गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : (अंतिम) भाग ५ : गुरुशिखर- चरणपादुका दर्शन

Submitted by निलाक्षी on 9 December, 2019 - 01:10

आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे. ज्याची बोटे इतकी रेखीव ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसायला कशी असेल. पादुकांभोवती कुंपणाप्रमाणे स्टीलच्या सळया उभ्या लावल्या आहेत. आपण लांबूनच दर्शन घ्यायचे. मागे गर्दी खुप होती, म्हणून प्रदक्षिणा करतच आम्ही बाहेर पडलो. याचसाठी केला होता सारा अट्टाहास.. मी इतके चढून वर पोहोचले होते, कोणत्याही थकव्याशिवाय.. मन तृप्त झाले होते. धीरगंभीरता मनात खोलवर उतरली होती. गोरक्षशिखरापासून दत्तशिखरापर्यंत आम्हाला जवळ जवळ ३/३.३० तास लागले होते. पण इतकावेळ कसा गेला आजिबात कळले नाही.

रांगेत उभे असताना खडकावर पडणार्‍या सावल्या:

20191112_073641.jpg

आता उतरायला सुरवात. मनातून तिथून जाऊच नये असे वाटत होते. पण जाणे भाग होते. आम्ही परत कमंडलू तीर्थाच्या रांगेत उभे राहिलो. इथे एकदम शिस्तबद्ध कारभार होता. आधी धुनीचे दर्शन घ्यायचे, मग प्रसादासाठी दुसऱ्या मंडपात जायचे. तिथून बाहेर येऊन तीर्थ प्राशन करायचे मग बाहेर. इथेही बरेच लोक सेवेसाठी जाऊन रहातात. अखंड अन्नदान इथे केले जाते व येथील प्रसाद आवर्जून घेतला जातो. येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. त्यात अनेकांना दत्तगुरूंचे दर्शन झालेले आहे. असं म्हणतात की दत्तगुरु जेंव्हा तपस्या करत होते तेंव्हा जुनागडमधे दुष्काळ पडला, म्हणून अनुसया मातेने त्यांच्या तपश्चर्येला थांबवून आजूबाजूची परिस्थिती त्यांना सांगितली. त्या प्रसंगी त्यांनी कमंडलू खाली फेकला, त्याचे कमंडलू तीर्थापाशी २ तुकडे झाले. एकातून अग्नी निर्माण झाला, तर एकातून पाणी. असे हे कमंडलूपासून निर्मिलेले कमंडलू तीर्थ.

इथे आम्हाला गरम गरम खिचडी, भाजी, दलीयाचा गुळाचा शिरा असा प्रसाद मिळाला, तोही सकळी सकाळी ८.३०च्या सुमारास. एकदम चविष्ट. सकाळी सकाळी एवढे अन्न गरमा गरम बनविणाऱ्या व वाढणाऱ्या सेवेकऱ्यांची कमाल वाटली.
आम्हाला असे सांगितले होते की वर बऱ्याचदा तीर्थ बाटलीत भरून देत नाहीत तेंव्हा बाटली नेऊ नका. पण आज बाटलीतही तीर्थ देत होते. त्यांना उन्हाळ्यात अक्षरश: १ गडूमधे आंघोळ, कपडे धुणे करावे लागते तरी अन्नदानात कधी खंड पडत नाही. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. इथे एकूणच वर शिधा आणणेही खूप कष्टाचे आहे. अनेक लोक थोडाफार शिधा, पैसे असे दान देतात. आम्हीपण केले. आम्हाला दत्तगुरूंचा फोटो व प्रसाद भस्मासह मिळाला.

