करायला गेलो गणपती पण झाला मारोती ( टुकारवाडीत वाघ )

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 December, 2019 - 03:04

करायला गेलो गणपती पण झाला मारोती
(टुकारवाडीत वाघ)

IMG_20191205_044429.jpg
माझं आणि टुकारवाडीच्या पाराचं मैत्र जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्या सारखं घट्ट आहे. काही अपवाद सोडल्यास नात्यांच्या रेशमी वस्राला अपेक्षांची किनार असते. पण मैत्रीचं नातं निरपेक्ष असतं. नसेल तर असावं ही माफक अपेक्षा. आमचं मैत्रही असच आहे. गावाला आल्यावर मी न चुकता पाराची भेट घेतो. पार माझ्याशी आणि मी त्यच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतो . मी गावात नसुनही गावाची इत्यंभूत माहिती मला असते. पुन्हा गावाच्या भन्नाट गोष्टीची शिदोरी घेऊन मी शहरात जातो. ही शिदोरी माझ्यातली गावच्या मातीची ओढ राखते.

एक दिवस मी एकटाच पारावर बसलो होतो. तेवढ्यात पार बोलू लागला.

“ लय बरं वाटलं तुम्हाला बघितल्यावर. किती दिवस भेटला नाही. ल‌ई दिवस झालं तुम्हाला सांगल सांगल असं म्हणत होतो पण तुमची गाठच पडत नव्हती.”

“अरे काय करू बाबा नोकरदार माणूस मी. नोकरीतून उसंत मिळाली की येतो गावी. “

“तुमचंही बरोबर आहे. पोटापाण्यासाठी काम धंदा करायलाच पाहिजे. माझे पोट टुकार वाडीतल्या टुकार गोष्टींवरच पोसतं. कधीतरी अजीर्ण होतं तेव्हा माझ्या पोटात या गोष्टी सारख्या डुचमळत राहतात. मला वाटतं कुणालातरी सांगावं. मी तसा प्रयत्नही करतो पण मी काय बोलतो हे कुणालाच ऐकू येत नाही. कारण इथले समदे टुकार. आता तुम्ही म्हणाल मी बोललेलं तुम्हालाच कसं ऐकू येतं ? तर त्याचं असं झालं….
तुम्ही यायच्या आधी मी माझ्या पोटातलं समदं शेजारच्या देवळातल्या भैरोबाला सांगायचो . एक दिवस त्यो म्हणला कसल्या भंपक कथा ह्या ऐकून माझं कान किटलं. तेव्हा पासून भैरोबाने माझ्यासाठी कान बंद केले. म्हणजे माझ्यासाठी भैरोबा भैरोबा झाला.
रागात भैरोबानी मला शाप दिला की तुझे बोलणं कोणालाच ऐकायला जाणार नाही. मी म्हणलो देवा या गावाच्या सतराशे साठ भानगडी पोटातच ठेवल्या तर माझी काय हालत होईल. अहो मी काय मोठ्या पोटाचा गणपती आहे सगळ्यांच पोटात ठेवायला. माझ्यावर कृपा करा आणि हा शाप मागं घ्या.
माझी दया येऊन भैरोबानी मला उ:शाप दिला. भैरोबा म्हणाला
“वत्सा यापुढे तुझे बोलणे फक्त बिनटुकार माणसालाच ऐकू येईल. टुकारवाडीतलं एकमेव बिनटुकार माणूस तुम्हीच. त्यामुळं माझं बोलणं फक्त तुम्हालाच ऐकू येतं.”

मी म्हणालो ठीक आहे बाबा. बोल काय म्हणणं आहे तुझं.

यावर पार म्हणाला एकदा भोकराईच्या शिवारात वाघ आला आणि पुढचं रामायण घडलं.

