ती, मी आणि बरंच काही . . .

Submitted by सोहनी सोहनी on 30 December, 2019 - 06:21

ती, मी आणि बरंच काही . . .

बंसिया बजैया मोरे कान्हा . . . अहिर भैरव ऐकत ती डोक्यातले सगळे विचार त्रास बाजूला सारून शांत डोळे मिटून त्या सुरांत मनाने दूरवर वाहून गेली होती.
हेच ते काही क्षण ज्यात मला ती खरीखुरी ती सापडायची, नाहीतर ह्या एवढ्याश्या जिवाच्या मनात, डोक्यात किती ते जंजाळ विचारांचे, इतरांच्या मनांचे, जबाबदाऱ्यांचे.
एरवी मी तिला असंच त्या क्षणांत वाहू द्यायचो आणि तिला पाहत बसायचो, ती त्यातून बाहेर येत नाही तोवर.
पण आज मी तिला हलवून हलवून उठवलं.
तिच्या कानातून हेडफोन काढून तो यूट्यूब वरचा अहिर भैरव बंद केला तशी ती त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहून रागावणार तोच मी सुरुवात केली.

तुला काय गरज आहे त्यांचं ऐकायची, आता अठरा वर्षे पूर्ण झालीत फक्त आणि लगेच लग्नाचं बघायला लागलेत, आणि तू चक्क होकार दिलाय. मला तिच्या ह्या निर्णयाचा यायला हवा त्या पेक्षा जास्तच राग आला होता.

"सतारा स्थळं पाहून देखील गेली आहेत, दोघांनी होकार कळवला आहे" बेफिकीरपणे ती म्हणाली.

आणि तू ??? मी काळजीने विचारलं.

"माझं काय आहे रे तिथे, मम्मा सांगेल ते, ती करेल ते, ती खुश आहे अजून काय पाहिजे मला" पुन्हा तोच बेफिकीरपणा, त्यात भर निर्विकार नजर.

तिची हि व्यक्त न होण्याची सवय आज मला असह्य झाली होती "मूर्ख आहेस का तू? मी जोरात खेसकलो तिच्यावर. सेकंड इयरला आहेस फक्त ना शिक्षण पूर्ण ना काही, आणि लग्नाचं काही कळतं तरी का तुला? एकदा झालं कि सुटका नाही गं, तुझं आयुष्य आहे नकार दे घरी सांग मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, लग्न नाही करायचं, बोलशील तर कळेल ना??"

तिने दुर्लक्ष केल्यासारखं पुन्हा कानात हेडफोन घातले, मला आता खूप राग आला म्हणून मी ते जोरात खेचून माझ्या खिशात टाकले.

तिला डिवचल्याशिवाय काही बोलत नाही ती, आता तर चांगलीच भडकली होती. ओरडलीच माझ्यावर जोरात

"का नकार देऊ? अरे मला स्वतःलाच त्या घरातून निघायचं आहे, खूप दूर जायचं आहे, सगळ्यांपासून खूप खूप खूप दूर, इतकं कि मला पुसटसा आवाज देखील येता कामा नये त्यांचा.
कंटाळली आहे मी त्यांच्या रोजच्या भांडणांना, रुसण्या फुगण्यांना. प्रेमाचा वात्सल्याचा लवलेश नाही त्या माणसांच्या मनात. सतत आपलं घोडं दामटवत चालले आपले पुढे. अरे मागे कुणी राहिलं, कुणी पडलं, कुणाला लागलं काही नाही फक्त आपण तेव्हढे खरे.
काय हवंय मला लहानपणा पासून सांग ना काय हवंय? थोडंसं प्रेम, कोणाकडून तेही आपल्या सख्ख्या आई वडिलांकडून.
अरे पप्पांचं एकवेळ ठीक आहे पण मम्मा? तिला कधी कळत नाही माझ्या मनातलं. मला का नेहमी गृहीत धरते ती? शेजाऱ्यापाजार्यांच्या मुलांवर भरभरून प्रेम करताना स्वतःचंच आसुसलेलं बाळ दिसत नाही तिला?"

