गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : भाग ४ : पावले चालती गुरुशिखराची वाट

Submitted by निलाक्षी on 5 December, 2019 - 01:55

काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला.

१०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप होउ दे!

जाता जाता भवनाथ मंदिरा विषयी थोडेसे :
हे महादेवाचे जागृत मंदीर आहे असे म्हणतात. बाजूलाच मृगीकुंड आहे. त्याची काहीतरी गोष्ट ऐकलेली, पण लक्षात नाही आता. येथे शिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते व मुहुर्तस्नाना साठी साधू थेट कुंडात उड्या टाकतात. हे मी कुंभमेळ्याबाबतपण ऐकले आहे. असे म्हणतात भगवान शिव स्वत: इथे त्यादिवशी स्नानाला येतात. कुंडाला प्रदक्षिणा करुन आल्यावर बाहेरच्या बाजूला एक दगड पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यावर तरंगणारा दगड. असे म्हणतात की रामसेतूतील हा दगड इथे आणला गेला आहे म्हणूनच पाण्यावरही तरंगतो. रात्रीच्या अंधारात खरच तरंगत होता की नाही हे कळाले नाही. दिवसा पहायला हवे.

रात्रीचे भवनाथ मंदिर :
20191111_223952.jpg

म्रुगी कुंडः
20191111_224424.jpg

असे महादेवाचे दर्शन झाले की थेट पहिल्या पायरीशी चढावा हनुमान आहे, त्याला नमस्कार; त्यालाही प्रार्थना की शक्ती दे. त्यानंतर पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो. त्या पायरीवर डोके ठेवायचे, दत्तात्रयांना सांगायचे, तुम्हीच घेऊन जा आणि सुखरुप खाली आणा. मग सुरुवात. आम्ही भवनाथानंतर जवळच असलेल्या जुन्या आखाड्याच्या आश्रमातील दत्तालापण नमस्कार केला. उत्सुकतेने सभोवार नजर फिरवीली. चारी बाजूंनी बांधकाम करुन साधू आणि साध्वींसाठी रहाण्याची सोय केलेली अनेक मजली इमारत होती ती. अनेकसाधू, साध्वी दिसत होत्या. या प्रवासात साध्वींना तेही अनेक संख्येने मी पहिल्यांदा पाहिले.

दर्शन घेऊन गिरीशिखराकडे वाटचाल चालू ठेवली.

गिरनार हे भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे. त्याची रेवताचल, कुमुद, उज्जयंत, श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आढळतात. श्रीराम व पांडवांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्णाद्वारे रुक्मिणी हरणही इथेच झाले अशीही मान्यता आहे. गिरनारचे उल्लेख सम्राट अशोकापुर्वीच्या इतिहासातही आहेत असं वीकीपीडिया सांगतो. असा हा गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना. अनेक साधू, बैरागी यांची तपोभूमी. स्वत: दत्तात्रयांनी इथे १२हजार वर्षे तपश्चर्या केली होती ब आजही त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच स्थानावर आज दत्तपादुका उमटलेल्या आहेत. हां आता कुणी म्हणू शकतं की हातानी छिन्नी हातोड्याने त्या कोरू शकतं! तसे असेलही.. पण या स्थानावर अनेकांना अनेक अनुभव येतात जे पादुका उमटल्या ह्यावर श्रद्धा ठेवायला लावतात. गिरनारला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच तो अनेक वन्यप्राणी, वनस्पती यांचे वसती स्थान आहे. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती इथे मिळतात.

आम्ही सुरवात केली, चढाई रात्रीची असल्याने किती चढलो ते काही कळत नाही. हवा छान थंड असते त्यामुळे लवकर थकवा येत नाही. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला चढत होतो. परिक्रमेचा काळ, त्यातून पौर्णिमा त्यामुळे वाटेवरची सगळी दुकाने चालू होती. त्यांचा प्रकाश मिळत होता. पायऱ्यांवर दिवेही लावले आहेत. अगदीच अंधार वाटेल तर तिथे पौर्णिमेचा चंद्र नैसर्गिक प्रकाश पुरवत होता. सुचना पुर्वीच दिल्या गेल्या होत्या की चढताना आजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश एकेक पायरी चढायची. प्रत्येकजण त्याची अंमलबजावणी करत होता. तसंपण ही स्पर्धा थोडीच होती..

