मन वढाय वढाय (भाग २)

Submitted by nimita on 3 January, 2020 - 21:39

बघता बघता दुसरा दिवस उजाडला आणि स्नेहाची निघायची वेळ येऊन ठेपली. सुमतीमावशी आणि मंजू ला तिनी पुन्हा एकदा सगळ्या सूचना दिल्या. श्रद्धाला सुद्धा 'कुठे काय ठेवलंय' ते दाखवून झालं. तेवढ्यात रजत तिच्याजवळ येत म्हणाला,"ID प्रूफ, क्रेडिट कार्ड वगैरे घेतलं आहेस ना ? थोडी कॅश पण ठेव बरोबर. तू तयार झालीस की सांग, म्हणजे मी कॅब बुक करतो."

स्नेहा काही बोलायच्या आत तो तिथून निघूनही गेला होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती कसनुसं हसली आणि खोलीत जाऊन आपली सुटकेस घेऊन बाहेर आली.

श्रद्धाला मिठीत घेत ती 'bye' म्हणाली. "Bye आई, खूप छान एन्जॉय करून ये. You know what.. काल मी जेव्हा आमच्या ग्रुप मधे सगळ्यांना तुमच्या सिल्व्हर ज्युबिली बद्दल सांगितलं ना, तर सगळे म्हणाले की अजून पंचवीस वर्षांनी आपण पण अशीच re union करू या...किती मज्जा येईल ना !"

त्या दोघींच्या बोलण्याकडे रजतचं लक्षच नव्हतं- तो पुन्हा त्याच्या लॅपटॉप मधे डोकं घालून बसला होता. त्याला हाक मारत श्रध्दा म्हणाली," बाबा , अहो आई निघालीये ." तिच्या बोलण्याचा परिणाम म्हणून की काय पण रजतनी स्नेहाकडे बघितलं. तिनी काही म्हणायच्या आधीच त्याचं एक कोरडं 'bye' तिच्या कानी आलं " तुझी कॅब पण पोचतेच आहे. कार्ड पेमेंट आहे ; त्यामुळे तुला सुट्टे पैसे वगैरेचा प्रॉब्लेम नाही येणार," असं म्हणत तो तिची सुटकेस घेऊन बाहेर जायला निघाला .स्नेहाला हे अपेक्षितच होतं पण तरीही तिच्या मनात कुठेतरी काहीतरी कोमेजलं ! तिच्या चेहेऱ्यावरचे ते बदलणारे भाव बघून श्रद्धानी तिला परत एकदा मिठी मारली आणि म्हणाली," इकडची काळजी नको करू. मी सगळं नीट manage करीन. आता लहान नाहीये मी...So, don't worry. तू तिकडे मजा कर ; मी आणि बाबा इकडे धमाल करू. हो ना बाबा?" श्रद्धाचं बोलणं ऐकून स्नेहाला जाणवलं की 'आता आपली मुलगी मोठी झाली आहे..नुसती सज्ञानच नाही तर समजूतदार सुद्धा!

"पोचलीस की कळव," कॅब मधे बसता बसता रजतचे शब्द तिच्या कानावर पडले ... स्नेहाच्या चेहेऱ्यावर हसू आणायला तेवढं कारण पुरेसं होतं. रजतच्या हाताला हलकासा स्पर्श करत तिनी त्याला 'bye' म्हटलं. त्यानी देखील तिचा हात हातात घेत म्हटलं," Enjoy and take care." कॅब च्या ड्रायव्हर कडे बघत तो म्हणाला," जास्त जोरात ब्रेक नका मारू. झटके नाही लागले पाहिजे..smooth चालवा गाडी." बोलता बोलता काहीतरी आठवल्यासारखं त्यानी स्नेहाकडे बघितलं आणि म्हणाला," आवळा सुपारी आहे ना पर्समधे ?" त्याच्या शब्दांतून तिच्याविषयीची काळजी अगदी स्पष्ट दिसून येत होती. स्नेहाला मोशन सिकनेस असल्यामुळे जर गाडी चालवताना जास्त झटके ,धक्के लागले तर तिला त्रास होतो हे रजतला चांगलंच माहित होतं. आणि त्यासाठीचा 'आवळा सुपारी' चा रामबाण इलाज त्यानीच तिला सांगितला होता.