डोळे ओलावतील आता म्हणून ती तिथेच थांबून मोठे श्वास घेत स्वतःला शांत करत राहिली काही क्षण. .

ह्यापेक्षा भरपूर काही आहे तिच्या मनात पण डोळ्यावर बंधनं ठेवली आहेत स्वतः, संगीताच्या सानिध्यात एकांताशिवाय इतर कुठेही तिचे डोळे ओलावत नाहीत. एकदा का डोळे ओले झाले कि मग त्यांवर नियंत्रण आणणं तिच्या नियंत्रणाच्या बाहेर असतं.
एक वेगळंच रसायन आहे ती माझ्यासाठी. . .

मी शांतपणे तिच्या डोळ्यांतले भाव टिपत राहतो आणि तिला ते लगेच कळतं आणि लगेच मूड बदलवते.
ज्या गोष्टीवर खरेतर तिने रडायला हवं असं मला वाटत होतं तीच गोष्ट ती हसत कि आपल्या मनातल्या रडण्यावर हसत सांगत होती देव जाणो.

"अरे करतात आमच्यात मुलींचे लग्न लहान वयात एवढं काय मनावर घेऊ नकोस तू, अरे त्या पाटीलांची ज्योती दहावी पास झाली आणि लगेच लग्न केलं तिचं, एका वर्षातच मुलगा पण झाला तिला.
माझं नशीब म्हणायचं मी इथपर्यंत तरी आली, आणि ते जाऊदेत रे, मज्जा तर ऐक.
साला कुणीही येतं पाहायला हा, माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठा, काही श्रीमंत लोकही येतात मोठी गाडी घेऊन, शिक्षण कमी, नीट नोकरीचा पत्ता नाही, असलेही येतात.
आणि मी काय करते माहियेत एका बाहुली सारखी नटते, माझ्या सावल्या सौंदर्याचं प्रदर्शन मांडते. मी तेव्हा चक्क लिपस्टिक लावते, ते फौंडेशन का काय ते ते पण लावते, जरा जास्त उजळ दिसायला.
लवकर लग्नाचा आटापिटा ह्याचमुळे कि मी काळी आहे." ती पुन्हा एकदा विषन्न हसली.

काळी म्हणजे फक्त सावळी, शुद्ध सावळी. गोरी म्हणता येणार नाही पण काळी तर नक्कीच नाही. अतिशय रेखीव चेहरा, बोलके डोळे आणि एक भावनाप्रधान मन.
मेकअप करायला अतिशय विटाळा असणारी एक सिम्पल मुलगी, एक छोटासा कुंकवाचा ठिपका कपाळी आणि तीची स्माईल, ह्यात ती इतकी मोहक आणि सुंदर दिसते ना कि खरंच एक मित्र सोडून एक मुलगा म्हणून विचार केला तर पाहता क्षणी आवडण्यासारखी नक्कीच आहे ती.

मलाही खूप आवडते ती खूप म्हणजे खूप पण . . . .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक वेगळी प्रेम कथा लिहण्याचा प्रयत्न करतेय. वातावरण गावाकडचं आहे, नेहमीच्या थीम पेक्षा खूपच वेगळी आहे. गावाकडचे प्रॉब्लेम, मानसिकता, वैगेरे मांडायचा प्रयत्न असणार आहे सो कशी होईल भीती वाटतेय. वाचून कळवा कशी आहे ते प्लिज.

गावाकडचे लोक, मुलगी अठरा वर्षांची झाली की लग्न करून देणारे
अशा घरातल्या मुलीला ते राग अहिर भैरव वगैरे कळत असेल का शंका आहे.+
तिला मित्र असणे आणि त्याच्या घरी जाऊन तिने राग अहिर ऐकत बसणे हेदेखील अशक्य वाटतेय.

> शेजाऱ्यापाजार्यांच्या मुलांवर भरभरून प्रेम करताना स्वतःचंच आसुसलेलं बाळ > हा प्रकारदेखील इमॅजिन करायला अवघड जातंय.

एनिवे पुभाप्र.

त्याच्या घरी नाही स्टेशनवर कॉलेज सुटल्यावर. पुढच्या भागात ते लिहलं आहे. वाचल्यास कळेल तुम्हाला.