इथेही खूप गर्दी होती. अगदी सतत एकाबाजूने चढणारे चालत होते तर दुसऱ्या बाजूने उतरणारे. जसजस वर जाऊ तसतशी गर्दी कमी न होता वाढतच होती. कुणी मोबाईलवर दत्तनामाचा जप लावून चालले होते तर कुणी स्वामी समर्थांचा. काही तरुण मंडळी एवढ्या गर्दीतही धसमुसळेपणा करत सिनेमाच्या गाण्यांवर उड्या मारत चालत होती व यात्रेकरुंच्या रोषास पात्र होत होती. मी सावकाश चालत होते तरी पहिल्या सुपरफास्ट बॅचचे लोक माझ्या आजुबाजूला होते. आश्चर्यच वाटलं माझ्या वेगाचं.

मन स्थिरही होते, शांत होते पण भावूकही झालेले. माझे बाबा अनेकवेळा गुरुचरित्राचे पारायण करीत. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी आठवत होत्या. दत्तगुरु व गणपती हे देव न वाटता लहानपणी आम्हाला आमचे कुटुंबीयच वाटत असत त्यामुळे आजपर्यंत गुरु किंवा देव या नजरेने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही; मला कुणा नातेवाईकालाच फार वर्षाने भेटायला जातोय असंच वाटत होतं.

पायरी चढताना आम्हाला सांगण्यात आलेले की विश्रांती उभ्यानेच घ्या, सारखे खाली बसलात तर अजून त्रास होईल. पायऱ्यांना एका बाजूला कठडे आहेत बहुतांशी. सुरवातीच्याच काही पायऱ्यांना आजिबात कठडे नाहीत. सतत चालत असल्याने हवा थंड असूनही थंडी आजिबात वाटत नव्हती. १५०० पायऱ्यांजवळ एक तरुण मुलगा खाली जाताना पाहिला. २५०० पायऱ्यांपासून परत आला होता तो. मला त्याचं आश्चर्य आणि स्वत:ची काळजी वाटली. हा मुलगा परत आला, आपण जाऊ ना ! पण मला थकवा आजिबात जाणवत नव्हता अगदी आरामात चढत होते. २०००पायरीच्या दरम्यान बेलनाथबाबा समाधी आहे. ते एक मोठे सिद्ध होते. २२५० पायरीवर डावीकडे राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. ३/४ पायऱ्या चढून आतमध्ये जाऊन दर्शनास दोन सुंदर मूर्ती आहेत. तिथून एका कपारीतून अजून वर गुहेत जाता येते. अगदी घसपटत जावे लागते. वर ३शिळांमुळे एक छोटीशी खोली तयार झाली आहे. मस्त वाटलं वर गेल्यावर. इथे भर्तुहरी नाथांनी राजा गोपीचंदाला उपदेश करून तपाला बसवले होते. वरच्या गुहेत ५/६ माणसे बसू शकतात, मस्त उबदार वातावरण होते आत.

रात्रीचे खाली दिसणारे गाव :
20191112_003124.jpg

यादर्शना दरम्यान सुपरफास्ट बॅच पुढे गेली, ती शेवट पर्यंत भेटली नाही. मी काहीकाळ एकटीच चालत होते, मग परत मंडळी भेटली. २,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे अजून वर गेल्यावर ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर भाविक येथे त्या संतानाला घेऊन येतात. आम्ही राणकमातेपाशी दिवा लावला. सगळेजण त्रिपुरवाती घेऊन आलेले व जिथे शक्य आहे तिथे वात लावत होते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. चढता चढता आम्ही पहिल्या मुक्कामी पोहोचलो- जैन मंदिर - साधारण ४हजार पायऱ्या इथे पुर्ण होतात. इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी बसायला जागा आहे. कुणी आडवे झालेले, कुणी बसल्या बसल्याच झोपलेले. आम्ही इथे पावणे ३ वाजता पोहोचलो.

