झुमरू

Submitted by ऋयाम on 28 December, 2019 - 05:19

झुमरू साहेबांसोबत माझी कशी ओळख झाली, ते इथे सांगितलेच आहे.

झुमरू साहेबांकडून हॅण्ड-ओव्हर घेताना त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे एकेक पैलू समोर येत गेले आणि हळूहळू मी कधी त्यांचा फॅन होत गेलो, समजलेच नाही. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेकविध पैलू पाहताना मनात नेहेमी एक विचार येई, "एखादा माणूस एकाच वेळी इतका सगळा कसा असू शकतो? लोक ज्याला 'चालतंबोलतं विद्यापीठ' म्हणतात ते हेच तर नव्हे??"

* * *

साहेब आमच्या कंपनीमधे पूर्णवेळ नोकरी करीत. मात्र त्यांचे ऑफिसला येणे, हे काहीसे हॅलेच्या धूमकेतू प्रमाणे असे. काहीसे अशासाठी, कारण हॅले बापडा ७६ वर्षांनी का होईना, नित्यनेमाने येतो म्हणे. साहेब मात्र सोमवारी आले, तर मंगळवारी 'वर्क-फ्रॉम-होम'. पण बुधवारी आले, तर गुरुवारी येतीलच असे नाही. देशद्रोही ऑड-इव्हन पद्धतीपेक्षा, देशभक्त रॅण्डम नंबर पद्धतीचा त्यांचावर जास्तीचा प्रभाव असावा.

त्या सोमवारी दुपारी एक महत्त्वाची मिटींग असल्याने, आणि त्यात साहेबांसोबत मलाही काही प्रेझेन्टेशन करायचे असल्याने मी शुक्रवारपासूनच देव पाण्यात घालून बसलो होतो. साहेब गुरुवारी आणि शुक्रवारीही आले नव्हते. त्यामुळे नशीब काहीसे जोरावर होते.

सोमवार उजाडला. मण्डे ब्लूऽजशी लढाई करीत मी कसाबसा नऊ वाजता ऑफिसात पोहोचलो. आणि नाश्ता वगैरे करुन साडेनऊच्या सुमारास माझ्या जागेवर जाऊन बसलो. बाकीची जनता यायला अजून थोडा अवकाश होता. साहेबांना यायला तर बराच अवकाश. पण मिटींग दुपारी दोन वाजताची, असल्यामुळे तयारीला अजून थोडा वेळ होता. तेवढ्यात मेसेंजरवर साहेबांचा 'गुड मॉर्निंग < insert name>! , व्हेरी गुड मॉर्निंग (हेही स्वतःच ?!)' असा मेसेज दिसला.

"त्याचं काय झालं, मी आज 'ट्रॅव्हल' करणारच होतो, पण माझी 'वाईफ' म्हणाली, की आज 'अमावस्या' आहे, आज कशाला जाता? आणि मला तिला नाही म्हणवत नाहीये. ती मला सोडतच नाहीये. आता तुच सांग < insert name>, मी काय करू? हाहाहाहाहाहा! " झुमरू साहेब मला म्हणाले. असे बोलताना, त्यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात, मला इथे वीसेक किलोमीटर लांबूनही अगदी स्पष्ट दिसत होता.

साहेबांची शैली तशी विलक्षणच.
"कसंही चालेल". मी अजून काय म्हणणार होतो?

इथे साहेबांच्या शैलीबद्दल थोडेसे सांगावेसे वाटते. आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची त्यांची पराकाष्ठा सर्वप्रथम त्यांच्या हाताच्या रुपाने आपल्या जवळपास पोहोचते. बरेचदा स्पर्शही करते. इथे त्यांच्या हातवार्‍यांचा वेग त्यांच्या आवाजाच्या वेगाशी स्पर्धा करतो. आपला मुद्दा समोरच्याला समजला नसेल, तर त्याची गैरसोय नको, म्हणून त्याला न विचारता तोच मुद्दा पुन्हा एकदा दुसर्‍या शब्दात सांगण्याचा नेटकेपणा मी त्यांच्याकडूनच शिकलो.

मी नवा असताना कधीकधी माझी चूकही होत असे. पण सरावाने त्यांच्याशी बोलताना किमान एक फूट अंतर ठेवून रहावे, हा नियम मी स्वतःपूरता मान्य करून घेतला. कधीकधी मॅनेजरेतर वर्गासोबत सामायिक न करण्यासारखी एखादी गोष्ट सांगताना हा नियम मोडावा लागला, तर त्यांचे मत 4-D (include rain) मध्ये ऐकण्याची अनपेक्षित संधी मिळून जाई आणि दिवस धन्य होत असे.

तर मूळ मुद्दा ट्रॅव्हलचा सुरु होता. खरेतर साहेबांचे 'ट्रॅव्हल' हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. मात्र विस्तारभयामुळे तूर्तास इथेच अगदी थोडक्यात नमूद करू इच्छितो.

"आपण सारे एका मोठ्या काफिल्याचा भाग आहोत. (नॉर्मल शिफ्टमधे असू, तर) रोज सकाळी मजल दरमजल करीत आपापल्या कंपन्यांमधे जातो. तिथे जमेल ते काम करतो. कधी पाट्या टाकतो, चुनाही लावतो. मात्र एक गोष्ट जी अटळ आहे, ती म्हणजे ऑफिसपर्यंतचे 'ट्रॅव्हल'. "

साहेबांचे घर, आमच्या कंपनीपासून साधारण दीडेक तास अंतरावर होते. जाऊन येऊन रोजचा तीनेक तासांचा प्रवास कंटाळावाणाच खरा.
धाडस करून, "तुम्ही इथे ऑफिसजवळच भाड्याने घर का बघत नाही?" असे मी एकदा त्यांना विचारलेही होते.
"त्याचे काय आहे < insert name>," साहेब म्हणाले होते, "माझी धर्मपत्नी आमच्या घराजवळच एका शाळेत शिक्षिका आहे. she is a qualified teacher, you know.. तर, तिला तिची एवढी चांगली नोकरी सोडायला लावून मी इकडे कशाला येऊ ना"? हाहाहाहाहा < insert टाळी>!