एके दिवशी भिवाची चौकडी सांजच्याला इथे टप-या हानत बसली होती. मी त्यांच बोलणं ऐकलं ते असं…

“आयला भिवा भोकराईच्या रानात वाघ आलाय.”
“आरं हो रं लै वात आणलाय त्यानी.”
“ना-याच्या उसात लपून बसलाय. काय काम कराय येत नाय”
“आरं कसलं ना-याच्या उसात त्याच्या बाजूला अर्ध्या गावाचं ऊस हायती. कवा कुणाच्या मळ्यात घुसल नेम नाही.”
“आरं भाज्या काढायला येईनात म्हणून शेतात सडायला लागल्यात. पिकात तन वाढतंय. कुठं पाणी सोडता येत नाही. अशानी ऊस वाळून जाईल. जित्राबं,माणसं सुध्दा सुरक्षित नाहीत. काहीतरी बंदोबस्त करायला हवा”
“म्हंजी तेवढं सोपं हाय व्हय ते. दोन कोसावर वाघ दिसला तरी मुतायला येतंय. आपण काय करणार.”
“ सरपंचाला सांगून फारिष्ट बोलवू , ते पिंज-यात पकडील की.”

असं ठरवून भिवा,शिवा,ना-या,नामा सरपंचाकडं गेले.

सरपंचाला सगळी हकीगत बैजवार सांगितली. सरपंच म्हणलं

“गावच्या सुरक्षेचा मुद्दा हाय.पाटलाला सांगायला हवा.”

सगळ्यांनी याला होकार भरला आणि गोष्ट पाटलाच्या कानावर घालायला पाटलाच्या घरी गेले . पाटील घरी नाही पाहून त्यांनी पाटलीनबाईंना ते कुठे भेटतील असं विचारलं.

तेव्हा तिची दुखरी नस दाबली गेली. तशी ती फणफणली.

“ जा की बगा त्या सटवीकडं.”
“कुणाकडं?”
“ह्या! ह्या! समद्या गावाला माहीत आन तुम्हाला माहिती नाय व्हय”.
तर ही सटवी म्हणजे गावड्याची आंजी. गावड्याची आंजी दिसायला नुस्ती रंभा. नवरा गेला. गावातल्या ढिगभर लांडग्यांच्या तावडीत टिकाव लागंना म्हणून पाटील जवळ केला. ती चारचौघीत लाजत पाटलाच्या नावाचा उखाणा घ्यायची

“ वाकडी तिकडी बाभळ तिच्यावर बसला होला पहिला नवरा मेला म्हणून पाटील ठेवला.”

पोटाला पोटभर मिळायचं वर कोण वाकड्या नजरेनं पाहयची हिम्मत करायचं नाय.

चौकडी गुपचूप गावड्याच्या आंजीच्या घरी आली.

पाटील लवंडलेलं आन आंजी त्याचं पाय चेपीत व्हती.
शिवा हळू आवाजात म्हणाला – “ आयला मजा हे, घरच्या वराणभाताचा कटाळा आला की गडी हितं तांबडा रस्सा भुरकतोया.”
सगळ्यांना बघून आंजी उठली.
पाटलानं आठ्या चढवत ईचारलं
“एवढं काय आर्जंट काम हाय रं भडविच्यानू, हिकडं कडमाडलं.”
भिवाची बोबडी वळली “नाय जी आमाला सरपंचानी पाठीवलय.”
“भोकराईच्या शिवारात वाघ आलाय तवा सरपंच म्हणलं फारिष्ट बोलावतो. पाटलांना सांगा ते पोलीस बोलावतील.”
“ बरं काय करायचं ती मी करील, तुमी हितनं आता सटका. कुणाला सांगू नका म्या हितं भेटलो. नाय तर आज दिवसभर चावडी हितंच भरल.”

त्याच दिवशी गावात दवंडी पिटली.

