गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान :भाग १

Submitted by निलाक्षी on 2 December, 2019 - 02:13

कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.

त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.

मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.

गिरनार बद्दल नक्की कधी ऐकले होते लक्षात नाही पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडे श्री. प्रमोदजी केणे यांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक वाचायला मिळाले व गिरनार विषयी उत्सुकता वाढली. तरीही गिरनार इथून किती लांब आहे, शिवाय १०हज्जार पायऱ्या चढायच्या.. छे.. हे काही आपल्याने होणार नाही म्हणून सोडून दिलेले.. प्रमोदजींना आलेले अनेक दिव्य अनुभव वाचून लोक भारावून गिरनारला जातात.. तसे माझे काही झाले नव्हते.. आणि हे त्यांचे अनुभव त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याईच्या शिदोरीमुळे होते.. सगळ्यांना थोडी येतात ते.. माझे व्यावहारीक मत.. शिवाय अश्या अनुभवांमुळे नक्की काय फरक पडतो जीवनात तेही माहीत नाही.

पण मग गिरनार विषयी गुगलवर वाचत गेले, जेंव्हा जेंव्हा जे जे वाचायला मिळेल ते वाचत होते. त्यात असे कळाले की पायऱ्या कठीण असतात वारा जोराचा वहात असतो, शिखर खूप उंच आहे, रस्ता एकदम घनदाट जंगलातून जातो. जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी वन्य श्वापदे मार्गावर दिसतात.. का कुणास ठाऊक पण दाट जंगल म्हटले की मला त्याची ओढ लागते.. भीतीही वाटतेच.. पण जंगलात जायला, रहायला मनापासून आवडते. त्यामुळे अजुनच जावेसे वाटायला लागले. त्यात अचानक ध्यानी मनी नसताना माझ्या सासुबाई आणि माझ्या २ नणंदा गिरनारवर जाऊन आल्या.. त्यांचा उत्साह पाहुन माझी इच्छा आणखीन प्रबळ झाली.. ६० च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासुबाई लीलया गिरनार चढून उतरल्या.. मग आपण का बर कच खावी असं वाटायला लागलं.. (सासुबाईंची क्षमता आणी इच्छाशक्ती अफाट आहे हे अलहिदा.)

मग काय सगळ्यांना सांगून झालं की कुणी जाणारं असेल गिरनारला तर मला सांगा, मलापण यायचं आहे. साधारण ३ एक महिन्यांपुर्वी आमच्या पुर्वी शेजारी रहाणाऱ्या काकुंचा फोन आला.. पुण्याहून एक ग्रुप नोव्हेंबरमधे जातोय तर आपण जायचं का. तेव्हा माझ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं पण नोव्हे. पर्य्ंत ते कमी होणार होतं, तेंव्हा सुट्टी मिळण्याची शक्यता होती.. मी हो म्हणून टाकलं. मनी विचार केला पुढचं पुढे पाहू..
पण लगेचच त्यांचा दुसरा फोन आला की नवरात्रापर्यंत त्यांच नक्की काय ते ठरेल.. काही अडचणींमुळे त्यांचं नक्की होत नव्हत.. झालं मी थोडी थोडी माहीती वाचायला सुरवात केलेली, सकाळी लवकर उठून चालायला जाण्याची मनाची तयारी करत असतानाच (हो, मला आधी लवकर उठण्यासाठी मनाची तयारी करावी लागते, मग शरीराची.. लै अवघड काम असतंय ते) काकूंनी अस सांगितल्यामुळे परत सगळ शांत झाल.. कांकू दिवाळी दरम्यान जाण्यासाठी मोकळ्या झाल्या आणी आता परत आमच जाण्याच ठरू लागलं.. त्या ग्रुपला फोन केला तर जागा नव्हती ती लोकं ८ तारखेलाच निघणार होती.

शेवटी आम्ही आमचं जायचं ठरवलं आणि १२, १३,१४ ची तिकिटे काढली.. जातानाची वेटिंगवर होती तर येतानाची कन्फर्म झालेली. आता ऑफीसमध्ये सांगून सुट्टी टाकून, कामे मॅनेज करून परत चालण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, मनाची, शरिराची थोडी थोडी तयारी सुरु केली. नेटवर वाचताना असे लक्षात आले की कार्तिकी पौर्णिमा दत्तदर्शनासाठी महत्वाची मानली जाते, त्यामुळे तिथे खुप गर्दी असणार.. आम्ही रहाण्याचे तिथे गेल्यावर पाहू असे ठरवले होते कारण अनेक धर्मशाळेत सहज जागा उपलब्ध होते, पण आता तसे चालणार नव्हते.. मग परत शोध सुरु झाला.. ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो, त्यांची काकुंशी अधीची ओळख होती म्हणून त्यांनाही विचाराचे ठरले कारण ते निघणार तेंव्हा आम्ही गिरनारला पोहोचत होतो, त्यांच्यापैकीच एखादी खोली आम्हाला मिळाली असती तर काम सोपे होणार होते. ऑनलाईन धर्मशाळा फुल दिसत होत्या.. काकुंनी त्यांना फोन केला तर त्या म्हणाल्या असे नाही होऊ शकणार पण ऐनवेळी ३ जणांनी रद्द् केल्याने जागा आहे तेंव्हा तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. जातानाची ३ तिकिटे आहेत आमच्याकडे फक्त येतानाची २ च् आहेत एकाच तात्काळमध्ये पहावं लागेल.

