थरारक : ६

Submitted by सोहनी सोहनी on 15 December, 2019 - 04:36

थरारक : ६

अंगाला कुठे काय लागत होतं, कुठून रक्त निघत होतं काहीच समजण्याच्या पलीकडे गेलेला मी धाडकन वरच्या दिवाणखान्यात आपटला गेलो. शुद्ध हरपताना अंधुक दिसलं ते मधू बाईसाहेबांच्या एका हातात आजी होती. मला केलेल्या मदतीची ती सजा होती. बाईसाहेबांनी केसांना घट्ट पकडलेली आजी, आजीची करुण, वेदनादायी नजर माझ्यावर पडली आणि माझेही डोळे मिटले, त्या क्षणी मिटलेले डोळे शेवटचे असावेत असं मनापासून वाटलं होतं कारण मी जिवंत असताना देखील मी आजीची मदत करायला सक्षम नव्हतो.

ना जाणे किती वेळ मी तसाच पडून होतो. शुद्धीवर आलो तेव्हा समोरच आजीचं प्रेत पडलं होतं, मी जिवाच्या आकांताने किंचाळलो. स्वतःचे आई वडील गेले तेव्हा किती दुःख झालं होतं माहित नाही पण आजीच्या देहाची ती अवस्था पाहून खूप रडलो, आतून काळीज तुटलं.

आजूबाजूला पाहिलं तर दिवाणखान्यातील सगळी दारे खिडक्या उघड्या होत्या, वारा सुसुसु करत आत येत होता, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अंधार पडला होता. ह्याचाच अर्थ मी जवळपास पूर्ण दिवस आणि एक अर्धी रात्र बेशुद्ध होतो.
म्हणजे आता ह्या क्षणाला ह्या वाड्यात मी आणि ती दोघेच होतो. सरसरून काटा आला अंगावर. म्हणजे आज आता ह्या मध्यरात्री काहीच क्षणात मी मरणार होतो. ह्या विचारानेच माझं संपूर्ण शरीर थरारून उठलं.
माझ्या मनात मृत्यूच्या भीतीची चादर पसरली, घनदाट अंधाराने विणलेली. तितक्यात त्या खोलीतून मधुबाईसाहेब बाहेर आल्या.
हृदयातून एक जीवघेणी कळ मेंदूपर्यंत धावली त्यांना पाहून.

वाऱ्यावर किंचित उडणारी तीच ओली केसं, जागोजागी फाटलेली ओली साडी, डोळ्यांत अंगार आणि हिंस्र भाव, मधू बाईसाहेबांचं शरीर असल तरी चेहऱ्यावर असावारीची झाक स्पष्ट दिसत होती.

"बरीच हिम्मत आहे रे तुझ्या एवढ्याश्या जीवात, वाटलं नव्हतं इतका खेळशील, पण आता खेळ संपलाय, तुझी देखील तीच हालत होईल जी इतरांची केली मी" कर्णकर्कश हसली ती, पूर्ण वाडा दणाणून उठला, जणू भिंतीही तिच्या आवाजाने थरारल्या.
मी कानावर हात ठेवून कान दाबले. तिने माझ्या केसांना पकडलं आणि मला ओढत नेलं. मी स्वतःला, स्वतःच्या जीवाला तिच्या स्वाधीन केलं. डोळे मिटले, मृत्यूच्या भीतीपेक्षा अजून दुसरी कसली यातना माझ्या मनावर येत नव्हती.

सोसाट्याचा वारा सुटला होता, रणांगण पेटल्यागत अंधारात देखील धुळीचे लोट उठले होते, माझा हात धरून मला कुणीतरी हळूहळू पुढे नेत होतं, डोळे उघडे होते पण माझे श्वास ???? . . . . . . .

माझे श्वास चालू होते कि नाही माहित नाही, डोळ्यांनी आता सगळं दिसत होतं, ऐकू येत होतं पण जाणवत काहीच नव्हतं, जाणिवा मेल्या होत्या जणू, डोळ्यांचं कार्यच पाहण्याचं म्हणून समोर जे घडेल ते पाहत होतो. मेलो होतो मी तेव्हा कदाचित.
तिने हाताला धरून मला त्या विहिरीजवळ नेलं, मला त्यात ढकलणार तोच "ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय" जाप करत केशरी सोवळे नसलेल्या व्यक्तीने मला मागे खेचलं.
अप्पा आले होते माझ्या मदतीला, तेजस्वी मुख, डोळ्यांत मी तुझ्यासाठीच आलोय हि भावना आणि तुला काही होऊ देणार नाही अशी शाश्वक आधाराची नजर.
म्हणजे त्यांनी काल रात्री मला पाहिलं होतं, अपेक्षा नसताना ते इथे आले होते, कदाचित मधू बाईसाहेबांचे प्राण वाचणार होते.
मी खाली कोसळलो, ती चौताळली. अप्पांच्या नामस्मरणाने तिला भयंकर त्रास होतं असावा, तिने कानांवर हात ठेवला जोरात किंचाळली, इतकी हि आजूबाजूची झाडे देखील थरारली.

तिने अप्पांना रोखण्याचा प्रयत्न केला पण नकारात्मक शक्तीच सकारात्मक शक्तीपुढे काही चाललं नाही, म्हणून काही न सुचून ती त्याच विहिरीत गुडूप झाली. आप्पांचे शब्द मला ऐकू येत होते. मधू बाईसाहेबांना वाचवण्यासाठी त्यांनी तिच्याशी साधलेला शाब्दिक सव्वाद देखील माझ्या कानावर येत होता.