“ शिवारात वाघ आलाय . कुणी रातंचं घराबाहेर पडू नये अथवा झोपू नये. दिवसा सुध्दा सगळीकडं सावधगिरी बाळगावी. ”

रात्री बाहेर झोपणारांची पंचाईत झाली. वाघाच्या भितीनं बरीच मंडळी घरात झोपू लागली. कोंबड्यांची खुराडी, शेरडं सगळी बंदीस्त निवा-यात गेली. ज्यांच्या जनावरांना बंदीस्त निवारा नव्हता त्यांनी मैदानात चार-पाच घरच्या जनावरांना एकत्र तात्पुरते गोठे केले. मंडळी काठ्या, कु-हाडी, भालं घेत एकत्र आली आणि रात्री शेकोटी पेटवून राखण करत बसली. त्यांच्या बरोबरचं कुत्र भुंकलं की सगळे कान टवकारत. घरातले खडबडून जागे होत. प्रत्येक घराच्या दारात परजलेल्या कु-हाडी , काठ्या, भालं ठेवले गेले. गावात रात्री लवकर सामसूम होऊ लागली.

रात्रभर गोठ्यावर जागरण केलेला लहू जमदाड्या घरात दिवसा साखर झोपेत असला तरी त्याला स्वप्नात वाघ बैलाच्या मानंवर बसलाय असं चित्र दिसायचं. जमदाड्या जोरानं वाघ, वाघ ओरडायचा. असं रोजचं होऊ लागलं. जमदाडाच्या तोंडावर बायको तांब्याभर पाणी मारायची. त्याला तोंड धुतोय असच वाटायचं. जमदाड्या उठून बसत बायकोला म्हणायचा “ सकाळ झाली व्हय. चा दे. “
त्याची बायको करवादत म्हणायची
“आता मद्यान्ह झाली. चार घास गिळा आन लवंडा.”

संगळ्यांना भीतीने ग्रासलं होतं पण पाटलीन लैच खुश व्हती. एरवी रात्री उशिरापर्यंत गावड्याच्या आंजीच्या दारी ओवाळून टाकलेलं पाटील वेळीच घराकडं यायला लागलं.

परगावी शाळेत जाणारी पोरं खुशाल आईबापाच्या संमतीने शाळेला दांडी मारू लागली. दिवसभर टवाळक्या करत फिरू लागली. एके दिवशी सांजंला पांडूच्या पोटात गुडगुडायला लागलं. म्हणून एका हातात भाला आणि दुस-याने टमरेल धरत तो हागंदारीकडं धावला. बसल्या बरोबर पोरं ओरडली वाघ, वाघ. पांडू लेंग्याची नाडी बांधायची विसरुन धावत सुटला. भाला तिथच राहीला. पांडू लेंग्यात घुटमळून पडला. मुका मार लागल्याने विव्हळला. पोरं खो खो हासत सुटली. तशी पांडूने एक सनसनती शिवी हासडली. तोपर्यंत पोरं दिसेनाशी झाली. गावातलं कोणीही रात्री परसाकडला गेलं की बसतो न बसतो तोच लगबग उठून घराकडे धावायला लागायचं. बहुतेक वेळा हा विधी तोंडं फिरवून उभ्या असलेल्या दोन-चार सखी सोबत्यांच्या गराड्यात व्हायचा.

रानात कोण जाईना. काही रिकामटेकडे मिळेल तिथं पत्त्यांच्या डावात रंगले. काही गडी सुतार, लोहाराकडं अवजारं बनवून घेत होते. बायाबापड्या सारवणं, भांडी घासणं, दळनकांडन करण्यात रमल्या.

जगण्याच्या अड्ड्यावर बेवड्यांची वर्दळ वाढली. जगण्या लक्ष्मीची सकाळ,दुपार, संध्याकाळी पुजा करु लागला . तिला नवस बोलला “वाघाचा मुक्काम चांगला वरीसभर वाढू दे पाच नारळाचं तोरण वाहिल.”