हे सगळे ६ तारखेला चालले होते आणि ही लोकं ८ तारखेला निघणार होती. मी तारखा पाहिल्या तर मला जास्तीची सुट्टी टाकावी लागणार नव्हती पण सुट्टी अलिकडे मात्र घ्यावी लागणार होती.. एक कांम नेमके शुक्रवारी किंवा सोमवारी येऊ शकत होते, आता परत डेव्हलमेंट टिम, आमचा ऑनसाईट असलेला माणूस, मॅनेजर या सर्वांशी परत बोलावे लागणार होते.. अधीची मंजूर झालेली रजा परत कॅन्सल करणे, नव्याने रजा टाकणे, कामाची आखणी करणे आले. पण सर्वांनीच सहकार्य दिले आणि ६ तारखेला संध्याकाळी ग्रुप बरोबर ८ तारखेच्या संध्याकाळच्या गाडीने निघण्याचे नक्की झाले.
हे सगळे होईस्तोवर Open SAP teamचा इमेल आला.. मी एका कोर्ससाठी नाव नोंदणी केली होती तो बरोबर ६ तारखेपासून सुरु होणार होता आणि पहिल्या आठवड्याचे साहित्य आणि सराव परिक्षा नेटवर उपलब्ध झाले होते. सराव परीक्षा १४ तारखेच्या आत द्यायची होती.. आम्ही १३ला रात्री येणार म्हणजे जायच्या आधी हे सगळे पुर्ण करायला हवे होते..
७ तारखेचा दिवस यातच गेला आणि ८ला दुपारी आम्ही निघणार होतो.. तयारी तर शुन्य होती.

आधी १२ तारखेच ठरलेलं तेंव्हा शनि, रवि हातात असणार होते.. तेंव्हा मायबोलीवर एकीचा गिरनारचा प्रवास वाचायला सुरू केलेली.. तिने बरीच शारीरीक तयारी, आखीव व्यायामाचे नियोजन वगैरे केलेले.. ते आठवले आणि ताण यायला लागला.. इतका की संध्याकाळी पित्ताने डोके दुखी वाढली.. याला अजुन एक कारण होते.. आम्ही गिरनारचा विचार केलेला तो गुरुशिखर चढून पादुकांचे दर्शन घेण्याचा.. पण ह्या ग्रुपमधे परिक्रमाही होती ज्यासाठी ३८ ते ४० किलोमीटर चालावे लागते.. दोन्ही कसं जमणार, परिक्रमा तर आधी होती आणि मग गुरुशिखर.. म्हणजे परिक्रमेने दमलो तर गुरुशिखरावर पाणी सोडावे लागणार होते आणि ते मन मानायला तयार होत नव्हते.. शेवटी मनाची तयारी केली कि परिक्रमा वर्षातून फक्त ५ दिवस - कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंतच करता येते तेंव्हा तिला प्राधान्य द्यायचे गुरुशिखरावर १२ही महिने जाता येते तेंव्हा तिथे परत जाता येईल.

मनाला आश्वस्त करित ८ तारखेला घरची कामे मार्गी लावीत तयारी पुर्ण केली. ८ तारखेला घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने अनेक गोष्टी कमी वेळात मार्गी लावणे शक्य झाले.
अगदी निघायच्या वेळी बॅग भरत २.३०ला निघणारे आम्ही ३ ला मार्गस्थ झालो.

मला जसे आठवत होते तशी मी सामानाची यादी करत होते अगदी टूथपेस्ट्, कंगवा ई. ई. ज्याचा फायदा निघताना ऐनवेळी बॅग भरताना झाला व काहीही न विसरता ३ वाजता मी बांद्रा स्थानकाकाडे निघाले..

क्रमश:
नीलाक्षी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री गुरुदेव दत्त
मी हि नुकताच गिरनार ला जाऊन आलो. खूपच अविस्मरणीय अनुभव. इच्छा मनात आल्यावर दर्शन घडतेच. शारीरिक तयारीपेक्षा मनाची तयारी अधिक महत्वाची. प्रत्येकाने हा दर्शनाचा अनुभव नक्की घ्यावा. आपला सविस्तर अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.

माझ्या पहिल्यावहिल्या लिखाणाच्या पहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मीनल.
भावनाजी प्रोत्साहनासाठी धन्यवाद !
ऋतूराज खरंय आपलं! हे प्रवास म्हणजे शरीरासह मनाचीही परीक्षा असते. तुमचेही अनुभव वाचायला आवडेल.

खुप छान लिहिलय..... पुढे हि वाचायला आवडेल..... वाचुन जाण्याचि खुप उत्सुकता होतेय... पण आपल्याला हे जमेल का हि एक भिती वाट्ते...

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
अबोल - गिरनार यात्रा ही केवळ श्रद्धेवर होते. जरुर जा. एकदातरी अनुभवावी अशीच यात्रा आहे ही.

छान लिहिलंय. दोन चार भाग जास्त झाले तरी चालतील हो पण सविस्तर लिहा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

सगळ्यांचे परत एकदा आभार!

दोन चार भाग जास्त झाले तरी चालतील हो पण सविस्तर लिहा.- हो प्रवीणजी तसा प्रयत्न करते आहे.

मी प्रतिसाद लिहायला घेतला की आधीचे प्रतिसाद मला दिसत नाहीत. त्यासाठी काय करायचं ?