अप्पा तिला विनवणी करत होते, समजावत होते, मधू बाईसाहेबाना सोड म्हणत होते.
आतून बुडबुड आवाज यायला लागले, मधू बाईसाहेबांचा श्वास कोंडला असावा.

"तुझे अपराधी नसलेल्या जीवांचे प्राण घेऊन तुही त्याच नराधमांच्या रांगेत आलीस ज्यांनी तुझं आयुष्य उध्वस्त केलं, सोड त्या निष्पाप जीवाला"

बुडबुड जोरात येऊ लागले, तसे अप्पा विहिरीत उडी टाकणार तोच मधू बाईसाहेबांचं शरीर विहिरीतून बाहेर फेकलं गेलं त्वेषानं.
त्यांचं काय झालं हे पाहायच्या आधीच अप्पांनी शिवाला स्मरून काही बेलाची पाने आणि काही धोत्र्याची फुले विहिरीत फेकली कदाचित ती देवाला अर्पण केलेली असावीत. स्मशान शांतता पसरली.
अप्पा वेगाने मधू बाईसाहेबांकडे धावले पण वेळ निघून गेली होती, त्या केव्हाच्याच निष्प्राण पडल्या होत्या.
तितक्यात जोराने एक काळी सावली विहिरीच्या बाहेर निघायचा प्रयत्न करू लागली आणि काहीच क्षणांत खाक होऊन विरून गेली.

- म्हणतात ना नामस्मरणाचा एक अंश देखील पर्वताएवढ्या काळ्या शक्तीला संपवायला पुरेसा असतो.
आराध्य शिवाला वाहिलेल्या एका बेलपत्रात देखील त्या काळ्या शक्तीला संपवण्याचं सामर्थ्य होतं.

त्या अचेतन अवस्थेत देखील माझ्या उघड्या डोळ्यांतून खळखळून पाणी आलं. काय चूक होती, आजीची, गोदाआईची, मधू बाईसाहेबांची ज्यांना दुसऱ्यांच्या पापकृत्याची किंमत मोजावी लागली तीही जीव गमावून.
इतकंच काय तर मधू बाईसाहेबांच्या दोन भावांची आणि इथे काम केलेल्या आधीच्या तीन माणसांची देखील काय चूक होती? जे नाहक प्रतिशोधाच्या अग्नीत भस्म झाले.
आणि हे सगळं कृत्य करायच्या आधी, प्रतिशोधात जळण्या आधी, जीव गमावण्या आधी, आब्रू लुटण्याच्या आधी असावरीची देखील काय चूक होती????
पाप केले कुणी आणि होरपळले गेले कोण, नाहक मेले कोण . . . .
अगणित प्रश्न घेऊन मी अप्पांच्या तेजस्वी मूर्तीकडे पाहिलं,

अप्पांनी माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी डोळे मिटले. . .

https://www.maayboli.com/node/72708 - थरारक : ५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली कथा आहे.
मधू वाचून स्वप्नवत सुखांत झाला नाही हे एक प्रकारे वास्तववादी.

मधू वाचून स्वप्नवत सुखांत झाला नाही हे एक प्रकारे वास्तववादी.???
म्हणजे काय हो?? कळलं नाही, सांगाल का प्लिज

'वाचून' म्हणजे 'मधूचा जीव वाचून कथा नॅरेटर चे मधूशी लग्न' असा किंवा तत्सम सुखांत शेवट न होता वास्तव वादि शेवट झाला हे चांगले झाले असे म्हणायचे होते.(इतक्या मोठ्या शक्तीशी सामना पूर्ण पूर्ण सुखांत होऊच शकला नसता म्हणून.)

ओह सॉरी, आधी कळलं नव्हतं.
धन्यवाद समजावून सांगितल्या बद्दल.
प्रतिक्रियेसाठी देखील मनापासून आभार. . .

अप्पा आणि अमानवीय शक्तीची लढाई अजून जास्त रंगवायला पाहिजे होती. ती गुंडाळली आहे असं वाटलं. बाकी सगळी कथा एकदम भारी, जबरदस्त. भाग पण भराभरा टाकलेत.

सगळ्यांचे मनापासून आभार.

हो मला हि तो भाग रंगवावासा वाटला, पण नंतर वाटलं जिवंतपणी देखील भोग भोगले मुक्त होताना सहजासहज मुक्त होऊदेत.
कदाचित ह्या विचारामुळे शेवट जरा सपाट वाटतोय पण . . .
बघुयात पुढच्या एखाद्या कथेत रोचक शेवट देऊयात.

कथा संपली का? मला वाटलं अजून एक भाग येईल. आप्पा काहीतरी बोलतील . पहिल्या भागात जिथे कथा सुरू होते त्या पॉइंटला जाऊन पुढे कथानायक कसा सेटल होतो याबद्दल काही येईल असे वाटत होते.

सर्व भाग वाचले. सुंदर रहस्यकथा , कुठेही कन्टाळवाणी झाली नाही. घटना वेगाने घडत गेल्या. त्यामुळे उत्कंठा वाढत होती. खूप छान

सर्व भाग वाचले. सुंदर रहस्यकथा , कुठेही कन्टाळवाणी झाली नाही. + ११११
सगळे भाग वाचले. मस्त लिहिली आहेस ग.