वन खात्याचं कर्मचारी, पोलीस आलं. पिंजरं लागलं. लोकांना डोक्याला पाठून बांधायला मुखवटं वाटलं. माणसं गावात फिरताना सुध्दा पाठमोरं मुखवटं लावू लागली. त्यामुळं पाठून नुसत्या अंगकाठीवरुन एकमेकाला ओळखणारी माणसं गोंधळू लागली.
IMG_20191205_031849_0.jpg
एक दिवशी जगतापाच्या संगीन पिवळं लुगडं नेसलं आन डोक्याच्या मागच्या बाजूला मुखवटा लावून पाण्याला गेली. ही संगी आणि गोंधळ्याच्या बबीचा बांधा शेम टू शेम. फरक इतकाच की संगी रंगाने सावळी आणि बबी काळी होती. सांजचं पाठून पाहीलं तर त्या दोघीतला फरक कळत नसायचा. बबीचं आणि काळ्या बाळ्याचं नाजूक प्रकरण होतं. अधूनमधून बबी सुध्दा पिवळं लुगडं नेसायची.
काळ्या बाळ्याला वाटलं त्याचाच ऐवज पाण्याला चाललाय. त्यान झटक्यात कावडीचं डबं घेतलं आन मागनं जाऊन संगीचा हात धरला तशी संगीन मागं वळून सनसनीत वाजवली. बाळ्या काळा होता म्हणून त्याचं थोबाड लाल झालं नाही इतकच. पण गालफडाला चांगल्याच झिणझिण्या आल्या.

बाई, बाप्या, पोरं सगळ्यांच्या सारख्या मुखवट्यांनी बरेच घोळ झाले.

मुखवटं लावून माणसं जमावाने शेतातही भीत भीत काम करत होती. सकाळी उन्हं चांगली वर आल्यावर रानात जात आणि यरवाळी घरी येत. त्यामुळं जे काम दोन दिवसात व्हायचं त्याला पाच दिवस लागत होते.

पिंजरे लावून पाच-सहा दिवस झालं तरी वाघाचा पत्त्या नव्हता.
शेतात बिनधोक काम करता येईना म्हणून , ना-या, भिवा, नामा, शिवाला काय चैन पडत नव्हतं.

पुन्हा भिवा, ना-या, शिवा, नाम्या पारावर जमलं. वाघाला कशी मात द्यायची यावर चर्चा रंगली.
भिवा – “ गड्यांनो आपण आता ही जबाबदारी आपल्या अंगावर घ्यायची. वनखात्यानी वाघाला पकडायच्या आधी आपणच पकडायचा. म्हंजी आपला सत्कार व्हईल. बक्षीस मिळल. त्यामुळं आपण पंचायतीच्या निवडणुकीत निवडून येऊ. म्या सरपंच व्हईल आणि तुम्ही सदस्य. पण याची वाच्यता कुठं करायची नाय.”
“आरं हे लय नामी काम होईल बघ. बर आता बोला कसं पकडू वाघाला ? ”
“मला तर वाटतं एखादं मेलेलं जनावर शिवारात ठेवून त्यावर ईख घालावं. खाऊन मरल.”
“आरं असं न्हाय करता येणार. परवाच भैताड वाडीत आसाच वाघ आला व्हता. गावकऱ्यांनी त्याला ईख घालून मारला तर पोलीस दहा पंधरा जणांना घेऊन गेलं, का तर म्हणं वाघ मारायला बंदी हाय.”
“आर ढोल, झांजा वाजवून बाहेर काढायचा आन वाघरीत गुंडाळायचा ”
“एवढं सोपं हाय ते”
“म्या काय म्हणतो माणसाचं मुखवट घालण्यापरिस वाघाचंच मुखवटं लावलं अन मोहरमच्या वाघाच रुप घेतलं तर वाघ काय करणार नाय.”
“आरं हो रं त्याला वाटल आपलाच कळप चाललाय. आपूण त्याला मोकळ्या रानात आणायचं आन हळूच मागून येऊन वाघरीत लपेटायचं.”
“आरं वासावनं वळीकतं ते बेनं . माणसाचा वास आला का मुखवटा घातलेल्याचा मुडदा पाडलं. तू व्हशील का तयार मुखवटा घालाया. ”

हि युगत कोणालाच पटली नाही. कोण जीव पणाला लावणार ? आन माणसाचे मुखवटे डोक्याला पाठीमागे बांधून भीत भीत काय काम होणार यावर सगळ्यांचे एकमत झाले. एकाच्या टकू-यात कायतरी वळवळलं….

