ती,मी आणि बरंच काही :६ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 4 January, 2020 - 06:38

ती,मी आणि बरंच काही :६ . . .

त्या नकार देतील हे मी मनात बिंबवून आलो होतोच, पण त्या पेक्षा अजून काय वाईट होईल ह्याची देखील तयारी करून आलो होतो म्हणजे कसं वेळेवर मनाला धक्का बसायला नको.
मला हाकलवून लावणार, आधी एक कानाखाली वाजवणार, किंवा जास्तीत जास्त दोन लोकांना बोलावून माझी चांगलीच इज्जत वैगेरे काढणार.

धक्का बसला खरा तोही खूप जोरदार पण सुखद, इतका कि मी आनंदाने खाली कोसळणार होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या हो म्हणाल्या, खरंच त्या हो म्हणाल्या.
त्यांना तिच्यासाठी एक चांगला शिकलेला चांगल्या घरातला चांगल्या माणसांत राहणार मुलगा हवा होता, आणि माझ्याकडे ते सगळं होतं, तिच्या सावल्या रंगामुळे तिला अशी मुलं नकार देत होती, त्यामुळे त्या माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एक वर्ष थांबायला तयार होत्या.
त्या म्हणाल्या पुढच्या आठवड्यात वडिलांना घेऊन ये मग पुढचं ठरवू.

तुम्ही मला इमॅजिन करू शकत असाल मी किती खुश असेन ते. जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती होतो मी त्या क्षणाला. ती माझी झाली होती म्हणजे होणार होती फक्त माझी. माळ नाचू कि गाऊ कि काय करू झालं होतं.
इतक्या सहज शक्य कसं झालं, काय काय ते मला विचार करायचा नव्हता मी तो क्षण साजरा करत होतो.

त्याच दिवशी लगेच तिला भेटलो आणि सांगितलं कि मम्माला भेटलो पण ती नाही बोलली ग, मी जरा मज्जा घेण्याच्या मूड मध्ये होतो.
मम्मा म्हणाली आजच्या पुढे तिचं नाव जरी घेतलं आणि तिच्याशी बोलायचं भेटायचं प्रयत्न केला तर परिणाम अतिशय वाईट होतील.
मुद्दाम रडल्यासारखं तोंड वैगेरे करून राहिलो.

तिच्या चेहऱ्यावर खास आश्चर्य दिसलं नाही, करणं तिने ठरवूनच टाकलं होतं कि त्या नाहीच म्हणणार. चेहरा मात्र पूर्णपणे उतरला, डोळ्यात हळूहळू लाल गुलाबी रेषा जमू लागल्या, श्वास जड झाले, पण ती रडली नाही.
जीवावर एक क्षीण स्माईल देत म्हणाली, मला माहित होतं ती नाहीच म्हणेल.
तुही विषय सोडून दे आता, आणि तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे.

विषय सोडून दे म्हणजे ?? तू असं कसं बोलू शकतेस. ती दुसऱ्यासोबत लग्न करायचं बोलत होती, मग तू करशील काय?? मी रागात म्हणालो.

"नाही, मी नाही लग्न करणार" ती कोणत्याही क्षणी रडणार होती.

मग तुला वाटतं त्या तुला अशी घरात ठेवतील, तेही आता आपलं कळल्यावर ?? मी मुद्दाम ताणून धरलं, ह्या नंतर ती कायमच आनंदी राहणार आहे थोडीशी मज्जा घेऊयात तिची.

" नाही, मी ठरवलं आहे, मी तुला पण फसवणार नाही आणि मम्माला पण दुखावणार नाही" ती वेंधळ्यासारखी कचरत म्हणाली.

काय ठरवलं आहेस तू? मी घाबरून विचारलं. अचानक मला आठवलं ती म्हणाली होती कि माझं जगणं मरणं तरी माझ्या हातात आहे ना.
सांग काय ठरवलं आहेस???? इकडे बघ, वर बघ माझ्याकडे आणि सांग तू काय ठरवलं आहेस??
भीतीने माझ्या डोळ्यांत कधी पाणी आलं कळलंच नाही. मी तिचा हात घट्ट पकडून तिला विचारत होतो.