कुड्कुडणारे आम्ही:
20191112_032757.jpg

आता असं ठरलं की इथून पुढे सगळ्यांनी एकत्रच जायचं. जैन मंदिराच्या मागच्या बाजूस वळणावर बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते. आम्ही तिथे थांबलो. मागची लोकं बऱीच मागे होती. झोपाळू मंडळींनी ताबडतोब खाली अंथरले व आडवे झाले. मी पण पाठ टेकून झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न केला. आता चांगलच गार वाटू लागलं. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून थंडी जाणवत नव्हती. अजून थांबलो तर थंडीने हुडहुडी भरेल अस वाटायला लागलं. इथे पोचल्यावर लगेचच कमरेला बांधलेले स्वेटर्स अंगावर चढले होते, कानटोप्या घातल्या गेल्या.

खरंतर चालून आता उत्साह आला होता. मोठ्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती. चव्हाणदादा तर उभं राहुन अस्वस्थपणे येरझारा घालायला लागले होते. त्यांना आजिब्बात नुसत थांबून रहायचं नव्हतं. तसाच साधारण तासभर काढला असेल. मागून आमची मंडळी एकेक करून यायला लागली. आता अजून थांबणे फारच जीवावर आलेले, मागून आलेल्या लोकांनापण झोपायचे नव्हते. मग थोड्याच वेळात सगळेच निघालो. आता इथून नुसती चढाई जवळ जवळ संपली. म्हणजे चढाई होती पण मधे मधे पायऱ्या उतरायच्याही होत्या.

इथून डावीकडे जुना रस्ता खाली जाताना दिसतो. या जुन्या मार्गाने स्वामी समर्थ गिरनार चढुन आले होते असे म्हणतात. अजूनही बरेच सिद्ध योगी याच मार्गानी येतात अशी वदंता आहे. डोलीवाले मात्र या मार्गावर नसतात व आता सामान्यही सगळे नवाच रस्ता वापरतात. परंतु गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना इकडे वळवत असल्याचे कळले. त्यामुळे आम्हालाही या मार्गाने यावे लागले असते कदाचित जो आत्तापेक्षाही अवघड आहे असे म्हणत होते. परंतू तसे झाले नाही.

आपल्याला उजवीकडून अंबाजीमाता शिखराकडे जायचे असते. तशी पाटीही इथे लावली आहे. गोमुखी मंदिराकडे, अंबामाता मंदिर, सहसावन मंदिर यासाठी बाणांनी दिशा दाखविली आहे.

हाच तो चौकः
20191112_023706.jpg

रात्र असल्याने गोमुखी मंदिरावरून सरळ अंबामातेच्या मंदिरापाशी आलो. एरवी रात्री सारी मंदिरे बंद असतात पण आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने सगळी मंदिरे उघडी होती व सगळीकडे भाविकांची गर्दी होती. इथे जवळपास ५हजार पायऱ्या संपतात. म्हणजे खरतर अर्धाच रस्ता झालेला असतो.पण पुढच्या रस्त्यात पायऱ्या उतरणेही असल्याने कदाचित, जास्त वेळ लागत नाही. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की पुढचा मार्ग अंबामाताच सुकर करते.

मी मातेला बाहेरूनच नमस्कार केला व पुढे गोरक्ष शिखराकडे चालत राहिले. हा मार्ग थोडा अवघड वाटला बाजूच्या कठड्यांची उंची जेमतेम घोट्या पर्यंतच वाटत होती. एका बाजूला दरी, रस्ता लहान वाटत होता व तीव्र वळणेही होती. जर वळणांवर जोरात वारा आला किंवा गर्दीत चालताना थोडा जरी धक्का लागला तर एका बाजूला कडप्प्याचा सपोर्ट नव्हता आणि खाली पडायला झाले असते. रात्र असल्याने नेमकी दरी किती खोल ते कळत नव्हते तरी विचाराने भीती वाटली.