हे सगळ करून येईपर्यंत बरेच वाजले असणार. आता आम्ही आश्रमात पोचल्यावरच वेळ पाहिली. आता १५०० पायऱ्या चढून गोरक्ष शिखर गाठायचे, मग अंबाजी. परत गोरक्षांचे दिवसा उजेडी दर्शन झाले. आता मोक्षाची गुहापण दिसली. त्याला पापपुण्याची गुहापण म्हणतात. गुहाम्हणजे छोटासा बोगदाच आहे. त्यातून सरपटत सरपटत बाहेर पडायचे. मी डोके आधी घालायच्या ऐवेजी पायाकडून शिरले आणि बाहेर पडले. तर लोक म्हणायला लागले हे चुकीचं आहे, परत जा आणि डोक्याच्या बाजूने शिरा. मी म्हटले अहो असतं एखादं बाळ पायाळू..:)

काही रस्त्यातले फोटो :
20191112_065934.jpg20191112_074923.jpg20191112_083414.jpg

तिथून अंबाजी माता शिखर गाठले. इथे एका दुकानी, आधी आलेल्यांचे चहापान चालू होते. मी लिंबू सरबत घेतले. रात्रीतून पाणी असे प्यायलेच नव्हते. खाली तीर्थावरही अगदी अर्धा ग्लास प्यायलेला. आता लिंबूसाखरेने अजून ताजंतवान वाटलं. अंबाबाईच्या मंदीरात गेले. आता गर्दी कमी झाली होती. चढणारे तर जवळपास कुणी नव्हतेच. अंबेचे मंदीर अगदी शांतपणे आतून पहायला मिळाले. देवी तर थेट आमची रेणुकामाताच. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे ऐकले होते म्हणून पुजाऱ्यांना विचारले की देवीच्या कुठल्या अवयवामुळे हे स्थान निर्माण झाले. त्यांनी नाभी असे सांगितले. स्थानिक लोक बऱ्याचवेळा इथपर्यंत येऊन मातेचे दर्शन घेतात आणि खाली जातात असेही सांगितले. आता पुढचा टप्पा जैन मंदीरे.

जैन मंदिरांचा समूह इथे वसलेला आहे. ती दिसतातही खूप सुंदर. बरेच कोरीवकाम केलेली अनेक मंदीरे आहेत. त्यातील शिवमंदीर प्राचीन आहे असे म्हणतात. जाताना पटापट अंबामाता शिखराला पोहोचलो होतो. येताना मात्र वेळ लागला. त्यात मधे मी गोमुखी गंगेचे दर्शन घेतले तिथेही वेळ गेला. कितीतरी वेळ मंदिरे नुसती लांबूनच खुणावत होती. पण शेवटी एकदा त्यांच्या जवळ पोचलेच. आता उनही जाणवत होते. उन सावलीचा खेळ चालल्याने उन्हाचा त्रास मात्र झाला नाही.

बरीचशी मंदीरे बंद होती. मी नेमीनाथांचे मात्र पाहिले. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. जैनलोकं इथपर्यंत दर्शनाला येत असतात. जरासा थकवा वाटत होता. मन मात्र एकदम फ्रेश होते. इथे क्षणभर विश्रांती घेऊन उतरू लागलो. आता फक्त पायऱ्या उतराच्या. पण तेच अवघड जाते असे म्हणतात, भराभर पायऱ्या उतरल्या तर नंतर पायात गोळे येतात तेंव्हा सावकाश उतराच्या.

सतत खुणावणारी जैन मंदिरे :
20191112_123511.jpg20191112_130319.jpg20191112_130756.jpg

उजवीकडे रस्ता दिसतोय तिथे मंदिराच्या भिंतीमुळे उन्हापासून संरक्षण होते.

20191112_130802.jpg

आता मी आणि शुभांगी थोडावेळ एकत्र उतरलो, मध्येच आम्ही एक काकडी खाल्ली दोघींनी मिळून आणि मस्त थंडगार वाटले, भूकही भागली, थकवाही गेला. मग मात्र ती पटापट पुढे निघून गेली. उतरताना परत भर्तुहरी-गोपीचंद गुहा, बेलनाथ महाराज करत सावकाश उतरत होते. मधे मधे उन जाणवत होते, मधेच आभाळ, छान वातावरण होते. आजूबाजूला निसर्ग ठासून भरलेला, दाट झाडी, झाडे तरी कीती वेगवेगळी. बेल, तुळस तर अमाप होते. मधे मधे पांढरी आणि पिवळी कोरांट फुललेली. कोरांटीची एवढी मोठी फुले पहिल्यांदाच पहात होते. लहानपणी अंगणात कोरांट होती पण तिची फुले म्हणजे साधारण अबोलीपेक्षा थोडी मोठी. इथे प्रदूषण नसल्याने सगळीच झाडे वेली तरारून वाढलेली.

