इष्काचा खटाटोप (भाग-2)

Submitted by सखा on 27 November, 2019 - 23:58

मी आमचे परम मित्र बाबुलाल साडीवाले यांच्या साडीच्या दुकानात जाऊन माझी समस्या सांगितली. बाबुलाल म्हणजे लोकसंग्रह असलेला इरसाल गडी त्यांनी दुकानातच खटाखट कास्टिंग करून टाकले. आता शिकागोला जायचे म्हंटल्यावर गावातल्या ऍक्टर लोकांनी पण फार काही आढेवेढे घेतले नाहीत. बाबुलाल स्वतःच प्रोड्युसर झाले.
कास्टिंग असे झाले:
निर्माता: बाबुलाल साडी सेंटर, बोकलवाडी
लेखक आणि दिग्दर्शक: मी
संगीत: न्यू महाराजा ब्रास बॅण्ड, स्टेशन रोड, बोकलवाडी.
मेकप/लाईट्स/नेपथ्य: राम के भरोसे - म्हणजेच ऐनवेळी बघू
१)जालीमसिंग: भैरू पैलवान
२)मिस्टर लुंगीवाला: बाबुलाल साडीवाले
३)अनिल : सेंट परशु शाळेतील बोकडे मास्तर
४)बद्रीनाथ: सेंट परशु शाळेतील चपराशी बद्री
५)हेडमास्तर: सेंट परशु शाळेतील दाबे सर
आता सर्वात महत्वाचे म्हणजे हिरोईन कोण घायची? सुरवातीला मुंबईवरून कतरीना कैफला हिरोईन म्हणून आणावी म्हणून चपराशी बद्रीनी फार आग्रह धरला तर तमाशाफेम नृत्यांगना सुंदराबाई उर्फ फटाकडीलाच घ्यावे असे भैरू पैलवानाचे मत पडले. चित्रकलेच्या नयन बाई असतील तर बोकडे मास्तरना कामात विशेष उत्साह येणार हे स्पष्ट दिसत होते. दाबे सरांचे विशेष असे काही मत नव्हते फक्त बाई सुंदर असावी म्हणजे लव्ह सीन चांगला होईल एव्हढेच त्यांचे म्हणणे होते.
आठवडा उलटून गेला तरी हिरोईनचे काही निश्चित ठरतच नव्हते त्यामुळे मला काळजी वाटू लागली एक दिवस बाबुलालच्या दुकानात मी आणि बाबुलाल चिंतेत बसलेले असताना बाबुलालचा गोरा गोमटा गुबगुबीत नौकर गणू गिऱ्हाईकाला साड्याचा पदर बाई प्रमाणे अंगावर घेऊन दाखवीत होता. गणूला त्या अवस्थेत पाहताच माझे दिग्दर्शकीय डोळे एकदम चमकलेच. दोन ज्ञानी मनुष्याचे विचार मिळते जुळते असतात असे म्हणतात त्या मुळे बाबुलालना पण माझा विचार पूर्णपणे पटला. गणू नौकरी जाण्याच्या भीती पोटी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. बाकीच्या नटांचा नाटकापेक्षा नटी मध्ये असलेला इंटरेस्ट पाहता गणू म्हणजेच लोला लुंगीवाला हे ज्ञान गुप्त ठेवलेलेलच योग्य असा सुज्ञ विचार मी आणि बाबुलालने न केला तरच नवल. एकूणच काय तर या हिट नाटकातील हॉट नटी कोण हा ज्वलंत प्रश्न एकदाचा सुटला!
कुठल्याही नामवन्त दिग्दर्शका प्रमाणे "गण्या लेका हेरॉईनचे काम करणार आहेस तेव्हा जरा वजन कमी कर!" असा दम देत मी गणूचे नामकरण केले "कोमलबाला". अर्थातच गणू हा कुठल्याही मापाने कोमल वाटत नव्हता तरी त्याच्या मिशाविरहित गुबगुबीत चेहऱ्यावर एक लबाड गोडवा असल्याने तो खपून गेला. म्हणतात ना उपासाला केळे आणि वनवासाला रताळे!
दुसऱ्या दिवशी बाबुलाल साडी सेंटर मध्ये सात वाजता मुहूर्ताचा कार्यक्रम झाला. दुबईची हिरोईन कोमल बाला येणार असे मी आणि बाबुलालने सर्वांना खोटे सांगितल्या मुळे बाकीची पात्रे वेळे आधीच अंघोळ बिंघोळ करून हजर होती. ठरल्या प्रमाणे सात वाजता बाबुलालने दिलेली भरजरी साडी घालून मिस कोमलबाला ठुमकत हजर झाली आणि नाटकात तिच्या बरोबर लव्हसीन असलेल्या सगळ्याच पात्रांचे डोळे चमकले आणि हे पाहून माझ्या आणि बाबुलालच्या छातीत धस्सच झाले!
