ती,मी आणि बरंच काही : ५ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 4 January, 2020 - 04:28

ती,मी आणि बरंच काही : ५ . . .

"कैसे सुख सोवे निंदरिया श्याम मुरत चित्त चढी"

इथे रचानाकराच्या चित्ती त्या कृष्ण सावळ्याची मूर्ती तर माझ्या चित्ती समोर डोळे मिटून बसलेल्या ह्या सावलीची मूर्ती रूढ होती.

दोघांच्या कानात एक एक कॉर्ड, ती डोळे मिटून आणि मी तिच्याकडे मनभरून पाहत बिहाग ऐकत बसलो होतो.
हल्ली ती आणि मी थोडा वेळ का होईना सोबत मिळून एकत्र शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकायचो. तिचाच हट्ट म्हणते ज्याला हे कळलं पटलं समजलं त्याच्यासाठी स्वतःला सावरण्याचा, आत्मिक शांततेचा आणि स्वत्व गवसण्याचा सरळ आणि सहज मार्ग.
खरं बोलत होती ती त्यात जादू आहे खरी, मला इतकं काही कळत नव्हतं अजून पण हळू हळू समजायला लागलं होतं थोडं, आवडून घेत होतो, थोडं ऐकून कळायचं आणि थोडं डोळे मिटून ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावांवरून कळायला लागलं होतं.
तिने डोळे मिटले की तिला पाहवत राहावंसं वाटायचं, हेच ते क्षण ज्यात मला हवी असणारी ती भेटायची, ती हरवायची कुठल्या तरी अलापात आणि मी तिच्यात.

पहिलं प्रेम आणि पहिलीच गर्ल फ्रेंड, नाही गर्ल फ्रेंड आहे असं कधी म्हणावंस वाटलं नाही, ती त्या शब्दापेक्षा खूप जास्त होती माझ्यासाठी. गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड ह्या कन्सेप्ट पेक्षा खूप खोल आणि व्यापक नातं बनत चाललं होतं आमचं.
प्रेम म्हणलं कि अपेक्षा आल्याच, मला हि वाटायचं तिने नेहमी माझ्यासोबत फिरायला यावं, एकांतात वेळ घालवावा, माझ्या हातात हात घालून रस्त्यावरून फिरावं, वैगेरे वैगेरे.
पण स्टेशनच्या पुढे ती कधी आलीच नाही. मी प्लॅन बनवायचो आणि ती नकार द्यायची नेहमीच, मग चिडचिड, रागवा रागव, काही महिने मी नकळत त्रास दिला तिला.

तुम्हाला जरा अतीच वाटेल पण ती म्हणायची कि, मी तुझ्या बरोबर फिरत होती, तुझ्याबरोबर मला कुणी पहिलं, माझ्या घरी इतर कुणाकडून आपल्या प्रेमाविषयी कळावं असं मला वागायचं नाहीये, नकारात्मक दृष्टिकोनाने कळण्यापेक्षा आपण स्वतः त्यांना सांगू तेव्हाच त्यांना आपल्याविषयी कळायला हवं म्हणजे कमीत कमी थोडासा सकारात्मक दृष्टिकोन असेल तिथे.
आपण स्वतः सांगण्यात आणि दुसर्याकडून कळण्यात खूप फरक पडतो ह्या गोष्टीवर आणि माझ्या मनाच्या मर्यादेबाहेर येऊन मी काहीच करणार नाही, जे मला चुकीचं वाटेल त्याला मी निक्षून नकार देईन त्यामुळे तू उगीच जास्त अपेक्षा ठेऊ नकोस ना प्लिज.

जरी ती अशी असली तरी ती पूर्णपणे माझ्यात गुंतली होती, मला वाटत होतं त्यापेक्षा खूप खोल. माझ्या आवडीनिवडी जपायची, माझ्यासाठी ती स्वतःच्या स्वभावात देखील बदल आणत होती.
सुगरण आहे ती, हल्ली स्वतःच्या हाताने बनवून काही ना काही आणायची. अतिशय चवदार पदार्थ बनवायची, मग ते गुलाब जमून असोत, खीर असो, हलवा असो, कि बेसनाचे लाडू असोत. एकंदरीत ह्या वयात खुपश्या मुलींना जे पदार्थ बनवता येत नाहीत ते ती अतिशय सुंदर बनवायची.
हो खरंच चिवडा, डिंक सुका मेव्याचे लाडू, पुरण पोळी, खूप काही. . .

तिची फायनल झाली, आता पुन्हा लग्नासाठी मुलं पाहणं वैगेरे, त्यात भेटणं जवळ जवळ पूर्णपणे बंद.
स्वतः काही कमावत नसताना, वेगळ्या जातीचे असताना तिच्या घरी जाऊन तिच्या आईसोबत आमच्या प्रेमाविषयी सांगणं म्हणजे दिव्य होतं माझ्यासाठी.

