मन वढाय वढाय (भाग १)

Submitted by nimita on 31 December, 2019 - 23:00

"ए आई, तू खरंच जाणार आहेस का उद्या औरंगाबादला? आणि तेही चार दिवसांसाठी?" स्नेहाला तिची बॅग पॅक करताना बघून तिच्या मुलीनी श्रद्धानी तिला विचारलं. "हो, म्हणूनच तर ही सगळी तयारी करतीये ना!" एकीकडे सूटकेस मधे कपडे ठेवत स्नेहा हसून म्हणाली. तिचं ते उत्तर ऐकून श्रद्धाला मात्र एकदम टेन्शन आलं. स्नेहाला मधेच थांबवत ती म्हणाली," ओके, तू ठरवलंच आहेस तर जा पण मग बाबांना पण घेऊन जा बरोबर... तू घरी नसलीस की उगीचच चिडचिड करत बसतात ते.मला नाही जमत त्यांना हँडल करायला. मागच्या वेळी तू दोन दिवस आजीकडे गेली होतीस तेव्हासुद्धा- 'कधी एकदा आई परत येते'- असं झालं होतं मला...आणि आता तर तू चार दिवस जाणार!"

खरं म्हणजे श्रद्धाचा तो त्रागा बघून स्नेहाला हसू येत होतं. पण तिला हसताना बघून श्रद्धा अजूनच वैतागली असती, त्यामुळे आपला चेहेरा निर्विकार ठेवत स्नेहा म्हणाली," अगं, माझ्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींची reunion आहे, आमच्या बारावीच्या बॅचला पंचवीस वर्षं झाली म्हणून सगळे एकत्र जमणार आहोत. तिथे बाबा काय करणार ? आणि सगळे एकटेच येणार आहेत...'No spouses allowed'- असं स्पष्ट लिहिलं आहे invitation मधे! आणि तसंही, मी इथली सगळी सोय करूनच जातीये. सुमती मावशीना सांगितलंय पोळ्यांबरोबर बाकी पण सगळा स्वैपाक करायला. आणि इतर कामांसाठी मंजू येतेच ना रोज- तिला पण सांगितलंय संध्याकाळी सुद्धा एकदा येऊन जायला. त्याशिवाय पुढचा आठवडा भर पुरतील इतकी फळं, भाज्या स्टॉक करून ठेवलीयेत. संध्याकाळी चहा बरोबर खायला म्हणून चिवडा आणि चकल्या पण करून ठेवल्यायत. त्यामुळे तुम्हांला दोघांना काहीही करावं लागणार नाही. आणि तीनच दिवसांचा तर प्रश्न आहे, चौथ्या दिवशी मी येतेच आहे की परत !"

"अगं, पण प्रश्न काम करण्याचा किंवा न करण्याचा नाहीये. काम करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे 'बाबा'..." श्रद्धा अजूनच वैतागून आपली बाजू मांडत म्हणाली ,"तू नसलीस की त्यांना कोणाचंच काही पटत नाही. प्रत्येक बाबतीत चुका दिसतात त्यांना.. दर चार वाक्यांनंतर ऐकवतात- 'स्नेहा असली की कसं सगळं व्यवस्थित असतं'...."

श्रद्धाचं हे वाक्य ऐकून स्नेहा मनोमन सुखावली. रजत च्या तोंडून असं स्वतःचं कौतुक ऐकून बरीच वर्षं झाली होती. स्नेहाला लग्नानंतरची ती मंतरलेली वर्षं आठवली .. तिच्या प्रेमात भान हरपलेला रजत आठवला. तिच्या प्रत्येक गोष्टीचं किती अप्रूप वाटायचं तेव्हा त्याला ! तिचं दिसणं, तिचं नीटनेटकं राहाणं, तिचा फॅशन सेन्स , तिनी केलेली पेंटिंग्ज, तिच्या हातचा स्वैपाक...सगळ्या सगळ्याचं किती कौतुक होतं त्याला.. अगदी मनापासून ! आणि हे कौतुक त्याच्या शब्दांबरोबरच त्याच्या डोळ्यांतही दिसायचं स्नेहाला ....खरंच किती तृप्त झाल्यासारखं वाटायचं तिला अशावेळी ! 'आपण करत असलेलं काम हे आपल्या जोडीदाराला आवडतंय' या नुसत्या कल्पनेनीच तिला अजून हुरूप यायचा.