पुढच्या काही क्षणांत कॅब एअरपोर्टच्या रस्त्याला लागली; स्नेहानी खिडकीची काच खाली केली आणि मागे वळून बघितलं- दोघांना शेवटचं 'बाय्' म्हणायला ! तिच्या अपेक्षेप्रमाणे फक्त श्रद्धाच तिच्या दिशेनी बघत हात हलवत होती- रजत केव्हाच वळून घराच्या दिशेनी निघून गेला होता. पण स्नेहाचं मन मात्र अजूनही तिच्या रजतच्या अवतीभोवतीच घुटमळत होतं. 'त्यानी जरी बोलून दाखवलं नाही तरी त्याच्या मनात अजूनही आपल्याबद्दल तेवढंच प्रेम आहे ..' या नुसत्या विचारानीच स्नेहा मनोमन सुखावली. निघताना त्यानी जेव्हा तिचा हात हातात घेतला होता तेव्हा त्याच्या हाताची पकड घट्ट झाल्याचं तिला जाणवलं होतं- जणू काही तो तिला म्हणत होता ' I will miss you...'

'पण मग हे सगळं तो बोलून का नाही दाखवत? प्रत्येक वेळी आपलं मीच समजून घ्यायचं का ? हृदयात खूप प्रेम असून काय उपयोग ....जर ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचलंच नाही तर त्या प्रेमाला काय अर्थ उरतो? हे म्हणजे कसं झालं माहितीये- बँक अकाउंट मधे खूप पैसे आहेत, पण मी ते खर्च नाही करणार '- स्वतःच्या या कल्पना विलासावर खुश होत ती मनात म्हणाली,' वा, कसं सुचतं गं तुला हे असं? रजत नी ऐकलं असतं तर त्याच्या स्टाईल मधे म्हणाला असता- 'देवा, वाचव मला हिच्या जोक्स पासून!' एकीकडे पर्स मधून आवळा सुपारी काढून तोंडात टाकत स्नेहानी बाहेर रस्त्यावर नजर टाकली. अजून बराच अवकाश होता एअरपोर्ट वर पोचायला . तिच्या विचारांची सफ़र पुन्हा सुरू झाली.....'तसंही आजकाल त्याचं वागणं खूपच unpredictable झालंय. कधी कधी इतकी काळजी घेतो- आत्ता घेतली तशी...पण बऱ्याचवेळा त्याचं माझ्याकडे लक्षही नसतं...आपल्याच नादात असतो तो...मी काय म्हणतीये किंवा काय करतीये हे त्याच्या गावीही नसतं.. अगदी आम्ही एकाच खोलीत असलो तरीही ... जणूकाही मी तिथे असूनही त्याच्यासाठी मात्र नसल्यासारखीच असते. अशा वेळी वाटतं की एक खूप मोटठी दरी आहे आमच्या मधे...आणि गंमत म्हणजे मला दरी पलीकडचा रजत अगदी स्पष्ट दिसत असतो...पण मी मात्र त्याच्या खिजगणतीतही नसते ! माझ्या कुठल्याही कामाचं कौतुक तर सोडाच पण साधी दखल ही घेत नाही तो आजकाल.. '

विचार करता करता स्नेहाला काही दिवसांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. रजत कामानिमित्त जवळजवळ महिन्याभरासाठी बाहेरगावी गेला होता. ज्या दिवशी तो परत आला त्या दिवशी स्नेहानी स्वतः त्याच्या आवडीचा स्वैपाक केला होता.त्याला आवडतात म्हणून मुद्दाम निशिगंधाची फुलं आणून फ्लॉवरपॉट मधे सजवली होती. त्या फुलांच्या मंदधुंद वासानी सगळं घर सुगंधित झालं होतं. जेवताना बॅकग्राऊंडला रफीची गाणी चालू होती.