"च्यामारी गण्यासाठी वेगळी सेक्युरिटी ठेवावी लागती की काय?" बाबुलाल माझ्या कानात कुजबुजले.
नटीला पाहताच हेकट हेडमास्तर दाबे यांनी ताबडतोब शाळेचे थेटर प्रॅक्टिस साठी देऊन आपले सामाजिक वजन वाढवले. मग काय रोज संध्याकाळी शाळेच्या थेटरात प्रॅक्टिसेस सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी भैरू पैलवान आणि दाबेसर दोघेही दिगदर्शकाने न सांगताच कोमल बालाशी जास्त लगट करतात अशी तक्रार बोकडे सरानी मला खाजगीत केली. आठ दिवसा नंतर सुध्दा डायलॉग्स पाठांतराच्या बाबतीत देखील सर्वांची बोंबा बोंबच होती.
लोला रागा रागात जालीम सिंगला म्हणते.
"जालीमसिंग तू नुसता नालायकच नाहीस तर पाजी हलकट आहेस"
हे वाक्य कोमलबाला उर्फ गणू असा म्हणत असे.
"जालीमसिंग तू नुसता नंदी बैल नाहीस तर हाजीपालकट हायेस."
आता मी गण्याला डोके फोडून सांगितले की भूमिका करताना पर्सनल घ्यायचे नाही तरी तो मूर्ख माणूस कायम नंदीबैल आणि हाजीपालकटच म्हणत असे. आता मी एक दुसरा एव्हडा सुन्दर लव्ह सिन लिहिला होता की ज्याचे नाव ते.
त्या सिन मध्ये लोला लुंगीवाला बागेत झुल्यावर बसून एक विरह गीत गात असते आणि बद्री तिला झोका देत असतो.
तेवढ्यात जालीम सिंगचा प्रवेश होतो आणि लोलाला बद्री झोका देत आहे हे पाहून त्याचा जळफळाट होतो आणि मग बद्री झोका थांबवतो आणि दोघांची तुफान मारामारी होते. आम्ही वर आढ्याला छान पैकी झोका बांधला वजनदार कोमलबाला त्या वर मजेत झोके घेऊ लागली. आढे कुर कुरु लागले. मागून बद्री महाराज मिटक्या मारीत तिला झोके देऊ लागले. जालीम सिंगचा प्रवेश झाला. बद्रीला काय जोर आला कुणास ठाऊक जालीम सिंग जसा तिच्या समोर येऊन कमरेवर हात ठेवून ऐटीत उभा राहिला तसा बद्रीने अधिकच जोरात झोका दिला. पाय लांब केलेल्या कोमलबालाने बेसावध भैरू पैलवानाला अशी काय दणकावून लाथ मारली की भैरू पैलवान त्या जोरदार धडकेने "बक्क" असा आवाज करून एखाद्या रॉकेट सारखा आम्हा दोनचार प्रेक्षकांच्या डोक्यावरून उड्डाण करून हॉलच्या मागच्या भिंतीला धडक मारून मग जमिनीवर पालथा लँड झाला. इकडे झोक्याच्या मागे उभा असलेला बद्री भैरूच्या उड्डाणाचे अपूर्व दृश्य पाहण्यात एव्हडा गुंग झाला की झोक्यावर परत आलेल्या कोमलबालाने त्याला पण कधी धडक मारली हे त्याचे त्यालाच कळले नाही. मला आणि बाबुलालला एवढेच दिसले की तो देखील त्या जबरदस्त दणक्याने स्टेजच्या मागच्या खिडकीतून मेलो मेलो असे बोंबलत रिव्हर्स उड्डाण करून गडप झाला मग दोन एक क्षणांनी धप्प असा आवाज येऊन बद्रीच्या हाडे मोडल्यागत केकाटण्याचा आवाज आला.
शाळेच्या मागच्या कचराकुंडीत जेव्हा आम्हाला एकदाचा बद्री सापडला तेव्हा बेशुध्ध व्हायच्या आधी तो मला एव्हडेच म्हणाला:
"काही म्हणा सर पण आपली हिरोईन लै भक्कम हाये." (क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users