माझा हात झिडकारून कापऱ्या आवाजात म्हणाली " मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय, तुझ्याशिवाय मला कुणीच नकोय रे, इतर कुना दुसऱ्याचा विचार देखील नकोय मला, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्यापेक्षा मला मरण सोप्प वाटतं, आणि मी तेच ठरवलं आहे, तसंही तुझ्याशिवाय जगणं म्हणजे आयुष्यभराच्या यातना असणार आहेत आणि त्या सहन करायची हिम्मत नाहीये माझ्यात, तसंही तिला माझी किंमत कळावी ह्यासाठी मरुन दूर जाऊ शकतेच कि मी,काही कठीण नसतं दोन रुपयाची नवीन ब्लेड आणायची हि बघ, हि इथली शीर जोरात कापायची पाच दहा मिनिट थोडासा त्रास आणि मग सगळं शांत "

आधी एक जोरदार थप्पड लगावून मी तिला हृदयाची धरलं, खूप जवळ, नशीब आजूबाजूला लोक नव्हती, पण दोघेही खूप रडलो. साला इतकं प्रेम करावं आपल्यावर कुणी कि आपल्यासाठी त्याने जीव द्यावा. जीव देणं हा विचार जरी अतिशय चुकीचा असला तरी आपण कुणासाठी त्याच्या आयुष्यापेक्षाही महत्वाचे असावेत, जर खरंच त्यांनी नकार दिला असता आणि हिने परस्पर काही केलं असतं तर मी विचारानेच इतका घाबरलो कि शब्दांत नाही सांगू शकणार.

तिला शांत करून, मी खरं सांगितलं. मी मरेपर्यंत मार खाल्ला असता तिला हा मनस्ताप दिल्या बद्दल पण तिच्या आत्महत्येचा विचाराने मी इतका रागावलो होतो कि तिला होकाराचा आनंद देखील चेहऱ्यावर नातं येत नव्हता. उशीर होईल कुणी ओरडेल ह्याचा प्रथमच विचार न करता कितीतरी वेळ ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती.
अशे जवळीकतेचे क्षण खूप कमी आले माझ्या आयुष्यात कि तिने मला ह्ग केलंय, मी हातात हात घेतलाय, खांद्यावर डोकं ठेऊन ती झोपलीये, गाडीवर मागे बसून फिरलीये, तिचा सहवास, ती आणि फक्त मी . . . मला पुढची सगळी स्वप्ने पूर्ण होताना दिसत होती.
आणि तिला दुसरीच स्वप्ने दिसत होती. .

ती एकदा म्हणाली होती कि, तुझ्याविषयी विचार करायचा एक स्वार्थी विचार देखील एक होता कि, तुझी फॅमिली.
किती आनंदात राहता रे तुम्ही, कधी भांडण नाही कि कधी ओरडाओरड नाही, सगळे कसे समजूतदार आहेत आणि मला आनंदी राहायला पैस्यापेक्षा असं कुटुंब हवंय, आपण कधीच भांडायचं नाही हा, मला मम्मा पप्पांसारखं नाही वागायचं, काही झालं तरी भांडायचं ओरडायचं नाही.

माझ्या घरी तसाही कोणाला प्रॉब्लेम होणार नव्हताच, म्हणून मी दोन दिवसांनी माझ्या आई वडिलांजवळ विषय काढला, खरा धक्का तर मला इथे बसला.

म्हणतात ना आयुष्यात सगळं सरळ सोप्प मिळालं तर ते आयुष्य कसलं.
आईने कडक विरोध दर्शवला, नाही म्हणजे नाहीच. वेगळी जात म्हणून वडीलदेखील तेच म्हणाले.
मला अटॅक यायचा बाकी होता फक्त, ज्या कुटुंबाची तिने स्वप्ने पहिली तिथे पूर्णपणे नाकारलं होतं तिला.
पूर्ण आठवडा भर वेड्यासारखा मनावत राहिलो, पण ते बधले नाहीत.
पुढच्या आठवड्यात तिच्या मम्माचा फोन आला कधी येतंय विचारायला, मी काय सांगणार होतो त्यांना?

मी तिला सगळी कल्पना दिली, दुःख खूप झालं तिला पण ती माझ्या बाजूने उभी राहिली म्हणाली प्रयत्न कर मम्मासोबत बोलू आपण, म्हणजे जे घडेल असं वाटतं होतं त्याच्या उलटंच घडत होतं सगळं, आश्चर्य म्हणजे हि चक्क मम्मासोबत बोलू आपण असं म्हणत होती.
बोललो मी त्यांच्या सोबत, घरातले ऐकायला तयार नव्हते तिच्या तरीही शेवटी मला त्यांनी वेळ देऊ केला फक्त लोकांना कळू देऊ नका तुमच्या विषयी ह्या अटीवर.

