चंद्रकला

Submitted by मिलिंद महांगडे on 19 December, 2019 - 01:01

चंद्रकला

चावडीजवळच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसात सगळे जमले होते . एरवी कधीही न येणारे मेंबरही आज न चुकता हजर झाले होते . रात्रीचे नऊ वाजत आले तरी कुणी जाईना . प्रश्नच तसा उभा राहिला होता. अशा प्रकारचा प्रसंग गावावर कधी येईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं . सगळे जण एका विचित्र तणावाखाली बसले होते . कोणाच्याही तोंडातून एक चकार शब्द निघत नव्हता . थोडंसं खाकरून पाटलांनी विचारलं , " आरं असं किती वेळ बसून ऱ्हायचं ? बोला की काहीतरी . "
" पाटील , एकच मार्ग हाय ... समूळ नाश ! " कोणीतरी म्हणालं . त्यावर पुन्हा सर्व सदस्यांमध्ये गडबड सुरू झाली .
" हे बघा , आपापसात बोलू नका , हा प्रसंगच इतका विचित्र आहे ... अशी वेळ आपल्या गावावर पहिल्यांदाच आलिया ... तवा सगळ्यांनी विचार करून काय करायचं ते ठरवा " ग्रामपंचायतीचे एक जुने सदस्य म्हणाले .
" बरं दुसरा पर्याय हाय का आपल्यासमोर ? " पाटलांनी विचारलं . तेव्हा कोणीच काही बोलेना . " ठीक आहे , मग कोण करील हे काम ? " त्यांनी विचारल्यावर लोक एकमेकांकडे बघू लागले . कोणीच पुढं येईना . इतक्यात खांद्यावर घोंगडी घेतलेला रघुजी रामोशी पुढं आला आणि म्हणाला , " पाटील , मी करतु हे काम . पन दाम बी तसंच मिळालं पायजेल "
" दाम तू मागशील ते ... काय मंडळी ? " पाटील म्हणाले त्यावर सगळ्यांनी त्यांना दुजोरा दिला आणि सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी रघुजीची पाठ थोपटली . " जा , काम फत्ते करून या " रघुजी आणि त्याचे साथीदार कामाला निघालेही . चंद्रकलेचा चेहरा पाटलांच्या डोळ्यांसमोर आला . आज गावकऱ्यांच्या आणि सगळ्या गावाच्या हितासाठी चंद्रकलेचा मुडदा पडणार होता .
वरच्या आळीत कोपऱ्यावर एका पडक्या वाड्यात चार खणाच्या पडवीवजा घरात चंद्रकला राहात होती . मध्यम वयाची , सावळीशी , कपाळावर बंद्या रुपयाएवढं कुंकू लावलेली चंद्रकला त्या घरात एकटीच राहायची . मुलबाळ नव्हतं आणि तिचा नवरा काही वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता . गावच्या पाटलांना सांगून चौकीवर नवरा हरवल्याची तक्रारही नोंदवली होती , पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही . आता तिचं ह्या जगात कोणीच उरलं नव्हतं . अगदी मितभाषी , आपण भलं आणि आपलं काम भलं . इतर बायका दुपारची कामं झाली की एकमेकींच्या घरी जाऊन गप्पा टप्पा मारायच्या , पण चंद्रकला मात्र कुणाकडेच जात नसे . शेजारीपाजारी संबंधही अगदी मोजकेच ! गरजेपुरते . चंद्रकला कुणाच्या अध्यात ना मध्यात ... दिवस दिवस ती कोणाच्या नजरेलाही पडायची नाही . एखादी अडगळीत पडलेली निर्जीव वस्तू जशी असते तसं तिच्या आयुष्य झालं होतं . तिच्या अशा समाजापासून अलिप्त राहण्यामुळे , तिच्या भोवती एकप्रकारचं गुढतेचं वलय निर्माण झालं होतं . आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं ते त्या बेंदुराच्या सणाच्या दिवशी !
त्या दिवशी गावात बेंदूराचा सण होता . गावकऱ्यांनी आपापले बैल झुल वगैरे टाकून , शिंगांना रंगकाम आणि गोंडे लावुन सजवले होते . सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण होतं . आता थोड्याच वेळात मिरवणूक निघणार होती . ढोल ताशे वाजायला लागले , सर्व ग्रामस्थ आपापले बैल घेऊन रांगेने उभे राहिले . कुणीतरी फटाक्यांची मोठी लड लावली आणि पहिल्या रांगेतले दोन बैल बिथरले . इतके की ते उधळले , मालकाच्या हातातलं दावं निसटलं आणि ते सैरावैरा धावत सुटले . सगळीकडे एकच गोंधळ उडाला . जो तो आपापला जीव मुठीत धरून पळू लागला . पण एक लहान मुलगा नेमका भर रस्त्यात उभा होता .उधळलेले बैल त्याच्या रोखाने येत होते . एकदम गंभीर परिस्थती निर्माण झाली. उधळलेले बैल आता कोणत्याही क्षणी त्या लहान मुलाला चिरडणार होते . लोक एकदम ओरडले . बायकांनी डोळे झाकून घेतले . त्या मुलाची आई तर चक्कर येऊन खालीच पडली .पण इतक्यात एक चमत्कार व्हावा तसं झालं . एक हात त्या मुलाच्या जवळ आला आणि त्या हाताने मुलाला मागे खेचलं . मुलगा थोडक्यात बचावला आणि बैंल उधळत पुढे निघून गेले . त्या मुलाला वाचवणारा हात चंद्रकलेचा होता . आता वर वर पाहता ही घटना साधी सरळ सोपी दिसते . वाचतानाही काही लक्षात येत नाही पण , हा प्रसंग प्रत्यक्ष बघणाऱ्या काही चाणाक्ष गावकऱ्यांच्या एक गोष्ट बरोब्बर ध्यानात आली होती ती ही की चंद्रकला आणि त्या मुलांमध्ये वीस ते पंचवीस फुटांचं अंतर होतं . आणि तिने जागचं न हालता मुलाला वाचवलं होतं . हे कसं शक्य आहे ? चंद्रकलेचा हात वीस फूट लांबला होता आणि तिने मुलाला वाचवलं होतं . त्यानंतर तिथं एक क्षणही न थांबता चंद्रकला निघून गेली आणि ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा , की हे झालंच कसं ?