खाली उतरता उतरता संध्याकाळ व्हायला लागली. वानरे आता खूप दिसायला लागली. त्यांचे मस्त खेळ चालू होते व आश्चर्य म्हणजे एकाही वानराने त्रास दिला नाही की रस्त्यात आले नाही. माकडेच फक्त त्रास देतात की काय कुणास ठाऊक. त्यांचे खेळ बघत किती पायऱ्या उतरतोय हेही कळत नव्हते. मधेच एका ठिकाणी एकदम सारे चिडीचूप झाले, वानरानी झाडावरुनच खॉक् असा इशारा दिला; मी ज्या पायरीवर होते तिथेच जवळच झाडीत खसपस झाली. मला वाटले कुठलेतरी जनावर पायरीच्या दिशेने येत असावे. मी जिथे होते तिथेच थांबले पण तो आवाज लांब जाऊ लागला. थोड्याच वेळात वानरे परत खाली उतरली आणि खेळू लागली म्हणजे जनावर गेले असावे मग मी ही चालू लागले. शेवटच्या पायरीवर आले तेंव्हा - " अरे पायऱ्या संपल्यापण" अशी मनाने प्रतिक्रीया दिली. परत पायरीवर डोके टेकले, दत्तगुरु, चढावा हनुमान यांचे आभार मानून भवनाथाकडे निघाले. मला असे कळले होते की शेवटच्या पायरीशी ॲक्युपंक्चरवाला बसतो आणि त्याचा खूप फायदा होतो. पण मला काही तो दिसला नाही.

मी भवनाथाचे दर्शन घेतले, जुन्या आखाड्यात जाऊन दत्तमुर्तीसमोर डोके टेकले. ही मुर्ती सुद्धा खूप प्रसंन्न आणि हसरी आहे. तिथे डोके टेकल्यावर क्षणात् जाणीव झाली की आपले उद्देश्य आता पुर्ण झाले. माझे डोळे भरुन आले, अश्रूंना बांध घालणे अवघड झाले. झ्टकन् उठून बाहेर पडले. जवळच धर्मशाळा होती. तिथे जवळपास सर्वच आलेले होते आणि आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. सर्वात शेवटी माझ्या २न्ही काकू आणि अजून एक जण होती. तिचे बूट कमंडलू तीर्थापाशी चोरीला गेले त्यामुळे अनवाणी उतरत होती. ते पण मग निवांत उतरले. रात्री १२.३०ला गाडी होती त्यामुळे सगळ्यांनीच आंघोळ विश्रांतीला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी रात्री घरी पोचलो आणि ही गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

दिवसाचे भवनाथ मंदिर :
20191112_164259.jpg20191112_164259_1.jpg

आम्ही रहात असलेले नरसी मेहता धामः
20191118_115656.jpg

एक स्वप्नवत असा हा प्रवास झाला. स्टेशनजवळचा स्कायवॉक पार करताना त्या जिन्यांनीही माझी दमछाक होते, मधे थांबावं लागतं आणि हे एवढे परिक्रमेचे अंतर, इतक्या हजारो पायऱ्या कसेकाय पुर्ण केल्या माझाच विश्वास बसत नाही. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मला कळाले की रात्रीचे चढायचे असते तेंव्हा पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा अशीच होती कारण मला झोप आजिबात आवरता येत नाही. (लक्ष्मी रस्त्यावर भर गणपती मिरवणुकीमध्येही मी दुकानाच्या पायरीवर बसून झोप काढलेली आहे ! ). पण गुरुशिखराच्या रस्त्यावर एकही क्षण थकवा किंवा झोप जाणवली नाही. उतरताना पाय लटपटतात, एकेक पायरी नको होते असे ऐकले होते, यातला एकही अनुभव मला आला नाही. उलट घरी आल्यावरही मी ताजीतवानी होते. सहज चालता येत नव्हते किंवा खाली मांडी घालून बसायला १/२दिवस त्रास झाला तेवढेच!

असे अनुभव आले की त्या जगतगुरुंवर आपोआप विश्वास बसतो आणि मस्तक त्यांच्या चरणी लीन होतं मनात शब्द उमटतात "जय गिरीनारी !"