आता समोरचा डोंगर चढून गेला की गोरक्षशिखर. इथून एक मधुर सुगंध दरवळायला लागला. खुप प्रसंन्न आणि उल्हसित वाटत होतं. तसं गिरनारवर काय परिक्रमेतही नैसर्गिक विधींसाठी काहीही सोय नाही. सरकारी शौचालये तोडक्या मोडक्या अवस्थेत, आतून झाडोरा वाढलेली होती नाहीतर बंदच. त्यांचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी जिथे सपाट भाग आहे तिथे लोक आडोसा बघत आणि विधी उरकत होते. मधे मधे तो वास तुमची सोबत करतो. हा सुगंध वेगळा होता. जसजसे शिखर जवळ येत होते तसा वाढत होता. मला वाटले की रस्त्यात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळे आहेत. आपल्याकडे काय दगडाला शेंदूर फासला कि झाला देव. तिथे धूप, उदबत्ती लावलेली होती त्याचा वास असेल. नंतर लक्षात आलं की ते तर सगळीकडेच होतं मग हा सुवास फक्त गोरक्षशिखराजवळच का येत होता?

तर सुगंध उत्साह वाढवत होता आणि फार म्हणजे फारच छान वाटत होते. गोरक्ष गुहेपाशी डावीकडे गोरक्ष मंदीर आहे आणि उजवीकडे गुहेत तुम्हाला धुनी भस्म मिळते. तिथेच अगत्याने तुम्हाला चहा पाजला जातो. त्या प्रसादाला नाही म्हणायचे नसते हे आधी वाचलेले आणि अगत्य पाहून चहा घेतलाच. आतापर्यंत एखाद् दोन घोटच पाणी प्यायले होते, तहान अशी लागली नव्हतीच. चहा घेताना लक्षात आले की बराच वेळ आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.

इथेच उभ्या उभ्या विसावा घेतला. तिथे एक साधू बसलेले होते व अनेकजण सेवेकरी होते. गरम गरम ताजा चहा करून सगळ्यांना देत होते. त्या बाबाजींना मी थोडी माहिती विचारली की गिरनार यात्रा का व कशी करतात. गर्दीमुळे असावं पण त्यांनी थोडक्यात जुजबी माहिती दिली.

गिरनार दर्शन हे आता फक्त पादुका दर्शन घेऊन पुर्ण करतात. पण खरतर इथे अनुसूया माता, महाकाली शिखर आहे. कमंडलू तीर्थाबरोबर यांचेही दर्शन घेतल्यावर गिरनार यात्रा पुर्ण होते. पण हल्ली लोकांना शक्य नसते त्यामुळे फक्त दत्त शिखर करतात. त्याचीही पद्धत त्यांनी सांगितली - खाली दामोदर तीर्थावर आंघोळ करायची मग भवनाथ, चढावा हनुमान अशी दर्शने करत कमंडलूतीर्थाला जायचे. तिथे परत आंघोळ करायची मग दत्तात्रय पादुका दर्शनाला जायचे. ते सांगत होते आताही जाणते लोक, साधू आधी कमंडलू तीर्थाला जातात, आंघोळ शक्य नसली तरी डोक्यावर तीर्थाचे प्रोक्षण करतात मग वर जातात. त्याबरोबर गोरक्ष धुनीपाशी असलेली घंटा आणि मोक्षाची गुहेविषयीपण त्यांनी माहिती दिली.

मी त्यांना नमस्कार केला पुढे डावीकडे धुनीचे दर्शन घेतले. इथली घंटा ३ वेळा वाजवायची व वाजवताना आपल्या पितरांची नावे घ्यायची म्हणजे सर्व पितरांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ती मोक्ष गुहा काही मला दिसली नाही.

पुढे गेल्यावर पायऱ्या उतरतानाही सुगंध बरोबर होता. खाली जैन मंदिराच्या अलिकडे असतानाच लोक म्हणत होते वर खूप गर्दी आहे तुम्ही थांबून जा. दर्शनाची रांग कमंडलू तीर्थापर्यंत पोचली आहे. आम्ही गोरक्ष शिखराचा एक जीना उतरला असेल् नसेल, रांगच सुरु झाली. आता जसजशी रांग पुढे सरकेल तसतस पुढे जायचे. हा रस्ता खरोखर लहान वाटतो त्यात डोलीवाले विश्रांतीला थांबले तर मग आपण त्या पायरीवर थांबूच शकत नाही.