त्यानंतर मात्र सगळ्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली . जो तो त्या दिवशी जे घडलं त्याबाबत दबक्या आवाजात बोलू लागला. चंद्रकलेबाबत अनेक वावड्या उठायला लागल्या. कोणी म्हणायचं चंद्रकला मध्यरात्री स्मशानात जाताना दिसली होती . कोणी म्हणे चंद्रकला आरशात दिसत नाही , तिच्या घरी आरसाच नाही . तिला चेहरा बघायचा झाला तर ती रांजणातल्या पाण्यात बघते . कोणी म्हणे तिनेच आपल्या नवऱ्याला मारून टाकलंय आणि त्याचं प्रेत वाड्याच्या मागच्या आडात टाकून दिलं .... कोणी म्हणे चंद्राच्या कलेनुसार तिचा चेहरा बदलत जातो , अमावास्येला ती दिसत नाही , वगैरे वगैरे .... ह्यातलं किती खरं आणि कितो खोटं हे त्याचं त्यालाच ठाऊक , पण तिच्याविषयी आणि तिच्या वागण्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हे मात्र नक्की ! लोक तिच्या वाड्याच्या आजूबाजूला फिरकेनासे झाले . लहान मुलांच्या आयासुद्धा आपलं पोरगं तिच्या वाड्याच्या जवळ जाणार नाही ह्याची काळजी घेऊ लागल्या होत्या. दिवसेंदिवस तिच्याबद्दलच्या चित्रविचित्र गोष्टींमध्ये वाढच होत चालली होती . अमावस्या , पौर्णिमेला रात्री लोक घराबाहेर पडेनासे झाले . गावात एक विचित्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली . ह्यावर तोडगा काढण्यासाठीच आज ग्रामपंचायतीची मिटिंग घेण्यात आली होती . ही भुताटकी गावात नकोच ! असंच प्रत्येकाचं मत पडलं होतं .
बरीच रात्र झाली तरी कामगिरीवर गेलेली मंडळी परत आली नव्हती .
" आरं , किती वेळ झाला रं ? " पाटलांनी न राहवून विचारलं .
" साडे अकरा झालेत पाटील . आपले गडी अजून कसं येईनात ? " ग्रामपंचायतीचे सदस्य गावडेंनी विचारलं .
" तेच मलाबी कळना ... काय इपरित तर झालं नसंल ? " पाटलांनी शंका काढली . त्यावर सगळेच घाबरले. लोकांमध्ये चुळबुळ सूरु झाली . " तसं काय व्हायचं नाही म्हना .... आपलं काम फत्ते होईल " पाटलांनी सावरून घेतलं .
" पाटील , एखाद्याला धाडता का वरच्या आळीला ? काय चालू हाय ते तरी कळल " कोणीतरी शक्कल काढली .
" ए गपे ... तिथं काम चालू आसंल , त्यात कशाला अडथळा ? जरा कळ काडा ... " परस्पर कोणीतरी त्याला झापुन टाकलं .
" नको , नको .... थोडं थांबू .... " पाटलांनाही हे पटलं . ते बोलत असतानाच , अंगावर घोंगडी घेतलेली चार माणसं ग्रामपंचायतींमध्ये शिरली . त्यांना बघून पाटील जागचे उठले . तशी सगळीच बाकीची मंडळी उठून उभी राहिली . सर्वांच्या नजरेत एकच प्रश्न होता त्यावर रघुजी म्हणाला, " पाटील , काम फत्ते ! " आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी खुर्चीत अंग टाकलं . बाकीच्या लोकांनी देवाचे आभार मानले . त्यानंतर सगळी पांगापांग झाली . पाटील एकटेच त्यांच्या खुर्चीत बसून विचार करीत राहिले . आपण केलं ते योग्य की अयोग्य ? तिला गावातून काढून टाका असं काही जण म्हणाले . पण कोणत्या कारणासाठी काढायचं ? आणि हे असं समजल्यावर ती काय करील सांगता येत नव्हतं . गावात चंद्रकलेसारखी एखादी जिवंत हडळ चारचौघात बिनदिक्कतपणे कशी काय राहू शकते ? तिला कोणतीही संधी न देता तिचा काटा काढणं गरजेचं होऊन बसलं . पण तसं बघायला गेलं तर , चंद्रकलेचा तसा गावाला कसलाच त्रास नव्हता . ती बिचारी एकटी शांतपणे राहत होती . आपण भलं आणि आपलं काम भलं . तरीही आपण तिला मारून टाकली . कदाचित ती एखादी साधी बाई असेल , निरुपद्रवी ... तिचा नवरा गायब झाला तेव्हा आपण तिला मदत केली होती , त्या बदल्यात आपण तिच्याकडे जे मागितलं त्यावर तिने एवढं चिडायला नको होतं . ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं , पण ही बया निघाली मोठी पतिव्रता ! ह्या पाटलाच्या मुस्काडीत मारली त्या भवानीनं ! बरं झालं , काट्यानं काटा निघाला . पाटील खुर्चीतून उठू लागले , पण का कुणास ठाऊक त्यांचे खांदे एकदम जड वाटू लागले . कसेबसे ते उठले ,आणि समोरच्या आरशात सहज त्यांचं लक्ष गेलं . त्यांच्या मानगुटीवर चंद्रकला बसली असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांच्या छातीत जोरात कळ येऊन ते धाडकन खाली कोसळले .