“गाय येल्यावर तिच वासरु मेलं तर गाय दुध काढू देत नाय. मग आपून काय करतो?”
“भोत बनावतो वासराचा आन कासंला चिटकावतो तवा गाय दुध काढू देतीया.”
“बराबर आपून तसाच वाघाचा भोत बनवायचा. त्याला बांधावर बसवू. ऊसातला वाघ आपलीच जमात हाय म्हून जवळ आला की धरायचा”
“ उगाचं डोस्क पिकवताय गड्यांनो. आपुन त्याला बेसुद करु आन मंग धरु. बेसूद झाल्यावर तो चौघांच्या आटोक्यात येईल.”
“कसं बेसूद करु ? त्याला जगण्याच्या अड्डयाव बोलवू. गलास भरु. भजी मिरची खायला घालू.”
“आरं नामी युगत हाय. आपून उसात दवंडी पिटू. आज रातच्याला गावचा पाहूणचार म्हून जगण्याच्याा अड्डयाव वाघोबाला पार्टी देयाची हाय. एक बोकड आन टिपाडभर दारुचा बंदोबस्त केलेला हाय तरी समद्यांनी हजर राहावं वो.”
“ आरं बास झाली मस्करी लेकांनो. पण दारु पाजून वाघाला पकडायची आडीया भारी”.
“ ना-याच्या उसाच्या खालच्या अंगाला जनावरांसाठी बनवलेला पाणी प्यायचा हौद हाय. परवा कोणीतरी बोंब उठवली वाघ त्या हौदात पाणी प्यायला येतो म्हणून . त्याच्यात दारू वतली तर वाघ झिंगल की. ”
“ वाघ दारुचा वास आल्यावर तोंड तरी लावल का पाण्याला ?”.
“ त्या परीस भांग घोटली तं कसं राहील ? शिवाच्या वरातीत भांग व्हती. काय मजा आलती नाचाया. “
“ माझा तर दुस-या दिवशी डोळाच उघडत नव्हता. “
“आपूण लय नशा येईल अशी भांग घोटू. तिच्यात साखर, वेलची, बडीशेप,गुलाब पाकळ्या घालू मग वास बी येणार नाय आन चव बी गाॅड लागल.”
“आसच करु”

भिवाची बायको माहेरपणाला गेली होती . घरी कोणी नव्हते. भांग त्याच्याच घरी करण्याचे ठरले.

मंडळीनी भांगेच्या बिया, पानं आणली. त्यात वेलची,काळी मिरी, बडीशेप गुलाब पाकळ्याच पाणी मिसळून वाटल्या. नंतर खसखस वाटून त्यात मिसळली. त्याचा वस्त्रगाळ करून वाटलेली साखर घातली आणि मिस्रण मुरायला ठेवलं. दोन-चार तास मुरल्यावर अगदी तर्र भांग तयार झाली.

भिवा, ना-या,शिवा भांगेची चव घेण्यासाठी उतावीळ झाले होते. तिघांनी काही ग्लास भांग रिचवली. नामाने बायकोच्या धाकाने भांग पिली नाही. सारे भिवाच्या अंगणात बसले होते. भिवा सारखं एकच बोलू लागला.
“मायला बाय्यलीला म्हणलं नको जावू माहेराला, एकाला दोघं सोबत राहू. मला म्हणती वाघ खातो का तुम्हाला एकटं राहिलं तर ?”
सारखं, सारखं तेच ऐकून शिवा वैतागून म्हणाला
“कशी येडी हाय, तुला खाल्ला तर हा शिवा नाय का?.”
आता भिवाच्या ध्यानात आलं शिव्या सारखं, सारखं त्याच्या बायको विषयी वगांळ बोलतोय.
भिवानं शिवाच्या कमरत लाथ हानली. तसा तो कळवळला. तो सगळं बिंग फोडतो म्हणाला आणि बोंब ठोकली…
“आमचं ठरलय”
“आमचं ठरलय”
“आमचं ठरलय”
हा तमाशा पाहणारे विचारु लागले काय ठरलय…
शिवाने तोंड उघडलं…आमी वाघाला भांsss…
तेवढ्यात भिवाने शिवाला लाथ घातल्याचे पाहून ना-या थोडा शुद्धीवर आला.
नामाने पटकन शिवाचं तोंड बंद केलं.
आजूबाजूला बाजूला जमलेले बघे समजले
“ आमचं ठरलय वाघाला भांचोदला पकडायचाच” असंच बोलतोय.
आता भिवाही सावध झाला. उगाच बिंग फुटू नये म्हणून चौघे पुन्हा भिवाच्या घरी गेले.

