लकीर के इस तरफ महत्वाची डॉक्युमेंट्री

Submitted by सखा on 2 December, 2019 - 14:30

लकीर के इस तरफ (२०१९)
लेखन/दिगदर्शन: शिल्पा बल्लाळ  
वेळ : ८९ मिनिट   
IMG-20191114-WA0013.jpg
तुम्ही बघताय नर्मदा नदीचे विशाल पात्र.  डॉक्युमेंटरी च्या सुरुवातीला एका स्त्रीचा आवाज येतो. ती म्हणते की या कथेचे तीन कॅरेक्टर्स हम, हमारी दुनिया और एलियन्स... पुढे ती निवेदिका आपल्याला सांगते की..समजा तुम्ही नदीच्या तीरावर राहता कित्येक पिढ्यापासून तुम्ही या गावात सुखाने नांदत आहात. इथे तुमची शेतजमीन आहे घर, व्यवसाय आहे.  तुमची पिल्लं  याच गावात वाढत आहेत तुम्ही समाधानाने जगत आहात.

मग अचानक एक दिवस कोणीतरी येतं ज्याचा चेहरा पण तुम्ही ओळखत नाही.  ती व्यक्ती तुम्हाला सांगते की आता तुम्ही इथं नाही राहायचं कारण आता आपल्याला प्रगती करायची आहे, मोठं धरण बांधायचे आणि धरण बांधल्यावर तुमचं गाव बुडणार, मात्र धरणाचे खूप खूप फायदे असतात आणि मुख्य म्हणजे हे फायदे तुमच्यामुळे इतर लोकांना होणार आहेत.  तुमचा हा त्याग तुमच्या देशातल्या अनेक बंधू-भगिनींना फायद्याचा ठरणारे मग चला बघू चला पटकन सगळा बाडबिस्तरा आवरा आणि तुम्हाला सरकारने दिलेल्या दुसऱ्या मस्त जागेत राहायला जा!

"काय ??" मग तुम्ही विचारणार "तू कोण रे भाऊ? तुझा आणि माझं काय नातं? तु माझ्यासाठी काय केलं म्हणून मी माझं गाव सोडायचं आणि आम्हीच का बर त्याग करायचा..." मग तो म्हणतो "कारण आपण एक प्रगतशील राष्ट्र आहोत या नदीवर धरण बांधले जाईल आणि आणि तुमच्या या थोड्याशा त्यागामुळे कितीतरी लाखो लोकांना फायदा होईल." 

मोठी मोठी आश्वासने दिली जातात. अनेक वर्षे त्यांची पूर्तता होत नाही. वाट पाहून लोकांचे आयुष्य संपतात. मग मेधाताईंच  आंदोलन होतं आणि त्यांना हळूहळू हक्क मिळू लागतो. लोकांना वाटतं ते आंदोलन संपल पण नाही आजही ते आंदोलन अजूनही चालू आहे आणि ही डॉक्युमेंटरी नेमकं आजच त्या लोकांचा वास्तव टिपते. 

खरंच त्यांना हवं ते मिळालं का? तुम्ही सांगितलं म्हणून त्यांनी त्याग केला ना?  मग त्यांना दिले का तुम्ही ते सगळं जे कबूल केलेलं की त्यांना विसरून गेलात? 

कित्येक गावातली कुटुंब विस्थापित होतात त्यांना जे काय कबूल केलेलं असतं ते तर मिळतच नाही घरा ऐवजी त्यांना पत्र्याचे शेड मिळतात जे उन्हात खूप तापतात आणि पावसात त्यात करंट उतरतो.  शेतीच्या नावावरती नापिक जमिनी दिल्या जातात.  एकाच कुटुंबातल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिल्या जातात का तर मग चिरीमिरी घेऊन पुन्हा कागदपत्रे जुळवून कुटुंबांना एकत्र आणला जाईल.  

कविता सच्ची असते शिल्पा बल्लाळ यांची डॉक्युमेंट्री "लकीर के इस पार" सुद्धा एक कविताच आहे फक्त तिचा फॉर्म डॉक्युमेंट्रीचा आहे.

या डॉक्युमेंटरी ची गंमत अशी की ती कुणालाच व्हिलन ठरवत नाही कुणालाही दोष देत नाही फक्त आपल्याला प्रश्न विचारत जाते.

"तुम्हारा घर का एक कमरा जल रहा हो तो क्या तुम दुसरे कमरे मे आराम से सोओगे?"

आणि तुम्हाला तो जर प्रश्न कळला नसेल तर एवढेच म्हणते "तो मुझे तुमसे कुछ नही कहना."

नदीकाठच्या विस्थापित लोकांनीच आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी एकमेकांना मदत करून तयार केलेल्या जीवनशाळा जिथं छोटी छोटी मुलं जगण्याची कला शिकतात.  

अन्याय होऊनही पुन्हा उभं राहण्याची धडपड करतात.  नक्षलवादी नाही बनत!

तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाल तर निसर्ग तुम्हाला नक्कीच तडाखा देईल हे वास्तव तुम्हाला दिसत. 

मेधाताई पाटकर यांचं या डॉक्युमेंटरी मधलं चित्रण अगदी त्या तिथल्या सगळ्या इकोसिस्टीम बरोबरच अगदी तटस्थपणे त्यांनी ते टीपल आहे.
Webp.net-resizeimage.jpg
पूर्ण डॉक्युमेंटरी पहात असताना केवळ पीडितांच्या संवाद आणि आजच्या त्यांच्या स्थितीवरून प्रगतीच्या नावावर दुसऱ्याचे जीवन उध्वस्त करणारा मानवाचा एक अत्यंत स्वार्थी हिडीस आणि ओंगळवाणा एलियन चेहरा आपोआपच आपल्या डोळ्या समोर येतो. 

कोण आहे तो एलियन? ज्याने आपल्या देशातील या लोकांची अशी अवस्था केली? फेसबुक आणि व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीवरच्या प्रत्येक पोग्या पंडिताने आवर्जून बघावी अशी डॉक्युमेंटरी जी अगदी जलाच्या शांत भावात तुम्हाला प्रश्न विचारते

"लकीर के इस तरफ?"

~सत्यजित खारकर

(टीप: या डॉक्युमेंटरी चे निर्माते 30 जानेवारी २०२० पासून महात्मा गांधी यांच्या पुणयतिथीचे औचित्य साधून युट्युब वर सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहेत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यमुना की नर्मदा? पाटकरांचं आंदोलन नर्मदेसाठी आहे ना.. >>>

सुनिती. बहुतेक ते माहीतीपटातल्या निवेदिकेचं दिल्लीस्थित लोकांना समजावणे असावे.
कारण लेखात "पुढे ती निवेदिका आपल्याला सांगते की..समजा तुम्ही यमुनेच्या तीरावर राहता" असे एक वाक्य आहे