असा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी केलाच पाहिजे! एकदा तरी जंगल जोखले पाहिजे, गुरुशिखरावरील गूढता, रमणीयता अनुभवली पाहिजे. वरजाताना मुळीच फार खाणे पिणे नेऊ नये. रस्त्यात अनेक दुकाने आहेत व तिथे सर्व काही मिळते. पेनकिलर किंवा स्प्रे मात्र जवळ ठेवावा. त्याचा उपयोग होतो. वर जाताना कपडे सैलसर, सर्वांग झाकणारे व सुटसुटीत असावेत. त्याने चढाउतरायला व उन वाऱ्याचा त्रास होत नाही. गिरिनारची विशेषता हीच की इथे तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता, अगदी ट्रॅकपॅण्ट टी शर्ट देखील.

या अश्या प्रकारच्या यात्रा आपणही करु शकतो हे बीज माझ्या सासूबाईंनी रोवले. त्यांच्या ठिकठिकाणच्या वाऱ्या पाहूनच मनातील सुप्त इच्छेला सत्यात आणणे शक्य वाटले. परत इतक्या ऐनवेळी जा तू मी काम संभाळतो म्हणणारा माझा कलीग, माझा बॉस यांचाही यात हातभार आहे. माझ्या नवऱ्यानेही जाण्याविषयी कुठलीच तक्रार केली नाही त्यामुळे मी समाधानाने जाऊ शकले. माझ्या नणंदेने औषधांची यादीच मला पाठवून दिली व ती उपयोगीही पडली. बहिणीनेही वेळोवेळी मॉरलसपोर्ट दिला ज्यामुळे ताण कमी होऊन तयारीवर व धेयावर लक्ष केंद्रीत करता आले. या अश्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादाने ही यात्रा पूर्ण झाली.

सर्वात शेवटी असेच म्हणेन की एकतरी वारी अनुभवावी गुरुशिखराची! जय गिरिनारी!

नीलाक्षी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे आभार!
खरच जंगलाच्या ओढीने एक ट्रेक म्हणून मी सुरवातीला घेतलेला सहभाग नंतर यात्रेत कधी बदलला कळलेच नाही.

या लेख माले दरम्यान वेळोवेळी प्रतिसाद देऊन लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहना बद्दलही तुम्हा सर्वांची मी आभारी आहे

धन्यवाद सामो, प्रविणजी!

पायाळू बाळ - हाहाहा. हजरजबाबी उत्तर》》
हाहा.. पायऱ्या उतरताना त्रास होत नव्हता कारण शरीराला सवय झालेली. पण परत जायचे म्हणजे आधी खाली बसायचे, मग जवळ जवळ रांगून किंवा झोपून घसपटत तो छोटा बोगदा पार करायचा.. म्हणजे त्रास होता. खाली बसण आणि उठण हे नंतरही २/३ दिवस त्रासदायक होतं. ते काही करायचे नव्हते मला Happy Happy

छान मालिका. मस्त लिहिले आहे.
एक शंका-
"येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. ">>>>> म्हणजे सोमवारी सकाळी ६ च्या आत धुनीच्या जागेवर पोहोचल्यास धुनी आपोआप पेटते हे पाहता येऊ शकते का? आणि आपोआप अग्नी प्रकरणाचे दृश्य फक्त सोमवारीच पाहायला मिळते की कोणत्याही दिवशी ते शक्य आहे?

प्रतिसादा साठी धन्यवाद!

म्हणजे सोमवारी सकाळी ६ च्या आत धुनीच्या जागेवर पोहोचल्यास धुनी आपोआप पेटते हे पाहता येऊ शकते का? आणि आपोआप अग्नी प्रकरणाचे दृश्य फक्त सोमवारीच पाहायला मिळते की कोणत्याही दिवशी ते शक्य आहे?>>

होय. हे बघण्यासाठी गर्दीही असते खूप. फक्त सोमवारीच पेटवतात धुनी.

धन्यवाद नीलाक्षी.

अवांतर: माझ्या वरच्या प्रतिसादात 'प्रकटनाचे' ऐवजी 'प्रकरणाचे' असे चुकीने लिहिले गेले आहे. त्याबद्दल क्षमस्व.