दुस-या दिवशी सांज पडता चौघेही रानातच हौदा जवळ्याच्या खोपटात थांबण्याच्या तयारीनिशी निघाले. प्रत्येकाच्या एका हातात भाला आणि अंगावर घोंगडी पांघरली होती. नामाने दुस-या हातात वाघर घेतली होती. ना-याच्या दुस-या हातात विजेरी होती. शिवाला भांग प्रिय. बरोबर भिवाचं कुत्रं होतं. ओढ्यात आल्यावर कुत्रं कन्हेरीच्या दिशेला धावत सुटलं. सारे एका जागेवर काय होतय हे पहात थांबले. आवाज न करता भाले सरसावले. कुत्रा धावला म्हणजे कन्हेरीच्या बेटाआड वाघ आसल म्हणून सगळ्यांनी श्वास रोखले.पण काही विशेष घडलं नाही. फक्त कुत्रा कन्हेरीच्या झाडावर तंगडी वर करुन आला. अखेर ते वाघाच्या भीतीने धडधडत्या काळजाने लपत, छपत ना-याच्या उसाच्या खालच्या अंगाला असलेल्या हौदा जवळ आले.
बरोबर आणलेली सगळी भांग हौदातल्या पाण्यात ओतली. शिवाला सगळी भांग हौदात ओतल्यानं भरुन आलं पण भिवा पुढं काही चाललं नाही.

भिवा म्हणाला चला आता खोपटात बसून बिळातनं नजर ठेवू वाघावर. पडत्या फळाची आज्ञा म्हून ना-या, शिवा, नामा त्याच्या मागोमाग खोपटाकडं आले. खोपटापुढं पडलेली लाकडं पेटवली. थंडी पडली होती. थोडावेळ शेक घेत बसले. कुत्र खोपटाभोवती फिरत होतं.

थोडा वेळ शेक घेतल्यावर सारे घोंगडी लपेटून खोपटात शिरले. खोपटाचा झापा बंद केला आणि बिळातून पाहात बसले. मध्य रात्री पर्यंत काहीच घडलं नाही फक्त खोपटा पुढचे निखारे क्षीण होत गेले आणि भिवाचा कुत्रा भुंकू लागला. सगळे सावधान झाले. डोळे वटारुन पाहू लागले. पुन्हा त्यांची धडधड वाढली. नामाने वाघर तयार ठेवली. सगळ्यांनी भाले सरसावले. कुत्रा भुंकतच राहिला पण वाघ काही दिसला नाही. दोन तास कुत्रा भुकंतच होता. आता तो भुकंताना एकाच जागेवर गरगरा फिरायला लागला. भिवाला समजेना असं का करतय? पण त्याला वाघाच्या भीतीने बाहेर पडावेसे वाटले नाही.
शेकोटीच्या उजेडात त्यांना वनखात्याचे कर्मचारी आणि पोलिस येताना दिसले. एका पोलीसाच्या हातात एक कॅन होतं. ते कॅन पाहून शिवा म्हणाला
“ भिवा आपलं कॅन कसं गेलं ह्यांच्याकडं.”
भिवा – “तिच्या आयला म्याच इसारलो वाटतं हौदा जवळ.”
ना-या “आता रं”.
नामा- “पळून जाऊ”.
शिवा “गप बसा.”
खोपटात सामसूम झाली.

