल ठेवत माटुंगा स्टेशन गाठले. फलाटावर चारपाचशे लोकं असतील. येथे गरमागरम चहा घेतला. आणखी अर्ध्यातासाने चर्चगेटला जाणारी एक लोकल हळुवार सरपटत स्टेशनात आली. एव्हाना मोबाईलवर एवढे ठरले होते की ज्याला जसे जमेल तसे त्याने स्वतःचे घर गाठावे. दादरला पोचलो. या ठिकाणी परिस्थिती भयानक होती. आठ दहा हजार लोकांची गर्दी होती. उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. सगळीकडे फक्त माणसं. घरी जायला आसुसलेली. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलीस दक्षता घेत होते.

मी पादचारी पुलावरून सगळ्या फलाटांवर नजर टाकली. पूर्वेकडील शेवटच्या फलाटावर खूप गर्दी नव्हती. म्हणून तिकडे गेलो. येथून एक्स्प्रेस गाड्या सुटतात. पण मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला. दुपारचे साडे बारा वाजले होते. फलाटावर कुठेही उभं राहिलं तरी पावसाचा फटका बसत होता. एका हात गाडीवर बुड टेकवून थोडा वेळ बसलो. इथेच डबा उघडून जेवण आटोपून घेतले. थोडी तरतरी आली.
नंतर वाटले महापुर आणि आजूबाजूला काय चाललंय ते तरी बघावं. लोकांची तारांबळ उडालेली होती. दादर पासून पुढे प्रत्येक रुळावर मला दिसेल तिथपर्यंत फक्त लोकल उभ्या दिसत होत्या. माटुंग्याकडून शेकडो स्त्रीपुरुष स्टेशनाकडे पायी येत होते. मी एका पादचारी पुलावर चढलो. पूर्वेकडील गल्लीत बुडालेली कार ढकलत न्यायला काही जण मदत करीत होते. एका म्हातारीला रबरच्या होडीत बसवून काही युवकांनी बाहेर काढले.
पुलावर बरेच जण आधीच उभे होते. साचलेल्या पाण्यातून अंदाजे रस्ता शोधत आणि अचानक खड्ड्यात पडणाऱ्या लोकांचे व्हिडिओ मोबाईलवर काढले जात होते. कुणी अचानक खड्ड्यात पडलं कि पुलावरची मंडळी ओरडत होती. एका विशिष्ट ठिकाणी बरेच जण खड्ड्यात पडत होते. पुराचे पाणी गढूळ असल्यामुळे कुठे खड्डा आहे त्याचा अंदाज येत नव्हता. त्या खड्ड्याजवळ एक वयस्कर माणूस गुडघ्याएवढ्या पाण्यात उभा राहून लोकांना खड्ड्यात पडण्यापासून वाचवत होता. घाबरलेल्या प्रवाशांना हात धरून त्यांना थोडे अंतर पार करवून देत होता. फलाटापर्यंत पोचवत होता. मी वरून हे बघत होतो. माझ्या असे लक्षात आले की खड्डा एक नसून दोन होते. आणि हे सदगृहस्त लोकांना एका खड्ड्यात पडण्यापासून वाचवीत होते. अर्थात अनेक जण शेजारच्या दुसऱ्या खड्ड्यात पडत होते. इथे आणखी एका माणसाची आवश्यकता होती. कुणीतरी हे काम करायला हवे होते. पण...कुणी?

पावसाची रिपरिप थांबत नव्हतीच. पुन्हा मुसळधार पाउस पडायला लागला. लोक खड्ड्यात पडतच होते. पुलावर सुरक्षित उभे राहून हा दुसऱ्यांच्या जीवाचा खेळ बघायला आणि त्याचे मोबाईलवर फोटो, व्हिडिओ काढायला अनेकांना मजा येत होती. त्यात मी सुद्धा होतो. अचानक मला माझीच लाज वाटायला लागली. मी हिम्मत एकवटली. मी माझा मोबाईल, पैशाचे पाकीट इत्यादी महत्वाचे सामान प्लास्टिकमध्ये गुंडाळले. बॅगेत टाकले, छत्री उघडली आणि फलाटावरून सरळ खाली बुडालेल्या रुळावर उतरलो. लोक येत होते त्यांच्या उलट दिशेला मी गेलो. ज्या ठिकाणी ते सदगृहस्त उभे होते तेथे गेलो. दुसऱ्या खड्ड्याच्या जागेचा अंदाज घेतला आणि ‘पोझिशन’ घेऊन उभा राहिलो. आता आम्ही दोघं मिळून फलाटाकडे जाणाऱ्या प्रत्येकाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवत होतो. तरीही कुणी पडलाच तर त्याला लगेच खेचून बाहेर काढत होतो. धीर देत होतो आणि फलाटाकडे पाठवत होतो. शेकडो लोकांची जणू रांगच लागली होती. मी उभा होतो तिथे इलेक्ट्रिकची डी.पी. होती. माझी बॅग मी त्याला लटकवून ठेवली. इथे जर चूकुन स्पार्किंग झाले असते तर क्षणात माझे ‘रोस्टेड चिकन’ झाले असते! ज्या ठिकाणी मी उभा होतो तिथे गुडघाभर पाणी आणि चिखल होता. पाणी गढूळ आणि थंडगार होते. अंदाजे एक वाजतापासून मी येथे उभा ठाकलो.