सगळी वातावरण निर्मिती अगदी रजतला आवडते तशीच जमली होती. पण त्यानी साधं एका शब्दानी बोलूनही नाही दाखवलं....शेवटी न राहवून श्रद्धाच म्हणाली," अहो बाबा, आईनी इतक्या मेहेनतीनी हे सगळं केलंय- कसं वाटलं तुम्हांला? ते तरी सांगा ...." तिच्या या वाक्यावर फक्त " छान आहे सगळं...त्यात काय सांगायचं?" असं काहीतरी पुटपुटत तो बेडरुममधे निघून गेला होता.

पण गेल्या काही वर्षांच्या अनुभवामुळे स्नेहाला आता त्याच्या या अशा वागण्याची सवय झाली होती. 'आता रजत आपल्याला गृहीत धरतो आहे' हे स्नेहाला जाणवायला लागलं होतं.

पर्समधल्या फोनची रिंग वाजली आणि स्नेहाची विचारशृंखला भंग झाली. श्रद्धाचा फोन होता- " आई, अगं, तुला आठवण करायची होती की खूप खूप फोटो काढ आणि मला पाठव. मला माझ्या insta साठी हवे आहेत. आणि हो, तो turquoise blue साडी मधला फोटो नक्की पाठव हं...माझ्या फ्रेंड्स ना दाखवणार आहे मी तो फोटो.मस्त दिसतेस तू साडीत. .....bye."

"मस्त दिसतेस तू साडीत ....."रजत पण हेच म्हणतो..म्हणजे म्हणायचा ! आणि त्याला आवडते म्हणून स्नेहा पण अगदी आवर्जून साडी नेसायची.त्याच्यासाठी नटायची, सजायची.... अशा वेळी त्याच्या डोळ्यांत तिच्या बद्दलचं प्रेम, ती नवथर ओढ अगदी स्पष्ट दिसायची स्नेहाला ! पण का कोणास ठाऊक - गेल्या काही वर्षांत रजतच्या नजरेतलं ते कौतुक , त्याच्या वागण्यातली ती प्रेमळ अधीरता ओसरत असल्याचा भास होत होता तिला. 'नक्की काय झालंय ? हळूहळू रजत त्याच्याच कोशात गुरफटल्यासारखा होतोय ? का मलाच आपलं असं वाटतंय- उगीचच ! का आता त्याला माझी - माझ्या असण्याची, दिसण्याची इतकी सवय झालीये की त्याच्यासाठी त्यातलं नावीन्यच संपलंय ?' स्नेहाला काहीच कळत नव्हतं.... कारण काहीही असो, पण रजतच्या या अशा कोरड्या नजरेमुळे, त्याच्या indifferent स्वभावामुळे हळूहळू स्नेहानी पण आधीसारखं खास त्याच्यासाठी तयार होणं, त्याच्या आवडीनिवडी जपणं - हे सगळं कमी केलं होतं. सुरुवातीला तिला वाटलं होतं की रजत तिच्या या अशा वागण्याची दखल घेईल. एखाद्या लहान मुलाला जेव्हा कोणाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं तेव्हा ते मूल कसं मुद्दाम समोरच्या व्यक्तीला न आवडणारं काम करतं! - स्नेहाची अवस्था पण काहीशी तशीच झाली होती... पण आश्चर्य म्हणजे तिच्या वागण्यात झालेला हा बदल रजतच्या मात्र लक्षातही आला नव्हता; म्हणजे निदान त्यानी तसं बोलून तरी नव्हतं दाखवलं.... आणि त्यामुळेच स्नेहाचा प्रत्येक वेळी अजूनच हिरमोड होत होता .

कुठेतरी काहीतरी चुकत होतं .. पण चूक काय होती आणि कोणाची होती ? .... स्नेहा तिच्याच विचारांच्या भोवऱ्यात अडकून पडली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.

मंजू ला तिनी पुन्हा.
इथे तिनी ऐवजी तिने असं पाहिजे होत ना.

सामो, अजून दोनच भाग झाले आहेत. ही कथा आहे, दोन तीन भागांत संपणारी लघुकथा नाहीये. पुढचे भाग वाचून बघा, आवडेल तुम्हाला Happy