पण जशीजशी वर्षं सरत गेली तसं रजतच्या डोळ्यांतलं ते प्रेम, ते कौतुक हळूहळू आटत गेलं. त्याच्या तोंडून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्यासाठी स्नेहाचे कान तरसायला लागले. पण याचा अर्थ त्याला तिच्याबद्दल कौतुक किंवा प्रेम नव्हतं असा अजिबात नव्हता- आणि हे सत्य स्नेहा देखील जाणून होती. त्यानी जरी बोलून दाखवलं नाही तरी आजही त्याचं आपल्यावर तितकंच प्रेम आहे याची तिला खात्री होती. फक्त त्याच्या या भावना स्नेहाजवळ व्यक्त करणं तो जणू काही विसरूनच गेला होता. पण त्याच्या या अशा रुक्ष वागण्यामुळे त्या दोघांच्या नात्यात एक प्रकारची भावनिक दूरी निर्माण व्हायला लागली होती.

आणि म्हणूनच आज असं पडद्यामागचं तरी का होईना पण त्याच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून स्नेहाला खूप छान वाटत होतं.तिच्याही नकळत तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचं हसू झळकून गेलं.

"अगं आई, लक्ष कुठेय तुझं ? मी तुला काहीतरी विचारतीये आणि तू नुसतीच हसत बसलीयेस," तिचा चेहेरा आपल्याकडे वळवत श्रद्धा म्हणाली. एकदम भानावर येत स्नेहानी विचारलं," काय गं? सॉरी,माझं लक्ष नव्हतं.काय म्हणत होतीस तू?" तिच्या सामानाकडे इशारा करत श्रद्धा म्हणाली," मी म्हणत होते की तुमचा काही ड्रेस कोड वगैरे ठरलाय का?" तिच्या प्रश्नाचा रोख स्नेहाच्या लक्षात नाही आला. तिला असं गोंधळात पडलेलं बघून स्पष्टीकरण देत श्रद्धा म्हणाली," तू सगळे ब्लू शेड्स चे कपडेच पॅक केलेस म्हणून विचारलं गं!"

श्रद्धाचं ऑब्झरवेशन अगदी बरोबर होतं. आणि तिचं बोलणं ऐकून स्नेहाच्याही लक्षात आलं की खरंच तिनी स्वतःच्याही नकळत वॉर्डरोब मधून फक्त निळ्या रंगसंगती चे कपडेच सिलेक्ट केले होते. अचानक ती कावरीबावरी झाली.... जणू काही तिची चोरी पकडली गेली होती ! श्रद्धाची नजर चुकवत ती म्हणाली,"छे, तसं काही नाही गं; मी काही ठरवून वगैरे सिलेक्ट नाही केले हे आऊटफिट्स... It just happened." स्नेहाला असं एकदम टेन्शन मधे बघून श्रद्धा म्हणाली,"It's ok आई, chill... मी सहजच म्हणाले तसं. तुला इतकं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुझी reunion आहे. तुला जे हवं ते करू शकतेस तू." श्रध्दा बोलता बोलता एकीकडे स्नेहाला पॅकिंग मधे मदत करत होती. स्नेहाचं अर्धं लक्ष त्याकडेच होतं. श्रद्धा नी जेव्हा तिच्या व्हॅनिटी केस ला हात लावला तेव्हा पटकन ती उचलून घेत स्नेहा म्हणाली," राहू दे अगं, मी करते पॅकिंग. माझ्या खुणेनी सगळ्या वस्तू ठेवल्या की मग मला शोधायला नाही लागणार ना, म्हणून म्हणाले." त्यावर खांदे उडवत श्रद्धा म्हणाली,"ओके, as you wish. पण आई, तुमच्या डिनर नाईट च्या वेळी काय घालणार आहेस तू ?" पण स्नेहाच्या उत्तराची वाट न बघता ती पुढे म्हणाली," तू ना साडी नेस...ती तुझी turquoise blue रंगाची शिफॉन आहे ना- ती ! Blue colour suits you."

स्नेहाला एक flying kiss देत श्रद्धा तिच्या खोलीत निघून गेली. पण तिच्या त्या शेवटच्या वाक्यानी स्नेहाच्या मनात मात्र आठवणींचं मोहोळ उठलं....मनाच्या खूप खूप खोल, अगदी तळाशी दडवून ठेवलेल्या आठवणींचं मोहोळ ! आणि ते वाक्य तिच्या कानांत घुमायला लागलं.....

"Blue colour suits you..."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कई बार यू भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
अनजानी प्यास के पीछे
अनजानी आस के पीछे
मन दौडने लगता है

वाचतेय. पुलेशु.