दुपारचे साडेतीन वाजेपर्यंत माझे पाय गार पडायला लागले. पोटऱ्यात क्रॅम्प्स जाणवू लागले. किती लोकांना मदत केली ह्याची मोजदाद ठेवायला वेळ नव्हता. स्टेशनाकडे येणाऱ्या लोकांची रीघ लागली होती. पाऊस थांबायला तयार नव्हता. आता उभे राहणे मला शक्य नव्हते.
त्या सदगृहस्थाला मी म्हणालो

flood.jpg

“आता मला आणखी उभे राहणे जमणार नाही. पायाला क्रॅम्प्स येत आहेत. मी हार्ट पेशंट आहे. मला माफ करा”.
त्यांनी अंगावर प्लास्टीकची घोंगडी (रेन कोट) घातली होती. अंदाजे साठ वर्षाचे ते असावेत. ते म्हणाले
“मी पण थकलोय. बघू जमेल तेवढा वेळ थांबतो. तुम्ही एक काम करा. माझ्या डब्यात भाजी पोळी आहे. ती जेवून घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल”.
“मग तुम्ही काय खाल?”
“मी स्टेशनावर वडा पाव खाऊन घेईन.”
“नको. मी साडे बारालाच जेवलो.”
असे बोलून मी फलाटावर चढलो. पादचारी पुलावरून खाली बघितले. ते सदगृहस्थ लोकांना वाचवीत होते. मी मोबाईल काढला. एक दोन छायाचित्रे घेतली. घोंगडीमुळे त्यांचा चेहेरा फोटोत आला नाही.

फलाटावर कुठेही बसायला कोरडी जागा दिसत नव्हती. शेवटी स्टेशन प्रमुखाच्या खोलीत जाऊन बसलो. पाय वृत्तपत्राने पुसून कोरडे केले. पाच साडेपाचला दादरच्या एका मैत्रिणीला फोन केला. तिने घरी बोलावले. सिद्धीविनायक मंदिराजवळ तिचे घर होते. म्हणाली मंदिराजवळ ये. तेथे घ्यायला येते. दादर पश्चिमेला स्टेशनाबाहेर मांडीपर्यंत पाणी तुंबले होते. पुन्हा भिजलो. स्टेशनातल्या चहावाल्याकडे प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत माझा टिकाव लागला नाही.

दादर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायपीट करीत निघालो (तसं मी कधीच गेलो नसतो). रस्त्यात वाफाळता चहा व बिस्कीटं मिळाली. अंगात पुन्हा तरतरी आली. मंदिराच्या दारात पोचलो. मंदिरात दर्शनासाठी कुणीही भक्त नव्हते. तिथला एक सुरक्षा रक्षक पोलीस मला म्हणाला “जावा आत. लगेच दर्शन होईल. आत कुणी नाही.” चप्पल काढून आत गेलो. पुजारी, मी आणि सिद्धीविनायकाची सुंदर ‘मूर्ती’. बाकी कुणी नाही. अनेकदा येथे येऊन अलोट गर्दी असल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेऊन परत गेलो आहे. त्या सर्व प्रसंगांची आठवण झाली. आज दर्शनासाठी कुणीही नव्हते. विद्युत रोषणाईत चकाकणार्‍या बाप्पांच्या ‘मूर्तीचे’ दर्शन झाले. तरीही मनात विचारांचे काहूर माजले होते. न जाणे का, पण मनात असा विचार आला की आज बाप्पा मंदिरात नव्हतेच!

मंदिराच्या बाहेर आलो. वीस रुपये मोजून प्रसादाचे दोन लाडू विकत घेतले. मैत्रीण आणि तिचा नवरा माझी वाट बघत होते. त्यांच्या घरी गेलो. अगदी घरच्यासारखे वाटले. आंघोळ केली. चहा, मग जेवण आणि मुक्काम. गेल्या अनेक वर्षांपासून मोनिका स्वतःच्या मिळकतीतून तीन आदिवासी मुलांना निसर्ग शिक्षण देते आहे. मोनिकाने तिच्या सासू-सासऱ्यांचा परिचय करून दिला. दर आठवड्याला हे वयस्कर जोडपे कॅन्सरच्या रुग्णांना हजारो रुपयांची औषधे मोफत वाटतात. अगदी देवमाणसं भेटल्यागत झाले.