झालं मुलं पाहायला येणं सुरु झालं, हि अतिशय घाबरली होती, पण ती मला कधीच फोर्स नाही केला कि तू लगेच ये, मम्माशी बोल, वैगेरे वैगेरे.
कदाचित तिचा काही माईंड सेट असावा, पण मला तर वाटतं मम्मा पूर्णपणे नकार देईल असं तिला माहित असावं.
काही कॉम्प्लिकेशन होण्याआधी मला काही करणं अतिशय गरजेचं होतं.
मी लहानच होतो तसं म्हणायला, म्हणजे लग्नाचं वय तर नक्कीच नव्हतं. आमच्यात शारीरिक जवळीकता नव्हती त्यामुळे मी हे नातं इथेच सहजरित्या थांबवू शकत होतो, पण माहित नाही कसं आणि केव्हा पण मनाने खूप आणि आतून जुडलो गेलो होतो आम्ही.

मी इंटेन्सिटी चेक करायला सहजच मेसेजवर तिला विचारलं कि, मी जर आता हे नातं संपवलं, म्हणजे माघार घेतली तर तू काय करशील??
किंवा मी मम्मासोबत बोललो आणि तिने नकार दिला आणि तुला इतर कोणासोबत लग्न करायला लावलं तर तूझा काय निर्णय असेल??
आणि शेवटचं, जर मी तुझ्यासाठी तुझ्या मम्माच्या नाकारानंतर हि प्रयत्न करत राहिलो आणि तरीही त्यांनी नकारच दिला तर पळून येशील माझ्यासोबत??

तर ती म्हणाली होती कि, मी तुझ्या आयुष्यात आली तर तू हैप्पी राहशील हि कन्सेप्ट जिथे संपणार असेल तिथे मला तुझ्या आयुष्यात स्वतःहून राहावंसं वाटणार नाही.
मला तू हवा आहे पण मम्माच्या होकाराने, तिला दुखावून नकोस. पळून येणं हि अशक्य गोष्ट आहे, मी ते करणार नाही, कधीच नाही.
तू माझ्यासाठी तिच्या नाकारानंतर देखील तिला मनावत राहिलास आणि तरीही ती ऐकली नाहीच, तरी मी तिला दुखावणार नाही आणि तुझ्याशिवाय इतर कोणाची होणारदेखील नाही. ह्या आयुष्यात तरी मी तुझीच आहे, आणि हो कमीत कमी माझं जगणं मरणं ह्यावर तरी माझा हक्क आहे.

शेवटच्या ओळीचा अर्थ मला कळला नाही पण मला खूप लवकर काही करणं गरजेचं होतं ते मात्र समजलं.
मग काय एक दिवस खूप हिम्मत करून गेलो तिच्या घरी मम्माला भेटायला. . .

मी माझ्या घरी काहीही न सांगता जरा नेहमीपेक्षा चांगला अवतार घेऊन गेलो. भीतीने हृदय धडाधड आपटत होतं, दरदरून घाम फुटला होता.
मी आणि मम्मा समोर बसलो होतो, तिने बनवलेला चिवडा जो मी दोन दिवस आधीच खाल्ला होता तो खाण्याचा त्या मला आग्रह करत होत्या आणि मी कशी सुरुवात करू ह्या विचारात पडलो होतो. अतिशय घाबरलो होतो अक्षरशः हात पाय कापत होते माझे.
जरी आज न बोलता गेलो असतो तरी पुन्हा येणं होतंच, म्हणून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगून टाकलं सगळं, एका अर्थी मी तिला लग्नाची मागणी घातली.

'माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, आणि आयुष्यभर सुखी ठेवेन मी तिला, सगळं तुमच्या होकारावर आधारित आहे, आणि तिने सगळं तुमच्यावर सोडलं आहे, तुम्ही जसं बोलाल तेच ती करेल, पण मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे, मी नाही राहू शकणार तिच्या शिवाय त्यामुळे प्लिज तुम्ही होकार द्या, प्लिज'

कुठल्या वाक्याचा कुठे अर्थ लागत होता काय माहित पण मी असंच सगळं तुटक तुटक बोललो. हे असं बोलायला हवं होतं कि नको माहित नाही पण मी असंच काही बोललो त्यांच्या समोर. झालं बोलून मी मान खाली घातली ती वर करायची हिम्मत माझ्यात नव्हतीच, दोन्हीकडे शांतता.
दोन तीन मिनिटांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी कोसळायचाच बाकी होतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults