जाणीव : ३

Submitted by सोहनी सोहनी on 17 December, 2019 - 05:49

जाणीव : ३

निःशब्दतेचेही काही तीव्र स्वर असतात, जे शांतता चिरून अदृश्य बाणासारखे मनावर आघात करत राहतात, तीव्र आघात. कोण म्हणत स्वर त्रासदायक नसतात? माझ्या निःशब्दतेचे स्वर मनावर ओढून पहा.

माझी बंदिश, माझे स्वर माझी साथ सोडून गेले, कधीच न परतण्यासाठी. जिच्यासाठी गायचो जागायचो ती हात झिडकारातून गेली, माझ्या आयुष्याचा असा राग बनवून ज्याचे स्वर मला लावता येत नाहीत, एक असा राग ज्यात तिला माझी तीव्र इच्छा असून देखील वर्ज्य स्वरासारखी वगळता येत नाहीये. आणि, आणि त्यामुळे उद्रेक होतो माझा, माझ्या भावनांचा.
सतत सलत राहते तिने मला दिलेली वागणूक, माझ्याशी केलेली प्रतारणा, सूडाने नाही पण क्रोधाने तापत असतं हे मन कायम, तिच्यावर अंधपणे ह्या तानपुऱ्याच्या स्वरांसारखा आधारित राहिलो ह्याची तीव्र खंत असते.
माझा जीवनराग बेताल बेसूर केल्याचा राग आयुष्यभर राहील तिने तोडलेल्या ह्या मनाच्या तुकड्यांत. . .

त्या शांतपणे कि गंभीरपणे कळलं नाही माझ्या भरल्या डोळ्यांना, पण ऐकत होत्या मला. मी त्या क्षणीही क्रोधाने धुमसत होतो, स्वतःला शांत करत कपाळी उमटलेल्या आठ्या आवरत, स्वतःला शांत करत मी डोळ्यातलं पाणी पुसलं.

त्या पुन्हा माझ्या डोळ्यांत पाहत आपुलकीच्या हसल्या आणि पुढे म्हणाल्या,

शांत हो आधी, थोड़ा वेळ ऐक माझं,जे मी सांगेन ते ऐकून तुला पटलं आणि तुझे विचार किती उथळ आहेत अशी जाणीव झाली तर इथून गेल्यावर आधी तिला माफ केल्याचं कळव.

तुझ्याकडे जाणीवा संवेदना आहेत पण स्व आहेत. तुझ्याच पुरत्या, तुला तुझं दुःख कळलं आहे पण तिचं दुःख ??
तू म्हणालास तुझं आयुष्य जे काही दिवसांपूर्वी तुमचं आयुष्य होतं, दोघांचं मिळून एक आयुष्य. मग तुझं एकट्याचं आयुष्य उध्वस्त झालं???? खरंच ???

एखादा मिश्र राग, 'पुरिया कल्याण' समजू, पूर्वांगात पुरिया धनश्री राग आणि उत्तरांगात यमन राग असा हा दोघांचा मिळून एकजीव नवीन राग. एखाद्याचा कोमल रिषभ लागला नाही किंवा पूर्वांगांचा पुरिया अंग जमला नाही, तर तू म्हणशील का ह्याला पुरिया जमला नाही ?
नाही ना. मग काय म्हणतो आपण?? तर आपण म्हणू कि त्या व्यक्तीला 'पुरिया कल्याण' जमला नाही.

मग आता सांग तुझं एकट्याचं आयुष्य उध्वस्त कसं? प्रेम नव्हतं तिचं तुझ्यावर ? लग्नानंतर कधी विचारलंस तिला कि सुखी आहेस का म्हणून??
तिने घरवाल्यांना निवडलं, तुझ्यावर अन्याय झाला, पूर्णपणे मान्य. पण तिच्यावर, तिच्या भावनांवर अन्याय नसेल झाला??
.

गाणं बंद केलं म्हणजे नक्की काय ?? रियाज बंद केलास ना? जास्तीतजास्त गुणगुणणं देखील बंद केलं हेच ना.
मग ऐकतोस का?? कोणासाठी आणि कश्यासाठी. आत्मिक शांततेसाठी तिथेच शरण जातोयेस आजही, बरोबर ना??

गाणं म्हणजे शिकून पाठ करून आहे तसं म्हणणं, हे गाणं असतं?? शास्त्रीय संगीत म्हणजे नुसतं गाणं नाहीये. एकदाका हे मनाला भिडलं ना मग सुटका नाही, हवीहवीशी सुखद कैद म्हण हवेतर ज्यात बुडून आयुष्यभर तरंगत राहावं अशी.
स्वतःशी जुडण्याचा, स्वतःला शोधण्याचा, स्वतःशी व्यक्त होण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे शास्त्रीय संगीत.

तू गात नाहीयेस कारण तू व्यक्त व्हायला घाबरतोय, तू ते आवरण भेदायला घाबरतोयेस ज्याच्या खूप खोल खरा तू आहेस, आणि त्याला रडणं नाही व्यक्त होणं, त्या दबलेल्या भावनेला मुक्त करणं होय.

विचार करायला लागेल असा एक किस्सा सांगेन तुला, मग काय घ्यायचं आणि काय वाहू द्यायचं ते तू ठरव.

तुझ्या बंदिशी सारखी मी हि कोणाच्यातरी जीवनरागाची बंदिश होते, तो स्वर व्हायचा आणि मी भावना, तो राग मी त्याच्यात बद्ध बंदिश.
लहानपणापासून गायचे मी आणि तोही. लहानपणापासूनच एकमेकांचे होऊन गेलो होतो. मोठेपणी गरीब आणि श्रीमंत या विषमतेने माझ्या घरी युद्ध पेटलं. माझ्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न उभा ठाकला. मला दोघांपैकी एक निवडायला लावलं.
स्वतःच्या हाताने स्वतःची स्वप्ने उधळीत मी आईवडिलांना निवडलं, लग्न देखील केलं त्यांनी सांगितलं तिथे.
एकाच महिन्यात त्याने स्वतःला ह्या विश्वातून वर्जित केलं.
लग्न झाल्यावर एकदा भेटला होता शेवटचा. मी पायावर पडून माफी मागत होते त्याची, माहितेय काय म्हणाला.
"'माफी माझी मागून तुझ्या मनातल्या जीवघेण्या ताना माझ्यापासून लपतील असं वाटतं तुला,? लहानपणा पासून आता पर्यंत ज्याला साथीदार मानून मोठी झालीस, ज्यावर जीव ओवाळालास, त्याच्या जागी एखाद्या अनोळख्याला स्वीकारण्याचंच दुःख मला कळणार नाही का??
डोळे बंद करून ज्याची छवी स्मरून स्वरांना भावनेच्या अधीन करताना अचानक वाटणं कि आता त्या छवी ला आठवण चूक आहे, आणि मनात निर्माण होणारे ते द्वंद्व ती अगतिकता मी समजू शकतो किमान तुझ्या तरी.
स्वप्नी रंगवलेल्या प्रणय रसातील राजकुमारा ऐवजी दुसऱ्याच कुणा राजकुमाराला स्वाधीन होण्याची तगमग, मनाचा त्रागा, मनाला होणारे आघात किमान तुझे तरी मी समजू शकतो. . .
पण आता एक कर, जे निवडलं आहेस मनापासून निभाव, सुखी राहा.
गात राहा, स्वतःशी व्यक्त होतं राहा, मनातील भावना मुक्त करत राहा. . ."'

मला त्याला काही सांगावं लागलं नाही, माझ्या अश्रूंनी त्याला सगळं कळलं होतं.
माणसं खूप भेटतात पण मन खूप कमी . . . माझं आणि त्याच मन कधीच भेटलं होतं.

पुन्हा एक चूक केली तो भेटला तेव्हा त्याच्या वरून दिसणाऱ्या संथ मनाचा ठाव मी घ्यायला विसरले आणि कळलं तेव्हा वाटलं नव्हतं तो असा करेल पण माझा जीवनराग एक संधिप्रकाश राग बनवून तो अनंतात विलीन झाला.
मला एक अशी जाणीव देऊन जी फक्त स्वरांनी व्यक्त होऊ शकली.
आणि मग गात राहिले, आळवत राहिले त्याला त्याची बंदिश होऊन, शेवटच्या श्वासापर्यंत . . .

म्हणून तुझ्या जीवनरागाची क्रोधाने दिशाभूल करू नकोस, आणि त्या बंदिशीला देखील नवीन रागात गुंतायला मोकळं कर . .

पूर्णतः आणि अपूर्णता दोन्हीही प्रेमाच्याच बाजू आहेत. दोन्ही सांभाळायचं बळ तुमच्यात असेल तरच खरं प्रेम केलं समजायचं. राग आणि क्रोध उथळ प्रेमाच्या खुणा आहेत, ज्यात मन एका ठोकरीने देखील उलथून रिक्त होतं आणि खरं प्रेम एक स्थिर, अचल आणि खोल जाणीव आहे, ज्याला जाणवते तो अपूर्णतेत देखील सुखी राहतो.

माझ्या खऱ्या अर्थाने वाहणाऱ्या डोळ्यांतून त्यांना जी जाणीव माझ्या मनातून वर आणायची होती ती त्यांच्या डोळ्यांत देखील उमटली होती.
मी तिला त्याच क्षणी माफ केलं होतं. उलट मलाच तिची माफी मागावीशी वाटतं होती तिच्याशी मी जे वागलो त्याची, तिच्या आधीच दुखावलेल्या मनाला अजून दुखावल्या बद्दल.

पश्चातापाने माझे अश्रू अनावर झाले होते, ताईंनी सावरलं मला, म्हणाल्या आपला जीवनराग आपणच गायचा असतो, कारण तानपुऱ्यावर गाणारा तानपुऱ्याच्या तार सुरांवर विसंबण्या आधी तानपुऱ्याचे स्वर तोच लावतो. . .

उद्या येशील तेव्हा तू गा आणि मी ऐकीन. काहीही गा फक्त आतून गा. . .

माझ्या 'ति'ला मी काल संध्याकाळीच भेटून माफी मागितली. तिच्या वाहणाऱ्या अश्रुंमधून माझे माझ्यातच दडलेले स्वर नव्याने जाणिवेत भरून उरले.

आज मी अगदी वेळेत पोहोचलो, फाटकाची कडी बाहेरून लागलेली होती, कसं शक्य होतं ते? मी रोज यायचो तेव्हा फाटक पूर्णपणे उघडं असायचं.
मी काही क्षण तसाच बाहेर उभा होतो तोच एक वयस्क आजी कुंपणाच्या आतून फुल तोडून ताईंच्या बंगल्यात घुसल्या. मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं ह्या आधी.
मी आत जायला त्या वरच्या खोलीत गेल्या, जिथे भैरवीजी तानपुरा रियाजानंतर ठेवायच्या.
खिडकीत तानपुरा त्याच जागी होता पण त्याच जागी भैरवी ताईंची मोठी प्रतिमा नुकत्याच घातलेल्या ताज्या फुलांच्या हातातून माझ्याकडे प्रसन्नतेने पाहत होत्या. . .

मी जागीच कोसळलो, शुद्धीवर आलो तेव्हा कळलं त्या आजी ताईंच्या आई होत्या. ताईंविषयी विचारलं तर रडत रडत म्हणाल्या
लग्नाच्या दीडेक महिन्यांनी घरी आल्या होत्या आणि रियाजाला बसल्या असताना अचानक हृदयात कळ येऊन गातागाताच हे जग सोडून गेल्या होत्या.

आताचे माझे अश्रू वेगळ्या जाणिवेचे आणि त्यांच्या आईचे वेगळ्या जाणिवेचे होते. . .

ताईंच्या 'त्या'च्या निधनानंतर ताईही लगेच म्हणजे ताई म्हणाल्या त्या वाक्याचा अर्थ मला मला कळला
"आणि मग गात राहिले, आळवत राहिले त्याला त्याची बंदिश होऊन, शेवटच्या श्वासापर्यंत . . ."

आजी गेली कित्येक वर्षे इथेच राहतात त्यांच्या म्हणण्यानुसार मी आत कधीच आलो नव्हतो, मला त्या ओळखत नव्हत्या आणि मी सुद्धा. . .
मग ह्या काही दिवसांत कोणाला भेटत ऐकत होतो???

ताईंनी अजून एक जाणिवेची ओळख करून दिली होती 'स्वीकार' मी जे घडलं ते स्वीकार केलं, मनातून त्यांच्या पवित्र आत्म्याला वंदन केलं.

ताई म्हणाल्या होत्या त्यांना मला ऐकायचं होतं आज, मी हिम्मत करून त्यांच्याच तानपुऱ्यावर आमच्या मनातील जाणिवेच्या मैफिलीचा शेवट वीणाताईंची भैरवी गाऊन केला . .

" माँ भैरवी भवतारीनी, माँ भक्तजन भय हारीनी
आदी राग प्रिया पुलित, भक्तिभाव प्रदायिनी"

त्या प्रतिमेतून प्रसन्नतेने माझ्याकडे पाहणाऱ्या ताई "गात राहा, स्वतःशी व्यक्त होतं राहा, मनातील भावना मुक्त करत राहा. . ." असं म्हणाल्याचं मला जाणवलं . . . .

तिथून परतताना जगण्यातली खरी जाणीव घेऊन आलो. . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults