इष्काचा खटाटोप (भाग-3)

Submitted by सखा on 27 November, 2019 - 23:59

बुके घेऊन भैरू पैलवानाला भेटायला जेव्हा मी, बाबुलाल आणि गणू हॉस्पिटलला गेलो. तेव्हा सर्वत्र प्लास्टर बांधलेला भैरू अभिमानाने म्हणाला:
"बाबुलाल म्या लै कुस्त्या खेळलो पण असा दणका कधीच नाही खाल्ला. ती दुबईची माउली लै स्ट्रॉंग हाये."
हे ऐकून गणू उगाच लाजू लागला मग मी त्याला नजरेनेच जरब दिली तेव्हढ्यात मग गण्या कडे बघून भैरू म्हणतो.
"काय रे गण्या लेका फोकलीच्या मिशा का बरं भादरल्यास?"
"त्याचे चुलते खुडकले." मी पटकन म्हणालो
"आं?? अर्रर्र, कशाने गेले?"
"ते झोक्यावरून पडले” मी पुस्ती जोडली.
"मायला हा झोका वंगाळच गड्या नुसती पनौती बरगड्या मोडल्या माझ्या." भैरू पैलवान उसासा सोडत बोलला
भैरूला भेटून मग बद्रीला भेटायला मी, बाबुलाल आणि गणू गावातल्या वेड्याच्या हॉस्पिटलला गेलो. तेव्हा डोक्याला मार लागलेला बद्री गणूला पाहून म्हणाला:
"आजा मेरी कोमल डार्लिंग. मला माहिती होते तू मला भेटायला येणारच."
ते ऐकून मी आणि बाबुलाल घाबरलोच आम्हाला वाटले बद्रीने कोमल म्हणजेच गण्या हे ओळखलेच मग नंतर लगेच बद्री सध्या वेड्याच्या दवाखान्यात आहे आणि डोक्याला मार लागल्याने तो टेम्पररी काही बाही बोलतो हे लक्षात येऊन आम्हाला जरा बरे वाटले.
मग अचानकच बद्री पलंगावरून उठून गणूला “पारू पप्पी दे पारू पप्पी दे" असे म्हणत त्याच्या कडे साठी धावला तेव्हा गण्याने ओरडत जिवाच्या आकांताने धूम ठोकली बद्री सुद्धा एखाद्या व्हिलन सारखा त्याच्या मागे पळाला. सुरक्षा सेवकांनी जेव्हा पंधरा मिनिटांनी बद्रीला धरून आणले तेव्हा तो एखाद्या विजयी वीरा सारखा हसत परत आला आणि म्हणाला:
"जय हो महिष्मती, पारूची पप्पी घेतलीच!"
आता शाळेच्या हॉलमध्ये मी आणि बाबुलाल गण्याची समजूत घालत बसलो होतो. त्याच काय झालं की गणू जिवाच्या आकांताने पळत बाबुलालच्या दुकानात जाऊन लपला आणि तिथे अंगावर साडी घेऊन म्यानिकेन सारखी कथकली पोज घेऊन उभा राहीला. वेडा बद्री मागोमाग तिथे दुकानात आला आणि पारू त्याला न दिसल्याने आता रिकाम्या हाताने काय जायचे असा विचार करून त्याने साडी घातलेल्या गुबगुबीत म्यानिकेनचेच दोनचार मुके घेतले . तेव्हढ्यात हॉस्पिटलचे सुरक्षा कर्मचारी पोहोचल्याने पुढचा अतिप्रसंग टळला मात्र आपल्या कडे ते विचित्र नजरेने पाहात आहेत हे काही साडी घातलेल्या गणूच्या नजरेतून सुटले नाही. झालेल्या फजितीने आता मी नाटकात काम करणारच नाही असा हट्ट करून गण्या बसला होता.
"अरे ते बद्री येडं झालंय त्याचं काय एव्हढं." मी गणूला समजावणीच्या स्वरात म्हंटल.
"वा जी वा म्हणे काय हुतंय, तुमचा मुका घेतला तर कळतंय तुम्हाला" - गणू
त्यावर बाबुलाल वडीलधाऱ्या व्यक्तीच्या समजावणीच्या स्वरात म्हणाले.
"अरे बाबा गालावर तर घेतला मुका तुझ्या हे पहा आता नट म्हंटल्यावर करावं लागतंय एव्हढं. फॉरेनच्या नट नट्या बघ बरं कशा पटापट मुके घेतात. ते थोडीच तुझ्या सारखे रडत बसतात." आता या युक्तिवादावर गणू कडे फारसा काही डिफेन्स नव्हता तरी तो भूण भूण करीत बसला शेवटी नाही हो म्हणता येत्या दिवाळीपासून पगार वाढवण्याच्या बोलीवर गणू पुन्हा राजी झाला.
भैरू आणि बद्री दोघेपण दहापंधरा दिवस जायबंदी झाल्याने लोला, लुंगीवाला, अनिल आणि हेडमास्तर यांच्याच सिनची प्रॅक्टिस घ्यायची असे ठरले. बाबुलालला फारसे वाक्य नव्हतेंच त्यामुळे बाकीच्यांचेच सीन्स घेताना ते बिचारे प्रॉम्पटिंगचे काम करत असत.
हेडमास्तरनी कुठे तरी वाचले होते की बरेच मोठे नट म्हणे चार घुटके घेतल्या शिवाय भूमीकेसाठी उभेच राहात नाहीत त्यामुळे हेडमास्तर साहेब रोज मस्त पैकी पिऊन झोकांड्या खात येऊ लागले आणि स्टेजवर उभे राहण्या पेक्षा जास्त आडवेच पडूच लागले.
संकटे किती पण येवोत पण नाटक होणारच हा प्रण करून आम्ही सर्वांनी पुढच्या सिनची प्रॅक्टिस सुरू केली.
या सिन मध्ये अनिलला एक दु:स्वप्न पडते की त्याचा पत्ता कट झाला आहे आणि त्याचे रायव्हल हेडमास्तर आणि कोमल हवेत सुपरमॅन प्रमाणे मजेत विहारत आहेत आणि मग तो एक दुख्खी गीत म्हणतो. या ड्रीम सिक्वेन्सला आम्ही चार शक्तिमान माणसांना वर आढ्यावर बसवले आणि दाबे सर आणि गण्याच्या कमरेला काळे मजबूत बारीक दोर बांधले. आता अनिल सरचे करुण गाणे सुरु झाले की वरच्या दोन दोन लोकांनी दोर ओढायचे म्हणजे मास्तर आणि कोमल हवेत तरंगताना दिसतील. स्टेजवर धूर सोडला की स्वप्न दृश्य मस्त दिसेल असा आमचा कयास होता.
अनिल सरनी दर्द भरे गाणे सुरवात केली. मी धुराचे मशीन ऑन करण्याची खूण केली. लाईट वाल्यानी लाल हिरवे लाईट सोडले. वरच्या गडी लोकांनी आडातून पाणी काढावे तसे खपाखप दोऱ्या ओढल्या.
सुरवातीला आम्हाला दाबेसर आणि कोमल दोघेही उलटे पालटे होत वर जाताना दिसले. एक क्षणभर दोघेही स्थिरावले आणि आपले डायलॉग म्हणणार तोच दोघेही लंबका प्रमाणे हेलकावे खात एकमेकांना जोरात धडका मारू लागले मग अचानकच सात आठ फुटांवरून आधी कोमलबाला दोरी तुटून धप्पकन खाली पडली पडताना तिने दाबेसरांचे पाय धरल्याने तिच्यावर दाबेसर पडले आणि मग दोऱ्याच्या हिसड्याने मग एका मागे एक चार लोक वरून धपा धप खाली पडले.