ह्या गोष्टी काही लपतात का?? हळू हळू खु जणांना कळलं, गावातले लोकं, ह्या प्रकारात संपूर्णपणे मुलीला नावं ठेवतात.
मी खूप प्रयत्न करून माझ्या घरच्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मी मध्येच नॉनव्हेग खायचं बंद केलं मला अतिशय आवडत असून, काही परिणाम होतं नाही म्हणून दोन महिने घरात जेवलो नाही, ती द्यायची सगळं मला, मी उपाशी नाही राहत हे आईला माहित होतं त्या मुळे तिने लक्ष दिलं नाही, ती हो बोलली नाही.

इकडे लोकं तिला असून असून बोलू लागली, आईला शेजारच्या काही बायका टोमणे मारू लागले, एक अतिशय कामाची शांत आणि हुशार ह्या इमेज वरून सगळे तिला चालू आणि लफडेबाज समजायला लागले.

त्या दिवशी भेटली होती, म्हणत होती कुणीही काहीही बोलतं अडून अडून, मला बोललेलं मीऐकून घेईन पण मम्माला कुणी बोललेलं मला सहन नाही होत रे, वाटतं सगळं सोडून द्यावं,
एव्हाना घरच्यांना समजावून मी थकलो होतो, मी तिला कोर्टात लग्न करायला विनवत होतो पण तिने पूर्णपणे नकार दिला.
आई वडिलांची समाजात नाचक्की, नंतर बहिणीचं लग्न जमवताना तिला काही त्रास झाला तर मी असं केल्याने, वैगेरे वैगरे जगाची चिंता तिला.

साला काय ठरवलं होतं आणि काय होतं आहे आयुष्यात, पूर्णपणे हतबल झालो होतो मी, दोन्ही बाजूने हरलो होतो. तिचे बिचारीची आई वडील चांगले म्हणून नाहीतर माझ्या घरादाराला शिव्या देऊन हिचं कुठेही लग्न लावून दिलं असतं पण त्यांनीच आधार दिला मला.
कोणाला काय समजत होतो आणि कोण कसं निघालं.
ठरवलं होतं हिला घरी नेऊन सुखात ठेवेल, इतकी वर्ष झालेला त्रास विसरायला लावेन इतकं प्रेम देऊ आम्ही सगळे पण माझ्या घरी ती नकोच होती कोणाला.

एक स्टेज अशी आली कि तिने स्वतःनेच ह्या नात्याला नकार दिला म्हणाली, ज्या घराला मी नकोच आहे तिथे मी कशी राहू, मला पाहून कित्येकांचे तोंड पडतील, कुणी रागराग करेल, घालूनपाडून बोलेल, मी कसं राहू रे अश्या घरात सांग ना???
माझ्यामुळे सगळ्यांना त्रास का होतो रे?? इतकी काय वाईट आहे मी? कि कोणालाच मी हवीशी नाहीये त्यांच्या आयुष्यात. एकाच गोष्ट हवीये आयुष्यात प्रेम करणारी माणसं, का देव देत नाही मला ते?? माझ्या नशिबात नाही का रे सुखी आनंदी कुटुंबात राहणं???
खूप दुखावली गेली होती ती, नवीन स्वप्ने पहिली आणि काहीच दिवसांत ती डोळ्यांदेखत तुटली.

खूप वाईट वाटलं, तिला सुखी आनंदी पाहण्यासाठी इतका अट्टाहास केला आणि तिला अजून जास्त त्रास दिला मीच.
पश्चाताप होत होता मला, मी काहीच करू शकत नव्हतो, न घरचे ऐकत होते ना ती कोर्टात लग्न करायला तयार होत होती.
तिचे आई वडील तरी किती सपोर्ट करणार होते, त्यांनीही माघार घेतली, अश्याने पोर कायमची घरी बिनलग्नाची राहील, त्यात एवढी बदनामी झाली ती वेगळीच.
झालं, तिचा फोन काढून घेतला बोलणं भेटणं सगळं बंद.
हरलो मी इथेच पूर्णपणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एका दिवसात दोन भाग आणि इतका विरोधाभास.....
कृपया पुढील भाग लवकर येऊ द्या...

अवांतर: अपेक्षा कि नक्कीच माघार घेतली नसेल... काहीतरी प्रयत्न केला असेलच आणि त्याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.