डिस्चार्ज झालेला मोबाइल चार्जिंगला लावल्याबरोबर खूप सारे मेसेजेस यायला लागले. अनेक ठीकांनी लोकांनी स्वतःच्या खर्चाने स्टेशनावर अडकून पडलेल्या लोकांसाठी मोफत खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था केली होती. अडकून पडलेल्या लोकांनी बिनदिक्कत यावे व येथे राहावे असे घोषित केल्या जात होते. अनेकांनी तर सोशल मेडियावर आमच्या घरी एवढ्या माणसांची व्यवस्था आहे. कुणीही या आणि आमच्याकडे राहा असे संदेश पोस्ट केले होते. मनाची चक्रे उलटी फिरू लागली.

फलाटावर भेटलेल्या अनोळखी माणसाने मला त्याचा डबा खायला देऊ केला होता. त्यांना बघून मी स्वतः पायात क्रॅम्प्स येईपर्यंत लोकांना मदत केली होती. दानशूर व्यक्ती स्टेशनावर अडकलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करीत होत्या. खायला प्यायला देत होते. राहायची व्यवस्था करत होते. मोनिकाचे सासू सासरे स्वतःच्या मिळकतीतून गोरगरिबांना मदतीचे हात देत होते.

या उलट, करोडो रुपयांची माया जमविणाऱ्या सिद्धिविनायक मंदिर संस्थानाने माझ्याकडून प्रसादाचे वीस रुपये धंदेवाईकपणे वसूल केले होते.

मला वाटते, मी चुकतच होतो. मंदिरातल्या सुंदर मूर्तीत मी परमेश्वर शोधत होतो. बाप्पा तिकडे सर्वांना वाचविण्यासाठी रेन कोटाच्या आत चेहेरा लपवून चिखलात उभे राहून धडपडत होते. बाप्पा मला स्वतःचा डबा खायला देत होते. पुलावरून गम्मत बघणाऱ्या, मोबाईलवर फोटो काढणाऱ्या माझ्यात बाप्पा कधी संचारले आणि शेकडोंना सुरक्षित घरी पोचवले ते मला जाणवले सुद्धा नाही. हजारो लोकांना रात्री खायला, प्यायला, राहायला देणाऱ्या शेकडो लोकांच्या अंतःकरणात बाप्पा संचारले होते. मूर्तीत परमेश्वर शोधणाऱ्या माझ्या मनाला साक्षात्कार झाला. मुंबईतल्या महापुराचे त्या दिवसाचे फोटो मी परत परत मोबाईलवर बघत असतो. चिखलात उभ्या बाप्पाचा चेहेरा मला काही अजून सापडला नाही.

परमेश्वर मूर्तीत नसतो. तो आपल्या आजूबाजूला मानवी रूप धारण करून संचार करीत असतो. आपल्याला त्याची अनुभूती अशी अचानक कधीतरी होते. तो असा अचानक आपल्या आयुष्यात येऊन जातो. आपल्याशी चार गोष्टी बोलतो. मदत करतो. फक्त आपल्याला त्याक्षणी ते कळत नाही!! बाकी त्याच्या नावावर धंदा करणारे करीत राहतात.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

परमेश्वर मूर्तीत नसतो. तो आपल्या आजूबाजूला मानवी रूप धारण करून संचार करीत असतो. आपल्याला त्याची अनुभूती अशी अचानक कधीतरी होते. तो असा अचानक आपल्या आयुष्यात येऊन जातो. आपल्याशी चार गोष्टी बोलतो. मदत करतो. फक्त आपल्याला त्याक्षणी ते कळत नाही!! बाकी त्याच्या नावावर धंदा करणारे करीत राहतात.>>>>>> यही तो सच है, बाकी सब झूट ! कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी..

बाप्पा तिकडे सर्वांना वाचविण्यासाठी रेन कोटाच्या आत चेहेरा लपवून चिखलात उभे राहून धडपडत होते.>>>

तुम्ही मंदिरात बाप्पा नव्हते लिहिले तेव्हाच मनात विचार आला बाप्पा तिकडे घोंगडी पांघरून लोकांना वाचवत होते, मंदिरात कुठून असणार.

सुंदर.
डोळे पाण्याने भरून आले.
देव, देव्हार्यात नाही; देव नाही देवालयी
_/\_

>>परमेश्वर मूर्तीत नसतो. तो आपल्या आजूबाजूला मानवी रूप धारण करून संचार करीत असतो. आपल्याला त्याची अनुभूती अशी अचानक कधीतरी होते. तो असा अचानक आपल्या आयुष्यात येऊन जातो. आपल्याशी चार गोष्टी बोलतो. मदत करतो. फक्त आपल्याला त्याक्षणी ते कळत नाही!! बाकी त्याच्या नावावर धंदा करणारे करीत राहतात.
अगदी खरंय. लिहिलेले आवडले.

तुम्हाला सलाम !
असा प्रसंग आला तर उभं रहायची इच्छा आणि शक्ती देव देवो !