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिने हात लांब करुन मुलाला वाचवले हे सगळ्या गावाने पहिले असंम्हणताय म्हणजे पाटलाने मुद्दाम तिच्या बद्दल खोटं
सांगुन तिला हडळ बनवुन तिचा अपप्रचार केला नव्हता हे उघड आहे.
जर ती खरंच हडळ असेल तर रामोशी तिला मारुच शकत नाही.

पाटलाने जर गावक-यांना मुद्दाम
सांगितलं असतं की हात लांब करताना मी स्वता पाहिलंय कोणाला काही माहीत नाही, पण पाटील बोलतोय म्हणुन पाटलावर विश्वास ठेवुन लोकांनी तिला हडळ मानलेय असं असतं तरच कथेचा जो शेवट केलाय त्याला अर्थ आहे.

ओढुन ताणुन ट्विस्ट निर्माणकरायचा प्रयत्न केला आहे.

नाही पटली.

एकाने 'मी असे असे पाहीले' म्हटले की बाकीचे त्यात भरच घालतात हे बघितलेय.
त्यामुळे पाटलाने जरी हे पसरवले असले तरी नंतर, कोणी पसरवले हे लोक विसरुन जातात.

पण इतक्यात एक चमत्कार व्हावा तसं झालं . एक हात त्या मुलाच्या जवळ आला आणि त्या हाताने मुलाला मागे खेचलं . मुलगा थोडक्यात बचावला आणि बैंल उधळत पुढे निघून गेले . त्या मुलाला वाचवणारा हात चंद्रकलेचा होता . आता वर वर पाहता ही घटना साधी सरळ सोपी दिसते . वाचतानाही काही लक्षात येत नाही पण , हा प्रसंग प्रत्यक्ष बघणाऱ्या काही चाणाक्ष गावकऱ्यांच्या एक गोष्ट बरोब्बर ध्यानात आली होती ती ही की चंद्रकला आणि त्या मुलांमध्ये वीस ते पंचवीस फुटांचं अंतर होतं . आणि तिने जागचं न हालता मुलाला वाचवलं होतं . हे कसं शक्य आहे ? चंद्रकलेचा हात वीस फूट लांबला होता आणि तिने मुलाला वाचवलं होतं . त्यानंतर तिथं एक क्षणही न थांबता चंद्रकला निघून गेली आणि ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा , की हे झालंच कसं ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे पाटलाने मुद्दाम नाही पसरवलं आहे, सगळ्यानी पाहिलं आहे असं लिहिलं आहे म्हणुन म्हटलं

मिलिंद
क्रिप्टो खुप छान चालू आहे, इथ काहीतरी गडबड वाटली पण अस समजू की चंद्रकला एक चांगली भूत आहे, पण जेंव्हा तिच्या नवऱ्याला कळलं तेंव्हा तो पळून गेला
ती आपलं सत्य कळू नये म्हणून अलिप्त राहायची पण त्या मुलाला वाचवण्यासाठी तिने तिची शक्ती वापरली, पाटलाने आपला हेतू साध्य करण्यासाठी ह्याचा उपयोग केला
तिला मारायला आलेल्याला तिने सोडून दिलं पण पाटलाला मात्र अद्दल घडवली