डोलीवाल्यांची मात्र दया आली. एक डोलीवाला वयस्कर होता, ओझे उचलून त्याच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते. हे ५ दिवस त्यांचा सिझन होता. वर्षभरातील सर्वात जास्त गर्दी या दिवसांत होते इथे. त्यामुळे याच दिवसांत कमावण्याची संधी. बरं एक डोली झाली की दुसरी डोली मिळेपर्यंत काम नाही. त्यासाठी त्यांना वरखाली फिरावं लागतं गिऱ्हाईक शोधत; म्हणजे परत पायऱ्या चढणे उतरणे आलेच. खुप कष्टामय जीवन आहे हे. तुम्हाला डोली आधीच धर्मशाळेत विचारुन ठरवता येते किंवा रस्त्यात वाटले तरी मागवता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात विचारले तर त्यांच्याकडे डोलीवाल्याचे नंबर असतात ते मागवून देतात. फक्त मग डोलीवाला जिथे असेल तिथून येईपर्यंत वाट पहावी लागते. तुमच्या वजनानुसार ११ ते १४ हजारापर्यंत डोलीचे दर ठरतात. आमच्यापैकी काहीजणांनी डोली आधीच ठरविली होती तर एकीने येताना केली.

या डोलीवाल्यांचा आमच्या बरोबरच एक किस्सा झाला. गर्दी खूपच होती. रांगेतही माणसे अगदी गर्दी करुन उभी होती. डोलीवाले भरभर चालत व मध्ये जागा मिळताच विश्रांती घेत. ते मोठमोठ्याने सुचना देतच चालत जेणेकरुन त्यांना मार्ग मोकळा मिळेल व डोलीतील माणसाला आणि चालणाऱ्यांना एकमेकांचा धक्का लागणार नाही. ते विश्रांतीसाठी थांबताना देखील लोक पुढेमागे सरकून जागा करुन देत. गोरक्षशिखरापासून पुढे बऱ्याच वेळा एका बाजूला दरी असते. दुसऱ्या बाजूला डोंगर जरी असला तरी पायऱ्यांची कड आणि डोंगर यामधे अंतर असते व खड्डास्वरुप झालेले असते. म्हणजे जिन्याच्या पहिल्या दुसऱ्या पायरीवरुन पाहिले तर चांगला दिड दोन पुरुष उंचीचा खड्डा. तर झालं असं की डोली वाल्याला जागा देताना पुढेमागे लोक पटकन् सरकतात त्याच वेळी आमच्यातील एक अगदी कॉर्नरला गेली व पडणार इतक्यात तिच्या सॅकला पकडून एकाने खेचले तिला. इथे डोंगरबाजूला सगळे पाषाण आहेत त्यामुळे काय झालं असतं हा विचारही न केलेलाच बरा.

इथे दुसरे एक महत्वाचे म्हणजे गोरक्षशिखरापासून पुढे एकही दुकान नाही. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असल्या अंबामातेपाशी घेऊन ठेवावे किंवा नंतर शिखरापर्यंत काही तुरळक दुकाने आहेत तिथे. गोरक्षशिखरापासून पुढे पाणी जरी लागले तरी ते कमंडलू तीर्थापाशीच मिळणार. म्हणजे जवळपास तीनेकहजार पायऱ्या गेल्यानंतर. तेंव्हा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी.