स्टेजवर एकच कल्लोळ उडाला. धूर जरा कमी झाल्यावर जो मानवी मनोरा दिसला त्यात सर्वात खाली अर्थातच अनिलसर होते. त्यांच्यावर आरूढ झालेले हेडमास्तर दाबे त्यांच्यावर कोमलबाला आणि मग इतर. खूपच विनोदी दृश्य दिसत होते परंतु ही हसण्याची वेळ नव्हती मदतीला धावण्याची होती आणि हो जाता जाता एक सांगायलाच हवे चेंगरलेल्या दाबे सरांच्या हातात दोन मोसंब्या होत्या.
सरकारी इस्पितळात अनिलसर आणि दाबेसरानां बाजू बाजूला खाटा होत्या आणि त्यांची प्लास्टरमय अवस्था पाहून माझ्या आणि बाबुलालच्या लक्षात आले की आपल्या नाटकाचे आता बारा वाजले आहेत. त्याही अवस्थेत दाबे सर मला आणि बाबुलालला दरडावून हातातील काल पासून जपून ठेवलेल्या मोसंब्या दाखवीत म्हणाले
"हे काय आहे? आं??"
"मोसम्ब्या आहेत प्रकृतीला छान." मी
"पण मी म्हणतो या स्टेजवर आल्या कश्या?" दाबे रागात ओरडले
"म्हणजे मला कळालेलं नाहीये दाबे सर " मी साळसूदपणे म्हणालो
"हेडमास्तर साहेब विचारत आहेत की ती कोमलबाला आहे का कोमलबाबा?" बोकडेसर बोलले
एव्हढ्यात गणू ठरल्या प्रमाणे रडत आला आणि माझ्या कानात कुजबुजला.
मी लगेच रडवेला चेहरा करून म्हणालो - "बाबुलाल आपली कोमलबाला गेली होssss"
"काय बाई मेली??" बोकडेसर आणि दाबे एकदमच ओरडले.
"नाही मेली नाही. तिच्या उंटाच्या शेपटीला उंदीर चावल्याने बिचारी दुबईला परत गेली."
"बरच झालं ती बाई म्हणजे पनौतीच होती आपले अर्धे कलाकार तिच्यामुळे दवाखान्यात आहेत. अरेरे काय ही दयनीय अवस्था दाबेसरची आणि अनिल मास्तरची " बाबुलाल रागात म्हणाले. बिचारा गणू गोरामोरा झाला पण त्याकडे मी साफ दुर्लक्ष केले आणि मी पण दात ओठ खात म्हणालो.
"बरोबर आहे. बरे झाले ती बाई परत गेली"
"अरे पण ही फळं स्टेजवर माझ्या हातात पडलीच कुठून?" दाबेसर अजूनही न्यूटनच्या उत्सुकतेने म्हणाले.
आता मात्र मी एक नामवंत नाट्य लेखक असल्या प्रमाणे म्हणालो:
"दाबेसर काही चमत्कार हे आम्हा सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बाहेरचे असतात. ज्या प्रमाणे अपशकुनाची वीज नेमकी कधी आणि कुणाच्या बोडक्यात पडेल हे कुणालाच सांगता येत नाही तदवत जगात सगळ्याच का? ला उत्तरे नसतात.
आता हेच बघाना, दोरी का तुटली? उंटाला उंदीर आत्ताच का चावला? बद्री का बरं वेडा झाला? मी लेखक कसा झालो? आणि ही फळं कुठून आली असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं शहाण्या माणसांनी शोधायची नसतात.
जीवनातील काही अनाकलनीय गोष्टी या दैवाचा कौल मानून थर्डक्लास प्रश्न अज्जीबात न विचारता विनम्रतेने स्वीकारायच्या असतात." असे म्हणत मी बोलता बोलता दाबेच्या हातातील मोसम्ब्या काढून गणूच्या हातातील पिशवीत टाकल्या आणि मग मात्र विशेष वेळ न दवडता बाबुलाल, गणू आणि मी त्वरित त्या खोलीतून नाहीसे झालो. (समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users