माझ्या दारी एक झाड

Submitted by _तृप्ती_ on 22 December, 2019 - 01:03

हिरव्या पानांनी डवरलेले, माझ्या दारी एक झाड
गुलाबी, लाल फुलांचा चढलाय नवा धुंद साज
वाऱ्यालाही पडतो मोह, साजिऱ्या या अंगणाचा
पानापानात शिरे झुळूक, शहारा मुलायम स्पर्शाचा
वारा नेतो वाहून, दरवळतो गंध दाही दिशा
सांगे गुज, येती पाहुणे, नांदती गाती गाणी
येती कधी पाखरे, बांधती घरटे, किलबिलती पिल्ले
झाडाने सामावले, बहरत गेले, आले गेले सारेच आपले
मीहीं गुंतले, पाहून दारीचे उमलणे, पानाफुलांचे गंधाळणे
आणि नित्याचेच झाले झाडाने साऱ्यांना भरभरून फुलवणे
एकदा नभ मेघांनी भरून आले, कोसळण्या अधीर झाले
झाडाचा मोह, अंगणी उतरले, पानाफुलांना स्पर्शून गेले
थेंबथेंब मोहक, सजला पानोपानी, आठवणींचा उमटे मोती
नवेच रूप, शोभते खास, झाडही दवबिंदूशी करे सलगीं
हिंदकळे हलकेच फ़ांदी, पर्ण-पर्ण तोलतीं मोत्याची माळा
देखणा तो सोहळा, अंगणी माझ्या उमलणाऱ्या साऱ्या कळ्या
रविकिरण उमटे, माला चमके, लेवून सोनसळी झळाळी
झाडाचे वेडे प्रेम, पाने, फुले, पक्षी गाती, मोत्याची बेधुंद गाणी
अन हाय तो आला वारा, हलले पान, क्षणात निखळले बिंदू सारे
थरथरले झाड, निष्प्रभ झाले, ढाळते अश्रू, पाहती हे घोंघावते वारे
कसे सहावे, हे असले क्षणाचे सौख्य अन अनंत काळाच्या वेदना
कसे कळावे, जीव लावते का कुणी, कसलाच विचार न करता
माझ्या दारी एक झाड, आता नुसतेच उभे, पानपान ढळे
बंध निसटले, गंध हरवला, रात्रीच्या अंधारात एकटेच रडे
माझ्या दारी एक झाड.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद वेडोबा, चिन्नू. मुक्तछंद म्हणता येईल याला. मला कविता लिहायला जसं सुचलं तसं लिहीत गेलं. माझा छंदांचा फार अभ्यास नाही, त्यामुळे तसं ठरवून नाही लिहिलं.