गोरक्षशिखरानंतर जी रांग लागली ती थेट पादुका दर्शन, कमंडलूतीर्थाचे दर्शन झाल्यावरच संपली. अनेकजण सांगतात या पायऱ्या खूप कठिण आहेत, जोराचा वारा असतो, रस्ताही तसा अवघड आणि चढही खडा आहे. वारा वगैरे इथे उंचावर आला तर काही खरे नाही. पण आम्ही रांगेत असल्याने आम्हाला चढाचा त्रास झाला नाही. वाराही शांत होता. एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकत रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. ५.३०/६ च्या सुमारास आम्हाला आमच्या डोल्या दिसायला लागल्या. त्यांचे एकदम छान ४.३०/५ला वरती दर्शन झाले होते. खूप खुष होते ते सगळे. आमच्या एकूण ६ डोल्या होत्या, त्यांची वाट पहाण्यात, त्यांना भेटण्यात थोडा वेळ गेला. मध्ये एक दोन छोटी मंदिरे लागली. त्यांचे नाव विसरले, पण प्रसिद्ध असावीत. सगळेजण न चुकता नमस्कार करत होते. रांगेतून चालतानाच ती लागतात त्यामुळे दर्शने घेणे सहज होत होते. त्यातले पुजारी साधू काही लोकांना भस्म लावत होते व काही लोकांना रुद्राक्ष देत होते. माझ्या असं लक्षात आलं; रुद्राक्ष फार कमी लोकांना मिळत होता. मला दोन्ही मिळालं. भस्म व रुद्राक्ष.काहींना हाताला त्यांनी काहीतरी लावले. त्याला एक अप्रतीम सुगंध होता. आमच्यापैकी चव्हाण दादांच्या हाताला त्यांनी ते लावले त्यामुळे आम्हाला सुगंध कळाला. नंतर घरी आल्यावर पाहिले तर रुद्राक्षालाही तोच अवर्णनीय सुगंध येत होता. नंतर कळाले की तिथे गिरनारी बापूंची गुहा आहे, ते मंदिर भैरवाचे होते. तसेच तिथे ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार रुद्राक्ष दिला जातो.

आता आम्ही कमंडलू तीर्थापाशी असलेल्या कमानी पर्यंत पोहोचलो होतो. उजवी कडच्या कमानीतून ३५० पायऱ्या खाली उतरून तीर्थाकडे जायचे तर डावी कडच्या कमानीतून पादुकांकडे. गर्दी इतकी होती की आम्हाला काही पर्यायच नव्हता; आम्ही दत्तशिखराकडे जात होतो. गर्दीचा उत्साह ओसंडून वहात होता. जय गिरिनारीच्या घोषणा दुमदुमत होत्या. येणारी लोकं घोषणा देत त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच मोठयाने रांगेतील लोक घोषणा देत. अशी घोषणाई सगळा आसमंत व्यापून राहिलेली. त्यामुळे कंटाळा, थकवा जाणवत नव्हता.

मागे गोरक्षशिखरापर्यंत गेलेली रांग
20191112_064743.jpg

बाजूने अनेक साधूवर जाताना दिसत होते. त्यांचे निरिक्षण करण्यातही वेळ चांगला जात होता. कुणी भगवी वस्त्र नेसलेले, जटाधारी, हाती दंड व कमंडलूवाले, कुणी मोठ्ठा जटाभारवाले नुसतेच लंगोटीवाले, कुणी शुभ्र वस्त्रातील, या सर्वांचे डोळे खतरनाक वाटत होते, काही सामन्यांसारखे पण भगवी पचंगी नेसलेले किंवा भगवी वस्त्र घातलेले. सर्वजण आपल्या तंद्रीत भराभर वर जात होते. कधीकधी त्यांचा वेग पाहून तोंडात बोटे जात होती. घरी आल्यावर मामानी विचारलं त्यातले किती साधू खाली येताना तु पाहिलेस लक्षात आहे का? आणि डोक्यात प्रकाश पडला खरंच की वर जाणारे तर अनेक होते, खाली येणारा एखाद् दुसराच. खाली यायला मार्ग तर एकच आहे, निदान जैन मंदिरापर्यंत तरी. मग ही लोकं गेली कुठे?

आम्ही कमंडलू तीर्थाच्या अलिकडे असतानाच समोर अरुणोदय झाला. समोर क्षितिजावर तांबडे फुटले होते. अगदी एखादा रंगाचा फुगा फुटावा किंवा डब्यातून रंग सांडावेत तसे रंग क्षितिजावर पसरले होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की सूर्य कुठून डोंगराच्या मागून वगैरे न येता सरळ क्षितीजरेषेवरुन वर आला. अरुणोदयापासून सुर्योदयापर्यंतचे आकाश पहाणे केवळ अप्रतीम, अलौकिक अनुभव होता.