कुत्रा अजूनही गरगरा फिरत भुकंतच होता. एरवी अनोळखी माणसावर धावून जायचा पण आज असं काहीच करत नव्हता. तो चक्क वनकर्मचा-यांचे आणि पोलीसांचे पाय चाटू लागला.
खोपटात बसलेल्या सर्वांची खात्री पटली की कुत्रा हौदातलं पाणी पिला असणार. नशिब वनकर्मचारी आहेत वाघ असता तर त्याला बी चाटायला लागला असता.

समोरची शेकोटी पाहून पोलीसांना संशय आला. खोपटात माणसं असावीत. तरी सावध पवित्रा घेत एकाने गप्पकन झापावर लाथ मारली. तसा झाप तुटला. विजेरीच्या उजेडात घोंगडी पांघरलेले भिवा, ना-या,शिवा,नामा स्पष्ट दिसले.

पोलीस निरीक्षक गरजला
“काय रं भडव्यानू वाघाला मारुन कातडं तस्करी करायचा विचार होता काय?”
“नाय , सायेब आसं काय बी नाय”.
“मग हे भालं, वाघर, कुत्र, हौदातली भांग कशापायी”? मला माहित आहे. तुम्ही त्याला भांग पाजून धरणार होता. मग मारणार होता. “
भिवा- “ नाय सायेब, आमी पकडून देणार व्हतो.”
पोलीस निरीक्षक “ भांग कोठून पैदा केली? का ऊसात झाडं लावलीत? भांगेवर कायदेशीर बंदी आहे. तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलय. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. हौदात भांग टाकल्याने वाघाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. वाघाला पकडून तुम्ही मारलं असतं आणि त्याचे कातडे विकून पैसे कमावले असते. या सगळ्या मागं आंतरराज्य टोळी आहे का हे सुध्दा पहावं लागेल. व्यवस्थीत चौकशी व्हायला हवी.”
पोलीस पंचनामा झाला. पोलीसांनी हौदातली भांग कॅन मधे भरली.कॅन सील केले. पंचाच्या सह्या झाल्या. आणि भिवाच्या चौकडीला पोलीस पुढील चौकशीसाठी घेऊन गेले.

भिवा म्हणाला
“ वाघाला जेरबंद करायला गेलो आन आपणच पिंज-यात अडकलो”.
शिवा – “ हो रं खाल्लंपिल्लं काय नाय गलास तोडला‌ बारा आणे. तशातली गत.”
नामा – “ भांग पिऊन तर्र होत मारामारी करत होता तवा खाल्ल नाय तरी पिलं ते इसारला व्हय.”
भिवा – “आरं गप् बस. त्याल बी गेलं तूप बी गेलं हाती धुपाटणं आलं. नाय वाघ घावला, नाय बक्षिस. पोलीस कस्टडी झाली. म्या तं सपान बघितलं व्हतं आपूण वाघ पकडला. आपला सरकारनी सत्कार केला. बक्षिस मिळालं. म्या गावचा सरपंच झालो आन तुमी पंचायत सदस्य.”
शिवा – आता जेल म्हंजी सत्कार समजू.
नामा – “ आता गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाय.”
ना-या – “ आपण सगळ्यांसाठी कराय गेलो पण आपलाबी मतलब व्हता त्यात.”
एवढ्यात एक हवालदार त्यांना म्हणाला साहेब चौकशीसाठी येतायेत. खरं काय ते सांगा. नाही तर पोलीसी हिसका दाखवू.
ना-या म्हणला “ करायला गेलो गणपती पण झाला मारोती.”
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाऽहाऽऽ Lol Lol
मस्त जमलय अगदी!
गावातले लहान मोठे किस्से भारीच अगदी!
दमांची आठवण झाली.

भारीच जमलय. Lol Lol Lol
दुसरा फोटो तर धम्माल आहे.