"तसे पाहता, साहेबांकडून मला मिळणारा हॅण्डओव्हर, हा साहेब त्यांच्या मूळच्या गावी (वाचा परराज्य) जाण्यासंदर्भात विचार करीत असलेने मिळणार होता. तसे असेल, तर असेही त्यांच्या qualified शिक्षिका पत्नीला सध्याच्या नोकरीवर पाणी सोडावेच लागणार होते. मग इथे आहे तोपर्यंत प्रवासाचा वेळ कमी करून घेणे सोयीचे पडले नसते का?" असा चुकार विचार माझ्या मनात डोकावला. मात्र मोठ्या लोकांचा सहवास लाभला तरी त्यांची विचार करण्याची पद्धत, कार्यपद्धती, इत्यादी आपल्याला समजू शकेलच असे नाही हे काही वेळाने आपसूक उमगले आणि मी तो प्रश्न विचारायचे धाडस केले नाही.

साहेब ट्रॅव्हल करणार नाहीत, म्हणजे आज त्यांच्यासोबत जास्तीचा ओव्हरलॅपिंग टाईम मिळाला आहे. देव कोणाला कशा स्वरूपात मदत करेल, सांगता येत नाही. मी साहेबांसोबत तासभर काम करणेचा मानस मनी बाळगून असता, अचानक मिळालेले हे तीन तास मला अजूनच मोठे भासू लागले. मिळालेल्या ह्या जास्तीच्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, याचाच मी विचार करू लागलो.

मी आदल्या दिवशी थोडं काम करून एक फाईल तयार ठेवलेली होती. "(साहेब,) ही घ्या. मी एक फाईल ईमेलद्वारे पाठवली आहे. ती पहा. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो. ", असे मेसेंजरवर म्हणेपर्यंत, साहेब स्काईपवरच्या 'ऑनलाईन' मोडामधून अचानक , 'नारायण नारायण' म्हणत 'प्रेझेन्स अननोन' मोडात गेले.

मी त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागलो. पण फोन लागेना.
"फोन का लागत नाही?" असा विचार मनात येणार एवढ्यात त्यांचा फोन माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला!"

* * *

"हॅलोऽऽ. हॅलोऽऽऽऽ. " साहेब पलिकडच्या व्यक्तीशी बोलत होते. नीट ऐकू येत नसल्याने त्यांनी मोबाईल फोन असा समोर धरला, आणि स्पीकर ऑन केला. त्यांचा फोन तेव्हा मला नीट दिसला. त्या बापड्याने चारपाच फूट उंचावरून हेडफर्स्ट डाईव्ह केल्याचे स्पष्ट दिसत होते. आतला मालमसालाही थोडाफार बिघडलाच असणार, ज्यामुळे ऐकू येण्यातही कमीजास्त होत असेल, अशी शंका येत होती.

दहाएक मिनिटे स्पीकर फोनवर त्या बाईंशी बोलून झाल्यावर साहेबांनी फोन खाली ठेवला, आणि हसत हसत मला म्हटले, "काही नाही, पर्सनल लोन वाल्यांचा फोन होता." हाहाहाहाहा! "मी सांगितलं , "मला सध्या गरज नाहीये. मला आत्ता कंपनीत बोनस मिळणार आहे. त्यातून माझा खर्च भागू शकेल." < shakes hand>

****

एवढ्यात साहेब परत ऑनलाईन झाले, आणि मी जुन्या आठवणींमधून बाहेर आलो.

(क्रमश: )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol मस्त जमले आहे हे सुद्धा! पुन्हा सांगण्याचा नेटकेपणा, हातवार्‍यांचा वेग्/आवाजाचा वेग वगैरे जबरी Happy

कधीकधी मॅनेजरेतर वर्गासोबत सामायिक न करण्यासारखी एखादी गोष्ट सांगताना हा नियम मोडावा लागला, तर त्यांचे मत 4-D (include rain) मध्ये ऐकण्याची अनपेक्षित संधी मिळून जाई आणि दिवस धन्य होत असे. >>> हे वाक्य जरा खुर्ची मागे घेउन समजावून घ्यावे लागले Happy

बाय द वे चौथी मिती 'रेन' म्हणजे say it, don't spray it म्हणतात तो ही गुण आहे का या साहेबांकडे?

तू इतर गोष्टीत, व्हॉट्सअ‍ॅप मधे वेळ घालवण्यापेक्षा जरा इथे अजून लिहीत जा Wink

(वेडोबा - स्पेसिफिक नाव वापरण्याच्या ऐवजी ते इन्सर्ट नेम लिहीले आहे. आधीच्या लेखातही आहे बहुधा). ऋयामा - तेथे त्यापेक्षा ऋयाम म्हणूनच का लिहीत नाही?

भारीय हां प्रकार Biggrin
धन्यवाद फारएण्ड
ते ४डी प्रकरण समजले नव्हते ... तुमच्या विश्लेषणा नंतर सोप्पे झाले.

धन्यवाद. Happy

@फारएण्ड - हो, चौथी मिती तीच..

>>तू इतर गोष्टीत, व्हॉट्सअ‍ॅप मधे वेळ घालवण्यापेक्षा जरा इथे अजून लिहीत जा
Rofl हो, नक्की.

>>इन्सर्ट नेम
haha. Just hoping to start a trend :p