सूर्योदयाचे काही क्षण
20191112_063527.jpg20191112_065137.jpg20191112_070215.jpg

समोरच्या दातार पर्वतावर मच्छिंद्रधुनी अंधारात पेटती दिसत होती, तिच्यावरचा झेंडाही आता नीट दिसत होता. इथे शंकराने दत्तात्रयांना, तर दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले असे म्हणतात. इतक्यात काही टारगट पोरे रांग तोडून जेष्ठांना न जुमानता पुढे आली. आमच्यातील तरुणांनी मग त्यांना अडवले व मागे जाण्यास भाग पाडले. त्यांची देहबोलीसुद्धा कीती बेफिकीरीची होती..

आता गुरुपादुका मंदिर दिसत होते. एक धीरगंभीर वातावरणात आपण प्रवेश करत आहोत असे वाटत होते. डोळे मिटले की ओम् च्या उच्चारवाने जसे तरंग तयार होतात तसे काहिसे वाटत होते. इथे येताना दत्तसंप्रदाय, दत्तमहाराज यांच्या लहानपणापासून कानावर पडलेल्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. हळूहळू पायऱ्या कमी होत होत्या. आम्ही एकाठिकाणी बूट काढले. थोड्याच वेळात आता दर्शन होणार होते.

डोंगरा आडून दिसणारे मंदिर
20191112_104415.jpg

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे आभार! फोटो टाकले आहेत.

एकूण वर्णन वाचता ही यात्रा तिशीच्या अगोदरच करायला हवी. नंतर जमेल तसं हे गर्दीचे महिने सोडून.>>
असं काही नाही.. बरेच व्रुद्ध लोक करतात. आमच्या बरोबर दोन जण ७०च्या आसपास असलेले होते व त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. तसेच ३०च्या आतले असे केवळ २/३ जणच होते.
ही यात्रा श्रद्धेची आहे व भाविक बरोबर यात्रा पूर्ण करतोच करतो.. असं म्हणतात गिरनारला जाणे दत्तगुरुंच्या इच्छेनेच होते.

फोटो -
छान आले आहेत. रांगेचा फोटो आवडला. त्यातून कल्पना येते की गुरुशिखर कसे असेल.
रात्रीचे मंदिराचे फोटो कोणत्या क्याम्राने काढलेत? आवडले.

छान आले आहेत. रांगेचा फोटो आवडला. त्यातून कल्पना येते की गुरुशिखर कसे असेल.>>>
रांग मागे गोरक्षशिखराकडे जाणारी आहे. तो सगळा रस्ता
पायऱ्या उतरून आलो. व पुढे परत पायऱ्या चढायच्या.

रात्रीचे मंदिराचे फोटो कोणत्या क्याम्राने काढलेत? आवडले.>>
सगळे फोटो मोबाइल मधले आहेत. Samsung A50

जावेसे वाटले खरे, पण बेसिक सुविधा नाहीत हे वाचले आणि ..... मनच मेले >>> सामो आपण ट्रेकला जातो तिथेही बऱ्याचदा सोय नसते. हाही प्रवास एक ट्रेक म्हणू शकतो. फक्ता पायऱ्या आहेत डोंगर चढायला

>>>>> सामो आपण ट्रेकला जातो तिथेही बऱ्याचदा सोय नसते. हाही प्रवास एक ट्रेक म्हणू शकतो. >>> अरे खरच की. हा विचार कधीच केला नाही Happy धन्यवाद नीलाक्षी

तसं नाही. जर इतके भाविक येतात तर दोन हजार पायऱ्यांठिकाणी बेस क्यांपची सोय करता येईल.
---
माथेरानला इतक्या वर्षानंतर दोन ठिकाणी टॉयलेटस उघडली आहेत. पेड असल्याने स्वच्छ आहेत. एक दिवसीय पिकनिकरांसाठी /भटक्यांची सोय झाली.

तसं नाही. जर इतके भाविक येतात तर दोन हजार पायऱ्यांठिकाणी बेस क्यांपची सोय करता येईल》》》

हो बरोबर आहे, त्या दृष्टीने बांधलेली स्वच्छतागृहे दिसतातही, मात्र ती वापरण्याच्या परिस्थितीत नाहीत. सरकारने वेळोवेळी याचा मेंटेनन्स करायला हवा.
तसेही आता जैन मंदिरे / अंबाजी पर्यंत रोप वे होतो आहे. तो सुरु झाला तर प्रवास फारच कमी वेळाचा आणि सोयीचा होईलसे वाटते.